विश्वासाचे जीवन
वचन: मी तुज पासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, तुझे मी कल्याण करीन, तुझे नाव मोठे करीन, तू कल्याण मुलक हो, उत्पत्ती १२:२.
देवाने अब्रामला पितृगृह सोडण्याची आज्ञा केल्यानंतर, त्याच्या विषयीची भावी योजना विदित केली, जी खरोखरच खूप भव्यदिव्य होती. अब्रामला ती किती समजली असेल कोण जाणो. आपल्या पासून मोठे राष्ट्र निर्माण होईल, आपले नाव खूप मोठे होईल व आपण आशीर्वादाचा श्रोत होऊ हे पंच्याहत्तर वर्षाच्या आब्राहामाला जो अपत्यहीन व भटकंतीचे जीवन जगत होता त्याला हे सर्व समजणे अथवा या गोष्टींची संपूर्ण जाणीव होणे शक्य नव्हते. या गोष्टीना भविष्यात पूर्ण होताना पाहणे सोपे नव्हते.
अब्राहाम देवाच्या आज्ञे नुसार आपल्या आप्तांना सोडून देव दाखवेल त्या वाटेने गेला. त्याने भटकंतीचे जीवन जगले, डेऱ्यातून, तंबूतून वस्ती केली, अनेक बिकट प्रसंगांना तोंड दिले. परंतु देवाचे वचन सांगते की,
त्याने
अभिवचणार विश्वास ठेवला व ज्या नगराला पाये आहेत, ज्याचा योजणारा व बांधणारा देव आहे आशा नगराची तो वाट पहात होता .इब्री ११:८–१०.
देवाने त्याच्या पासून इस्राएल राष्ट्र निर्माण केले. त्याचे नाव इतके मोठे केले की तो विश्वासाचा पिता ठरला आहे. आज अब्राहामाला आपल्या आत्मिक पित्याचे स्थान देणारे विश्वासणारे आकाशातील तार्यांप्रमाणे अगणित आहेत. कारण त्याने विश्वास ठेवला धीराने आज्ञापालन केले.
यावरून आपण समजून घ्यावे कि आज आपली सामाजिक, राजकीय, व आर्थिक स्थिती काय आहे हे महत्वाचे नाही. तुम्ही कोणीही असा, कसेही असा, अगदी अशिक्षित, गरीब , अथवा दुर्बल पण जर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहात
तर
तुमचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे या बद्दल शंका घेण्याचे कारण नाही. आज भलेही तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्याचे चित्र पाहता येत नसेल पण तुम्ही आब्राहामा प्रमाणे देवाच्या मार्गदर्शनाला प्रतिसाद देत पुढे चालावे हे उत्तम आहे. देवाचे वचन काळाच्या कसोटीवर खरे उतरले आहे, स्तोत्र १८:३०.आकाश व पृथ्वी नाहीसे होईल पण देवाचे वचन सर्व काळ राहील. मत्तय २४:३५. खरोखर देवाच्या योजना आकाशापेक्षा उंच असतात हेच खरे. यशया ५५:८–९.
प्रार्थना: हे प्रभू येशू तू मला निवडले म्हणून मी तुझे आभार मानतो. तरी तुझ्या दिव्य योजनांना समजून घेऊन तुझ्या इच्छेनुरूप चालण्यास मला सहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो आमेन.