वचन: आणि अब्राहामाने त्या ठिकाणाचे नाव यहोवा – यिरे [ म्हणजे यहोवा मिळवून देईल ] असे ठेवले, म्हणून आज पर्यंत असे म्हणतात कि यहोवाच्या डोंगरात ते मिळवून दिले जाईल . उत्पत्ती २२:१४.
आपण रोज प्रार्थना करताना देवाकडे काहींना काही मागतो. आपली यादी कधीच संपत नाही. देवाने आम्हाला हवं ते सर्वकाही द्यावं हीच आपली इच्छा असते. देव आपल्या अडचणीत, संकटात नेहमीच आपल्या बरोबर असतो. अनेकदा आपण चर्चमध्ये साक्ष देतो की, देवाने आपणाला कसे सहाय्य केले. पण तरीही आपल्या डोक्यावर काळजी चिंतांनी भरलेले ओझे तसेच असते. हे सर्व विसंगत नाही का वाटत ? काही लोक यावर उलट सुलट बोलतात. पण चांगला विचार केल्यास असे लक्षात येते की,आपल्या साक्षी खऱ्या आहेत, देव आपल्यावर
प्रीती करितो, आपण
धार्मिक जीवन जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतो . परंतु चिंता काळज्यांचे ओझे संपुष्टात येत नाही. विश्वाचा चालक व मालक
आपल्या बरोबर असताना जीवनात आनंद व शांतीचा अभाव हे चांगले नाही. चला तर
मग जाणून घेऊ देव संगती असताना आमच्या जीवनात आनंद व शांतीचा अभाव का असतो ? का आपण आशीर्वादित जीवनाचा खरा अस्वाद घेऊ शकत नाही ?
देवाकडे पाहण्याचा दृष्टीकोण:आपल्या विचारांवरती आपल्या संस्कृतीचा प्रभाव असतो. त्यामुळे देवाकडे पाहण्याचा आपला एक दृष्टीकोण तयार झालेला असतो. देव म्हणजे कोणीतरी शक्ती आहे, त्याला काही धार्मिक कर्मकांडाच्या द्वारे संतुष्ट केल्याने तो आशीर्वाद देतो व तसे न केल्यास शिक्षा देतो. म्हणून देवाचे देवाला वेळेवर देणे त्याच्या बाबतीत काही चूक होता कामानये, कळत नकळत जरी काही चुकले तरी त्याचे परिणाम भोगावे लागतील.अशा प्रकारचे एक वेगळेच दडपण आपल्याला आपल्या समाज्यामध्ये पहावयाला मिळते. त्यामुळे बऱ्याच लोकांना वाटते कि जर आपण चर्चला गेलो नाही तर आपले काही नुकसान होईल, आपण आशीर्वाद गमावून बसू , जर दान दशमांश दिला नाही तर बरकत गमावून बसू . अशा
भीती पोटी किंवा निव्वळ स्वार्थापोटी हे करणे
एक ख्रिस्ती म्हणून कधीच योग्य नाही. देव त्याच्या लेकरांकडून निकोप प्रीतीची अपेक्षा करितो. देवाला
वाटते की आपण जे कृपा पावलेले; देवराज्याचे भागी असलेले त्या आपण आपले कर्तव्य समजून मंडळींच्या सेवाकार्यात समर्पित असावे. पण असे होत नाही कारण आपण देवाकडे आपल्या सांस्कृतिक दृष्टीकोनातून पाहतो.वेगवेळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवर राहणाऱ्यांना त्यांच्या संस्कृतीने दिलेल्या दृष्टीकोनातूनच ते देवाकडे पहात असतात.
पवित्र शास्त्र आपल्याला देवाकडे पाहण्याचा योग्य दृष्टीकोन देते. पण त्यासाठी आपल्याला आपल्या जगिक ज्ञानाचा पसारा बाजूला केला पाहिजे व पूर्ण पणे रिक्त होऊन शास्त्र वचनातून देवाला समजून घेतले पाहिजे. म्हणजे आपला देवाविषयीचा दृष्टीकोण योग्य होईल व आपण चिंता काळज्यांनी मुक्त असे आशीर्वादित जीवन जगू.
देवाचे व आपले नाते आहे हे ओळखा
: पवित्र शास्त्र आम्हाला देव, मानव व येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या नात्याचे
स्पष्ट प्रगटीकरण देते. “सहा दिवसात परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्वकाही निर्माण केले” निर्गम २०:११.”देवाने पुरातनकाळी पृथ्वीचा पाया घातला गगने त्याच्या हातचे कृत्ये आहेत“. स्तोत्र १०२ :२५ या या वचनांवरून वरून हे स्पष्ट होते कि “देव म्हणजे विश्वाचा निर्माण कर्ता“.त्यामुळे विश्वातील प्रत्येक गोष्टीवर त्याचा हक्क आहे, तसा मानवावरही त्याचा हक्क आहे.
अ) देव व मानवाचे नाते: प्रत्येक निर्मिती मागे देवाचा एक हेतू आहे; तसे मानवाच्या निर्मितीमागेही देवाचा विशेष हेतू होता. त्याने मानवाला त्याचे प्रतिरूप दिले (अधिकार दिला, ज्ञान बुद्धी व सामर्थ्य दिले ) यासाठीकी पृथ्वीवर त्याने सर्व व्यवस्था पहावी. उत्पत्ती १:२७–२८. यावरून आपल्या लक्ष्यात येईल की, सर्व मानवजातीचा निर्माता या नात्याने तो सर्वांचा पिता आहे व सर्व मानव एका उच्च हेतूने निर्माण केले आहेत. परंतु पवित्र शास्त्र पुढे सांगते की देवाने निर्माण केलेले प्रथम पुरुष व स्त्री यांनी देवाच्या उच्च हेतूला समर्पित न राहता. आज्ञाभंग करून ते सैतानाला अनुसरले. त्यामुळे ते व त्यांच्या अधिकाराखाली असलेली पृथ्वीवरील सृष्टी शापित झाली. देवाचे आणि त्यांचे नाते संपुष्टता आले. त्यांनी केलेल्या पापाच्या परिणामा मुळे सर्व मानव जात शापित झाली. सत्यापासून (देवापासून ) फारकत झाल्याने मानवी जीवन अंधःकाराने भरून गेले. पुन्हा ते ज्ञान, बुद्धी,सामर्थ्य, व अधिकार मिळवण्यासाठी मानव जात प्रयत्न करीत राहिली व त्यातूनच वेगवेगळे धर्म, संप्रदाय, मार्ग, पंथ, कर्मकांड, व तत्वज्ञानाची निर्मिती होत गेली . परंतु मानव पुन्हा कधीच त्या उच्च स्थितीला पोहचू शकला नाही. आणि पोहचणार तरी कसा ? कारण ज्या देवाने ते काढून घेतले त्याने दिल्या शिवाय ते त्याला मिळणारच नाही.
ब) देव व ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचे नाते: देवाचे त्याच्या निर्मितीवर प्रेम आहे. आज्ञा भंग केलेल्या मानवाला आज्ञापालनाचा मार्ग उदाहरणा सहित दाखवण्यासाठी व त्याच्या उद्धारासाठी त्याने कुमारी मरीयेच्या पोटी
जन्म घेतला. स्त्री पुरुष संयोगाविना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याचा हा मानवी अवतार असल्यामुळे.प्रथम निर्मिलेल्या मानवासारखा तो परिपूर्ण मानव झाला. त्याच्या ठायी कुठलेच पाप नव्हते. त्यामुळे परिपूर्ण मानवाचे जीवन त्याच्या ठायी आम्हाला पहावयास मिळाले. अंधःकाराने भरलेल्या जगात तो देव इच्छेला प्राधान्य देत जीवन जगला. निर्दोष असताही देव इच्छेला
समर्पित रहात त्याने वधस्तंभावरचे मरण सोसले . त्याच्या ठायी पाप नव्हते म्हणून मृत्यूच्या बंधनांना तोडून तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. देव इच्छेला प्राधान्य देत मरेपर्यंत आज्ञापालन केल्या मुळे समस्त मानवजातीवर असलेला आज्ञाभंगाचा दोष नष्ट झाला. आता जो मनुष्य प्रभू येशूवर विश्वास ठेवतो व त्याने घालून दिलेल्या मार्गावर चालतो त्याचा उद्धार होतो. देव व त्याचे तुटलेले नाते पुन्हा स्थापित होते. तो त्याला पुन्हा हक्काने माझ्या पित्या म्हणून हाक मारू शकतो. योहान १:१२. व १ योहान ३:१.
जर आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो तर आम्हाला जगातील इतर लोकांप्रमाणे अंधारात चालल्यासारखे भीत भीत जगण्याची गरज नाही. देवाने दिलेले प्रत्येक अभिवचन आपल्यासाठी आहे. देवा बरोबरच्या आपल्या नात्यात ख्रिस्ती जीवनाचे सामर्थ्य दडलेले आहे. ज्याला हे नाते ओळखता व जगता आले तो धन्य कारण तो परिपूर्ण जीवनाचा (आशीर्वादित) आनंद उपभोगील.
देवावर व मनुष्यावर प्रीती करा : प्रभू येशूने अतिशय महत्वाची शिकवण आपल्याला दिली आहे; तो म्हणतो,”तू आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जिवाने व आपल्या सर्व मनाने तुझा देव प्रभू याच्यावर प्रीती कर व जशी स्वतःवर तशी तू आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.” मत्तय २२;३७–३८. पतित मानवाचे मन द्वेषाने भरलेले असते पण ख्रिस्तावरील विश्वासाने जे उद्धार पावले आहेत त्यांचे मन प्रितीने भरलेले असते. आणि ते असायलाच पाहिजे. कारण देवाचे वचन सांगते, “प्रियजनहो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे, जो कोणी प्रीती करितो तो देवापासून जन्मलेला आहे. व देवाला ओळखतो. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखीत नाही कारण देव प्रीती आहे. १ योहान ४:७–८.
देवाची इच्छा आहे की आपण प्रितीने पूर्ण जीवन जगावे, आपण आपले जवळचे किंवा मित्रच नाही तर शत्रूंवरही प्रीती करावी. असे केले तर देवाला आपल्या विषयी आनंद होईल कारण देवाला भेदभाव आवडत नाही. तो वाईटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो, व नीतिमानांवर
व अनीतिमानांवर
पाऊस पाडतो. आपणही भेदभाव न करता जर प्रीती करू तर येशूच्या द्वारे जे देव पुत्रत्व आम्हाला प्राप्त झाले आहे ते अधिक गौरव युक्त होईल, प्रीती केली तरच आपण देवाचे पुत्र आहोत हे सिध्द होते. ” मी देवावर प्रीती करितो, असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूंचा द्वेष करील तर तो लबाड आहे, कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूंवर जो प्रीती करीत
नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. जो देवावर प्रीती करितो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी हि देवाची आपल्याला आज्ञा आहे. १ योहान ४:२०–२१.
अ) जर आम्ही देवावर प्रीती करितो: जर आम्ही देवावर प्रीती करितो, तर त्याच्या आज्ञा मानण्यात आपल्याला आनंद होतो, त्या ओझे वाटत नाहीत. योहान १४:२३. आम्ही देवाच्या वचनात रममाण होतो, ज्या मुळे सर्व कार्य सिद्धी होते स्तोत्र १: १–३. त्याच्यावरील प्रीतीमुळे आम्हाला त्याचे सुरक्षा कवच प्राप्त होते स्तोत्र ९१:१४. देवाकडे येशूच्या नावात आपण हवं मागू शकतो व आपल्याला ते प्राप्त होईल .मत्तय ५:४३ –४८. योहान १५: ७–१७.प्रीती आम्हाला आत्मिक पूर्णता देते. मत्तय ५: ४८, १ करिंथ १३: १–१३.
ब) जर आम्ही माणसांवर प्रीती करतो: जर आम्ही माणसांवर प्रीती करतो तर तेही आपणावर प्रीती करतात. देवाचे वचन सांगते कि हा सुवर्ण नियम आहे, “लोंकानी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा कारण नियमशास्त्र व संदेष्ट्य ग्रंथ हेच होत. मत्तय ७:१२.प्रीती भीतीला संपुष्टात आणते. प्रीतीच्या ठायी भीती नसते; इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते. भीती मध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीती मध्ये पूर्ण झालेला नाही १ योहान ४: १८. थोडक्यात काय तर आपण माणसांवर व देवावर प्रीती करू तर सर्वांगांनी आशीर्वादित असू.
विश्वासाने सुवार्तेच्या कार्यात सक्रिय व समर्पित जीवन: जर आपण देवाबरोबरचे
आपले नाते ओळखले तर आपण त्याच्यावर प्रीती करू, व सहाजिकच त्याच्या कार्यात सक्रिय व समर्पित राहू. देव म्हणजे मनुष्य नाही कि ज्याला मर्यादा आहेत. देवाला त्याच्या सामर्थ्याला व अधिकाराला कोणत्याही मर्यादा नाहीत. त्यामुळे त्याच्या लेकरांचे हित करण्यापासून त्याला कोणीही रोखू शकत नाही. देवाचे वचन सांगते,” आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणाऱ्यांस
म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांस देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात“. रोम ८:२८. अब्राहाम याच विश्वासाने वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी देवाला अनुसरला व पुढे शंभर वर्षे प्रत्येक स्थितीत देव इच्छेला समर्पित राहिला. त्याच्या जीवनात जे काही घडले ते त्याच्यासाठी आशीर्वादाचे कारण झाले.
जेव्हा देवाने त्याला त्याच्या एकूलत्याएक मुलाचे होमार्पण करण्यास सांगितले तेव्हा तो डगमगला नाही. पवित्र देव माझ्याकडे अशी मागणी कशी करू शकतो, असा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला नाही किंवा त्याने काही शंका उपस्थित केली नाही. कारण शंभर वर्ष देवा समागमे चालताना तो हे समजला होता की देव सर्वसमर्थ, पवित्र व प्रितीने पूर्ण आहे. मानवी होमार्पण तो अमंगळ मानतो त्यामुळे माझ्या मुलाचे होमार्पण तो होऊ देणारं नाही, हि फक्त माझ्या विश्वासाची कसोटी आहे. म्हणून मोरिया डोंगरावर आराधना तर होणार व त्यासाठी होमार्पणाचे
कोकरूही मिळणार याच विश्वासाने अब्राहाम आपल्या एकुलत्याएक मुलासमवेत मोरिया डोंगर चढत होता. प्रत्येक परिस्थितीत देवाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून कसे पहावे हे अब्राहाम आपल्याला येथे शिकवितो. आपणही सुवार्तेच्या कार्यात मंडळी बरोबर समर्पित असावे. कष्ट सहन करताना निराश न होता देवाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहावे. सेवाकार्याची हि वाट आशीर्वादाची वाट आहे असा विश्वास ठेऊन पुढे चालावे म्हणजे उत्तम ते प्रतिफळ मिळेल.
मोरिया डोंगर आशीर्वादाच्या वाटेचे प्रतीक आहे: मोरिया डोंगर चढत असताना इसहाकाने अब्राहामाला विचारले, बाबा आपल्याकडे होमार्पणा साठी सर्वकाही आहे पण कोकरू नाही, यावर अब्राहामाने उत्तर दिले होते कि, “देव होमार्पणासाठी कोकरू मिळवून देईल.” अब्राहामाला पूर्ण विश्वास होता कि देव त्याच्या इसहाकाला त्याच्या पासून हिरावून घेणार नाही. तो पवित्र आहे, मानवाचे होमार्पण तो होऊ देणार नाही, पण जरी काहीही झाले तरी देवाच्या आज्ञेचे पालन मी करणार, हा त्याचा दृढ निश्चय होता. तो आपल्या मुलासह मोरिया डोंगरावर पोहचला त्याने वेदी बांधली, त्यावर लाकडे रचली तरी त्याला देवाकडून काहीच संकेत मिळत नव्हता. शेवटी आपल्या लाडक्या मुलाला बांधून वेदीवर ठेवले ‘तरी देवाकडून
काहीच संकेत मिळत नाही असे पाहून, त्याचा जीव नक्कीच पिळवटून निघाला असेल यात शंकाच नाही. मोठया जड अंतकरणाने तो मनोमन म्हटला; आता मला माझ्या बाळाला होमार्पणासाठी अर्पण करावेच लागेल. मग त्याने हाती सूरा
घेतला. हा अगदी शेवटचा क्षण होता तो
सूरा चालवणार इतक्यात देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून त्याला थांबवले व मुलाला काहीही इजा करू नकोस असे सांगितले. तू कसोटीस उतरलास तू आपल्या एकूलत्याएक मुलास माझ्यापासून राखून ठेवले नाही. तेव्हा अब्राहामाने पाहिले तो त्याच्या मागे झुडपात मेंढा गुंतलेला होता, त्याने तो घेतला व आपल्या मुलाऐवजी अर्पण केला. आता त्याच्या विश्वासाप्रमाणे घडून आले होते. त्याला होमार्पणा साठी अर्पण मिळाले होते, म्हणून त्याने त्या ठिकाणाचे नाव यहोवा यिरे
[ म्हणजे यहोवा मिळवून देईल ] असे ठेवले. पुढे हेच ठिकाण दाविदाने देवाच्या मंदिरासाठी निवडले व शलमोनाने याच ठिकाणी देवाचे मंदिर बांधले, १ इतिहास २२:१, २ इतिहास ३:१. समस्त इस्राएलास देवाकडे जाण्याचे व त्याच्याकडे मागण्याचे हे ठिकाण झाले. पुढे; यहोवाच्या डोंगरात मिळवून दिले जाईल अशी म्हण रूढ झाली. याचा अर्थ देवाच्या मार्गाने चालल्यास, त्याच्या सेवाकार्यात विश्वासाने समर्पित राहिल्यास आशीर्वाद मिळतात हे इस्राएल राष्ट्राने अनुभवले होते.
सारांश: देवाने अब्राहामाच्या एकुलत्याएक पुत्रास इजा सुद्धा होऊ दिली नाही, पण जेव्हा त्याचा पुत्र त्याला मानवाच्या उद्धारासाठी द्यावा लागला तेव्हा त्याने सर्वकाही सहन केले. ख्रिस्ताच्या सर्व दुःख सहनात तो त्याच्या बरोबर राहिला व शेवटी त्याने समस्त मानवाच्या तारणासाठी त्याचे अर्पण केले.खरोखर त्याने जगावर केवढी मोठी प्रीती केली ?
योहान ३:१६.
ज्या दिवशी उद्धाराची सुवार्ता आपण स्वीकारतो त्याच दिवशी आपला मानवी जन्म सार्थकी लागतो व आपण सर्वथा कल्याणकारक मार्गाला अनुसरतो. म्हणून आता कशाचीही चिंता काळजी न करता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशूवर संपूर्ण मनाने प्रीती करत सुवार्तेच्या सेवेला विश्वासाने समर्पित असावे, बाकी आपला देव यहोवा यिरे आहे. आपल्यासाठी चांगल्या गोष्टींचा पुरवठा करण्यापासून त्याला कोणीही रोखू शकत नाही. हि आशीर्वादाची वाट आहे या वाटेवर विश्वासाने चाला.
प्रार्थना: हे प्रभू येशू तू माझ्या पापासाठी अर्पिला गेलास म्हणून मी तुझे आभार मानतो, तुझ्या प्रीतीला समजण्यास मला सहाय्य कर. मी हि तुझ्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती करावी म्हणून माझे सहाय्य कर. तुझ्या ठायी आशीर्वादित जीवनाचा परिपूर्ण आनंद मला मिळूदे. येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक आमेन.
रेव्ह. कैलास (आलिशा) साठे.