मौंडी गुरुवार. योहान १३:१-३५

                                                                       मौंडी  गुरुवार 

मौंडी गुरुवार
प्रस्तावना : पवित्र शास्त्रात मौंडी गुरुवार अशा शब्दाचा उल्लेख नाही. परंतु आज संपूर्ण ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये मौंडी गुरुवार पाळतात किंवा आपण म्हणू कि साजरा करितात. कारण जसे सुंतेचे व वल्हांडणाचे महत्व जुन्या करारातील नियम शास्त्रावर आधारित आहे, व आजही यहुदी सुंतेचे व वल्हांडणाचे महत्व लक्ष्यात घेऊन साजरे करितात. तसे ख्रिस्ताने सांगितलेले दोन विधी म्हणजे बाप्तिस्मा व प्रभू भोजन  याला महत्व आहे. हे दोन्ही विधी नवीन करारात ख्रिस्ताद्वारे आज्ञापिले आहेत. चला तर मग मौंडी गुरुवार बद्दल आपण सविस्तर पणे समजून घेऊ.

मौंडी गुरुवार का म्हणतात ? मौंडी गुरुवार म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला मौंडी या शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहजे. मौंडी हा शब्द लॅटिन भाषेतील mandatum या शब्दातून घेतला आहे, याचा अर्थ आज्ञा असा होतो. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या मृत्यूच्या आधल्या दिवशी म्हणजे गुरुवारी संध्याकाळी आपल्या शिष्यांच्या संगती वल्हांडणाचे भोजन घेत असताना; प्रभू भोजनाच्या विधीची स्थापना करून त्यांना एक नवी आज्ञा दिली की,” तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, जशी मी तुम्हांवर प्रीती केली तशी तुम्ही हि एकमेकांवर प्रीती करावी.  तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहा.” योहान १३:३४-३५. या आज्ञेचा व घालून दिलेल्या प्रभुभोजनाच्या विधीचा संदर्भ घेत या दिवसाला मौंडी गुरुवार असे म्हटले जाते. 

वल्हांडणा ऐवजी प्रभुभोजन: आपल्याला माहित आहे की, त्या वेळी प्रभू येशू आपल्या शिष्यांसह वल्हांडणाचे भोजन करीत होता किंवा सण साजरा करीत होता.मत्तय २६:१७-१९. यहुद्यांच्या रीतीप्रमाणे वल्हांडणाच्या भोजनाचे प्रतिनिधित्व कुटुंबाचा प्रमुख करी. तो हाती प्याला घेऊन देवाला धन्यवाद देत असे व तो प्याला कुटुंबातील इतर सदश्यांना देत असे. या प्याल्याला ते धन्यवादाचा असे प्याला म्हणत. 

प्रभू येशूने सुध्दा भाकर घेऊन देवाला धन्यवाद दिला व ती भाकर मोडून शिष्यांना देत असता म्हटले घ्या, खा; हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व देवाचे आभार मानत त्याने तो त्यांस दिला व म्हटले तुम्ही सर्व यातील प्या. हे माझे [नव्या] कराराचे रक्त आहे; हे पापांची क्षमा होण्यासाठी बहुतांकरिता ओतले जात आहे. मत्तय २६:१६-२८. 

वल्हांडणाचे प्रतीकात्मक स्वरूप प्रभू भोजन आहे: येथे वल्हांडणाचा सण साजरा करीत असताना प्रभू येशूने प्रभुभोजनाची स्थापना केली. कारण जसे वल्हांडणाचा सण जुन्याकरारामध्ये देवाने इस्राएल लोकांच्या केलेल्या तारणाची आठवण करून देणारा आहे तसे नव्या करारामध्ये प्रभुभोजनाचा विधी हा येशू ख्रिस्ताने समस्त मानवजातीच्या केलेल्या तारणाची आठवण करून देणारा आहे. 

वल्हांडणातील कोकऱ्याच्या अर्पणाने इस्राएल लोकांचे मिसर देशात रक्षण झाले. त्यासाठी देवाने त्यांना सांगितले होते की प्रत्येक कुटूंबाने आपल्या घरासाठी एक कोकरू घ्यावे ते एक वर्षाचे निर्दोष नर असावे. त्याचे मांस भाजून त्याच रात्री बेखमीर भाकरी व कडवट भाजीबरोबर खावे त्याच्या मासांपैकी काहीही शिल्लक राहू नये याचीही काळजी त्यांना घायची होती व या कोकराचे रक्त घराच्या दाराच्या बाह्यांवर लावावयाचे होते. ज्या घराच्या दारावर कोंकऱ्याचे रक्त लावलेले असेल ते घर ओलांडून मृत्यूचा दूत पुढे जाईल. देवाच्या या सांगण्यानुसार इस्राएल लोकांनी केले व त्यामुळे मृत्यूचा दूत मिसरातील प्रथम जन्मलेल्यांना मारून टाकीत असताना इस्राएलांचा बचाव झाला. या घटनेची आठवण म्हणून इस्राएल लोक पिढ्यांपार हा सण साजरा करीत. 

येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसह हाच सण साजरा करीत आहे परंतु या सणाला आतां नवे व व्यापक स्वरूप देण्यासाठी. कारण वल्हांडणाचा सण जसे इस्राएलाच्या तारणाचे प्रतीक आहे किंवा इस्राएल लोकांना फारोच्या गुलामगिरीतून देवाने सोडवल्याची आठवण करून देणारा सण आहे. त्याप्रमाणे येशू ख्रिस्त जगाला पापाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी देवाचा कोकरा असा अर्पिला जाणार होता. प्रभू येशू ख्रिस्ताचे अर्पण संपूर्ण मानवाच्या तारणासाठी होणार होते. आता मानवाने त्यांच्या तारणासाठी अर्पिलेल्या आपल्या एकूलत्याएक पुत्राची आठवण करावी व पवित्र जीवनाला समर्पित असावे हि देवाची इच्छा असल्यामुळे प्रभू भोजनाच्या विधीची स्थापना या ठिकाणी होत आहे. देवाच्या लेकरांनी वल्हांडणाच्या सणा ऐवजी प्रभू भोजनाचा विधी करून प्रभू येशूच्या प्रीतीची आठवण करावी व देवाला त्याच्या एकूलत्याएक पुत्रासाठी  धन्यवाद द्यावा हे या ठिकाणी अपेक्षित आहे. 

शिष्यांनी प्रीतीने व नम्रतेने जीवन जगावे हि मुख्य अपेक्षा: आपण प्रत्येक रविवारी अथवा महिन्यातून एकदा किंवा अनेकदा ज्या त्या चर्चच्या रीती प्रमाणे प्रभू भोजन घेतो. प्रभू येशू आपल्या पापासाठी मेला, त्याच्या रक्ताद्वारे आपण नव्या कराराचे भागी झालो. त्याचे रक्त आपल्याला शुध्द करते हे सर्व आपण लक्ष्यात घेतो व त्याच्या मरणाची आठवण करितो किंवा घोषणा करितो. परंतु या मध्ये प्रभू येशूने आपल्याला दिलेला महान संदेश, किंवा आज्ञा आपण शक्यतो कधीच विचारात घेत नाही, किंवा सोयीस्कर पणे विसरतो. ती म्हणजे एकमेकांवर प्रीती करा व एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ट माना, किंवा नम्र भावाने एकमेकांशी वागा. 

भोजन चालू असताना, प्रभू येशू उठला व घंगाळात पाणी घेवून शिष्यांचे पाय धुऊ लागला व पुसू लागला. तेव्हा पेत्राने हरकत घेतली असता तो पेत्राला म्हणाला तू जर मला तुझे पाय धुऊ दिले नाहीस तर तुला माझ्या मध्ये वाटा नाही म्हणजे या कृतीच्या द्वारे तो प्रत्येकाला आग्रहपूर्वक सांगत होता की तुम्ही एकमेकांचा सम्मान करा, जगिक लोकांप्रमाणे एकमेकांवर जळत आपले वर्चस्व सिध्द करण्यापेक्षा एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ट स्थान द्या. असे केल्याने तुम्ही कमी अधिक होणार नाहीत तर तुम्ही आशीर्वादित असाल. योहान: १३: ४-१७. या वरून स्पष्ट होते की प्रभू येशू प्रभू भोजनाचा विधी स्थापित करीत असताना नम्रतेने सहजीवन जगण्याचा धडा आग्रह पूर्वक शिकवत होता.

भोजन चालू असताना सैतानाने यहूदाचा ताबा घेतला व तो प्रभू येशूला धरून देण्यासाठी बाहेर निघून गेला. तेव्हा प्रभू येशूला खूप दुःख झाले असणार यात शंकाच नाही. तेव्हा तो उर्वरित शिष्यांना म्हणाला,” बाळांनो, आणखी थोडा वेळ मी तुमच्या बरोबर मी आहे. तुम्ही माझा शोध कराल, आणि जसे मी यहुद्यांस सांगितले की, जेथे मी जातो तेथें तुमच्याने येववत नाही तसेच मी तुम्हालाही आता सांगतो. व पुढे तो म्हणाला, मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की “तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, जशी मी तुम्हांवर प्रीती केली तशी तुम्ही हि एकमेकांवर प्रीती करावी.  तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहा.” योहान १३:३४-३५.

सारांश: प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मृत्यूच्या अगोदर वल्हांडणाचा सण साजरा करताना त्याच्या त्यागाची आपल्याला आठवण राहावी. आपल्याला  तारणाचे महत्व समजावे, व आपल्या जीवनाकडून त्याला काय अपेक्षा आहेत हे आपण कधीच विसरू नये. म्हणून त्याने वल्हांडणाच्या भोजनाच्या वेळी; प्रभू भोजनाच्या विधीची स्थापना केली व त्या दरम्यान शिष्यांचे पाय धुऊन व प्रीती पूर्ण जीवन जगण्याची नवी आज्ञा दिली. हे आपण कधीही विसरू नये. 

अनेक चर्च मौंडी गुरुवारी संध्याकाळी प्रभू भोजनाच्या विधीचे आयोजन करतात. काही चर्चेस पायधुण्याचा कार्यक्रम करतात व काही दोन्ही गोष्टींचा यात सहभाग करितात. यात गौण काहीच नाही. परंतु काही लोक अज्ञानामुळे किंवा अपुऱ्या माहितीमुळे याकडे दुर्लक्ष करतात किंवा या गोष्टीना पांथिक व सैध्दान्तिक रंग देऊन नावे ठेवतात. कृपया असे करणे चांगले नाही. 

एकमात्र नक्की की आपण या गोष्टी फक्त करायच्या म्हणून करू नयेत तर त्यामागचे कारण समजून कराव्यात व आपले आत्मिक जीवन गांभीर्याने जगावे. गॉड ब्लेस यू . 

प्रार्थना: पवित्र प्रभू माझ्यासाठी तू आपला देह दिला आपले रक्त सांडले. तू माझ्या पापासाठी त्या वधस्तंभावर मेला. मी तुझे खूप आभार मानतो. तुझ्या प्रीतीला अनुसरण्यास मला सहाय्य कर. येशूच्या  मागतो म्हणून ऐक आमेन. 

रेव्ह. कैलास [आलिशा ] साठे. 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole