आशीर्वाद व शाप वचन: तेव्हा शेम व याफेथ यांनी वस्र घेऊन आपल्या खांद्यावर ठेवले व पाठमोरे होऊन आपल्या बापाची नग्नता झाकली, त्यांची तोंडे पाठमोरी होती म्हणून त्यास आपल्या बापाची नग्नता दिसली नाही. उत्पत्ती ९:२३. देव आपल्याकडून सुज्ञ व शिस्तबद्ध जीवनाची मागणी करितो. देवाची आज्ञा आहे कि,’आपल्या आई वडिलांचा मान राख म्हणजे जो देश मी तुला देत आहे त्यात चिरकाळ राहशील, निर्गम २०:१२. याचा अर्थ आई वडिलांचा मान राखण्यावर आपले आशीर्वाद अवलंबून आहेत. आपण अनेकदा आपल्या आईवडिलांना योग्य मान देत नाही. त्यांच्याशी उद्धटपणे वागतो व आपल्या वागण्याचे समर्थनही करतो. जसे, ते योग्य वागत नाहीत मग मी त्यांच्याशी का योग्य वागू ? परंतु देवाने आपल्याला स्पष्टपणे सांगितले आहे कि आपल्या आई वडिलांचा मान राख त्याने असे सांगितले नाही कि विशिष्ट परिस्थितीत अथवा त्यांच्या स्वभावानुसार त्यांचा मान राख, म्हणून आमचे आई वडील कसेही असोत त्यांचा मान राखला पाहिजे. नोहा द्राक्षरस पिवून झिंगला हे त्याचे कृत्य योग्य होते का? नीती २०:१ व हब :२:१५. सांगते नोहाचे हे वागणे योग्य नव्हते. तरी त्याचा पुत्र हाम याने त्याचा मान राखणे अगत्याचे होते. त्याने बापाची नग्नता पाहिली व त्याच्या दोन्ही भावास त्या बद्दल सांगितले. त्याचे ते वागणे आपल्या बापाची लाज काढण्यासारखे होते. याउलट शेम व याफेथ यांनी अगदी सुज्ञता दाखवत आपल्या बापाचा मान राखला. त्याचे प्रतिफळ त्यांना लगेच मिळाले. नोहा जागा झाल्यावर शेम व याफेथ त्याच्याशी कसे वागले व हाम कसा वागला हे जेव्हा त्याला कळाले, तेव्हा त्याने हामच्या वंशाला गुलामीचा शाप दिला व शेम व याफेथ यांच्या वंशाला आशीर्वाद दिला, ज्याचे परिणाम आजही दिसतात. सुज्ञ व शिस्तबध्द जीवन आशीर्वाद मिळवते तर बेशिस्त जीवन शाप मिळवते हे आपण येथे लक्षात घेतले पाहिजे. आपल्यापेक्षा थोरांशी आदराने वागा, आई वडील यांचा मान राखा, जीवन सावधपणे वागवायचे आहे हे नेहमी लक्षात असू द्या . बेदरकारपणे लागल्याने शाप येऊ शकतात. प्रार्थना: हे प्रभू मी सुज्ञतेचे व शिस्तबध्द जीवन जगण्यास समर्थ व्हावे म्हणून तू मला तुझा पवित्र आत्मा दिला यासाठी मी तुझे आभार मानतो. तरी मला पवित्र आत्म्याचे ऐकण्यास व तुझ्या वचनानुसार जीवन जगण्यास मला कृपा पुरव येशूच्या नावाने मागतो, आमेन.