वचन: म्हणजे अब्राहामाच्या म्हातारपणी सारा गरोदर
राहिली व जो नेमलेला समय देवाने त्याला सांगितला होता त्या समयी त्याच्यापासून तिला मुलगा झाला. उत्पत्ती २१:२.
![]() |
देवाचा नियुक्त समय |
प्रियांनो
, मानवी जीवन हे इच्छा, आकांक्षांची भरलेले असते. प्रत्येकाला काहीतरी मिळावे असे वाटते, काहीतरी मिळवायचे असते. अनेकांनच्या जीवनाचे तत्वज्ञान असे असते की एका विशिष्ट वयात व्यक्तीला हे मिळालेच पाहिजे किंवा त्याने ते केलेच पाहिजे. उदाहरणार्थ वयाच्या एका विशिष्ट काळात शिक्षण, लग्न, मुले, घरदार झालेच पाहिजे. मानवी व्यवहारातून विचार करता हे योग्य हि वाटते. पवित्र शास्त्र सांगते की, पोटचे फळ हे देवाचे दान आहे . तरुणपणातील मुले हि वीराच्या भात्यातील बाणाप्रमाणे असतात. वेशीवर शत्रूशी बोलाचाली होत असता ते ओशाळणार नाहीत. स्तोत्र १२७: ३–५. परंतु अब्राहामाला व साराला मात्र म्हातारपणा पर्यंत एका लेकरासाठी वाट पहावी लागली. मग आपल्या समोर प्रश्न उपस्थित राहू शकतो की ज्या देवाला तरुण वयातील मुलांचे महत्व कळते त्याने अब्राहाम व सारा यांना इतक्या मोठया प्रतीक्षेत का ठेवले? आशीर्वादाच्या वाटेवरून चालताना आम्ही हे समजून घेणे आवश्यक आहे; यासाठीकी आपल्या जीवनातील परिस्थितीकडे आपण सकारात्मक पाहू शकू व आपल्या आत्मिक जीवन शैलीचा आनंद लुटत शांतीने भरलेले जीवन जगू शकू.देवाची योजना : देव यिर्मयाला म्हणतो,”मी तुला उदरांत निर्माण करण्याच्या पूर्वी मी तुला जाणले, आणि तूं गर्भस्थानातून निघण्याच्या आधी मी तुला पवित्र केले; मी तुला राष्ट्रां करीता भविष्यवादी म्हणून नेमले आहे. यिर्मया १:५. प्रत्येकासाठी देवाची एक योजना असते इच्छा असते. आपण आईच्या उदरात घडण्यापूर्वीच देवाने आपल्या विषयी हि योजना केलेली असते. योग्य वेळ आल्यावर गोष्टी कार्यान्वित होतात व समजतात.अब्राहामाच्या बाबतीतही असेच होते देवाने त्याची निवड पूर्वीच केली होती परंतु ती त्याला देवाच्या दृष्टीने योग्य वेळ आल्यावर कळली तेव्हा तो पंच्याहत्तर वर्षाचा होता.
देवाने अब्राहामाला
पाचारण केले
त्याच समयी त्याला अभिवचन दिले कि त्याच्या पासून तो एक मोठे राष्ट्र बनवील. पण हि गोष्ट एक दिवसात घडून येणार नव्हती. त्या अगोदर देवाला अब्राहामाला बरेच काही शिकवायचे होते घडायचे होते. त्याप्रमाणे अब्राहाम देवाच्या अनुभवातून शिकत गेला व विश्वासात वाढत गेला. विश्वासाचा पिता अशी आत्मिक उंची प्राप्त होण्या अगोदर तो मानवी दैहिक प्रवृत्तिनुरूप वागला. संत पौल रोमकराच्या मंडळीस मार्गदर्शन करताना लिहितो की, “इस्राएलापासून झाले ते सर्वच इस्राएल आहेत असे नाही. आणि ते अब्राहामाचे संतान आहेत म्हणून ते सर्व लेकरे आहेत असेही नाही, तर इसहाकातच तुझे संतान म्हटले जाईल, असे वचन आहे. म्हणजे देहाची लेकरे ती देवाची लेकरे आहेत असे नाही. तर वचनाची लेकरे तीच संतान अशी गणली जातात. कारण वचनाचे वाक्य हे आहे की, ह्या समयाप्रमाणे मी येईन आणि सारेला मुलगा होईल“. रोम ९:६–९. याचा अर्थ अब्राहाम व सारा यांना पुत्र देण्यासाठी देवाने जो विलंब लाविला त्याचे कारण हे आहे की, आपल्याला अभिवचनाच्या द्वारे जे देव पुत्रत्व प्राप्त आहे याची खात्री व्हावी.
देवाची
योजना व
उद्देश : आपल्या जीवनासाठी देवाची योजना व उद्देश काय आहेत हे आपण समजून घेतले पाहिजेत. देवाची योजना आपल्यासाठी केंव्हा सुरु होते असा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की हि योजना आईच्या उदरात घडण्या पूर्वीची असते. या योजने मागे देवाचा विशेष उद्देश असतो.जसे यिर्मयाला राष्ट्रां करीता भविष्यवक्ता म्हणून निवडिले होते. यिर्मया १:५. संत पौलाला राष्ट्रांच्या लोकांमध्ये शुभवर्तमान गाजवण्यासाठी नेमिले होते. संत पौल म्हणतो, “मी माझ्या आईच्या गर्भातून जन्मलो तेंव्हापासून ज्या देवाने मला वेगळे केले व आपल्या कृपेने मला बोलावले त्याला हे बरे वाटले की, त्याने आपला पुत्र माझ्यात प्रगट करावा, यासाठी की राष्ट्रांच्या लोकांमध्ये मी त्यांचे शुभवर्तमान गाजवावे, तेव्हा लागलेच मी माणसांचे अनुमत न घेता, आणि जे माझ्या पूर्वी प्रेषित होते त्यांच्या जवळ वर येरुशलेमेस न जाता, मी अरबस्थानात निघून गेलो व फिरून दिमिष्कास परत आलो. गलती १: १५–१७.
देवाचे लेकरे म्हणून आम्हासाठी देवाची योजना व उद्देश दोन पातळींवर पहावयास मिळतात. एक म्हणजे सामायिक पातळीवर व दुसरा म्हणजे वैयक्तिक पातळीवर.
सामायिक पातळीवर: देवाचे वचन सांगते,”ज्यांना त्याने पूर्वी ओळखले, त्यांना त्याने आपल्या पुत्राच्या प्रतिमे प्रमाणे होण्यास पूर्वी नेमले. यासाठीकी तो पुष्कळ भावांमध्ये जेष्ट व्हावा. आणखी ज्यांना त्याने पूर्वी नेमले त्यांना त्याने बोलावलेही, आणि ज्यांना त्याने बोलावले त्यांना त्याने न्यायी ठरवले, आणि ज्यांना त्याने न्यायी ठरवले त्यांना त्याने न्यायी ठरवले त्यांना त्याने गौरविले. रोम ८:२९–३०. आम्ही तर चांगली कामे करण्यासाठी ख्रिस्त येशू मध्ये अस्तित्वात आणलेले असून त्याचे कारागिरीचे काम अहो; ती चांगली कामे देवाने यासाठी योजून ठेवली की आम्ही त्यामध्ये चालावे. इफिस २:१०. या वरून स्पष्ट होते की जे सर्व ख्रिस्ती आहेत त्यांना देवाने येशू ख्रिस्ता सदृश जीवन जगण्यासाठी निवडले आहे.
वैयक्तिक पातळीवर: जसे सामायिक पातळीवर देवाची योजना व उद्देश आहेत तसे ते प्रत्येकासाठी वैयत्तिक पातळीवरही आहेत. आत्म्याच्या कृपा दानांवरून हे स्पष्ट होते. संत पौल
ख्रिस्ताच्या शरीरावरुन उदाहरण देताना सांगतो की,तुम्ही तर ख्रिस्ताचे शरीर आणि प्रत्येक आपापल्या ठिकाणी त्याचे वेगवेगळे अवयव आहा. आणि देवाने मंडळीत कित्येक ठेवले आहेत ते म्हणजे प्रथम प्रेषित, दुसरे भविष्यवादी, तिसरे शिक्षक, मग चमत्कार करण्याचे सामर्थ्य, मग निरोगी करण्याची कृपा दाने, सहाय्य, अधिकार, निरनिराळ्या भाष्या. अश्या प्रकारे कार्य करण्याचे कृपादान प्रत्येकाला भिन्न आहे. १ करिंथ १२:१७–२८.
येथे प्रत्येकाने आपले कृपादान ओळखले पाहिजे व त्याप्रमाणे देवाच्या योजनेला म्हणजे आपल्या वैयत्तिक पाचारणाला प्रतिसाद दिला पाहिजे. प्रभू मध्ये सामायिक पाचारणाला अनुसरत आत्मिक जीवन जगत असता देवाकडून नियुक्त वेळी आली म्हणजे देवाची आपल्या बाबतीतील वैयत्तिक योजना दृष्टीपथात येत जाते. व जस जसा प्रतिसाद त्या योजनेस आपण देतो तसतसे आपले जीवन आशीर्वादित होत जाते.संगाचे तात्पर्य मंडळीतील प्रत्येक व्यक्ती देवाने पचारलेला आहे व तो अतिशय अर्थपूर्ण जीवनाचा भागी आहे हे आपण प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे.
देवाने अब्राहामाला वचनदत्त पुत्र दिला तेव्हा त्याचे वय शंभर व त्याच्या पत्नीचे वय नव्वद होते. विचार करा या मृतवत शरीरांना सामर्थ्य कसे व का प्राप्त झाले. हे देवाविषयीची साक्ष व त्याचे गौरव प्रगट करणारे नाही का? देवाचे संकल्प देव सिद्धीस नेतो त्याला आपल्या शक्ती सामर्थ्याची कला गुणांची गरज नाही. गरज आहे ती आपले पाचारण समजून घेऊन देवाच्या वेळेची वाट पाहण्याची. म्हणून आपल्या आशीर्वादांची वाट पाहताना धीर सोडू नका, देव त्याच्या वेळे नुसार सर्व काही देईल.
देव थकलेल्यांना शक्ती देतो, व अशक्तांचे बळ वाढवतो. तरुण देखील थकतील व दमतील परंतु जे यहोवाची प्रतीक्षा करतात ते आपली शक्ती नवी करतील ते गरुडासारखे पंखानी वर जातील ते धावतील तरी दमनार नाहीत ते चालतील तरी थकणार नाहीत.
यशया ४०: २९–३१.
प्रार्थना: हे देवा खरोखर तू माझ्यासाठी उत्तम गोष्टी ठेवल्या आहेत तरी मला धीर धरून वाट पाहण्यास सहाय्य कर. येशूच्या नावांने मागतो म्हणून ऐक, आमेन.
रेव्ह. कैलास [आलिशा ] साठे.