देव आपल्याला का निवडतो एक चिंतन १करिंथ ८:८,

 

वचन:
देवापुढे आपली योग्यायोग्यता अन्नाने ठरत नाही, न खाल्याने आपण कमी होत नाही व खाल्याने
आपण अधिक होत नाही. १करिंथ ८:८

एकमेकांसाठी जगा १करिंथ ८:८
ख्रिता मध्ये एक शरीर 

एकमेकांसाठी जगा: करिंथ येथे त्याकाळी खूप मूर्तिपूजा चालत असे, काही विशेष प्रसंगी सामुदायिक भोजन समारंभ आयोजित केले जात असत. संपूर्ण शहर आशा कार्यक्रमात भाग घेत असे. काही विद्वान ख्रिस्ती या भोजन समारंभात मूर्तींच्या मंदिरात भोजन करीत, तर काही दुविधा मनःस्थिती मध्ये राहात कारण त्यांना वाटत असे कि मूर्ती मध्ये ते दैवत वास करिते जर आपण ते खातो तर आपण विटाळतो.या परिस्थितीत त्यांच्या मध्ये वादविवाद होत असत. ईश्वरपरिज्ञानामुळे स्वतःला विद्वान समजणारे लोक त्यांच्या खाण्या पिण्याचे समर्थन करताना मूर्ती शून्य आहे, खाण्यापिण्या मुळे काही फरक पडत नाही असे सांगत, यशया ४०:२५२६. संत पौलाला यामुळे भीती वाटत होती कि स्वतःला शहाणे समजणाऱ्या या विद्वानांनमुळे, दुविधा मनःस्थिती असलेले भाऊ बहिणी अडखळून पुन्हा निरर्थक गोष्टींच्या मागे लागतील. त्यामुळे तो या विद्वानांना खडे बोल सुनावतो कि आपल्या भावा बहिणींशी प्रितीने वागा.त्यांच्यासाठी आशा गोष्टी पासून दूर राहा.

ख्रिस्ती जीवन हे स्वतःसाठी कधीच नसते, हे सामुदायिक कर्तव्यांनी बांधलेले जीवन आहे.तुमचे ज्ञान, सामर्थ्, आत्मिक दाने हि सर्व आत्मिक भावा बहिणींच्या उन्नतीसाठी उपयोगात आणायची असतात.संत पौल म्हणतो, “खाण्यामुळे मी जर आपल्या बंधूला अडखळण होत असेल तर मी त्याला अडखळू नये म्हणून कधीच मांस खाणार नाही.” करिंथ : १३.

संत पौल
संत पौल 

सर्वांची निवड सामाजिक उद्देशांसाठी आहे: संत पौलाची निवड विदेशी लोकांसाठी सुवार्ता घेऊन जाण्यासाठी झाली. गलती १:१५-१६. अब्राहामाची निवड इस्राएल राष्ट्राच्या निर्मितीसाठी केली उत्पत्ती १२:१-३, तर इस्राएलची निवड जगाला प्रकाश देण्यासाठी केली यशया ४२:६, योसेफाला देवाने राज्य दिले ते  पुष्कळ लोकांचे प्राण वाचावे म्हणून, उत्पत्ती ५०:२०. एस्तेरला देवाने राज्य दिले ते यहुद्यांच्या प्राणांचे रक्षण व्हावे म्हणून, एस्तेर ४:१४. 

देवाने प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला का निवडले आहे : देवाचे वचन सांगते, तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, मोलाने मिळवलेले लोक आहा, यासाठी की ज्याने तुम्हांस अंधारातून आपल्या अद्दुत प्रकाशात बोलाविले आहे त्याचे सद्गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. १ पेत्र २: ९. येथे ख्रिस्ताला अभिप्रित असलेला सद्गुण कोणता असा प्रश्न जर आपण उपस्थित करू तर त्याचे उत्तर स्वकेंद्रित धार्मिकते मध्ये सापडणार नाही, तर ख्रिस्ताच्या शिकवणीत सापडते. चांगल्या शमरोनीचा दाखला यावर योग्य प्रकाश टाकणारा आहे. लूक १०:२५-३७. 
अक्षय जीवन कसे मिळावे ? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी प्रभू येशूने चागंल्या शमरोनीचा दाखला दिला. कोणी एक नियमशास्त्री त्याची परीक्षा पाहू इच्छित होता. म्हणून त्याने प्रभू येशूला प्रश्न विचारला कि मी सर्वकाळचे जीवन मिळावे म्हणून काय करू ? तेव्हा प्रभू येशूने त्यास विचारले की, नियमशास्त्रा नुसार काय केले पाहिजे ? तेव्हा त्याने उत्तर दिले कि, “तू आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जिवाने व आपल्या सर्व शक्तीने व आपल्या सर्व मनाने तुझा देव प्रभू याच्यावर प्रीती कर., ” यावर प्रभू येशूने म्हटले, ठीक उत्तर दिलेस, हे कर म्हणजे तू वाचशील.” लूक १० :२७ -२८. 
प्रभू येशूचे हे उत्तर त्याला टोचले, स्वतःला न्यायी ठरवण्यासाठी त्याने प्रभू येशूला उत्तर देऊन म्हटले, तर माझा शेजारी कोण ? आता येथे आपल्याला स्वकेंद्रित धार्मिकता आणि आपल्या निवडीला प्रतिसाद देणारी खरी धार्मिकता प्रभु येशूने दाखवून दिली आहे. यासाठी त्याने एक दाखला दिला, तो म्हणतो; पहा कोणी एक वाटसरू येरुशलेमेवरुन यरीहो कडे जात असता, वाटेत लुटारूंनी त्याला अर्धमेले होऊ पर्यंत मारले व त्याचे सर्व काही लुटून ते निघून गेले. हा वाटसरू तेथेच मरणप्राय झालेल्या अवस्थेत पडून असता, तेथे एक याजक आला, त्याने त्याला पाहिले पण काहीही न करता तो दुसऱ्या वाटेने गेला. नंतर एक लेवी त्या ठिकाणी आला व त्यानेही याजका प्रमाणे त्याच्याकडे पाहून न पाहिल्या सारखे केले व दुसऱ्या वाटेने निघून गेला. नंतर तेथे एक शमरोनी आला, त्याने या वाटसरूची मदत केली, त्याच्या जखमा तेल व द्राक्षरस ओतून बांधल्या, त्याला आपल्या गाढवावर बसवून एका   उतारशालेत नेले, त्याचा सांभाळ केला व दुसऱ्या दिवशी जाताना उतार शाळेच्या  मालकाला दोन रुपये देऊन सांगितले कि या व्यक्तीची काळजी घ्या, मी पुन्हा येईल व आपण जर ज्यास्तीचा खर्च केला असेल तर तो खर्च पूर्ण करीन. आता आपल्या सहज लक्ष्यात येईल की, याठिकाणी स्वकेंद्रित धार्मिक कोण आहेत व खऱ्या अर्थाने धार्मिक कोण आहे.
आपल्याला हि या शमरोनी प्रमाणे खरी धार्मिकता अंगीकारणे गरजेचे आहे. याजक व लेवी दोघेही देवाने त्याच्या सेवेसाठी निवडलेले असता, देवाच्या निवडीचा खरा अर्थ समजू शकले नाहीत. पण आपल्याला प्रभू येशूने सांगितले आहे की, तुम्ही जगाचा प्रकाश आहात, डोंगरावर वसलेले नगर लुप्त नाही.आणि दिवा लावून तो मापाखाली ठेवत नाहीत, तर दिवटणीवर ठेवतात, मग जे घरात आहेत त्या सर्वाना तो उजेड देतो. तसाच तुमचा उजेड माणसांपुढे प्रकाशो, यासाठीकी त्यांनी तुमची चांगली कर्मे पाहावी, आणि तुमचा बाप जो आकाशात आहे त्याचे गौरव करावे. मत्तय  ५:१४-१६.

चांगला शमरोनी
चांगला शमरोनी 
यावरून हे स्पष्ट होते की देव आपल्याला स्वकेंद्रित धार्मिकतेचे प्रदर्शन करण्यासाठी निवडीत नाही तर आपण जगात देवाचे प्रतिनिधी म्हणून न्यायीपणाची कृत्ये करून या जगाला प्रकाश द्यावा हि त्याची इच्छा आहे.
प्रार्थना: हे प्रभू येशू तू पवित्र आत्म्या द्वारे मला रोज मार्गदर्शन करतोस म्हणून मी तुझे आभार मानतो
मला माझी आत्मिक कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडता यावी म्हणून सहाय्य कर .येशूच्या नावाने मागतो.आमेन.

रेव्ह. कैलास साठे 

 

 

Enable GingerCannot connect to Ginger Check your internet connection
or reload the browser
Disable in this text fieldEditEdit in GingerEdit in Ginger×

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole