वचन: आणि त्याला पाणी प्यायला दिल्यावर तिने म्हटले तुझ्या उंटांनाही प्यायला पुरेल इतके पाणी मी काढीन. उत्पत्ती २४:९.
देवाबरोबरचे आपले नाते समजून घ्या :जर जीवनात आपल्याला उत्तम ते मिळवायचे असेल तर आपले देवा बरोबरचे नाते सुरळीत असायला हवे. अनेकजण देवाबरोबरच्या आपल्या नात्याला गृहीत धरतात. ते देवाची त्यांच्या बद्दलची इच्छा काय आहे या बद्दल कधीच विचार करत नाहीत. त्यामुळे देवाच्या द्वारे प्राप्त कार्या पासून व त्याच्या सहाय्या पासून वंचित राहतात. त्यांचा जीवन प्रपंच स्वकेंद्रित असतो. त्यामुळे ते उत्तम आशीर्वादांना मुकतात. अब्राहमच्या जीवनाकडे पहा तो आपल्या पाचारणाला अनुसरत होता. देवाबरोबर त्याचे नाते अगदी घट्ट होते. त्यामुळे देवाच्या सहाय्याने उत्तम ते मिळवणे त्याला श्यक्य होते.म्हणून तो विश्वासाने अलियेजरला खात्री देतो कि,” स्वर्गीच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून, माझ्या जन्मभूमीतून आणिले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईन; तो तुझ्या पुढे आपला दूत पाठवील, आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी मुलगी आण. उत्पत्ती २४: ७.
अब्राहमा प्रमाणे ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे देवाच्या इच्छेत पवित्र जीवन जगणे, व त्याच्या कार्याला अनुसरणे हे आपले कर्तव्य आहे असे जर आपण समजतो तर आपले
त्याच्याशी नाते आहे आणि उत्तम ते मिळविण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही.जरा या अभिवचनावर विचार करा, “मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र अहा. मी आत्तापासून तुम्हाला दास म्हणत नाही; कारण धनी काय करितो ते दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे; कारण जे काही मी आपल्या पित्या पासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हास कळवले आहे .
तुम्ही मला निवडिले नाही तर मी तुम्हास निवडिलें व तुम्हास नेमले आहे. ह्यात हेतू हा कि तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे,” योहान १५: १४–१७.
आपली योजना देवाच्या हाती सोपवून द्या: आपले नाते देवाबरोबर चांगले आहे याची आपल्याला खात्री असेल तर आपण विश्वासाने आपली योजना देवाच्या हाती सोपवून देऊ शकता. असे केल्यास उत्तम यश आपल्या हाती पडते. अलियेजर अब्राहामाच्या सांगण्याप्रमाणे त्याच्या नातलगांच्या देशात आला होता, पण त्याच्या साठी तो देश अपरिचित होता. अशा परिस्थितीत त्याला अब्राहामाच्या नात्यातून इसहाकासाठी सर्वगुण संपन्न मुलगी शोधायची होती. हे खरोखरच खूप कठीण होते पण इतके दिवस अब्राहामाबरोबर राहिलेल्या या त्याच्या कारभाऱ्याला देवाचे सामर्थ्य कळले होते. त्याचा विश्वास होता कि देवच हे शक्य करू शकतो. म्हणून त्याने एक उत्तम युक्ती शोधली व ती देवाच्या हाती सोपवून दिली. तो असे करू शकला; कारण अब्राहामाचे
देवाबरोबरचे नाते किती घट्ट आहे हे तो ओळखून होता.
चांगले करण्याचा कंटाळा कधीच नको: पवित्र शास्त्र आम्हास यासाठी नेहमीच उत्तेजना देते की,”चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये. कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल” गलती ६:९.
जीवनात जर उत्तम गोष्टी मिळवायच्या असतील तर आमचे मन उत्तम संस्कारानी संस्कारित असायला हवे व आमचे शरीर सदृढ व उत्साही असायला हवे.
अलियेजरने देवाकडे प्रार्थना केली कि,” हे देवा पहा मी येथे पाण्याच्या श्रोता जवळ उभा आहे, व गावातील लोकांच्या मुली पाणी काढण्यासाठी आता येथे येत आहेत, तर असे होऊ दे कि मी ज्या मुलीला म्हणेल कि मी तुला विनंती करतो कि मला पिण्यासाठी तुझी घागर उतर तेव्हा ती म्हणेल कि पी, व तुझ्या उंटांनाही पुरेल इतके पाणी मी देते. असे जिच्या बाबतीत घडेल तीच तू माझ्या धन्या साठी निवडली आहेस असे मी समजेन. उत्पत्ती २४:१४. या मागे त्याचा हेतू हा होता कि त्याला इसहाक साठी सुस्वरूप मुलगी तर हवीच होती पण त्याच बरोबर उत्तम संस्कार व आरोग्य संपन्न असलेली मुलगी हवी होती. म्हणून त्याने अशी अट घातली होती, कारण विहिरीत उतरून घागर भरून आणायची व एका अनोळखी माणसासाठी खाली करायची हे माणुसकीच्या नात्याने एकवेळ शक्य आहे. पण त्याच्या बरोबर त्याच्या दहा उंटांसाठी विहिरीतून पाणी काढणे हि सोपी गोष्ट नाही, जाणकारांच्यामते एक उंट तीन मिनिटांत दोनशे लिटर पाणी पितो [५३ गॅलन]. विचार करा दहा उंट किती पाणी पिऊ शकतात? काही घेणेदेणे नसताना अशी जबादारी तीच व्यक्ती घेऊ शकते जिच्यात प्रचंड शक्ती, उत्साह व मानवतेच्या प्रति विलक्षण आदर व प्रेम असेल. रिबकेवर तिच्या परिवारात चांगले संस्कार झाले होते. तिचे कुटुंब देवाला ओळखणारे होते. त्याच बरोबर तिचे आरोग्य उत्तम होते व तिचे जीवन उत्साहाने भरलेले होते
त्यामुळे ती अलियेजरच्या विनंतीला कुठलीही अपेक्षा न ठेवता सकारात्मक प्रतिसाद देउ शकली व उत्तम आशीर्वादाची भागी झाली
कालेबचे उदाहरण घ्या, त्याचे मन देवाच्या वचनात संस्कारित होते म्हणून तो शरीराने देखील बलवान होता.वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी तो यहोशवाला
म्हणतो,” आज बघ मी पंच्याऐंशी वर्षाचा आहे. मोशेने मला पाठवले त्या दिवशी मी जितका समर्थ होतो तितका आजही आहे. लढण्याची व धावपळ करण्याची ताकत माझ्यात त्यावेळी होती तेवढीच आजही आहे. मग कालेब याला देवाने आशीर्वाद दिला आणि त्याला हेब्रोन वतन करून दिले. म्हणूनच कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याचे हेब्रोन हे आज पर्यंत वतन झाले आहे; ह्याचे कारण इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या इच्छे प्रमाणे तो निष्ठापूर्वक वागला
यहोशवा १४:१०–११,
आपल्याला जर जीवनात उत्तम आशीर्वाद हवे असतील तर आपले शरीर व मन आशीर्वादित असायला हवे आहे.देवाच्या वचनाच्या द्वारे
सुसंस्कारित
मन व सदृढ
शरीर असे जर आपले व्यक्तिमत्व असेल
व देवाबरोबरचे
आपले नाते घट्ट असेल तर आपण मानवतेच्या दृष्टीकोनातून चांगले करायला कधीच थकणार नाही तर परिणामतः उत्तम यशाचे मानकरी व्हाल .
प्रार्थना: हे प्रभू येशू तू प्रत्येक वेळी माझ्या बरोबर आहेस म्हणून मी प्रत्येक गोष्टीत तुझे सहाय्य,व मार्गदर्शन घ्यावे असे शहाणपण मला दे. मी माझ्याच बुध्दीवर अवलंबून राहू नये म्हणून माझे सहाय्य कर. मला उत्साही मन आणि सदृढ शरीर दे
येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन.