आत्मिक युद्ध

योहान ८:३२: तुम्ही सत्य जाणाल व सत्य तुम्हांला मोकळें करील.

आत्मिक युद्ध

प्रस्तावना: प्रियांनो , सैतान हाच मानवाचा खरा शत्रू आहे. बायबल सांगते, आपले युद्ध  रक्त व मास यांच्याशी नव्हे, तर ते सत्तांशी, अधिकाऱ्यांशी, या जगातील अंधाराच्या सत्ताधाऱ्यांशी, व आकाशातील दुष्ट आत्म्यांशी आहे.इफिस ६:१२. याचा अर्थ मानव हा भौतिक गोष्टींमुळे संकटात नाही तर त्याच्या आत्मिक स्थिती मुळे संकटात आहे. भौतिक गोष्टी आपण पाहू शकतो, सहज समजू शकतो परंतु आत्मिक गोष्टी पाहण्यासाठी व समजण्यासाठी आत्मिक दृष्टी किंवा समज असावी लागते. म्हणून प्रभू येशू म्हणतो, मानवाला सत्य समजणे अत्यंत गरजेचे आहे कारण सत्यच त्याला सैतानाच्या दास्यातून मुक्त करील.हे सत्य काय आहे हे आपण बायबल मधील एका प्रसंगावरून समजून घेऊ.

आत्मिक अहंकाराचे जोखड: सैतानाने माणसांना अनेक प्रकारच्या अहंकारामध्ये वाढवले आहे. त्यात वंश अहंकार अत्यंत घातक आहे, हे इतिहास आम्हाला शिकवतो. हा अहंकार माणसाला सत्यापासून दूर ठेवतो व भ्रामक कल्पनांमध्ये वाहवत नेतो. अहंकारी माणूस आत्मिक दृष्टी गमावतो. त्याचे अंतःकरण सत्य स्विकारण्यास तयार नसते. तो येशू ख्रिस्ताच्या संपूर्ण शिक्षणाला अनुसरू शकत नाहीत. 

एकदा असे झाले की, येशू ख्रिस्ताचे शिक्षण व सामर्थ्य पाहून काही यहुदी प्रभावित झाले. त्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. तेव्हा त्याने त्यांना म्हटले,’ जर तुम्ही माझ्या शिकवणी नुसार वागाल तर तुम्ही खरोखर माझे शिष्य आहा. माझ्या शिकवणी नुसार वागल्याने तुम्हाला सत्याचा अनुभव येईल व तुम्ही बंधमुक्त व्हाल. हे एकूण त्या  यहुद्यांचा अहंकार जागा झाला. ते येशू ख्रिस्ताला म्हणाले आम्ही आब्राहामाचे संतान आहोत, व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो. ते दैहिक परंपरेने फुगले होते म्हणून प्रभू येशू सांगत असलेले आत्मिक रहस्य ते समजू शकले नाहीत. पुढे प्रभू येशू त्यांना म्हणतो अब्राहाम किंवा देव तुमचा बाप नाही तर सैतान तुमचा बाप आहे. कारण तुमच्यात देवाच्या शिक्षणाला अनुसरण्याची इच्छा नाही परंतु सैतानाद्वारे जो अहंकार येतो तो तुमच्यात आहे. तुम्ही पापाचे दास आहात.योहान ८:३२-४७.

नम्र व्हा, व देवाला शरण जा  म्हणजे अहंकाराचे जोखड तुटेल : नाशाच्या आधी मनुष्याचे हृदय गर्विष्ट असते, आणि सन्मानापूर्वी नम्रता असते नीती :१८:१२ यिर्मया ९:२३-२४ सांगते,”यहोवा असे म्हणतो, ज्ञानवानाने आपल्या ज्ञानाविषयी आढ्यता मिरवू नये व बालवानाने आपल्या बलाविषयी तोरा मिळवू नये व धनवानाने आपल्या धनाविषयी अभिमान बाळगू नये. परंतु जो अभिमान बाळगतो त्याने याविषयी अभिमान बाळगावा की तो समजतो व मला ओळखतो असा की जो पृथ्वीवर प्रेम दया, न्याय व न्यायीपण चालवतो तो मी यहोवा आहे कारण या गाष्टींमध्ये मला संतोष आहे, असे यहोवा म्हणतो.पुढे पवित्र शास्त्र सांगते, तुम्ही म्हणता आपण नगरात जाऊ व्यापार करू पैसा कमवू,परंतु सत्य हे आहे की तुम्हांला उद्याची माहिती नाही, तुमचे आयुष्य वाफेसारखे आहे, म्हणून तुम्ही म्हणावे प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व हे किंवा ते करू. स्वतःला नावाजून घेण्यासाठी फुशारकी मारणे वाईट आहे. याकोब ४:१३-१७. बायबल सांगते,”देव गर्विष्ट लोकांना विरोध करतो, परंतु तो नम्र जनांस कृपा देतो. यास्तव देवाच्या अधीन असा, पण सैतानाला आडवा, म्हणजे तो तुम्हा पासून पळेल. देवा जवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल. प्रभूच्या दृष्टीने नम्र व्हा म्हणजे तो तुम्हांस उंच करील. याकोब ४:६-८,१०. 

प्रभू येशूला अनुसरा: सैताना विरुद्धचे आत्मिक युद्ध जर जिंकायचे असेल तर प्रभू येशूला अनुसरणे गरजेचे आहे. जो प्रभू येशूला अनुसरेल तो आत्मिक अहंकाराच्या जोखडात अडकणार नाही. फिलिप्पे २:३-११ सांगते, “तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका; तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ट माना; तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पाहा. अशी जी चित्त वृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायींही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही; तर स्वतःस रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण; आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लिन केले. ह्यामुळे देवाने त्याला अतिउच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते  त्याला  दिले. ह्यात हेतू हा की, स्वर्गात पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.

रेव्ह कैलास [आलिशा ] साठे .

—————————————————————————————————————————–

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole