जीवन व मरण मनुष्याच्या हाती आहे, यहे १८:३२.

जीवनाचा मार्ग 

वचन: मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, तर मागे फिरा व जिवंत रहा यहे १८:३२.

उध्दाराचा मार्ग

प्रस्तावना: आपल्याला प्रश्न पडू शकतो की, मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही असे जर देव म्हणतो तर त्याने माणसाला अमर का केले नाही ? तर प्रियांनो, देवाने माणसाला अमर जीवन देऊनच निर्माण केले होते. परंतु आज्ञाभंगाच्या पापामुळे माणसात मरण आले. तरी हे शारीरिक मरण आहे आत्मिक नाही. देव या ठिकाणी आत्मिक मरणाबद्दल बोलत आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो,”मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ?” मत्तय १६:२६. 

याचा अर्थ शारीरिक मरण येणार परंतु त्याने जीवनाचा शेवट होत नाही, देवाचे वचन सांगते, “ह्या विषयी आश्चर्य करू नका. कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्म केली ती जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे. योहान ५:२८-२९. कारण मनुष्याला एकदा मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. इब्री ९:२७. 

देवाच्या दृष्टीकोनातून मृत्यु : शारीरिक मृत्यू नंतर दुसरा मृत्यू आहे आणि तो कोणाच्याही वाट्याला येऊ नये असे देवाला वाटते परंतु देवाचा न्याय पवित्रतेच्या कसोटयांवर आधारलेला आहे, या न्यायाचे वर्णन प्रगटीकरणाच्या पुस्तकात दिले आहे ते पुढील प्रमाणे,” नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला, त्याच्या तोंडापुडून पृथ्वी व आकाश ही पळाली,  त्यांकरिता ठिकाण उरले नाही.’ मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले, त्या वेळी पुस्तके उघडली गेली; तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले ते जीवनाचे होते, आणि त्या पुस्तकांमध्ये जे लिहिलेले होते; त्यावरून मृतांचा न्याय, ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला, तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यास बाहेर सोडले; मृत्यू व अधोलोक यांनी आपल्यातील मृतास बाहेर सोडले, आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला. तेव्हा मरण व अधोलोक हि अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. ज्याकोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही, तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. प्रगटीकरण २०:११-१५. 


देवाने केलेले उध्दाराचे कार्य :
मानवाच्या आज्ञाभंगाच्या पापामुळे त्याला शारीरिक मृत्यू प्राप्त झाला. परंतु आत्मिक मृत्यू त्याला प्राप्त होऊ नये म्हणून देवाने त्याच्यासाठी उध्दाराची योजना केली, ” देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला; अशासाठीकी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” योहान ३:१६ 

मानवाला आज्ञाभंगाच्या पापाच्या दोषातून मुक्त करण्यासाठी प्रभू  येशू ख्रिस्त मानवाच्या रूपाने या जगात आला, त्याने वधस्तंभावरील मरण सोसले परंतु देवाच्या इच्छेचा भंग केला नाही. पहिल्या परिपूर्ण मानवाने आज्ञाभंगाचे पाप केल्यामुळे मानवात मरण आले. परंतु दुसऱ्या परिपूर्ण मानवाने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने मरण पत्करले परंतु आज्ञाभंगाचे पाप केले नाही म्हणून मानवाला पुनः नीतिमत्व प्राप्त होऊन, जीवनाचे दार उघडले आहे. 

जीवन मनुष्याच्या हाती : प्रभू येशूने केलेल्या उद्धाराच्या कार्यामुळे मानवाला जीवन निवडण्याची संधी प्राप्त झाली आहे. जो मनुष्य आपल्या पापाची पश्चाताप करून क्षमा मागतो, त्याच्या पापाची क्षमा होते व त्याला नीतिमान जीवन जगण्याचे सामर्थ्य देवाकडून प्राप्त होते. अशा व्यक्तीवर न्यायाचा प्रसंग येणार नाही, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो,” मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. योहान ५: २४. 

जो मनुष्य प्रभू येशूवर विश्वास ठेवतो तोच देवाच्या दृष्टीने नीतिमान ठरतो. देवाचे वचन स्पष्टपणे बजावते की, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही, जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकूलत्याएक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. निवडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे, तरी मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्य दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्ये करितो तो प्रकाशाचा द्वेष करितो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही.परंतु जो सत्य आचारतो तो प्रकाशाकडे येतो ह्यासाठीकी आपली कृत्य देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे,’ योहान ३: १८-२१. 

देवाने मनुष्याला स्वतःच्या प्रतिरूपात निर्माण केले. अमर जीवन दिले, अधिकार दिला, सामर्थ्य दिले व फलद्रूपतेचा आशीर्वाद दिला. मानवामध्ये मरण हे देवाच्या व्दारे आले नाही तर त्याने केलेल्या आज्ञाभंगाच्या पापा मुळे आले.  देव सांगतो की, ‘प्रत्येक अपराध आपणा पासून  काढून टाका तुम्ही आपणास नवे हृदय व नवा आत्मा प्राप्त करा, तुम्ही का मरावे.’ या वरून स्पष्ट होते कि देवाला मनुष्याचे दुःख पाहून संतोष होत नाही, तर मनुष्याने आनंदी, सुखी, व शांतिमय जीवन जगावे व त्याच्या सहवासात राहावे हीच त्याची इच्छा आहे. आता जीवन व मरण मनुष्याचा हाती आहे. 

प्रार्थना: हे प्रभू येशू तू प्रीती आहेस, माझ्या साठी तुझे संकल्प चांगले आहेत म्हणून मी तुझे आभार मानतो. माझी कधीही अधर्मा कडे प्रवृत्ती होउ देवू नको. येशूच्या नावाने मागतो. आमेन.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole