रोजची आत्मिक भाकर.

हागार व इश्माएल 

वचन:  
मग यहोवाचा दूत तिला म्हणाला, पहा, तू गरोदर आहेस मुलाला जन्म देशील; आणि तू त्याचे नाव इश्माएल ( म्हणजे देव ऐकतो) असे 
ठेव कारण यहोवाने तुझे दुःख ऐकून घेतले आहे. उत्पत्ती १६:११.

अब्राम साराय यांनी देवाच्या मार्गदर्शनानुसार नाही; परंतु त्यांच्या मनाने निर्णय घेऊन हागार ह्या मिसरी दासीला त्यांच्या जीवनात आणले. ती कृती देवाच्या इच्छेनुसार अथवा योजनेनुसार नव्हती म्हणून तिचे दुष्परिणाम त्यांच्या जीवनात सुरु झाले. हागार सारायला तुच्छ मानू लागली, साराय तिचा छळ करू लागली , अब्राम साराय एकमेकांना दोष देऊ लागली. आज बरेच ख्रिस्ती कुटुंबे, मंडळ्यां, संघटनांनमध्ये समरसता दिसत नाही. संघटित रित्या आव्हानांना सामोरे जाण्यास ऐक्य दिसत नाही
कारण त्यांचे निर्णय कृती देवाच्या इच्छेनुरूप नसतात. पण देव तारणाच्या अंतिम लक्ष्याकडे जात असताना सर्व सांभाळून घेतो. आपण धडा घ्यावा म्हणून परिणामही भोगायला लावतो.

हागार हि फारोने सारायला दिलेली मिसरी दासी होती. साराय अब्राम यांच्या सानिध्यात आल्यावर तिला देवाची ओळख झाली असावी. सरायचा छळ सहन करीत असताना ती देवाकडे प्रार्थना करत असेल. देव अब्रामाला जो पुत्र देणार होता तो तिच्याच गर्भात वाढत आहे असे समजून त्याला धन्यवाद देत असेल. मनोमन विचार करत असेल कि माझ्या पुत्राची संतान आकाशातील ताऱ्यांप्रमाणे अगणित होईल. पण आता छळ सहनशीलते पलीकडे गेल्यामुळे ती देवाकडे आक्रोश करत; शूरच्या वाटेने सिनायच्या द्वीपकल्पातून जाणाऱ्या रस्त्याने पुन्हा मिसरकडे पळून चालली. तिच्यासाठी हा मार्ग जीवघेणा होता. देवाशिवाय आता तिचा कोणीच सहारा नव्हते 
म्हणून ती त्याचा सारखा धावा करीत होती. विश्वाचा निर्माणकर्ता कृपाळू पिता परमेश्वर सर्वांवर कृपा करितो; सर्वांचे ऐकतो; सर्वांवर त्याचे लक्ष असते. त्याच्याकडे आरोळी मारणाऱ्या या गुलाम स्त्रीचा त्याने कैवार घेतला. देवदूताला तिच्याकडे पाठवून तिचे मार्गदर्शन केले तिला होणाऱ्या मुलाचे नाव इश्माएल 
ठेव असे सांगितले या नावाचा अर्थदेव ऐकतो,” या वरून स्पष्ट होते कि देव तिला तिच्या मुलाच्या तिच्या भविष्याची खात्री देत होता.

प्रार्थना: हे प्रभू येशू तू खरोखर प्रीती आहेस सर्वांचे तारण व्हावे हीच तुझी इच्छा आहे म्हणून मी तुझे आभार मानतो. मला नेहमी तुझ्या इच्छेनुसार निर्णय घेण्यास सहाय्य 
कर म्हणजे सर्व गोष्टी तुझ्या गौरवासाठी होतील, पावित्र्यात शांतीत तुझी सेवा माझ्या हातून घडेल. येशूच्या नावाने मागतो आमेन.

रेव्ह. कैलास [अलिशा ] साठे.

देवाला ओळखा 

वचन:तेंव्हा साराय अब्रामाला म्हणाली, आता पहा, यहोवाने मला मूल होऊ दिले नाही.मी तुला विनंती करते तू माझ्या दासी पाशी जा, कदाचित तिच्या पासून मला मुले मिळतील. आणि अब्रामाने साराय हीचा शब्द ऐकला. उत्पत्ती १६:.

देवाने अब्रामाला अगदी सर्वकाही समजावून सांगितले होते. त्याचे संतान आकाशातील ताऱ्यांप्रमाणे अगणित होईल, त्यांचे 
भविष्यात काय होईल त्यांच्या देशाच्या सीमा कशा असतील अगदी सर्वकाही सुव्यवस्थित सांगितले होते. मग देवाला जर अशा प्रकारे त्याला संतान द्यायचे होते तर तसे सांगितले नसते का ? नक्कीच सांगितले असते. येथे एक गोष्ट लक्षात घ्या साराय अब्राम यांनी देवाला त्याच्या क्षमतेमध्ये पाहिले नाही, परंतु त्यांच्या शारीरिक परिस्थिनुरूप विचार करून हा निर्णय घेतला. जणू सारायला वाटले असावे कि देवाने आम्हाला मुलं होण्याचा आशीर्वाद दिला हे बरोबर आहे पण मी इतकी म्हातारी आहे तर मला मूल कसे होईल ? कदाचित देव अब्रामाला मला माझ्या दासी पासून मुलं देऊ इच्छित असेल. कारण त्या काळी पूर्वे कडे अशी प्रथा होती कि जर गुलाम मुलीला मुलं झाली तर ती मुलं तिच्या धनिणीची समजली जात, जर तिची धनीन वांझ असेल तर. (जर ती वांझ नसेल तर गुलाम मुलीची मुलं तिचे गुलाम असत. म्हणजे गुलामांच्या मुलांबाबद काय निर्णय घ्यायचा हे मालकाच्या हाती असायचे ). म्हणून तिने 
तिची दासी हागार 
जी मिसर देशात फारोने तिला दिली होती तिच्याशी अब्रामाने लग्न करावे असा आग्रह तिने त्याच्याकडे केला. अब्रामाने देखील तिच्या सांगण्याप्रमाणे हागार बरोबर लग्न केले. मानवी दृष्टीकोनातून त्यांनी जे केले त्याचे समर्थन करता येईल; कारण त्यांनी मूल होण्यासाठी खूप वाट पाहिली होती. आता साराय म्हातारी झाली होती, तिला मूल होण्याची 
अशा आता संपली होती. त्यांनी त्यांच्या परिस्थितीकडे पाहिले जगातील व्यवस्थेप्रमाणे काय मार्ग निघू शकतो याचा विचार करून निर्णय घेतला. त्यांनी देव त्याचे सामर्थ्य त्याची इच्छा योजना लक्षात घेतली नाही. याचा परिणाम आपण पाहतो कि पुढे कि अब्राम, साराय हागार याना क्लेश झाले मुलगा इश्माएल याच्या 
जीवनावरही त्याचा अनिष्ट परिणाम झाला. जर आपण देवाच्या इच्छेचा विचार करता, जगातील तत्वज्ञान, रूढी परंपरा, संस्कृती यावर आधारित निर्णय घेतले तर त्याचे परिणाम क्लेश कारक असतात. म्हणून आपले सर्व निर्णय देवाच्या वचनाच्या प्रकाशात असावेत, प्रार्थने द्वारे आपण देवाकडे मार्गदर्शन मागून आपले निर्णय घ्यावेत.

प्रार्थना: हे प्रभू येशू तू नित्य माझ्या संगती आहेस म्हणून मी तुझे आभार मानतो. मला सहाय्य कर मी कधीही रूढी परंपरा अथवा संस्कृतीचा आधार घेत माझे निर्णय घेऊ नयेत. तर केवळ प्रार्थाना वचनाच्या मार्गदर्शनात माझे निर्णय असावेत. येशूच्या नावाने मागतो आमेन.

रेव्ह.कैलास [अलिशा] साठे .


Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole