देवाची नावे व आशीर्वादांची रहस्ये ! [ पवित्र शास्त्र सिद्धांत ]

देवाची नावे  व आशीर्वादांची रहस्ये !

देवाची नावे व आशीर्वादांचे रहस्ये ! [पवित्रशास्त्र सिद्धांत ]

प्रस्तावना: देव एक आहे; ज्याने सृष्टीची रचना केली. तो अनन्य आहे. तरी त्याची नावे अनेक आहेत. या प्रत्येक नावामध्ये एक रहस्य आहे. देवाविषयी एक प्रकटीकरण आहे. हि नावे देवाचे व्यक्तित्व प्रकट करितात. देवाचे नाव सर्वश्रेष्ट आहे, व सर्व अधिकारांनी युक्त असे सर्व समर्थ नाव आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो,”हे यहोवा, आमच्या प्रभू , ज्या तू आपले वैभव आकाशांवर स्थापिले आहे, त्या तुझे नाव सर्व पृथ्वीत किती थोर आहे”! स्तोत्र ८:१ आपण या नावांना जर पाठ केले व त्यांचे वैशिष्ट्ये समजून घेतले तर आपल्यासाठी हे एक मोठे आशीर्वादाचे कारण होऊ शकते. 

१]एलोहिम : हिब्रू भाषेत हे अनेक वचनी नाव आहे. यामुळे संभ्रमित होऊ नये . हिब्रू भाषेत एलोहिम म्हणजे देव हे नाव सर्वात ज्यास्त वेळा आढळते. याच्या बहुवचनीय रुपामुळे हे नाव  त्र्यकेत्वाला अधोरेखित करते असेही आपण म्हणू शकतो. हे नाव पवित्र शास्त्राच्या पहिल्याच वचनात म्हणजे उत्पत्ती १:१ मध्ये आहे. एलोहिम म्हणजे सर्वसमर्थ, महा शक्तिमान देव. दावीद राजा म्हणतो,”देवाने उठावे, त्याच्या वैऱ्यांची दाणादाण होवो; जे त्याचा द्वेष करतात तेही त्याच्यापढून पळोत,” स्तोत्र ६८:१ येथे मूळभाषेत भाषेत “एलोहिम” आहे, म्हणजे एलोहिम = सर्वशक्तिमान/ महाशक्तिमान देवाने आपल्या शत्रूच्या विरोधात लढावे व त्याचा पराभव करावा हा अर्थ आहे. जेथे जेथे एलोहिम हा शब्द आढळेतो, तेथे तेथे देवाच्या महाशक्तिमान पणाच्या सामर्थ्याची अपेक्षा केली आहे. 

२] अदोनाय [ प्रभू ] : अदोनाय हे आदरार्थी नाव आहे;या नावातून अधिकार, व  पद अधोरेखित होते. येशू ख्रिस्ताला आपण प्रभू असे संबोधतो, कारण तो पित्याच्या उजव्या बाजूस आहे व त्याच्याकडे वर आकाशात, पृथ्वीवर, व पृथ्वीच्या खाली सर्व अधिकार त्याच्याकडे आहेत. मत्तय २८:१८, योहान ५:२६, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो,” मी मार्ग, सत्य, व जीवन आहे. माझ्या द्वारे आल्या वाचून कोणालाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळत नाही. योहान १४:६. स्तोत्रकर्ता म्हणतो,”आहो पृथ्वीवरील राजेहो, तुम्ही देवाला गा, तुम्ही प्रभूला स्तवने गा”. स्तोत्र ६८:३२. 

३] याव्हे किंवा यहोवा : हे नाव देवाने स्वतः मोशेला प्रकट केले. हे नाव देवाचे सनातनत्व प्रकट करते. देव म्हणाला,”जो मी आहे, तो मी आहे. आणखी तो म्हणाला इस्राएलाच्या संतानास सांग ‘मी आहे’ याने मला तुम्हाकडे पाठवले आहे”. निर्गम ३:१४. या वरून स्पष्ट होते की देव सनातन आहे. यहुदी या देवाच्या नावाला अतिशय महत्व देत, मान सन्मान देत, त्यांच्या दृष्टीने हे नाव अतिशय पवित्र असल्यामुळे हे नाव घेताना ते विशिष्ट आत्मिक तयारी करीत. इतरवेळी यहोवा ऐवजी ते एलोहिम या नावाचा वापर करीत. तो सदैव अस्तत्वात आहे व असणार. हि गोष्ट आम्हांस मोठी आशा देणारी आहे, मोठा आनंद देणारी आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो,”देवाला गा त्याच्या नावाला स्तवने गा, जो रानांमधून स्वारी करीत जातो, त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा, त्याचे नाव याह आहे; तर त्याच्यापुढे तुम्ही उल्हास करा”. स्तोत्र ६८:४. येशू ख्रिस्ताने आपले सनातन अस्तित्व प्रकट करताना म्हटले, ‘मी तुम्हांस खचित खचित सांगतो अब्राहाम झाला त्यापूर्वी मी आहे, योहान ८:५८. देव मोशेला म्हणाला,”आणि अब्राहाम, इसहाक, व याकोबाला मी सर्व समर्थ देव असा प्रगट झालो. परंतु यहोवा या माझ्या नावाने मी त्यांना ओळख दिली नव्हती”. निर्गम ६:३.

४] एल शाद्दय : म्हणजे “सर्वसमर्थ देव”. हे नाव सुद्धा देवाने स्वतः प्रगट केले आहे. वचन सांगते,”अब्राम नव्यान्नव वर्षांचा झाला तेंव्हा यहोवा अब्राहामाला दर्शन देऊन त्याला म्हणाला, मी सर्वसमर्थदेव आहे ; तू माझ्या समोर चाल व पूर्ण हो. निर्गम १७:१. यावरून हे स्पष्ट होते की “एल शाद्दय” हे नाव त्याचे व्यक्तित्व प्रगट करते की तो सर्वकाही करण्यास समर्थ आहे. हे नाव आम्हांला प्रत्येक परिस्थितीत त्याच्यावर विश्वास ठेवण्यास व त्याच्या विषयी आशा धरून राहण्यास सांगते.

५] एल-एल्योन : देवाच्या या नावाचा अर्थ होतो ‘परात्पर’ सर्वश्रेष्ट, परमपवित्र स्थानात स्वर्गात वास करणारा, अगम्य, अतुल्य, व परमथोर. शालेमचा राजा मलकीसदेक हा परात्पर देवाचा याजक होता. त्याने अब्राहामाला आशीर्वाद देऊन म्हटले,’ परात्पर देव आकाशाचा व पृथ्वीचा धनी याच्याकडून अब्राम आशीर्वादित होवो,’ उत्पत्ती १४:१८. 

६] एल -रोई : जे आपण वागतो; म्हणजे आपली सर्व दिनचर्या, उठणे, बसणे, चालणे,बोलणे, पाहणे, विचार करणे, खाणे -पिणे, निजणे -उठणे , आपले आशीर्वाद , आपल्या जीवनातले संकटे, सर्व काही देव पाहतो. हागारप; सारा पासून पळून जात असता देवाने तिला पाहिले व मार्गदर्शन केले. ते ठिकाण शूराच्या वाटेवर असलेल्या झाऱ्या जवळ होते,’तेव्हा हागारने यहोवाचे नाव,’तू पहाणारा देव आहेस असे ठेवले’ कारण तिने म्हटले जो मला पाहतो त्याला मी येथेही मागून पहिले काय? यावरून त्या विहिरीला बैर-लहाय -रोई [म्हणजे मला पाहण्याऱ्या जिवंताची विहीर ] असे म्हटले आहे. उत्पत्ती १६:७-१४.

७] एल -ओलाम : ओलाम हा शब्द  जुन्या करारात चारशे पेक्षा ज्यास्त वेळा आला आहे. याचा अर्थ होतो, पुरातन, सनातन, सतत असणारा.  एल ओलाम म्हणजे सनातन देव, हे नाव जुन्या करारात फक्त चार वेळेस आले आहे. सर्वकाळचा  देव. अब्राहाम व अबीमलेख यांच्यातील करार झाल्यावर, अब्राहामाने बैर-शेबा येथे एशेल झाड लावले व आणि येथे एल-ओलाम [सनातन देव ] याचे नाव घेऊन प्रार्थना केली. यामागे अब्राहामाचा असा विश्वास होता की देव सनातन आहे, माझ्यामागेही तो या कराराचे रक्षण करील. उत्पत्ती २१:३३. यशया ४०:२८

८] याव्हे- यिरे : पुरवठा करणारा देव, अब्राहम  आपल्या एकुलत्या एक मुलाला [इसहाकला]अर्पण करण्यासाठी घेऊन जात असताना. इसहाकने विचारले, ‘की बाबा अर्पणासाठी आपण सर्वकाही घेतले आहे पण अर्पण [कोकरू] घेतले नाही ‘. तेव्हा अब्राहाम त्या बाळाला सांगू शकला नाही की, तुलाच अर्पण करायचे आहे. त्या ऐवजी तो म्हणाला देव पाहून देईल. असे बोलण्यामागे कारण होते, त्याला आतून हे वाटत होते की मी ज्या देवाला अनुसरत आहे तो पवित्र आहे, या जगातील देवाप्रमाणे नाही की जो मानवी अर्पण इच्छील, हि माझ्या विश्वासाची परीक्षा आहे. पुढे आपण पाहतो की, अब्राहाम जेव्हा इसहाकचे अर्पण करण्यासाठी सुरा उचलतो तेंव्हा देव त्याला थांबवतो, व त्याच्या ऐवजी मेंढा अर्पणासाठी देतो. म्हणून अब्राहामाने त्या ठिकाणचे नाव यहोवा यिरे [यहोवा मिळवून देईल] असे ठेवले. 

९] याव्हे-शाबोथ : याव्हे-शाबोथ म्हणजे सैन्याचा यहोवा , सेनाधीशदेव, स्वर्गातील सैन्याचा सेनापती [सर्वेसर्वा]. यशयाला झालेल्या दृष्टांतामध्ये तो पाहतो की, देव सिहांसनावर बसलेला आहे व सराफीम त्याला गौरव देताना त्याची स्तुती गाताना म्हणतात,”सैन्याचा यहोवा, पवित्र, पवित्र पवित्र आहे; सगळी पृथ्वी त्याच्या तेज्याने भरली आहे. यशया ६:१-३. दाविदराजा म्हणतो,”हा गौरवाचा राजा कोण आहे ? सैन्याचा यहोवा तोच गौरवाचा राजा आहे. स्तोत्र २४:१०.

१०] यहोवा रोफे [ राफा ] : निरोगी करणारा देव, निर्गम १५:२६ मध्ये देव म्हणतो,” जर तू लक्ष लावून यहोवा तुझा देव याची वाणी ऐकशील व त्याच्या दृष्टीने नीट ते करशील व त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व नियम पाळशील, तर जी दुखणी मी मिसऱ्यांवर घातली त्यातले कोणतेही तुझ्यावर घालणार नाही कारण मी यहोवा तुला निरोगी करणारा आहे”. 

११] याव्हे शालोम: देव शांती देवो, “मग गिदोनाने येथे अर्पण अर्पायाला योहोवाला वेदी बांधली व तिचे नाव यहोवा-शालोम [ म्हणजे यहोवा शांती देवो ] असे ठेवले.ती आजपर्यंत अबीयेजेऱ्यांच्या अफ्रा येथे अजून आहे”शास्ते ६:२४. आपण देवाकडून शांती मिळवू शकतो. दावीद राजा म्हणतो,”यहोवा आपल्या लोकांना सामर्थ्य देईल; यहोवा आपल्या लोकांना शांतीने आशीर्वादित करिन,” स्तोत्र २९:११ पुढे नव्या करारात प्रभू येशू मध्ये हि भविष्यवाणी पूर्ण झाली असे आपण पहातो. मी तुम्हांस शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हांस देतो; जसे जग देते त्याप्रमाणे मी तुम्हांस देत नाही. तुमचे अंतःकरण घाबरू नये व भिऊही नये. योहान १४:२७

१२] याव्हे निस्सी : “यहोवा आमचा ध्वज” पूर्वी युद्धांवर जाताना सैंन्य त्या राष्ट्राचा ध्वज पुढे चालवत असे. तो ध्वज त्यांना प्रेरणा, सामर्थ्य व विजय देण्यास समर्थ असे. अमालेकांशी झालेली लढाई जिकल्यावर मोशेने एक वेदी बांधली आणि तिचे नाव यहोवा निस्सी [म्हणजे यहोवा आमचा झेंडा ] असे ठेवले.निर्गम १७:१५. यहोवा निस्सी हे नाव घोषित करते की यहोवा आमची लढाई लढतो. हे नाव संपूर्ण पवित्र शास्त्रात एकदाच आले आहे.

१३] याव्हे-सिद्केनू : परमेश्वर आमचे नीतिमत्व, हे नाव देवाचे न्यायीपण दाखवते. तो न्यायी आहे. म्हणून आम्ही प्रभू मध्ये आशा धरून राहणे योग्य आहे,व आवश्यकही  आहे. त्याच्या योजने नुसार व त्याच्या वेळेनुसार तो सर्वकाही सुव्यवस्थित करितो. यिर्मया देवाचा आशावादी संदेश सांगताना या नावाची घोषणा करितो,”त्या दिवसात यहूदा ताराला जाईल व येरुशलेम निर्भय राहील, आणि तिला यहोवा आमचे न्यायीपण [यहोवा सिद्केनू ] हे नाव देतील. संत पौल करिंथ येथील मंडळीला म्हणतो,”आणि नियमशास्त्राद्वारे जे माझे स्वतःचे न्यायीपण ते नसलेल्या, पण जे ख्रिस्तावरच्या विश्वासाच्याद्वारे मिळते, जे न्यायीपण देवापासून विश्वासाच्या द्वारे आहे, ते असलेल्या मी त्याच्या मध्ये सापडावे. फिलि ३:९.

१४] याव्हे – मिक्वाद्देशकेम: पवित्र करणारा यहोवा, पावित्र्य हे देवाकडून येते, ते आम्हांला जगापासून वेगळे करते यासाठी की आम्ही त्याचे गौरव करावे व आज्ञांकित जीवन जगावे. देवाचे वचन सांगते,”आणि तुम्ही माझे  पाळा, व ते आचारा; जो तुम्हांला पवित्र करितो तो मी यहोवा आहे. लेवीय २०:८, निर्गम ३१:१३

१५] याव्हे -राह [रोई -रोही ] : परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे.स्तोत्र २३:१.  ख्रिस्ती व्यक्तीने नेहमी घोषित करावे की परमेश्वर ख्रिस्त माझा याव्हे -राह, मला काही उणे पडणार नाही. माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील. 

रेव्ह साठे कैलास [आलिशा ]

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole