फलद्रुप स्त्री
वचन: आणि सारा म्हणाली देवाने मला हसवले; जो कोणी ऐकेल तो माझ्या बरोबर हसेल. उत्पत्ती २१:६.
प्रस्तावना:पूर्वीच्या काळी स्त्रीला पुत्र होणे किंवा मुलं होणे अतिशय महत्वाचे मानले जात असे. जो पर्यंत स्त्रीला मूल होत नाही तिची जीवन सार्थक होत नव्हते. स्त्रीचा जन्मच मुलांना जन्म देण्यासाठी व त्यांची काळजी घेण्यासाठी होतो अशी त्या काळी
मान्यता होती. जर एखादी स्त्री वांझ असेल तर तिला समाजात तुच्छतेची वागणूक मिळत असे. त्यामुळे आशा स्रिया खचून जात असत.
त्यांच्या मधील हि उणीव जगातील कोणतीच गोष्ट भरून काढू शकत नसे. त्यामुळे त्यांचे जीवन निराशेने व दुःखाने भरून जात असे. वांझ स्त्री च्या वेदना फक्त वांझ स्त्रीच समजू शकते असे म्हटले तर वावगे होणार नाही. (वाचा १ शमुवेल १: ९–१८.) सारा सुध्दा याच दुःखातून गेली असणार हे आपण समजू शकतो. मला कोणीतरी आई म्हणून हाक मारावी, कोणालातरी मी मूल म्हणून जवळ घ्यावे, आपल्या पतीला पुत्र सुख प्राप्त व्हावे हे तिला मनोमन वाटत असल्यामुळेच तिने स्वतःची दासी त्याला बायको म्हणून दिली.
{ कारण त्या काळात पूर्वेकडे अशी प्रथा होती कि दासीची मुले तिच्या धनिणीची समजल्या जात जर ती धनीण वांझ असेल तर किंवा आपण याला असेहि
समजून घेऊ शकतो कि धनिणीचा दासीच्या मुलांवर पूर्ण अधिकार असे }. पण आता देवाने तिचे सर्व दुःख आनंदात बदलून टाकले होते. तिचे वय नव्व्द वर्षांचे व अब्राहामाचे वय शंभर वर्षांचे असताना देवाने तिला मातृत्वाचे हे सुख दिले होते. वांझपणाचा कलंक निघून गेला होता, हि सर्व देवाची करणी आहे, हे तिला पूर्णपणे कळाले होते. हे देवाचे सामर्थ्य आहे, हे देवाचे विश्वासूपण आहे, व हा केवळ त्याचा कृपा प्रसाद आहे हे तिला कळाले होते. म्हणूनच ती म्हणते देवाने मला हसवले जो कोणी ऐकेल तो माझ्या बरोबर हसेल.
येथे सारा जी आपली आत्मिक माता आहे ती जणू येणाऱ्या पिढयांना व सर्व वांझ स्रियांना, देवा वरील विश्वासाने असे अभिवचन देत आहे किंवा विश्वास देत आहे की देवावर विश्वास ठेवा, त्याच्या बरोबर सात्विकतेने चाला, व त्याच्या कडे प्रार्थना करा तो कृपाळू, प्रीतिनेपूर्ण व सर्वसमर्थ देव माझ्या प्रमाणेच तुमचे दुःख आनंदात बदलून टाकीन.
तिचे हे आश्वासन सत्य आहे, म्हणूनच हजारो वर्षांनंतर स्तोत्रकर्ता म्हणतो, “तो वांझेल घरकरीन, लेकरांची हर्षित आई करितो. हालेलूयाह. स्तोत्र ११३:९.आजही अनेक स्रिया देवावर विश्वास ठेऊन सारा बरोबर हसत आहेत.
प्रार्थना:प्रभू येशू तू सर्वसमर्थ आहेस, कोणीही दुःखी नसावे हीच तुझी इच्छा आहे. म्हणून कृपा करून माझी प्रार्थना ऐक व जी कोणी बहीण तुझ्यावर विश्वास ठेऊन तुझ्याकडे मातृत्व सुख मागेल तिला आनंदी मुलाची माता बनव. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन.
रेव्ह. कैलास [आलिशा ] साठे.