महान सत्य. रोम ११:३६.

गूढ सत्याचा शोध 

वचन: सर्वकाही त्याच्या पासून व त्याच्या द्वारे व त्याच्याच प्रित्यर्थ आहे. रोम ११:३६.

क्रोस
प्रास्ताविक: जगातील घडामोडी अथवा आपले वैयक्तिक अनुभव आपल्या पुढे अनेक प्रश्न उपस्थित करतात. काय बरोबर काय चूक किंवा घडणाऱ्या गोष्टीं मागची कारणे काही कळत नाही. तरी मनुष्य आपल्या कुवतीनुसार काही अर्थ काढण्याचा प्रयत्त्न करतो. जितके त्याला कळते त्या आधारावर न्याय करण्याचा प्रयत्त्न करतो. कधी आत्मप्रौढी मिरवतो तर कधी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्त्न करतो. या प्रयत्नात तो देवालाही सोडत नाही. परंतु माणसाने हे समजून घ्यावे कि देवाचे मार्ग अगम्य आहेत ते तर्कशुध्द विचार करून कळत नाहीत.तरी माणसाने एक मध्यवर्ती सत्य लक्षात घ्यावे की, तो कितीही शक्तिशाली असला तरी तो त्याचा मृत्यू चुकवू शकत नाही इतकेच नाही तर त्याला क्षणभर पुढे ढकलू शकत नाही. आपल्याकडे एक म्हण आहे की,’आले देवाजीच्या माना तेथे कोणाचे चालेना. तो रंकाला धुळीतून उचलून राज्यांच्या पंक्तीस बसवतो व राज्यांचे सिहांसन काडून घेऊन त्याला धुळीला मिळवतो. म्हणून सर्वकाही त्याच्या पासून आहे व त्याच्या प्रित्यर्थ आहे. माणसाने त्याची इच्छा व त्याचे मार्ग समजून घेऊन त्याला अनुसरण्यातच त्याचे कल्याण आहे. 

देव विश्ववनिर्माता आहे: हे विश्व् देवाने निर्माण केले आहे. त्यामुळे देवाचा या विश्वावर अधिकार आहे. या विश्वाबद्दलच्या त्याच्या इच्छा महत्वपूर्ण आहेत, कारण तो सर्व समर्थ देव त्याला हवं ते या विश्वाचे करू शकतो. तो सर्व सृष्टीचा न्याय करण्यास समर्थ आहे. त्यामुळे सर्व गोष्टी अस्तित्वात असण्याचे कारण तोच आहे व पुढेही तोच असणार आहे.तो आज माणसांचा न्याय करितो, राष्ट्रांचा न्याय करितो व शेवटी तोच सर्वांचा न्याय करून सार्वकालिक सृष्टीची निर्मिती करणार आहे. 

देवच सर्वज्ञ आहे: या विश्वात देवच सर्वज्ञ आहे. म्हणजे त्यालाच सर्व ज्ञान आहे. देवाचे वचन सांगते, माझ्याकडे तू आरोळी कर म्हणजे मी तुला उत्तर देईन, व तुला माहित नाहीत अशा मोठया, व अवघड गोष्टी तुला दाखवीन,”यिर्मया ३३:३. म्हणून मनुष्याने आपल्या जीवनातील अथवा जगातील घडामोडींचा काही अर्थ काढण्यापेक्षा देवाला विचारणे अधिक चांगले. त्याला हाक मारली तरच ते तो आपल्याला सांगू शकतो परंतु तो त्याच्या इच्छेचा भाग आहे. तरी माणसाने त्याच्या अधिकाराला, ज्ञानाला, दिव्य योजनांना संपूर्ण मान सन्मान देऊन त्याचे अद्भुत कार्य जगात व आपल्या जीवनात अनुभवावे हे इष्ट आहे. 

ख्रिस्त तेवढा मिळवावा: देवाचे वचन अतिशय मोलाचे मार्गदर्शन करते की, “मनुष्याने सर्व जग मिळवले व आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ,” मार्क ८: ३६. म्हणून जगात आपली स्थिती काहीही असो आपण ख्रिस्ताला सरळपणे अनुसरत राहणे ह्यातच आपले कल्याण आहे. देव भक्त ईयोबाच्या जीवनातील दुःखाचे कारण त्याचे विद्वान मित्र व स्वतः तो समजू शकला नाही. तो तक्रार करून देवाकडून उत्तराची अपेक्षा करू लागला, कारण त्याच्या मित्रांनी त्याच्या धार्मिकतेबद्दल त्याला बोल लावला होता. तेव्हा देवाने त्याला सृष्टीचक्रातील गूढ गोष्टीं बद्दल अनेक प्रश्न विचारले. तेव्हा ईयोब निरुत्तर झाला व त्याने आपल्या तोंडावर हात ठेविला व म्हणाला,’मला समजत नाही ते मी बोललो ते माझ्या आटोक्याबाहेचे व अद्भुत आहे ते मला कळले नाही. ईयोबाच्या मित्रांना वाटत होते कि धार्मिकांची भरभराटच व्हायला हवी व दुर्जनांचा नाश. परंतु हे सूत्र माणसाचे आहे, ईयोब धार्मिक होता तरी त्याच्या जीवनात भयानक संकट आले ते दुःख त्याच्या जीवनात खरेच यायला नको होते परंतु त्या दुःखाची सांगता अशी झाली कि त्याने समोरासमोर देवाला पहिले व आशीर्वाद दुप्पट झाले. येथे  भौतिक आशीर्वादांना गौण समजू पण त्याने देवाला प्रत्यक्ष पाहिले व त्याच्याशी बोलला. देवाला अनुसरल्यामुळे; हा महान आशीर्वाद ईयोबाला मिळाला.

प्रार्थना: हे प्रभू येशू तुझ्या अद्भुत योजना व तुझे माझ्या जीवनातील कार्य यासाठी मी तुला धन्यवाद देतो. माझ्यावर दया कर व तुझ्या इच्छेला समर्पित राहण्यास मला साहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो. आमेन.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole