देव कोण आहे?
देवाबद्दल आपण समाजात अनेक मत मतांतर पाहतो. देवाला कोणी मानो अथवा न मानो, प्रत्येक जण त्याच्या अस्तित्वाचा, आपल्या जीवनातील त्याच्या हस्तक्षेपाचा व त्याच्या अधिकाराचा अनुभव घेतो. व त्यातूनच माणसाच्या मनात नकळत प्रश्न उभा राहतो की कोण आहे ज्यामुळे हे विश्व व माझे जीवन प्रभावित होते ? हा देव आहे का ? आहे तर मग तो कोण आहे ? मी त्याच्या बद्दल कसे जाणून घेऊ ? त्याचे व माझे काय नाते आहे ? व जर काही नाते आहे तर मी त्याला कसा प्रतिसाद देऊ ?
देवाबद्दल आपल्या मनात उठणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी काही लोक विज्ञानाचा आधार घेतात, काही तत्वज्ञानाचा आधार घेतात तर काही लोक वेगवेगळ्या धर्मांचा आधार घेतात, तरी कोणालाही देव काय आहे हे कळत नाही उलट अधिक संभ्रम निर्माण होतो.
येथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जो पर्यंत माणूस माणसाला स्वतःची ओळख करून देत नाही तो पर्यंत आपणास एकमेकांची खरी ओळख होत नाही, तो पर्यंत आपण एकमेकांबद्दल फक्त अंदाज बांधत असतो. हे देवाच्या बाबतीतही अगदी असेच आहे. देवाने स्वतःचा परिचय दिल्या शिवाय आपण त्याला समजू शकत नाही.
आता जर आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की हे कस शक्य तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की देवाने पवित्र शास्त्र (बायबल ) च्या द्वारे स्वतःला प्रगट केले आहे. बायबल हे केवळ एकमात्र माध्यम आहे की ज्या द्वारे आपला आणि देवाचा परिचय होतो,व जीवन सुख, शांती, व आनंदाने बहरून जाते.
अ) देव निर्माण कर्ता आहे : पवित्र शास्त्र बायबल सांगते की देव म्हणजे निर्माणकर्ता. उत्पत्तीच्या पहिल्या व दुसऱ्या अध्यायामध्ये असे वर्णन आहे की, देवाने सर्व विश्व निर्माण केले आहे, सर्व सृष्टीचा तो निर्माता आहे. निर्गम २०:११ सांगते की, देवाने सहा दिवसात आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले. मानवाला देवाने आपल्या प्रतिरूपात निर्माण केले आहे. उत्पत्ती १:२७. या वरून स्पष्ट होते की देव म्हणजे निर्माता, सर्वांचा बाप! बापाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. म्हणून जसा बाप एक असतो तसा देवही एक आहे. देव म्हटले की आपल्याला समजायला हवे की हे माझ्या व सर्वांच्या बापाविषयी बोलल्या जात आहे. बापाच्या पंगतीत आपण दुसऱ्या कोणालाच स्थान देत नाही हे अगदी तशेच आहे. जर आपण कोणालाही आपला बाप म्हणू लागलो तर खऱ्या बापाला दुःख होईल व इतकेच नाही तर ती गोष्ट आपल्या बदनामीचे व अपमानाचे कारण होईल. म्हणून देव म्हटले की निर्माण कर्ता आपला बाप हेच आपण समजून घेतले पाहिजे.
ब) देव सर्वोच्च आहे : देव हाच सर्वोच्च आहे. आत्मिक जगातील कोणतीच शक्ती, किंवा व्यक्ती देव होऊ शकत नाही. किंवा स्वतःला देव म्हणवून घेऊ शकत नाही. भौतिक जगातील सुध्दा कोणीही राजा अथवा महान व्यक्ती देव होऊ शकत नाही किंवा स्वतःला देव म्हणवून घेऊ शकत नाही. किंवा आपणही कोणाला देवाच्या बरोबरीला बसवू नाही. ते महापाप आहे. देवाला सर्वोच्च, परात्पर, व सनातन, म्हटले आहे. स्तोत्र ५०:१४, ४६:४, ९१:१, २१:७. त्यामुळे आपल्या जीवनातही देवाला सर्वोच्च स्थान असावयाला हवे.
क) देव यहोवा आहे :सर्वोच्च देवाला संबोधतांना वेगवेळ्या भाषेत व संस्कृतीत वेगवेगळे नांवे व उपाध्या आहेत. जसे आपल्या मराठी भाषेत आपण त्याला परमेश्वर अथवा ईश्वर म्हणतो. तसे देवाने स्वतःचे नाव मानवाला प्रगट करताना स्वतःला “यहोवा ” म्हटले आहे, निर्गम ३:१४. मराठीमध्ये याचे भाषांतर,”मी जो असावयाचा तोच असणार” अशाप्रकारचे केले आहे. या वरून स्पष्ट होते की; हे नाव देवाचे सनातनत्व प्रगट करते. इब्री १३:८ सांगते,”येशू ख्रिस्त काल, आज, व युगांयुग सारखाच आहे.”
देवाने हे स्वतः सांगितलेले नाव असल्यामुळे यहुदी धर्मगुरू या नावाला अतिशय श्रेष्ट स्थान देत. प्रत्येक वेळी हे नाव उच्चारण्याची अथवा लिहिण्याच्या अगोदर ते आंघोळ करीत. व हे शक्य नसल्यास ते देवाप्रती आदर दाखवत या नावाऐवजी इतर उपाधीवजा नावांचा वापर करीत. जसे, ‘सर्वोच्च देव, सर्वसमर्थ देव, परात्पर देव, वा प्रभू,’ असे.
प्रार्थना: हे परात्पर देवा तू पवित्र शास्त्रात ( बायबल) मध्ये स्वतःला प्रगट केले म्हणून मी तुझे आभार मानतो. तू निर्माणकर्ता, माझा व या विश्वाचा बाप आहेस, तू सर्वोश्रेष्ठ आहेस, व तू सनातन आहेस. हे मला कळाले आहे. तरी माझ्या जीवातून तुला मान, महिमा व आदर मिळावा म्हणून माझ्यावर कृपा कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक, आमिन.
रेव्ह कैलास (आलिशा ) साठे
Super, excellent