झावळ्यांचा रविवार. लूक १९:२८-४०, मत्तय २१:१-११, मार्क ११:१-११, योहान १२:१२-१९.

                                                                    झावळ्यांचा रविवार 

झावळ्यांचा रविवार
प्रस्तावना: आपण ख्रिस्ती प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचे साक्षी आहोत, आपला विश्वास आहे की आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यामुळे तारलेले आहोत व आपल्याला सार्वकालिक स्वर्गीय जीवनाची आशा आहे. त्यामुळे चर्चच्या परंपरे नुसार आपण प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा दिवस साजरा करितो. त्यामध्ये हेतू हा आहे की आपण आपल्या अध्यामिक जीवनाविषयी अधिक जागरूक राहावे व अधिक आवेशाने ते जगावे. आणि त्याच बरोबर या जगाला तारणाची सुवार्ता या निमित्ताने आम्ही घोषित करितो. त्यामुळे पुनरुत्थानाच्या उत्सवाच्या तयारीतील प्रत्येक उत्सव, विधी, व आराधनेतील प्रत्येक कृती अतिशय महत्वपूर्ण आहे. 

झावळ्यांचा रविवार देखील याच उत्सवाचा भाग आहे. पुनरुत्थानाच्या अगोदरचा रविवार हा झावळ्यांचा रविवार म्हणून आपण साजरा करितो.  या दिवशी वेगवेगळे चर्च त्यांच्या परंपरे नुसार हा दिवस साजरा करितात. काही चर्चेस एकत्र येऊन प्रभात फेऱ्या काढतात, एकत्र भक्ती करून, सहभोजनाचा आस्वाद घेतात. बहुतेक चर्चमध्ये झावळ्यांचा वापर दोनहजार वर्षांपूर्वीचा तो प्रसंग जिवंत करण्यासाठी केला जातो. झावळ्यां इस्राएलच्या संस्कृती नुसार शुभ मानल्या जातात त्या अर्थाने सुध्दा त्यांचा उपयोग केला जातो. व सर्वात महत्वाचे म्हणजे देवाचा संदेश सर्वच चर्चेस मध्ये सांगितला जातो. पुढील संपूर्ण आठवडा हा पवित्र सप्ताह म्हणून आपण पाळतो. या सप्ताहात आपण अधिक देवाच्या सानिध्यात रहावे उपवास प्रार्थनेने त्याची सेवा करावी अशी अपेक्षा असते. या सप्ताहात मोंदी गुरुवारचे प्रभोजन, उत्तम शुक्रवारचे सात शब्दांवरील संदेश व शेवटी पुनरुत्थानाच्या दिवशी येशू ख्रिस्ताने मृत्युवर मिळवलेला निर्विवाद विजय साजरा केल्या जातो. 

येरुशलेमचे महत्व: येरुशलेम हे ठिकाण मानवाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे,याचे कारण या स्थानाच्या इतिहासात आहे. चार हजार वर्षांपूर्वी देवाने अब्राहामाला या स्थानात त्याच्या एकूलत्याएक मुलाचे म्हणजे इसहाकाचे बलिदान करण्यास सांगितले होते. आपल्याला माहित आहे मोरिया डोंगरात देवाने दाखवलेल्या ठिकाणी अब्राहाम पोहचला व आपल्या पुत्राचा यज्ञबली देऊ लागला तेव्हा देवाने त्याला एक मेंढा दाखविला व इसहाकला काही इजा होवू दिली नाही. अब्राहामाने तो मेंढा घेतला व त्याचा यज्ञबलि दिला व त्यानंतर अब्राहामाने त्या ठिकाणाचे नाव यहोवा यिरे म्हणजे यहोवा मिळवून देईल असे ठेवले. याचा अर्थ येथे एकूलत्याएक पुत्राचा यज्ञबलि होणे बाकी राहिले होते. कारण अब्राहाम असे म्हणत नाही की देवाने मिळवून दिले आहे, पण असे म्हणतो की,”देव मिळवून देईल” याचा अर्थ येथे एकुलत्याएकाचा यज्ञ होणार व तो एकुलताएक देवाने मिळवून दिलेला “देवाचा कोकरा” असणार हे भविष्य तो सांगत होता.उत्पत्ती २२:१३-१४. 

आता अब्राहामाच्या या भविष्य वाणीचा विचार करिता आपल्या असे लक्ष्यात येते की दोन हजार वर्षांनी हे खरे ठरले. अब्राहामाच्या वेळी मोरिया डोंगर ओसाड रान असेल. परंतु नंतर तेथेच यरुशलेम वसते, दावीद या ठिकाणी आपली राजधानी करतो. व याच मोरिया डोंगरात त्याचा मुलगा शलमोन देवाचे मंदिर बांधतो. २ इति ३:१. आता आपण लक्ष्यात घ्यावे की, झावळ्यांच्या रविवारी देवाचा कोकरा प्रभू येशू ख्रिस्त येरुशलेमेत [मोरिया डोगरात] का प्रवेश करीत आहे. 

झावळ्यांच्या रविवारचे महत्व: झावळ्यांचा रविवार हा अतिशय महत्वाचा आहे कारण प्रभू येशूने या दिवशी आपल्या सेवेच्या अंतिम टप्यात प्रवेश केला. त्याला माहित होते की येरुशलेमेत त्याच्याबरोबर काय होणार आहे. पवित्र शास्त्र अभ्यासकांच्या मते येशू ख्रिस्ताचा येरुशलेमेतील हा प्रवेश त्याच्या विजयी प्रवेशाचे प्रतीक आहे.येशू ख्रिस्त त्याच्या सेवाकार्यादरम्यान गावोगाव शहरोशहरी फिरला परंतु अशाप्रकारे त्याने कुठेच प्रवेश केल्याचे दिसत नाही. आज मात्र या दाविदाच्या राजधानी मध्ये व देवाचे मंदिर असलेल्या शहरामध्ये तो जाणीव पूर्वक तयारी करून प्रवेश करीत आहे, कारण त्याला माहित आहे की येथे त्याचे अर्पण मानवांच्या उद्धारासाठी होणार आहे. त्यामुळे तो त्याच्या येरुशलेमेतील प्रवेशाच्या हेतूला एका विशिष्ट प्रकारे सादर करू इच्छित असल्याचे आपल्याला दिसते. त्यामुळे हा प्रवेश आम्हाला खूपकाही शिकवतो. 

येरुशलेमेत विजयाचा उद्घोष करीत प्रवेश : ख्रिस्ताचे जीवन देव इच्छेला पूर्णपणे समर्पित होते. येशू ख्रिस्त व त्याचे शिष्य वर येरुशलेमेस जात असता तो आपल्या बारा शिष्याना बाजूला घेऊन सांगतो. “पहा आपण वर येरुशलेमेश जात आहोत, तेथे मनुष्याचा पुत्र मुख्य याजकांच्या व शास्त्र्यांच्या होती धरून दिला जाईल; आणि ते त्याला मरणदंड ठरवतील. ते त्याची विटंबना करायला,  त्याला फटके मारायला, व वधस्तंभी द्यायला राष्ट्रांच्या लोकांच्या हाती देतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुनः उठवला जाईल”. मत्तय २०:१७-१९. याचा अर्थ ख्रिस्त येरुशलेमेत प्रवेश करताना होणाऱ्या सर्व गोष्टीबद्दल जागरूक होता. त्याला माहित होते कि कोणत्या प्रकारचे मरण त्याच्या पुढे ठेवले आहे. तरी त्या मरणाशी दोन हात करून तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार व संपूर्ण मानवजातीसाठी स्वर्गीय जीवनाचे दार उघडणार याची त्याला खात्री होती. त्यामुळे येरुशलेमेत त्याचा प्रवेश सैतानावर निश्चित विजय मिळवण्याच्या आवेशाचे रणशिंग आहे. 

ख्रिस्ताचा संदेश: येशू ख्रिस्त येरुशलेमेत प्रवेश करताना मृत्यूवर निश्चित विजयाचे रणशिंग फुंकतोच परंतु त्याच  बरोबरच त्याच्या प्रवेशातून मानवजातीस एक संदेशही देत आहे. जेव्हा प्रभू येशू जैतून डोंगराजवळ आला तेव्हा त्याने आपल्या दोघां शिष्यांस पुढे गावात पाठवले, व सांगितले की,”समोरच्या गावात जा; त्यांत जाताच ज्यावर कोणी माणूस कधीही बसला नाही असे शिंगरू बांधलेले तुम्हाला आढळेल; ते सोडून आणा. आणि तुम्ही त्याला का  सोडता; असे जर तुम्हास कोणी विचारले तर त्याला सांगा की, प्रभूला याची गरज आहे.” याचा अर्थ येशू ख्रिस्ताला येरुशलेमेत प्रवेश करण्यासाठी एका अशा शिंगराची गरज होती की ज्यावर कोणीही बसलेले नाही.आता आपल्याला हे जाणून घेतले पाहिजे की या शिंगराद्वारे प्रभू येशू काय संदेश देऊ इच्छित होता. 

गाढव समृध्दीचे प्रतीक: प्रभू येशूने शिक्षण देतांना स्थानिक संस्कृती, तेथील रीतीभाती व रोजचे जीवन यांचा उपयोग उदाहरणा दाखल केला. त्यामुळे लोकांना त्याचे शिक्षण चांगले कळत असे. येरुशलेमेत प्रवेश करताना त्याने हीच पध्दत वापरली यासाठी की लोकांना त्याचा उद्देश व देव राज्याचा संदेश कळावा. त्या साठी त्याने गाढवाच्या शिंगरावर बसून येरुशलेमेत प्रवेश केला. पूर्वीच्या काळी गाढव हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग होते. अगदी अब्राहामाच्या काळातही गाढवाचा उपयोग वाहन म्हणून केला जाई. गाढवांच्या संख्येचा संपत्तीशी संबंध जोडला जाई. धष्ट पुष्ट गाढवांचा धनी अधिक सन्माननीय व संमृध्द मानला जाई. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, याकोब यहूदा वंशाला आशीर्वाद देतांना म्हणतो, ” यहूदा सिहाचा बच्चा आहे. राज्याधिकार त्याच्या हाती राहील. त्याने आपल्या गाढवाचा बच्चा द्राक्षवेलाशी व आपल्या गाढवीचे शिंगरू उत्तम द्राक्षवेलाशी बांधून आपले वस्त्र द्राक्षरसात आणि आपले पांघरून द्राक्षाच्या रसात धुतले आहे. द्राक्ष रसाने त्याचे डोळे तांबडे व दुधाने त्याचे दात पांढरे होतील.” उत्पत्ती ४९:११-११२. याकोबाचा हा आशीर्वाद एक भविष्यवाणी आहे, हि भविष्यवाणी दावीद व शलमोन यांच्या वैभव शाली साम्राज्याबद्दलच नाही तर ख्रिस्ता द्वारे प्रगट होणाऱ्या देवराज्याच्या वैभवाबद्दलही सांगत आहे. या आशिर्वादावरून एक गोष्ट  स्पष्ट होते की इस्रायलच्या संस्कृतीत गाढव हे समृद्धीचे प्रतीक मानले जात असे. 

गाढव शांतीचे प्रतीक: पूर्वीच्या काळी राजा कश्यावरुन प्रवास करीत आहे हे फार महत्वाचे मानले जाई. राजा जर घोड्यावरून येत असेल तर त्याचा उद्देश युध्दाचा आहे असे मानले जाई. व तो जर गाढवावर बसून येत असेल तर त्याचा हेतू शांतीचा, सलोख्याचा, वाटाघाटीचा व शुभसंकेत देणारा मानला जाई. 

संदेष्ट्याच्या भविष्यवाणीची पूर्णता: जखऱ्या संदेष्ट्याने ख्रिस्ताच्या येरुशलेमेतील प्रवेशाबद्दल चारशे वर्षांपूर्वी भविष्यवाणी केली होती. तो म्हणतो,”अगे सियोनाच्या कन्ये, अत्यंत उल्लास कर, अगे यरूशलेमेच्या कन्ये, हर्षनाद कर; पहा,तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो न्यायी आहे आणि त्याच्याजवळ तारण आहे; तो नम्र आहे, आणि तो गाढवावर, गाढवीच्या शिंगरावर स्वार झालेला आहे. आणि मी एफ्राईमा पासून रथ व यरुशलेमेपासून घोडा छेदून टाकीन; आणि लढाईचे धनुष्य छेदले जाईल; आणि तो राष्ट्रांशी शांती बोलेल; आणि त्याचे प्रभुत्व समुद्रापासून समुद्रापर्यंत, आणि नदी पासून पृथ्वीच्या शेवटापर्यंत होईल.” जखऱ्या ९:९-१०. 

[ ख्रिस्ताचे गाढव कसे व्हाल व कशासाठी व्हाल शुभ :रोम १२:१०-१८, शांती: मत्तय ५:९ इब्री १२: १४-१७, , १ पेत्र ३:८-१२, २ करिंथ ५:१८-२०, लेवी १९: १७-१८, १ तिम ५:२०, १ थेस ५:१४-१५, मत्तय ५: २३-२४. नम्रता: मत्तय ५:५, यशया ५७:१५, ६६: १-२, नीती २२:४.समृध्दी :उत्पत्ती ४९:११-११२, बळकट:उत्पत्ती ४९: १४-१५,  सुवार्तेची गरज रोम १०:१५, ८-१३]

यावरून स्पष्ट होते की; प्रभू येशू ख्रिस्त  गाढवाच्या शिंगरावर बसून यरुशलेमेत प्रवेश करीत असताना जखऱ्या संदेशष्ट्याची भविष्यवाणी पूर्ण होत होती व तो  संदेश देत होता की तो तारणारा मसीहा आहे, त्याचा हेतू उत्तम आहे, सर्व राष्ट्रांमध्ये शांती स्थापित करणे हा त्याचा उद्देश आहे, व त्याचे राज्य समृध्दीने परिपूर्ण असणार आहे. 

 मसीहाचे स्वागत परंतु उद्देश मात्र जगिक: प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेत पूर्ण तयारीनिशी प्रवेश करीत असताना जनसमुदायाने त्याचे स्वागत अतिशय उत्साहाने केले, मात्र ते आत्मिक व जगिक गोष्टींमध्ये भेद करू शकले नाहीत. इस्राएल राष्ट्राने पुन्हा एकदा स्वकेंद्रित दृष्टीकोनातून देवाकडे पाहिले. 

त्यांनी अभिषिक्त राजाचे स्वागत करावे तसे ते आपले वस्त्र त्याच्या पुढे रस्त्यावर टाकीत चालले २ राजे ९:१३. त्यांनी हातांमध्ये खजुरीच्या झाडांच्या झावळ्या घेतल्या व त्याला सामोरे गेले, योहान १२:१३. इस्राएलाच्या संस्कृतीमध्ये झावळ्या विजयाचे व शुभफलप्राप्तीचे प्रतीक आहेत. ख्रिस्तापुढे आपले वस्त्रे टाकून व हातामध्ये झावळ्या घेऊन ते आपल्या मसीहाचे स्वागत करताना उत्साहाने ओरडत होते. होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित आहे! आमचा बाप दावीद याचे येणारे राज्य धन्यवादित आहे! परम उंचामध्ये होसान्ना. मार्क ११:९-१०. या वरून स्पष्ट होते की प्रभू येशूचे स्वागत अतिशय उत्साहाने करण्यात आले होते. 

होसान्ना म्हणजे हे  प्रभू आत्ता आमचे तारण कर. ह्या घोषणा होत असता  काही परुश्यानी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करीत म्हटले, हे गुरु, तू आपल्या शिष्यांना धमकाव. तेव्हा प्रभू येशूने त्यांना उत्तर देताना म्हटले, मी तुम्हास सांगतो हे उगे राहिले तर धोंडे ओरडतील. ह्या वरून हे स्पष्ट होते की हा समुदाय दैवी प्रेरणेने एका स्वर्गीय घटनेला प्रतिसाद देत होता.

सर्व गोष्टी आत्मिक पातळीवरून नियंत्रित होत्या. तरी मानवाला त्या पूर्णपणे कळत नाहीत हेच येथे स्पष्ट होते. कारण प्रभू येशूला त्यांनी राजा म्हणून स्वीकारले होते पण ते यासाठीकी त्याने रोमची सत्ता उलटवून टाकावी व यहुद्यांचे राज्य स्थापित करावे. परंतु प्रभू येशू मात्र सैतानाचे, मृत्यूचे व अंधाराचे राज्य संपवून सर्व मानवांचे तारण व्हावे यासाठी स्वतःला यज्ञबलीचा कोकरा असा समर्पित करण्यास यरुशलेमेत प्रवेश करीत होता. हजारो वर्षांपूर्वी स्तोत्रकर्ता आत्म्यात ह्या गोष्टी पाहून म्हणतो,” बांधणाऱ्यांनी जो दगड नाकारला तो कोपऱ्याचा मुख्य झाला आहे. हि यहोवाची करणी आहे, हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे. जो दिवस यहोवाने केला आहे तो हाच आहे , यांत आम्ही उल्लास व आनंद करू. हे यहोवा, आम्ही तुला विनंती करतो, आता तारण कर; हे यहोवा, आम्ही तुला विनंती करतो, आतां उत्कर्ष होऊ दे. जो यहोवाच्या नावाने येत आहे तो धन्यवादित असो; यहोवाच्या मंदिरातून आम्ही तुम्हांला आशीर्वाद दिला आहे. यहोवाच देव आहे त्याने आम्हास प्रकाश दिला आहे; वेदीच्या शिंगास यज्ञ दोर्यांनी बांधा.” स्तोत्र ११८: २२:२८. स्तोत्र कर्त्याने वर्णन केलेल्या या भविष्यवाणीला शास्त्री परुशी समजले नाहीत त्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला नाही व अनेकांसाठी ते अडखळण झाले. 

देवाचा उद्देश मात्र पुढे गेला यहोवाने त्याचा कोकरा मिळवून दिला, देवाचे वचन सांगते,”जर तू आपल्या तोंडाने येशूला प्रभू म्हणून पत्करशील, आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा तू आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील तर तुझे तारण होईल. कारण न्यायीपणासाठी मनुष्य अंतःकरणात विश्वास ठेवतो आणि तारणासाठी तो तोंडाने पत्करतो. कारण शास्त्रलेख म्हणतो, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लाजवला जाणार नाही. कारण यहुदी व हेल्लेणी यांच्यामध्ये काही भेद नाहीं; कारण सर्वांचा प्रभू तोच आहे, आणि जे त्याला हाक मारतात त्या सर्वांविषयी तो धनवान आहे. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याला हाक मारील त्याचे तारण होईल.” रोम १०:९-१३. 

झावळ्यांच्या रविवारी यरुशलेमेत देवाच्या कोकऱ्याचे स्वागत झाले तसे आपणही त्याचे स्वागत दैवी योजनेला समजून न घेता करू नये कारण या बाबतीत आता सर्वकाही प्रगट आहे, तरी सैतानाने मानवी मर्यादांचा उपयोग करीत आपल्याला स्वकेंद्रित करू नये. आपला उध्दार झाला आहे आपण अधिक समर्पणाने, पवित्रतेने प्रभूला अनुसरू. आज त्याचे स्वागत आपल्या हृदय रुपी यरुशलेमेत करीत आपल्या उध्दाराचा आनंद साजरा करू.

प्रार्थना : हे प्रभू येशू तू माझ्या पापासाठी अर्पिला गेलास [मेलास], व पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत उठलास, असा मी अंतःकरणाने विश्वास ठेवतो व मुखाने कबूल करतो. तू माझ्या जीवनाचा प्रभू व्हावे म्हणून मी तुझ्याकडे विनंती करितो. माझे तारण कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक, आमेन. 

रेव्ह. कैलास [आलिशा ]साठे. 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole