आदाम व हव्वा
वचन:
परमेश्वर देवाने आदाम व त्याची स्त्री यांसाठी चर्म वस्रे करून त्यास लेवविली. उत्पत्ती ३:२१.
अनेक ईश्वरविज्ञानी विद्वानांच्या मते हि चर्म वस्रे म्हणजे न्यायीपणाची वस्रे आहेत. देवाने आदाम व त्याची पत्नी यांच्या पाप क्षमेसाठी प्राणी बळी दिला व या रक्त शालनाद्वारे त्यांच्या पापावर पांघरून घातले. काहीही असो, आदाम व हव्वेने आज्ञाभंगाचे पाप केल्यानंतर त्यांना जाणीव झाली कि ते नग्न आहेत त्यामुळे त्यांना स्वतःच्या अवस्थे बद्दल लाज वाटू लागली, म्हणून त्यांनी अंजिराची पाने स्वतः भोवती गुंडाळून आपली नग्नता झाकण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा देवाला सामोरे जाण्याचा प्रसंग आला तेव्हा ती दोघेही घाबरली, अपराधीपणाची भावना व शिक्षेची भीती यामुळे देवापासून लपू लागली पण त्यांना ते शक्य नव्हते. त्याच अवस्थेत त्यांना देवाच्या न्यायला सामोरे जावे लागले. देव न्यायी आहे तो पवित्र आहे त्याने त्याचा न्याय पूर्ण केला. पण देवाच्या क्रोधाला देवाची प्रीती आवार घालते हे खरे आहे. व हे हि खरे आहे कि तोच निर्माणकर्ता असल्यामुळे बापाचे मन त्याच्या ठायी आहे..
आपण आपल्या मुलांना शिक्षा करत असताना त्या शिक्षेचे दुःख जितके मुलांना होते त्यापेक्षा अधिक दुःख आपल्याला होते. आपला राग शांत झाल्यावर आपण लेकराला उराशी कवटाळून केलेल्या शिक्षे बद्दल खेद व्यक्त करितो, व झालेल्या गोष्टी पुन्हा नीट कशा करता येतील या विषयी लेकराशी हितगुज करून त्याचे सांत्वन करितो. जसजसे लेकरू शांत होते तसतसे आपण समाधान पावतो व घडलेल्या गोष्टी बद्दल खेदकरीत न बसता पुन्हा सर्व व्यवस्थित करण्याच्या कामी लागतो. अगदी असेच या ठिकाणी घडले असावे असे मला वाटते कारण पित्याची प्रीती यापेक्षा वेगळा विचार करू शकत नाही. हि चर्मवस्रे सांत्वनाची वस्रे आहेत, येशू ख्रिस्ता द्वारे होणाऱ्या उद्धाराची आशा देणारे हि वस्रे आहेत. हि वस्रे लेवविताना तो हेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहे कि भिऊ नका मी तुमचा पूर्णपणे त्याग केला नाही करणार नाही मी माझा पुत्र येशू ख्रिस्ता द्वारे तुमच्या तारणाची योजना केली आहे.मी पुन्हा सर्व नवे व पवित्र करिन. परिपूर्ण पित्याची; परिपूर्ण इच्छा; परिपूर्णतेकडे वाटचाल करीत आहे, तिला कोणीच रोखू शकत नाही.वधस्तंभाला उंच करा, सुवार्तेचा चंग बांधा.
प्रार्थना: हे प्रभू येशू तू माझ्या मर्यादा जानतोस तरी माझ्यावर प्रीती करतोस म्हणून मी तुझे आभार मानतो.
तुझा साक्षी म्हणून जीवन जगण्यास व सुवार्तेची सेवा करण्यास मला साहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो. आमेन.
रेव्ह कैलास [आलिशा ] साठे.