तारण-व-आत्मिक-जीवन-बायबल-स्टडी-[-आत्मिक-जीवन-]-भाग-३.

 तारण व आत्मिक जीवन 

तारण-व-आत्मिक-जीवन-बायबल-स्टडी-[-आत्मिक-जीवन-]-भाग-३.
प्रस्तावना: आपले आत्मिक जीवन समजून घेताना, तारण व आत्मिक जीवन यातील फरक समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. तारण व आत्मिक जीवन या दोन्ही गोष्टी पवित्रीकरणाच्या उद्देशाने घडून येतात. या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून भिन्न आहेत. त्यांची कार्य वैशिष्ट्ये वेगळी आहेत व त्यांचे परिणाम वेगळे आहेत. तरी स्वाभाविकपणे एकीतून दुसरीचा उगम होतो, म्हणून दोन्हींना अतिशय महत्व देऊन त्यांना समजून घेतले पाहिजे. त्यामुळे आत्मिक जीवन आपण जागरूक स्थितीत जगू.

तारण म्हणजे काय ? तारण  या शब्दाचा सरळ अर्थ आहे संरक्षण बचाव किंवा मुक्ती [ मुक्त होणे ]. पवित्र शास्त्रातही तारण हा शब्द याच अर्थाने योजला आहे. पापदंडापासून मुक्ती म्हणजे तारण. प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्या मानवाला देवाकडून मिळणारे हे एक कृपादान आहे. येथे देव त्या व्यक्तीच्या पापांची क्षमा करून, त्याला सार्वकालिक जीवनासाठी [ सनातन जीवनासाठी ] निवडतो. देवाचे वचन सांगते,”ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याच्या नियमाने मला पापाच्या व मरणाच्या नियमापासून मुक्त केले. प्रभू येशू निकदेमला मार्गदर्शन करताना म्हणतो ,’तो या जगात यासाठी आला आहे की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्याच्याठायी  सार्वकालिक जीवन असावे’. योहान ३:१५. 

तारण केंव्हा व कसे घडते: जेंव्हा एखादा व्यक्ती अंतःकरणापासून प्रभू येशूवर विश्वास ठेवतो व त्याच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतो. तेव्हा देव त्या व्यक्तीच्या निर्णयाचे स्वागत करतो, कारण हा सत्याचा, देवाच्या इच्छेला अनुसरणारा, पवित्र जीवनाचा मार्ग आहे.  म्हणून प्रभू येशूला शरण जाणाऱ्या व्यक्तीचा देव अतिशय आनंदाने स्वीकार करतो व त्याच्या पापांची क्षमा करून त्याला पापाच्या व मरणाच्या नियमांपासून मुक्त करतो. हे सर्व देवाच्या कृपेने घडून येते. बायबल सांगते,’तुम्ही कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तारलेले आहा, आणि हे तुम्हापासून नव्हे तर देवाचे दान आहे. हे कर्माकडून नाही, यासाठीकी कोणी नावाजून घेऊ नये. इफिस २:८-९ असे म्हटले आहे की एक पापी जेंव्हा पापी जीवनाबद्दल पश्चाताप करून, प्रभू येशूवर विश्वास ठेऊन त्याच्या मार्गाने चालण्याचा निर्णय घेतो तेव्हा स्वर्गात हजारो देवदूत आनंद करितात. यावरून आपण लक्षात घ्यावे की मानवी आत्मा देवाच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे.

तारणाची हि घटना मानवाच्या जीवनात एकदाच घडते, प्रभू येशूला शरण जाणाऱ्याचा देव तो आहे तसा त्याचा स्वीकार करितो. कारण बायबल सांगते तो पाप्यांना तारण्यासाठीच या जगात आला. प्रभू येशू म्हणतो,”मी न्यायीस बोलवायला आलो नाही तर पाप्यांस पश्चातापासाठी बोलवायला आलो आहे”. लूक ५:३२. संत पौल त्याचा आत्मिक पुत्र तीमथ्याला मार्गदर्शन करताना म्हणतो,”ही गोष्ट विश्वसनीय व पूर्ण अंगिकारकरण्यास योग्य आहे की, ख्रिस्त येशू पाप्यांस तारायला जगात आला; त्यांच्या मध्ये मी तर पहिला आहे”. १ तीम १:१५. या वरून स्पष्ट आहे की कोणीही पापी व्यक्ती जेंव्हा येशूकडे जातो तो त्याचा स्वीकार करितो. 

पापी व्यक्तीचा स्वीकार करताना देव त्याच्या पापांची क्षमा करितो. प्रेषित १०:४३, व त्याला पवित्र जीवनासाठी वेगळे करितो, कल ३:१२. १ थेस्स ४:७. त्याला पवित्र आत्म्याचा शिक्का मारून त्याचे तारण सील करतो, म्हणजे त्याला पवित्र आत्म्याचे दान देऊन त्याच्या अंतःकरणात त्याच्या तारणाची [ मुक्तीची ] खात्री पटवतो. इफिस १ :१३-१४. देव त्याच्याशी नव्याने पिता पुत्राचे नाते स्थापित करितो योहान १:१२. अशा प्रकारे देव त्या व्यक्तीचे तारण करून म्हणजे पापाच्या शिक्षेपासून त्याला मुक्ती देऊन, त्याला संपूर्ण नवीन व्यक्तित्व, व जीवन जगण्याचा नवा उद्देश देतो २ करिंथ ५:१६-१७. या सर्व गोष्टी टप्याटप्याने नाही तर त्याच घटकेस होतात जेंव्हा तो व्यक्ती ख्रिस्ताला आपले जीवन समर्पित करितो. व त्याच घटकेस त्या व्यक्तीच्या आत्मिक जीवनाच्या प्रवासाला सुरुवात होते. ज्याला आपण पवित्रीकरणाच्या प्रक्रियेची सुरवात देखील म्हणू शकतो. २ करिंथ ७:१.  म्हणून प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने तारण व त्याचे परिणाम यांचा व्यवस्थित अभ्यास करावा. आपणही याठिकाणी याबद्दल पुढे पाहणार आहोत.

आत्मिक जीवनाचा प्रवास [ पवित्रीकरण ] : ज्या वेळेस व्यक्तीचे तारण होते, त्या वेळेस त्याच्या बाह्य अंगावर काहीच परिणाम दिसत नाहीत. परंतु त्याचे अंतरंग म्हणजे अंतरिक व्यक्तित्व बदलण्यास सुरवात झालेली असते. काहींच्या जीवनात ती अतिशय प्रखरतेने जाणवते तर काहींच्या जीवनात ती सुप्त स्वरूपात स्वरूपात सुरु होते व हळू हळू त्याच्या व्यावहारिक जीवनात जाणवू लागते. आत्मिक जीवनाचा प्रवास किंवा पवित्रीकरण हि घडण्याची प्रक्रिया आहे, या प्रक्रियेतून व्यक्ती आत्मिक रित्या परिपक्व होत जातो, प्रौढ होत जातो. १ थेस्स ५:२३-२४. सांगते,”शांतीचा देव स्वतः तुम्हांस परिपूर्ण पवित्र करो, आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या येण्याच्या वेळी तुमचा आत्मा, जीव आणि शरीर हीं संपूर्ण व निर्दोष अशी राखली जावोत. तुम्हांस बोलवणारा विश्वासू आहे तो हे करीलच. आपण अनेक प्रौढ किंवा परिपक्व ख्रिस्ती व्यक्तींना पाहतो, पवित्र शास्त्र [ बायबल ] देखील मंडळीतील प्रौढ व परिपक्व भावा बहिणींबद्दल सांगते की, “तुम्हांतले कित्येक जण, जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, समलिंगी, चोर, लोभी मद्यपी, निंदक, हरण करणारे होते, तथापि तुम्ही प्रभू येशूच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले व पवित्र केलेले व न्यायी ठरवलेले आहा. १ करिंथ ६:९-११. यावरून स्पष्ट होते कि आत्मिक जीवनाचा एक प्रवास आहे, पवित्रीकरणाची ती प्रक्रिया आहे. तिचे प्रतिफळ खूप महान आहे म्हणून तिला योग्य प्रकारे समजून घेणे अतिशय आवश्यक आहे

क्रमशः …

रेव्ह साठे [आलिशा ] कैलास .

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole