“आत्मिक युद्ध” गलती ४:१०

वचन : वार, महिने, सणाचे काळ, व वर्षे हीं तुम्ही पाळता. गल :४: १०

आत्मिक युद्ध

प्रस्तावना: प्रियांनो, संत पौल गलतीकरांच्या मंडळीला मार्गदर्शन करताना सांगत आहे की, ‘ जुने ते होऊन गेले आहे, पूर्वी तुम्ही ज्या गोष्टी अनुसरत होता, त्या आता अनुसरण्याची गरज नाही कारण आता प्रभू येशूच्या द्वारे तुम्ही देवाचे पुत्र व कन्या आहा. आता तुम्ही दासांसारखे जीवन जगणे योग्य नाही तर मुलाचा हक्क दाखवत जीवन जगावे. परंतु जसे आपण पाहिले की आपले युद्ध माणसा बरोबर नाही तर सैतानाबरोबर व त्याच्या सत्तांन बरोबर आहे. इफिस ६:१२. म्हणून आपण हे समजून घ्यावे की हा  सैतान आपल्याला त्याच्या दास्यात ठेवण्यासाठी  वेगवेगळ्या प्रकारेभूतकाळात अडकवुन ठेवतो. जसे परंपरा, संस्कृती, जात, इतिहास अशा अनेक गोष्टींचा तो प्रयोग करून आपल्याला ख्रिस्ताने दिलेल्या गौरवी व सामर्थी जीवनापासून दूर ठेवतो, व पुन्हा आपण त्या सैतानाच्या खोट्याला शिक्षणाला बळी पडतो. म्हणून आत्मिक युद्धात सैतानावर जर विजय मिळवायचा असेल तर आपण हे समजून घेतले पाहिजे की, मी नव्याने जन्म पावलो आहे, मी नवी सृष्टी आहे आता जुन्या कोणत्याच गोष्टींना मी माझ्या जीवनात थारा देणार नाही.

जेंव्हा आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो तेंव्हा आपला नवीन जन्म होतो. वरील वचन आपल्याला जुन्या जीवनशैली विषयी सावध करीत आहे. बायबल सांगते, आतापासून आम्ही कोणाला देहावरून ओळखत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहावरून ओळखले होते तरी आता यापुढे आम्ही त्याला तसे ओळखत नाही.जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पाहा, ते नवे झाले आहे. २ करिंथ ५: १६-१७.  

अशक्त व भिकार्डे प्राथमिक शिक्षण: संत पौल नियमशास्रातील जुन्या गोष्टींना भिकार्डे शिक्षण संबोधतो.( गल ४:९ पंडिता रमाबाई ) व बायबल सोसायटी ओल्ड व्हर्जन च्या भाषांतरात या शिक्षणाला दुर्बल व निःसत्व संबोधले आहे. कारण ते दासपणाच्या जीवनाकडे नेते. म्हणून प्रभू येशूच्या शिक्षणात आपण मुळावलो पाहिजे. जुन्या करारातील गोष्टी जुन्या कराराचे ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व भाषिक सन्दर्भ लक्षात घेऊन, व स्वर्गीय देवाची दैवी योजना प्रगतिशील पणे पुढे जात आहे हे समजून घेत त्या समजून घ्याव्यात. 

बायबल सांगते,”तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेला आहा तर जगाला जिवंत असल्या सारखे विधि का मानिता ? उपभोगाने ज्या वस्तू नष्ट होतात त्यांना हाती धरू नका , चाखू नका , स्पर्शू नका, असे जे मनुष्याच्या आज्ञांचे व शिक्षणाचे विधी आहेत ते का मानिता? याला स्वेच्छासेवा, दिनभाव , व देहदंडन यांवरून ज्ञानाचे नाव आहे खरे, तरी देहस्वभावाच्या तृप्तीला प्रतिबंध करण्याची त्यांची योग्यता नाही.कल : २:१६-२३, 

नासत चाललेल्या गोष्टी : संत पौल इफिसकरांच्या मंडळीला लिहिलेल्या पत्रात सांगतो, ‘राष्ट्रांच्या लोकांप्रमाणे तुम्ही मनाच्या व्यर्थतेत तुम्ही चालू नये, त्यांची बुद्धी अंधकारमय व त्यांचे अंतःकरण कठीण असल्यामुळे ते अज्ञानी असून देवापासून दूर आहेत.ते बधिरलेले असून, लोभाने अशुद्धता करण्यासाठी कामातुरपणाच्या स्वाधीन आहेत. तुम्ही मात्र प्रभू येशूच्या सत्य शिक्षणात आहात, म्हणून पूर्वीच्या वर्तुणूकींमुळे व फसवणाऱ्या वासनांमुळे नासत चाललेला जुना स्वभाव टाकून, आपल्या प्रभू येशूच्या सत्य शिक्षणात तुमच्या मनाचे नवीकरण करावे व जे तुम्ही देवाकडून न्यायी व पवित्र झालेला आहात त्या तुम्ही न्यायीपणात व पवित्रतेत जीवन जगावे   इफिस ४:१७-२४  

रोम १२: १-२ सांगते”यास्तव, भावांनो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांस विनंती करितो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र, देवाला आवडता यज्ञ अशी सादर करावी हि तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आणि या जगाशी समरूप होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठीकी देवाचा मनोदय, जो उत्तम आणि आवडता आणि परिपूर्ण, तो काय आहे याची तुम्ही पारख करावी. 

दैहिकतेचे लक्षण: जुन्या स्वभावातील जीवन म्हणजे जुन्या सवई, आचार, विचार किंवा आपण म्हणू शकतो संपूर्ण जीवनशैली हे जगिक जीवनाचे म्हणजे दैहिकतेचे लक्षण आहे. १ करिंथ ३:३  सांगते,”तुम्ही अजूनही दैहिक आहा; कारण तुम्हांमध्ये हेवा व भांडण [व फुटी ] आहेत, ह्यावरून तुम्ही दैहिक आहा, आणि माणसांच्या रीती प्रमाणे वागता की नाही? 

दैहिकतेच्या जीवनात, ‘व्यभिचार, जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, भांडण , मत्सर, राग, तंटे , फुटाफुटी , तट , हेवा , खून , दारूबाजी , विलास , या गोष्टींचा समावेश होतो व या जीवनाला देवाच्या राज्यात देवाच्या राज्यात स्थान नाही .गल ५:१९-२१. 

सारांश :  १ तिम ४:१-२ सांगते,” आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील, लबाड बोलणाऱ्या मनुष्याच्या ढोंगाने ते फुस लाविणाऱ्या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील. त्या मनुष्याचा सद्सदविवेक डागलेला असा होईल. म्हणून, आपल्याला जर आत्मिक युद्धात टिकाव धरून विजयी जीवन जगायचे आहे तर जुन्या गोष्टी व ख्रिस्तामधील नवीन जीवन यात स्पष्ट विभागणी केली पाहिजे. जुने जीवन व नवीन जीवन यात सीमारेषा आखून जुन्या  जीवनाला नवीन जीवनात येऊ देऊ नये व नव्या जीवनालाही जुन्याकडे नेऊ नये.

देव बाप समजण्यास सहाय्य करो व तुम्हाला सैतान विरुद्ध मोठा जय देवो. अमीन 

रेव्ह कैलास [आलिशा ] साठे. 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole