तारणाचे-आशीर्वाद-बायबल-स्टडी-भाग-४

तारणाचे आशीर्वाद 

तारणाचे आशीर्वाद

प्रस्तावना: तारण या शब्दाचा सर्वसाधारण नैसर्गिक अर्थ आहे, वाचणे, बचाव होणे, संरक्षण होणे. हा शब्द वाचताना, बोलताना, व  ऐकताना आपल्याला बहुतेकदा हाच अर्थबोध होतो, किंवा अभिप्रित असते की,प्रभू येशूने नरकाग्नीच्या शिक्षेपासून आपला बचाव केला.प्रेषित १०:४३. परंतु तारणामुळे आपल्याला किती आशीर्वाद प्राप्त झाले आहेत. ते आपल्या जीवनाला कशाप्रकारे सर्वांगसुंदर बनवत आहेत. याचा अर्थबोध बहुतेकदा होत नाही,ख्रिस्ती व्यक्तीच्या बोलण्यात तारण हा शब्द अगदी रुळलेला दिसतो. परंतु वागण्यात तारणाचे तेज दिसत नाही, तारणाच्या ताटात देवबापाने आम्हांला किती आशीर्वाद वाढले आहेत; हे आम्ही पाहतच नाही त्यामुळे त्या आशिर्वादांचा आस्वाद घेणे, त्यांच्या सामर्थ्याचा अनुभव घेणे, व आनंदाने, शांतीने व विजयाने भरलेले जीवन जगणे या पासून आपण वंचीत राहतो. तेव्हा तारणाला त्याच्या परिपूर्ण स्वरूपात समजून घेणे आवश्यक आहे.

१] तारणाद्वारे आमची पापाच्या गुलामगिरीतून मुक्तता : प्रभू येशुवरील विश्वासाच्या द्वारे जेंव्हा देव आमचा स्वीकार करतो तेव्हा तो आमच्या पापांची फक्त क्षमा करीत नाही तर पापाच्या गुलामगिरीतूनही आपली सुटका करितो. याचा अर्थ तारण हे फक्त स्वर्गात जाण्याचे तिकीट देत नाही तर पृथ्वीवर सुद्धा आपल्या जीवनात  स्वर्ग अनुभवण्याचे सामर्थ्य देते. हे सत्य आपण समजून घेतले पाहिजे. परंतु, हे सत्य समजण्यासाठी आपण शिष्यत्वाचे जीवन जगणे अतिशय आवश्यक आहे. म्हणजे आम्ही ख्रिस्ती आध्यात्मिक शिक्षण घेणे  व त्याच बरोबर त्याप्रमाणे  जीवन जगण्याचा प्रयत्न करणे  आवश्यक आहे म्हणजे आपण पापाच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्याचा अनुभव घेऊ. देव म्हणतो माझे लोक ज्ञान नसल्यामुळे नष्ट होतात. होशेय ४:६

आपल्याला माहित आहे की, हत्ती लहान असल्यापासूनच त्याच्या पायाला साखळीने खुंटीला बांधून ठेवतात, सुरवातीला तो खुंटी उपटण्याचा प्रयत्न करतो पण लहान असल्यामुळे त्याला ते शक्य होत नाही, हळूहळू त्याची मानसिकता बनते की तो ती खुंटी कधीच उपटूशकत नाही. त्यामुळे तो बलांढये झाल्यानंतरही गपचूप त्या खुंटीला बांधून राहतो. गाढवाच्या बाबतीतही असेच आहे, त्याला ज्या जागेवर रोज खुंटीला बांधून राहण्याची सवय झालेली असते त्या जागेवर गेल्या नंतर तो शांत उभा राहतो कारण त्याला वाटते की तो आता खुंटीला बांधून आहे व आता शांत उभे राहण्या शिवाय त्याच्याकडे काही पर्याय नाही. 

अशा अनेक प्रकारच्या खुंट्या सैतानाने माणसांना संभ्रमात ठेवण्यासाठी केलेल्या आहेत. जशा, धार्मिक समजुतींच्या खुंट्या, तत्वज्ञानाच्या खुंट्या, भाषिक सांस्कृतिक समजुतींच्या खुंट्या, वेगवेळ्या सवयींच्या खुंट्या, वेगवेळ्या अभिलाश्यांच्या खुंट्या,जगातील इतिहास, सायन्स, सामाजिक, आर्थिक व राजकीय लाभाच्या खुंट्या. अशा असंख्य खुंट्या आहेत की ज्यामुळे ख्रिस्ती व्यक्ती संभ्रमात राहून; ख्रिस्ताने दिलेल्या स्वातंत्र्याला अनुभवूशकत नाहीत . याचे उत्तम उदाहरण पवित्र शास्त्रात आहे. काही यहुद्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला तेंव्हा त्याने त्यांना म्हटले, जर तुम्ही माझ्या वचनात राहाल, तर तुम्ही खरोखर माझे शिष्य आहा, आणि तुम्ही सत्य जणाल व सत्य तुम्हांला मोकळे करील. त्यांनी त्याला उत्तर दिले, आम्ही अब्राहामाचे संतान आहो व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो, तर तुम्ही मोकळे व्हाल असे तू कसे म्हणतोस ? येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हांस खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे .आणि दास सर्वकाळ घरात राहत नाही, पुत्र सर्वकाळ राहतो. म्हणून पुत्र जर तुम्हांला मोकळे करील तर तुम्ही खरोखर मोकळे व्हाल. योहान :८:३१-३६

स्वाध्याय : विचार करा, येथे यहुद्यांची खुंटी कोणती आहे कि ज्यामुळे ते येशूचे खरे शिष्य होण्यास तयार नाहीत ? येशू त्यांना कशातून मोकळे होण्याचे अभिवचन देत होता ? व त्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे होते. आज तुम्ही हे स्वतःच्या व इतर ख्रिस्तींच्या जीवनाशी कसे लागू कराल ?

👇

२] तारणाद्वारे आम्हांला नवी आत्मिक ओळख: प्रियांनो तुमच्या स्वतःच्या नजरेत तुमची स्वतःची एक ओळख आहे. मी आमुक आमुक आहे व मी असा आहे. परंतु हि तुमची ओळख फक्त तुम्हीच ठरवत नाही तर जगाचा यात खूप मोठा वाटा असतो. हे जग तुमच्या व्यक्तित्वाला अनेक गोष्टी चिटकवते, जसे, हे जग तुम्हाला जात देते, धर्म देते, वर्ण व्यवस्था देते, वर्ग व्यवस्था देते, वंश देते, अशा अनेक गोष्टी तुम्हाला जगाकडून मिळतात, ज्या प्रचलित संस्कृती मध्ये तुमची वाढ होते, त्यानुसार तुमचे व्यक्तित्व तयार होते, तुमची ओळख तयार होते. व त्या ओळखीनुसार तुम्ही आयुष्यभर आपले जीवन जगता. तुम्ही स्वतःकडे पाहताना त्याच दृष्टीकोनातून पाहता व जगाकडेही म्हणजे सहजीवी आहेत त्यांच्याकडेही त्याच दृष्टीकोनातून पाहता. यात तुम्ही फारसे बदल तुम्ही करूशकत नाही. 

आणखी एक ओळख स्वर्गाकडून सर्व मानवांसाठी स्वर्गातून मिळाली आहे. आणि हि ओळख कोणीही मानव स्वतःच्या कर्तृत्वाने बदलू शकत नाही. ती ओळख आहे, “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. रोम ३:२३. ज्याच्या दृष्टीकोनातून पाहताना आपण माणसांना विभागून पाहतो. मात्र देवाच्या दृष्टीकोनातून पाहता सर्व एकाच माळेचे मनी असलेले आपल्याला पाहायला मिळते. मग प्रश्न पडू शकतो की खरिओळख कोणती. 

येथे आपण हे समजून घेतले पाहिजे की,देवाने दिलेली ओळख खरी आहे. कारण हे जग पापाच्या प्रभावाखालीच  चालते, देवाच्या वचनावरूनहि हे आपल्याला कळते व या जगाच्या अनुभवारूनहि आपल्याला याची खात्री पटते. कारण, जगातील सर्व व्यवस्था भ्रष्ट आहेत, येथे सत्याला स्थान नाही. हे आपण रोजच्या जीवनात अनुभवतो.  या वरून स्पष्ट होते की जगाने दिलेली ओळख खरी नाही, म्हणून तुमची स्वतःविषयीची समज खोटी ठरते. 

एक चांगली बातमी या ठिकाणी आहे; ती म्हणजे तारणाच्या द्वारे देवाने आपल्या जुन्या सर्व ओळखी पुसून टाकल्या आहेत. व आपल्याला नवी ओळख दिली आहे. आता यापुढे आपण पापी नसून नीतिमान आहोत. वचन सांगते,”आपण प्रभू येशू वरील विश्वासावरून न्यायी ठरलेलो आहो, म्हणून आपणास आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडून देवाबरोबर आपल्याला शांती आहे. रोम ५:१. आता देव  प्रभू येशूवर विश्वास न ठेवणाऱ्यांवर क्रोधीत आहे. तो म्हणतो प्रकाश जगामध्ये आला असता, त्यांनी अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कर्मे दुष्ट होती. त्यांनी देवाच्या एकुलत्या पुत्रावर विश्वास ठेविला नाही. म्हणून त्यांच्यावर न्याय येणार. योहान ३:१६-३१. मात्र येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे मिळणारे देवाचे न्यायीपण सर्व विश्वासणाऱ्यांसाठी आहे, कारण त्यात काहीच भेद नाही. रोम ३:२२. प्रेषित पेत्र या नव्या ओळखीचे वर्णन करताना म्हणतो,”तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजक वर्ग, पवित्र राष्ट्र, मोलाने मिळवलेले लोक आहा, यासाठी की ज्याने तुम्हांस अंधारातून आपल्या अद्युत प्रकाशात बोलावले आहे त्याचे सद्गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. १ पेत्र २:९. 

सर्व विश्वासणाऱ्यांचा ख्रिस्ताच्या द्वारे देवाशी समेट झाला आहे. रोम ५:१०-११, प्रत्येक विश्वासणारा ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहे. २ करिंथ ५:१६-१७. प्रत्येक विश्वासणारा देवाला ” माझ्या पित्या ” अशी हाक मारू शकतो. योहान १:१२, रोम ८:१४-१७. आता द्राक्षवेले पासून जश्या तिच्या फांद्या विभक्त होऊन जगू शकत नाहीत तसे आपण देवाशी जोडल्या गेलो आहो. 

विश्वासणाऱ्याचे देवाबरोबरचे हे नाते त्याला वेगवेगळ्या भाव विश्वात घेऊन जाते. कधी तो देवाला आपला मेंढपाळ व स्वतःला त्याच्या कळपातील मेंढरू म्हणतो. स्तोत्र २३, योहान १०:१४-१६. तर कधी आपले संपूर्ण समर्पण करून त्याला आपला प्रभू व स्वतःला त्याचा सेवक असे पाहतो, याकोब १:१. कधी हे नाते शिक्षक व शिष्य अश्या शिस्तबध्द चौकटीत बसवलेजाते, योहान १३:१३, १५:८ तर कधी सर्व चौकटी तोडून मित्रत्वाच्या आनंददायी नात्यात रममाण होते. योहान १५:१३-१५. 

👇

सर्वात मोठी देणगी पवित्र आत्मा: विश्वासणाऱ्याला तारणाच्या द्वारे मिळणारी सर्वात मोठी देणगी म्हणजे “पवित्र आत्मा ” योहान ७:३८-३९. प्रेषित १:८. २:३-४. आमच्या आत्मिक जीवनाच्या प्रवासामध्ये सर्वात महत्वाची भूमिका पवित्र आत्म्याची आहे. 

स्वाध्याय : तुम्ही या नव्या आत्मिक ओळखीत जीवन जगण्याचा प्रयत्न करीत का ? होय, तर तुमचा अनुभव काय आहे? नाही , तर का नाही ? 

रेव्ह. कैलास [आलिशा ] साठे. 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole