देव कसा आहे ?

देवाच्या व्यक्तित्वाचे पैलू : देव कोण आहे ? देव कसा आहे ? जे जर आपल्याला समजून घ्यावयाचे असेल तर पवित्र शास्त्र बायबल मध्ये देवाचे प्रगट झालेले व्यक्तित्व आपण समजून घेतले पाहिजे. देवाने आपल्याला स्वतःचा परिचय देताना आपल्याला समजेल असा आपला परिचय दिला आहे. 

देवाच्या व्यक्तित्वाचे हे पैलू आपण जितके समजून घेऊ तितके आपण त्याच्या अधिकारांशी, सामर्थ्याशी, व प्रितीशी एकरूप होऊ, त्याच्यावर अवलंबून जीवन जगू, व त्याला समर्पित असू.

अ ) देव सनातन आहे : देव सनातन आहे याचा अर्थ त्याला सुरवात व शेवट नाही. तो स्वयंम आस्तित्वात आहे व तो नेहमी असणार. तोच सर्व विश्वाचे आद्य कारण आहे, त्याच्या पासून सर्व झाले व त्याच्या गौरवी इच्छेने झाले. विश्वातील प्रत्येक गोष्ट म्हणजे ग्रह, तारे, आकाशें, देवदूत, सर्वकाही जे दृश्य व अदृश्य आहे ते देवाने निर्मिलेले असल्यामुळे त्यांच्या आस्तित्वात येण्याची एक वेळ आहे व त्यांचे अस्तित्व संपण्याचीही एक वेळ आहे, त्यामुळे सर्व निर्मिती समयाच्या बंधनात आहे, परंतु देव समयाच्या बंधनात नाही म्हणून तो सनातन आहे. तिमोथी ६:१६ सांगते, “जो धन्य व एकच अधिपती, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू , ज्या एकालाच अमरत्व आहे, तो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा मनुष्याने पाहिले नाही.आणि कोणाच्याने पाहावत नाही, तो ते त्याचे प्रकट होणे यथाकाळी दिसण्यात आणील; त्याला सन्मान व युगांयुगाचे सामर्थ्य असो.आमेन”. स्तोत्र  ९०:२ सांगते, ‘देव युगानुयुग आहे.’ 

देव सनातन असल्यामुळे आपण त्याच्या अभिवचनानुसार सुरक्षित आहोत. त्याच्या वरील विश्वास व त्याच्यामधील जीवन आपल्याला अमरत्वाकडे घेऊन जाते. ‘तो आपल्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील, यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्टहि नाहीत कारण पहिले होऊन गेले प्रकटी २१:४

ब ) देव सर्वज्ञ आहे : देव सर्वज्ञ आहे म्हणजे देवाला सर्व ज्ञात आहे, त्याला सर्व ज्ञान आहे, कारण तोच सर्व गोष्टींचे आद्य कारण आहे, सर्व त्याच्या पासून व त्याच्या इच्छेने त्याच्या गौरवासाठी झाले आहे.त्याच्या समोर भूतकाळ व भविष्यकाळ वर्तमान काळाप्रमाणे आहे. 

देव सर्वत्र  पाहतो : परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत, ते बरे वाईट पहात असतात. नीतिसूत्रे :१५:३ स्तोत्रकर्ता म्हणतो, ‘मी तुझ्या आत्म्या पासून कोठे जाऊ ? मी तुझ्या समक्षेतेपासून कोठे पळू ? प्रत्येक ठिकाणी तू आहेस असे तो म्हणतो,’ पुढे तो म्हणतो ‘मी जरी म्हणालो की अंधार लपवो, सभोवतीचा प्रकाश काळोख होवो, व असे जरी मी म्हणालो, तरी अंधकार देखील तुझ्यापासून काहीच लपवत नाही, रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहे. स्तोत्र १३९:७, ११-१२. 

देव आपले विचार शब्द व कृती जाणतो : स्तोत्र १३९:१-४ सांगते, “हे परमेश्वरा तू मला पारखले आहे, तू मला जाणतोस, माझे बसणे, व माझे उठणे तू जाणतोस. तू दुरून माझे मनोगत समजतो. आपले मनोगत देव जाणतो, आपल्या मनात आलेला चांगला वाईट विचार तो जाणतो. देवाचे वचन सांगते, ‘डॅनियलने ज्या दिवशी तू समज घेण्याचा, व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निच्चय केला त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले, त्याच तुझ्या शब्दांवरून मी आलो आहे, असे देवदूताने त्याला सांगितले.’ डॅनियल १०:१२. यावरून हे स्पष्ट होते की आपण आपले मन देवासमोर योग्य ठेवल्याने आपण आशीर्वादित जीवन जगू शकतो. देवाचा आत्मा सर्व गोष्टींचा शोधक आहे ,१ करिंथ २:१०-११. देवाला  आपल्या बद्दल सर्व माहित आहे, देवाचे वचन सांगते त्याने आपल्या डोक्यावरील केस देखील मोजलेले आहेत. मत्तय १०:२९-३१

क) देव सर्वव्यापी आहे: देव सर्वव्यापी आहे याचा अर्थ देवाला सेर्ववेळी सर्वठिकाणी उपस्थित राहण्याची, पाहण्याची व कार्यकरण्याची क्षमता आहे. त्याच्या समक्षतेने सर्व विश्व व्यापले आहे. दावीद राजा म्हणतो,”हे देवा तू मला मागुनपुढून घेरले आहे, माझ्यावर तू आपला हात ठेविला आहे, हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडे आहे; हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्याबाहेर आहे. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे जाऊ ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळू.  स्तोत्र १३९: ५-७

देव सर्वव्यापी आहे यावरून आपण समजावे की देव आपणा कोणापासूनही दूर नाही. पवित्र शास्त्र सांगते,”ज्या देवाने जग व त्यातले अवघे केले, तो आकाशाचा व पृथ्वीचा प्रभू आहे, म्हणून तो हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही; आणि त्याला काही उणे आहे, म्हणून मनुष्याच्या हातांनी त्याची सेवा घडावी असे नाही; तर जीवन, प्राण व सर्व कांही तोच सर्वास देतो; आणि एकापासून मनुष्याची सर्व राष्ट्रे उत्पन्न करून त्यांनी सगळ्या भूपृष्टभागावर रहावे असे त्याने केले, आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्यानें ठरवल्या; अशासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा,म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसे तरी मिळवून घ्यावे. तो आपल्यातल्या कोणाएकापासूनही दूर नाही.   प्रेषित १७:२४-२७. 

ड ) देव सर्व शक्तिमान आहे: देवाच्या शक्ती सामर्थ्याची आपण कल्पनाही करू शकत नाही, ते आपल्या बुद्धी सामर्थ्याने समजून घेणे अश्यक्य आहे. देवाचे वचन सांगते की,”आमचा देव स्वर्गात आहे त्याला बरे वाटते ते सर्व तो करितो,” स्तोत्र ११५:३. देवाच्या सामर्थ्यावर आपण कसा विश्वास ठेवावा हे आपण अब्राहामाच्या जीवनावरून शिकतो. देवाचे वचन अब्राहामाच्या विश्वासाबद्दल सांगते,”ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यास जिवंत करितो, व जे नाही त्यास ते असल्यासारखी आज्ञा करितो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे. त्याने आशेचा संभव नसताही आशेने विश्वास धरिला, यासाठीकी तशी ‘तशी तुझी संतती होईल’ असे जे वचन त्याप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे. आपले निर्जीव झालेले शरीर व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण हीं त्याच्या लक्ष्यात होती; तथापि विश्वासाला दुर्बलता येऊ न देता, त्याने देववचनाकडे पाहून अविश्वासामुळे आपली डळमळ होऊ दिली नाही, तर विश्वासाने प्रबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. आपण दिलेले वचन पूर्ण करावयासी तो समर्थ आहे असा त्याचा पूर्ण निच्चय होता .” रोम ४:१७-२१

इ ) देव पवित्र आहे: देव पवित्र आहे, त्याच्याठायी कोणताही विकार नाही. पवित्रतेचि व्याख्या जर करावयाची म्हटले तर इतकेच म्हणावे लागेल की, “पवित्रता म्हणजे देव, त्याचे सर्वांग पवित्र व्यक्तित्व.” कारण पवित्रता हि फक्त देवाच्या ठायी आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकात एका साक्षात्कारात चार अद्भुत प्राणी; देवाची स्तुती करताना, पवित्र, पवित्र, पवित्र, जो होता, आहे व येतो’ तो ‘प्रभू देव, सर्वसत्ताधारी,’ हे म्हणावयाचे ते रात्रंदिवस थांबत नाहीत, प्रगटी ४:८. यशया ६:२-३ सांगते, सराफीम देवाच्या सिंहासनाभोवती आळीपाळीने व उच्च स्वराने, पवित्र ! पवित्र ! पवित्र ! सेनाधीश परमेश्वर ! अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय असे सतत घोषित करीत असतात. स्तोत्रकर्ता म्हणतो, “हे इस्राएलाच्या स्तवनात वसणाऱ्या, तू पवित्र आहेस,”  स्तोत्र  २२:३.

देव पवित्र आहे म्हणून त्याची आपल्याकडून हीच अपेक्षा आहे की तो जसा पवित्र आहे तसे आपणही पवित्र असावे, [लेवीय १९:२]. १ पेत्र १:१३-१६,सांगते,”यास्तव तुम्ही आपल्या मनरूपी कंबरा बांधा आणि सावध राहून येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण होण्याच्या वेळीं तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेंतील आपल्या पूर्वीच्या वासनांप्रमाणे वागू वर्तू नका; तर ज्याने तुम्हास पाचारण केले, तो जसा पवित्र आहे, तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा; कारण, मी पवित्र आहे यास्तव तुम्ही पवित्र व्हा, असा शास्रलेख आहे.पुढे देवाचे वचन अतिशय आग्रहाने सांगते,”आपण आपले उरलेले आयुष्य मनुष्याच्या इच्छेप्रमाणे घालवावे, १पेत्र ४:२. या युगाबरोबर समरूप होऊ नका; तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाची जी उत्तम, ग्रहणिय व परिपूर्ण इच्छा, ती काय आहे हें समजून घ्यावें,रोम १२:२. येशू ख्रिस्त सर्वांसाठी याकरिता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करिता नव्हे तर यांच्यासाठी जो मेला व उठला त्याच्याकरीता जगावे.२ करिंथ ५:१५,

 ई) देव प्रीती आहे : देव प्रीती आहे, तो सर्वांवर प्रीती करितो, त्याकडे कोणताच भेदभाव नाही. पवित्र शास्त्र सांगते, ‘देव मानवावरच्या प्रीतीचे प्रमाण असे देतो की आपण पापी असतां ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला,’ रोम ५:८.पुढे पवित्र शास्त्र सांगते,”देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यानें आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याजवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” योहान ३:१६ 

देवाच्या या प्रीतीपूर्ण स्वभावाला आपण योग्य प्रतिसाद द्यावा म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने देवाच्या लोकांसाठी सर्वात मोठी आज्ञा दिली ती प्रीती विषयी. देव प्रीती आहे म्हणून आपले आत्मिक जीवन प्रितीने भरलेले असले पाहिजे, आपण देवावर पूर्ण अंत:करणाने, पूर्ण जिवाने, व पूर्ण मनाने प्रीती करावी व जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावरही प्रीती करावी, अशी त्याची इच्छा आहे.मत्तय २२: ३४-४०

देवावर सर्वस्व पणाला लावून प्रीती करावी यातच मानवाचे कल्याण आहे.जे देवावर प्रीती करितात त्यांच्यासाठी सर्वकाही कल्याणार्थ आहे रोम : ८:२८. देव प्रीती स्वरूप आहे; जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो,१ योहान ४:१६,

रेव्ह कैलास [आलिशा ] साठे. 

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                      

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole