आपले पाचारण हेच आपले सामर्थ्य ! उत्पत्ती १२:१

 आपले पाचारण हेच आपले सामर्थ्य !

वचन: देवाने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले गणगोत्र आपले पितृगृह सोडून मी दाखवीन त्या देशात जा. उत्पत्ती १२:.

प्रस्तावना: अब्रामचे पाचारण आम्हाला खूप काही सांगते,या पूर्वी हाबेल, शेथ, अनोश , हनोख नोहा हे सर्व देवाबरोबर चालणारे होते.पण अब्राम देवाला ओळखणारा होता.अब्रामच्या पाचरणातून देव माणसाचे नैसर्गिक नाते लक्षात येते. तुम्ही कोणीही असा देवाचा अधिकार तुम्हावर आहे तो तुम्हाला अधिकाराने बोलवू शकतो.आपल्या जीवनात त्याची योजना पूर्णतेस नेण्यासाठी; त्याचे कार्य आपण जन्म घेण्या अगोदर पासून सुरु होते

प्रेषित पौलाचे पाचारण : संत पौल म्हणतो,” मी माझ्या आईच्या गर्भातून जन्मलो तेंव्हापासून ज्या देवाने मला वेगळे केले व आपल्या कृपेने मला बोलावले, त्याला हे बरे वाटले की , त्याने आपला पुत्र माझ्यात प्रगट करावा, यासाठी राष्ट्रांच्या लोकांमध्ये मी त्याचे शुभ वर्तमान गाजवावे, तेव्हा मी माणसांचे अनुमत न घेता . आणि जे माझ्या पूर्वी प्रेषित होते त्यांच्याकडे वर येरुशलेमेश न जाता, मी अरबस्थानात निघून गेलो व फिरून दिमिष्कास परत आलो  गल :१५-१७. संत पौल जन्माने यहुदी होता, परूशी पंथाचा तो अग्रणी पुढारी होता, समाजात व राजदरबारी त्याला विशेष स्थान होते . परंतु जेंव्हा त्याला ख्रिस्ताचा साक्षी होण्यासाठी पाचारण झाले त्याने सर्व काही सोडले, कोणाचाही विचार न करता तो आपल्या पाचरणाला अनुसरला.  

यिर्मयाचे पाचारण : यिर्मयाला देव म्हणतो , मी तुला उदरांत निर्माण करण्याच्या पूर्वी मी तुला जाणिले, आणि तू गर्भस्थानातून निघण्याच्या आधी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांकरिता भविष्यवादी म्हणून नेमले आहे. यावर यिर्मयाने म्हटले हे प्रभू कसे बोलावे हे मला माहित नाही, मी केवळ मूल आहे. तेव्हा देव म्हणाला स्वतःला लहान समजू नको मी तुला ज्याकडे पाठविलं त्याकडे तू जाशील, आणि जे काही मी तुला आज्ञापिले ते बोलशील, भिऊ नको कारण मी तुला सोडवायला तुझ्या बरोबर आहे. मग हात पुढे करून त्याच्या मुखास स्पर्श केला व म्हटले माझी वचने मी तुझ्या मुखात घातली आहेत. पहा , उपटायला व मोडायला व नाश करायला व पाडून टाकायला, बांधायला व लावायला मी तुला या दिवशी राष्ट्रांवर व  राज्यांवर नेमून ठेवले आहे. यिर्मया :५-१०. 

अब्रामला सुध्दा देवाने असेच निवडले होते, देवाने त्याच्या योजने नुसार त्याच्या कुटुंबाला खास्द्यांचे उर येथून बाहेर काढले,उत्पत्ती ११:२७३२.नंतर त्याला त्याच्या कुटुंबापासून वेगळे केले. देवाच्या या आव्हानाला अनुसरणे अब्रामला सोपे नव्हते, पण देव जेव्हा आम्हाला त्याच्या योजने नुसार बोलवतो तेव्हा त्याच्या कृपेच्याद्वारे अनुग्रह करून त्याला अनुसरण्याचे सामर्थ्य देतो. त्याकाळात माणसाचे जीवन त्याच्या जवळच्या लोकांवर अथवा समजावर अवलंबून असायचे. आपला समाज सोडून माणूस जिवंत राहणे त्याकाळी अवघड होते. पण देव कृपेने अब्रामने देवाच्या पाचारणाला सकारात्मक प्रतिसाद दिला प्रत्येक पावलावर देवाचे सहाय्य, सामर्थ्य, आशीर्वाद अनुभवत तो विश्वासाचा पिता ठरला. आपणही विपरीत परिस्थितीकडे पाहता देवाच्या पाचारणाला सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. देव विश्वासयोग्य आहे.

 प्रार्थना: हे प्रभू येशू मला तू निवडले आहे, तुझी योजना मला प्रगट केली आहे; म्हणून मी तुझे आभार मानतो तरी मला धीराने तुला अनुसरण्यास कृपा पुरव , येशूच्या नावाने मागतो आमेन.

 रेव्ह . कैलास [आलिशा] साठे .

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole