यश दोन पावलांवर. स्तोत्र १२८:२.

वचन: तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील तुझे कल्याण होईल, स्तोत्र १२८:

यश दोन पावलांवर आहे

प्रस्तावना: आज आपण पाहतो की माणसे रात्रंदिवस कष्ट करतात पण त्यांना सुख शांतीचा लाभ होत नाही, मग  सर्वांग सुंदर आशीर्वादित जीवनाची कल्पना करणे खूपच दूरची गोष्ट आहे. तरी परमेश्वराच्या ठायी हि आशा जिवंत आहे. दावीद म्हणतो माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया हि प्राप्त होतील व परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. स्तोत्र २३:६,  चला तर मग हे आशीर्वादित जीवन कोणाला प्राप्त होऊ शकते ते आपण पाहू.

परमेश्वराचे भय धरणारा: प्रियांनो, माणसाला प्रथम देवाच्या अस्त्तित्वाबद्दल पूर्ण खात्री हवी. देव अस्तीत्वात आहे, तो सर्व गोष्टींचा निर्माता आहे, व त्याचा सर्वांवर अधिकार आहे. हा विश्वास ज्यांना आहे ते देवाबद्दल मनात आदर बाळगतात व त्याच्या भयात जीवन जगतात. देवाचे वचन सांगते, ” देवाचे भय ज्ञानाचा आरंभ आहे, आणि पवित्राला ओळखणे हीच बुध्दी आहे,” नीती ९:१०. 

हालेलूया, जो पुरुष यहोवाचे भय धरतो, जो त्याच्या आज्ञांमध्ये फार संतोष पावतो तो सुखी आहे. पृथ्वीवर त्याची संतती बलिष्ट होईल; सरलांचा वंश आशीर्वादित होईल. धन व संपत्ती त्याच्या घरात राहतात, पण त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकते. स्तोत्र ११२:१-३. 

संपूर्ण हृदयाने देवाला शोधणारा : जे त्याच्या साक्षी पाळतात,जे संपूर्ण हृदयाने त्याला शोधतात ते सुखी आहेत. स्तोत्र ११९:२. एकदा माणसाला देवाच्या अस्तित्वाची खात्री झाली म्हणजे त्याने त्याच्या अधिकारांवर व सामर्थ्यावर विश्वास ठेवणे, व त्याच्या कृपेची वाट पहाणे आवश्यक आहे. देवाला संपूर्ण आपले हृदय हवे आहे, अर्धे जग आणि अर्धा देव असे विभागलेले अंतःकरण देवाला आवडत नाही. देव इस्राएल राष्ट्राला मार्गदर्शन करताना म्हणतो, की  तुम्ही पापाचे शाशन भोगत असता; पश्याताप करून जर संपूर्ण हृदयाने जर माझ्याकडे वळाल व माझ्या शोधास लागाल तर मी तुम्हास पावेल. अनुवाद ४:२९. 

डोंगरावरील सुप्रसिद्ध प्रवचनात मार्गदर्शन करताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, देवाला तुमच्या जगातील गरजा माहित आहेत, त्यांची परिपूर्ती होण्यासाठी तुम्ही त्याचे राज्य व धार्मिकता मिळवण्यासाठी झटा. 

परमेश्वराचा आश्रय घेणारा : एकदा देवाबद्दलच्या सत्याशी आपला परिचय झाला की मग त्याच्या ठायी आश्रय घेणे आवश्यक आहे.अनेक लोक देवाला जाणतात त्याच्यावर विश्वास ठेवतात परंतु पूर्ण पणे त्याच्यावर अवलंबून राहण्यास कमी पडतात. दावीद राजाने देवाच्या ठायी आश्रय घेतला व त्या आश्रय घेण्याचा परिणाम त्याने अनुभवला, त्यामुळे देवावरील आपला विश्वास व स्वतःच्या उज्वल भविष्या विषयीचा आत्मविश्वास व्यक्त करताना तो म्हणतो, ‘परमेश्वर माझा मेंढपाळ असल्यामुळे मला कशाचेच कमी पडणार नाही, तो संगती असल्यामुळे मी कशालाच भिणार नाही, स्तोत्र २३, तो पुढे म्हणतो, “यहोवा आपल्या अभिषिक्तला तारतो, तो आपल्या पवित्र आकाशातून आपल्या उजव्या हाताच्या तारण करणाऱ्या सामर्थ्याने त्याला उत्तर देईल. कोणी रथांवर कोणी घोड्यांवर भरंवसा ठेवतात, परंतु आम्ही यहोवा आमचा देव याच्या नावाविषयी बोलू,” स्तोत्र २०:६-७. 

स्तोत्र ९१ सांगते, ‘ परमेश्वराच्या ठायी आश्रय घेणाऱ्यांना व त्याला आपला बळकट दुर्ग मानणाऱ्यांना; देव त्याला सैतानाच्या प्रत्येक पाशांपासून सोडवील, दीर्घ आयुष्य देऊन त्याला तृप्त करीन.व त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. 

लागूकरण : तू आपल्या श्रमाचे फळ खाशीलतू सुखी होशील तुझे कल्याण होईलस्तोत्र १२८:२ हे अभिवचन देवाला भिऊन वागणाऱ्या, त्याचा झटून शोध करणाऱ्या व त्याच्या ठायी आश्रय घेणाऱ्या त्याच्या लेकरांसाठी आहे. देव पवित्र आहे आणि आपल्याकडून पवित्र जीवनाची अपेक्षा करतो हे या ठिकाणी समजून घेतले पाहिजे. आपले आई वडील आपल्याकडून चांगल्या गोष्टींची अपेक्षा करतात. आपल्याला त्यांचा आदर असतो म्हणून आपण नेहमी त्यांच्या समोर चांगले वागतो. परंतु त्यांच्या मागे करायचे तेच करतो. आपल्या आई वडिलांना आपले हे गुण माहित नसतात. पण स्वर्गीय निर्माण कर्त्या बापाचे तसे नाही, तो आपल्या मनातील विचार जाणतो, तो सर्व वेळी सर्व ठिकाणी उपस्थित असतो. त्याला फसवणे अवघड आहे. दावीद राजा म्हणतो मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळू? आकाशात, अधोलोकात, समुद्राच्या पलीकडे, सर्वत्र तू आहेस, प्रकाश अंधकार तुला सारखेच 
आहेत. तू माझे अंतर्याम निर्माण केले आहे, तूच माझ्या आईच्या उदरी मला घडवले. दावीद 
राजाने परमेश्वराच्या प्रीतीचा शिस्त लावणाऱ्या शिक्षेचा अनुभव घेतल्या मुळे देवाचे भय त्याच्या मध्ये आहे. तो म्हणतो हे देवा माझी झडती घेऊन माझे हृदय जाण मला कसोटीस लावून माझे मनोभाव तपास माझ्या ठायी दुष्टपणा कडे काही प्रवृत्ती असेल तर पहा. दावीद राजा देवाला भिऊन वागत असे, व त्यालाच आपला आश्रय मानून जीवन जगत असे,म्हणून तो विश्वासाने म्हणू शकला,” खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण दयाही लाभतील मी परमेश्वराच्या घरात चिरकाळ राहील. स्तोत्र २३:.

प्रार्थना: हे प्रभू येशू तू मला पवित्र आत्मा देऊन नीतिमान जीवन जगण्याचे सामर्थ्य दिले आहे म्हणून मी तुझे आभार मानतो.दावीद राजा प्रमाणे मलाही तुला आवडणारे जीवन जगण्या साठी कृपा पूरव म्हणजे माझे कल्याण होईल. येशूच्या नावाने मागतो, आमेन.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole