देवाचे श्रेष्टत्व [ सारसत्व ]

 देवाचे श्रेष्टत्व [ सारसत्व ] 

बायबल सिद्धांत

देवाला त्याच्या पूर्ण क्षमतेमध्ये किंवा त्याच्या पूर्णत्वामध्ये तो कसा आहे हे माणसाला समजणे शक्य नाही. परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे, त्याची थोरवी अगम्य आहे.स्तोत्र १४५: ३ परंतु आपण देवाला, त्याच्या अस्तित्वाला ओळखून त्याची ओळख करून घेऊ शकतो. त्याच्याशी आपले सबंध अधिक घनिष्ट करू शकतो.पवित्र शास्त्र सांगते देव माणसावर प्रीती करितो कारण तो मानवाचा निर्माणकर्ता आहे. त्यामुळे तो आपल्यापासून स्वतःला दूर ठेवीत नाही, त्याच्या अस्तित्वाचा अनुभव तो आपल्याला वेळोवेळी देत असतो. परंतु माणसाला त्याच्याकडे लक्ष देण्यास त्याला व त्याच्या इच्छेला समजून घेण्यास वेळ नाही. पवित्र शास्त्र बायबल मध्ये देव स्वतःला प्रारंभापासून प्रकट करीत आला असल्याचे वर्णन आहे ते पुढील प्रमाणे,”देव प्राचीन काळी अंशाअंशानी व प्रकारा-प्रकारांनी आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे बोलला. तो या काळाच्या शेवटी आपल्याशी आपल्या पुत्राच्याद्वारे बोलला आहे; [म्हणजे प्रभू येशूच्या द्वारे तो प्रकट झाला]  त्याने त्याला सर्वांचा वारीस करून ठेवले आणि त्याच्या द्वारे त्याने विश्व उत्त्पन्न केले,” इब्री १:१-३. या वरून स्पष्ट होते की जर आपण पवित्र शास्त्र बायबल व प्रभू येशू यांना योग्य प्रकारे समजून घेतले तर, आपण देवाला ओळखून त्याचे श्रेष्टत्व/ त्याचे सारसत्व समजू शकतो. 

देवाच्या सारसत्वाला समजून घेण्यासाठी पुढील पाच मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत. १] देव आत्मा आहे २]देव जीवन आहे ३] देव अनन्य आहे ४] देव परिपूर्ण आहे ५] देव सनातन आहे. हे पाच मुद्दे देवाच्या व्यक्तित्वाला समजून घेण्यासाठी पायाभूत आहेत. 

देव आत्मा आहे : देव आत्मा आहे. तो अदृश्य आहे, कल १:१५, “तो सर्वकाळचा राजा, अविनाशी, अदृश्य [एकच ] ज्ञानी देव याला सन्मान व गौरव सर्वकाळ असो. आमेन,” १ तीमथ्य १:१७. या अदृश्य देवाने देवाने मानवाच्या उद्धरासाठी, प्रभू येशू ख्रिस्ता मध्ये देह धारण केला व स्वतःला मनुष्याला प्रकट केले. इब्री १:१-३. देवाचे स्वरूप कोणीही पाहू शकत नाही, आम्ही फक्त प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याला समजून घेऊ इच्छितो तोच एक माध्यम आहे जेथे आम्ही देवाला पाहू शकतो. योहान १४:९. 

मानवाने देवाला मूर्तीमध्ये शोधणे, मूर्तीची पूजा करणे किंवा कोणत्याही प्रकारे मनाच्या भुलवण्याने त्याचे गौरव इतर  गोष्टीना देणे देवाला क्रोध आणणारे आहे. म्हणून देवाने इस्राएल राष्ट्राला आज्ञा देताना अगदी निक्षून सांगितले की,”माझ्यासमोर तुला दुसरे देव नसोत. तू आपणासाठी कोरीव मूर्ती करू नको, आणि जे वरती आकाशात अथवा जे खाली पृथ्वीत अथवा जे पृथ्वीच्या खाली पाण्यात आहे त्याची प्रतिमा करू नको. तू त्यांच्या पायापडू नको, आणि त्यांची सेवा करू नको, कारण मी यहोवा तुझा देव आवेशी देव आहे, माझा द्वेष करणाऱ्यांच्या तिसऱ्या व चौथ्या पिढीवर बापाच्या अन्यायाचे शासन लेकरांवर घालणारा, आणि माझ्यावर प्रीती करणाऱ्यांच्या व माझ्या आज्ञा पाळणाऱ्यांच्या हजारांवर प्रेम दया करणारा असा मी आहे,” निर्गम २०:३-६. हे इस्राएला, ऐक, यहोवा आमचा देव एकच यहोवा आहे. तर तू आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जिवाने व आपल्या सर्व शक्तीने यहोवा तुझा देव याच्यावर प्रीती कर. अनुवाद ६:४-५.

देव जीवन आहे : देवाच्या ठायी जीवन आहे, तो जीवनाचा श्रोत आहे, जीवन त्याचे स्वतःचे आहे, तो जीवनाचा धनी आहे . शास्त्र सांगते,”पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे, तसे पुत्राच्या ठायींही स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्याला दिले,” योहान ५:२६. देवाच्या पासून सर्व सृष्टीला जीवन मिळाले आहे. त्याने जर आम्हांकडे दुर्लक्ष केले किंवा आपला स्वास काढून घेतला तर सर्व सृष्टी एकदाच नष्ट होईल. पवित्र वचन सांगते,”ज्या देवाने जग व त्यांतले अवघें केले तो आकाशाचा व पृथ्वीचा प्रभू आहे, म्हणून तो हाताने बांधलेल्या मंदिरात रहात नाही. आणि त्याला काही उणे आहे म्हणून मनुष्याचा हातांनी त्याची सेवा घडावी असे नाही; तर जीवन, प्राण व सर्वकाही तोच सर्वास देतो,”प्रेषित १७:२४-२५. “त्याचे चित्त स्वतांकडेच असले, त्याने आपला आत्मा व स्वास आवरून स्वतःच्या ठायी परत घेतला, तर सर्व जीवधाऱ्यांचा एकदम प्राणांत होईल, मानव पुन्हा मातीस मिळेल,” ईयोब ३४:१४-१५. कारण तोच निर्माता आहे. “त्याच्या द्वारे सर्व झाले; आणि झाले असे काहीच त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्याचा प्रकाश होते,” योहान १: ३-४. तेंव्हा आपण समजून घ्यावे की मनुष्य कितीही शक्तिमान झाला तरी जीवनासाठी, स्वसांसाठी त्याला देवावरच अवलंबुन रहावे लागते.

देव परिपूर्ण आहे: देव सर्वच बाबतीत परिपूर्ण आहे. त्याच्याठायी कोणतेच उणेपण नाही. देव आपल्या सर्व कामात परिपूर्ण आहे. मोसे देवाची स्तुती करताना म्हणतो, “तो दुर्ग आहे; त्याची कृती अव्यंग आहे; त्याचे मार्ग न्यायाचे आहेत; तो सत्य देव आहे, त्याच्याठायी अधर्म नाही, तो न्यायी व सरळ आहे,” अनुवाद ३२:४. पुढे हजार वर्षांनी दावीद राजा देवाची स्तुती करताना मोसेचेच अनुकरण करतो कारण देव त्याच्या वागण्यात कधीच बदलत नाही. दावीद म्हणतो,” देवा विषयी म्हणाल तर त्याचा मार्ग अव्यंग आहे; परमेश्वराचे वचन कसास लागलेले आहे; त्याचा आश्रय करणाऱ्या सर्वांची तो ढाल आहे.” २ शमुवेल २२:३१. देव ज्ञानाने, सामर्थ्याने, अधिकाराने, पवित्रतेने, व प्रीतीने पूर्ण आहे. म्हणून त्याचे नियमशास्त्र पाळणाऱ्याचे कल्याण झाल्या शिवाय रहात नाही कारण ते दोषरहित आहे. वचन सांगते “परमेश्वराचे नियमशास्त्र पूर्ण आहे ते मनाचे पुनरुज्जीवन करते; परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यांस समंजस करितो,” स्तोत्र १९:७. 

देव अनन्य आहे: देवाच्या बाजूला दुसरा देव नाही, जे देव आहेत ते मनुष्याने केलेली कारागिरी आहे असे पवित्रशास्त्र सांगते. ज्याला देव म्हणावे असा तो एकच यहोवा परमेश्वर आहे. देव याच्या सारखा आहे त्याच्या सारखा आहे असे आपण म्हणू शकत नाही. कारण देव अतुल्य आहे. देव म्हणतो,”मी कोणाशी तुल्य आहे म्हणून त्यांची उपमा मला तुम्ही द्याल असे पवित्र प्रभू म्हणतो,” यशया ४०:२५. दावीद राजा म्हणतो,’हे प्रभो परमेश्वरा, तू थोर आहेस; जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे, त्यावरून पहाता तुझ्यासमान कोणी नाही; तुझ्याशिवाय अन्य देव नाही. २ शमुवेल ७:२२. 

देवाचे महानपण व सामर्थ्य हे अनन्य आहे, अतुल्य आहे. वचन सांगते, “हे परमेश्वरा तुझसारखा कोणीच नाही; तू थोर आहेस, पराक्रमामुळे तुझे नाव मोठे आहे, यिर्मया १०:६. देवाला सर्वकाही शक्य आहे, त्याने जर कल्पना केली आणि ती कल्पना त्याला प्रत्यक्षात आणावीशी वाटली तर तो ती क्षणात प्रत्येक्षात आणू शकतो. अब्राहामाच्या विश्वासाबद्दल असे लिहिले आहे की,’ज्या देवावर त्याने विश्वास ठेविला, जो देव मेलेल्यास जिवंत करितो, व जे नाही त्यास ते असल्यासारखी आज्ञा करितो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे,’ रोम ४:१७. देव म्हणतो,”पाहा, मी परमेश्वर सर्व मानव जातीचा देव आहे; मला अवघड असे काही आहे काय”? यिर्मया ३२:२७. 

देवच फक्त ज्ञानी आहे, त्याच्याच ठायी ज्ञान आहे. आपण देव ज्ञानाच्या बाबतीत अनन्य आहे त्याच्या तुल्य कोणीच नाही. “दानीएल  म्हणाला, देवाचे नाव युगानुयुग धन्यवादित असो; कारण ज्ञान व बल हीं त्याचीच आहेत,” दानी २:२०. ज्ञान शोधणे माणसाला शक्य नाही, माणूस चिंतनातून, तत्वज्ञानातून,वाचनातून, शिक्षणातून व अनुभवातून जे ज्ञान मिळवतो ते पूर्ण ज्ञान नाही त्याला आपण सत्य म्हणू शकत नाही. ईयोब म्हणतो,”त्याच्या ठायी ज्ञान व पराक्रम  हीं आहेत, मसलत व विवेक त्याच्या जवळ आहेत” ईयोब १२:१३. माणसाने अज्ञानातून मुक्त होण्यासाठी परमेश्वराला शरण जाणे, त्याच्या कडे ज्ञानाचा प्रकाश मागणे गरजेचे आहे. प्रेषित याकोब आपल्याला मार्गदर्शन करितो की,” तुम्हांतला कोणी जर ज्ञानाने उना असेल तर त्याने जो देव सर्वांना उदारपणे देतो व दोष लावत नाही त्याच्यापाशी मागावे म्हणजे ते त्याला मिळेल”. याकोब १:५

चांगुलपणाच्या बाबतीत सुध्दा देव अनन्य, अतुल्य आहे. आपण नेहमी म्हणतो,”परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा, त्याजवर भाव ठेवतो तो पुरुष धन्य, स्तोत्र ३४:८. जो त्याच्यावर भाव ठेवतो त्याच्या चांगुलपणाची आशा धरून राहतो तो तृप्त होतो. “कारण आशा लागलेल्या जीवाला तो तृप्त करतो आणि भुकेल्या जीवाला तो उत्तम पदार्थांनी भरवतो,” स्तोत्र १०७: ९. दावीद देवाकडे प्रार्थना करितो की,”तू तुझा मनोदय साधायला मला शिकिव, कारण तू माझा देव आहेस; तुझा चांगला आत्मा मला सरळपणाच्या देशात नेवो,” स्तोत्र १४३:१०.

पवित्रतेच्या बाबतीत देव अतुल्य आहे अनन्य आहे. देवच केवळ पवित्र आहे. जसे जीवन त्याचे स्वतःचे आहे तशी पवित्रताही त्याची स्वतःची आहे. जसे ज्ञान फक्त त्याचे आहे किंवा आपण म्हणू ज्ञानाचा खरा श्रोत तोच आहे, तसे पवित्रतेचा श्रोत देवच आहे. त्याच्या शिवाय पवित्रता शोधूनही सापडणार नाही. वचन सांगते, “परमेश्वरा सारखा  पवित्र कोणी नाही, कारण तुझ्याशिवाय कोणी नाहीच; आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही. १ शमुवेल २:२. हे प्रभू तुला कोण भिणार नाही, आणि तुझ्या नावाचे गौरव कोण करणार नाही? कारण तू एकच पवित्र आहेस; कारण सर्व राष्ट्रे येऊन तुझ्या समोर नमन करतील, कारण तुझी न्याय कृत्ये प्रकट झाली आहेत. प्रकटी १५:४. 

या विश्वात देवच विश्वास योग्य आहे. कोणीही माणूस, माणसाचा धर्म, माणसाची जात, माणसाचे तत्वज्ञान, माणसांनी निर्माण केलेल्या अद्भुत विद्या, किंवा त्याचे विज्ञान किंवा देवाला सोडून ज्ञात किंवा अज्ञात अशी कोणतीही गोष्ट देवा इतकी विश्वासू असू शकत नाही. विश्वासाच्या बाबतीतही देव अनन्य आहे. “जो पुरुष यहोवाच्या ठायी विश्वास ठेवतो आणि त्याचा भरोसा यहोवाच आहे तो आशीर्वादित आहे”. यिर्मया १७:७. संत पौल करिंथकराच्या मंडळीला लिहितो,”देव विश्वासू आहे, त्याच्याकडून तुम्ही त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या भागीपणात बोलावलेले होता.” १ करिंथ १:९. देव विश्वासू असल्यामुळे आपण या वचनावर विश्वास ठेऊन त्याच्यामध्ये जे भागीपण मिळाले आहे त्याबद्दल स्वतःला धन्य समजावे कारण तो कधीच बदलत नाही.  संत पौल तीमथ्याला मार्गदर्शन करताना लिहितो की, “जरी आपण अविश्वाशी झालो, तरी तो विश्वासू राहतो कारण त्याच्याने स्वतःला नाकारवत नाही” २ तिम २:१३. 

तारण हे सुद्धा देवाकडूनच होते. तारणाच्या बाबतीत सुद्धा देव अनन्य आहे. दाविदाला या गोष्टी विषयी खात्री होती की तारण हे फक्त देवाकडूनच होते. तो म्हणतो,”यहोवा आपल्या अभिषिक्तला तारतो, हे मी आता जाणतो, तो आपल्या पवित्र आकाशातून आपल्या उजव्या हाताच्या तारण करणाऱ्या सामर्थ्याने त्याला उत्तर देईल. कोणी रथांवर आणि कोणी घोड्यांवर भरोसा ठेवतात, परंतु आम्ही आमचा देव यहोवा याच्या नावा विषयी बोलू.” स्तोत्र २०:६-७.पुढे तो त्याची तारणा विषयीची खात्री व्यक्त करताना म्हणतो,”माझा जीव मौन धरून केवळ देवाची वाट पाहात आहे,  त्याच्याकडूनच माझे तारण येते.” स्तोत्र ६२:१. 

देव सार्वकालिक आहे: सनातनत्व फक्त स्वयं अस्तित्वात असलेल्या देवाचे आहे. सनातनत्वाच्या बाबतीत देव अनन्य आहे. देवा पासून सर्वकाही निर्माण झाले तोच सर्व गोष्टींचे आद्य कारण आहे. देवाने आपले सनातन जीवन मोशेला प्रकट केले. मोसे म्हणाला, तू मला इस्राएल लोकांकडे पाठवत आहेस, पण त्यांनी मला तुझ्या बद्दल विचारले तर मी काय सांगू? तेंव्हा देवाने आपली सनातन ओळख मोसेला सांगितली. “देव मोशेला म्हणाला, मी जो असावयाचा तोच असणार, तू इस्राएल लोकांस सांग ‘मी असणार’ त्याने मला तुम्हां कडे पाठवले आहे,” निर्गम ३: १४. देवाला काळाची मर्यादा नाही. तो समयाच्या बंधनात नाही. स्तोत्रकर्ता म्हणतो,”हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आम्हांस निजधाम आहेस. पर्वत उत्पन्न झाले त्या पूर्वी, तूं पृथ्वी व जग निर्माण केली त्या पूर्वी तूं युगानुयुग देव आहेस. तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवतोस, आणि म्हणतोस आहो मानवांनो परत या. कारण तुझ्या दृष्टीने सहस्र वर्ष कालच्या गेलेल्या दिवसासारखी आहेत, रात्रीच्या प्रहारासारखी आहेत,”स्तोत्र ९०:१-४. 

Rev.Sathe Kailas  

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole