वूमेन्स डे, “ख्रिस्ती दृष्टीकोनातून”
संपूर्ण जगभर अशी एक मान्यता आहे की स्रियांचे जवळजवळ सर्वच संस्कृतींमध्ये शोषण होत आले आहे व होत आहे. या शोषणाच्या व्यवस्था नष्ट व्हाव्यात व स्रियांना पुरुषांच्या बरोबर सामान सामाजिक, राजकीय, धार्मिक व आर्थिक दर्जा प्राप्त व्हावा हे अपेक्षित आहे. हे घडून येण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत.
आपल्या देशाचा विचार करता आपल्या असे लक्ष्यात येते की, स्रियांकडे पाहण्याचा आमचा दृष्टीकोनच चुकीचा आहे. जसे मुलगा व मुलीत भेदभाव करणे, मुलगी जन्मली तर पापाच फळ, मुलगा जन्मला तर कुलदीपक, मुलगी म्हणजे दुसऱ्याचे धन, मुलगा म्हणजे कुटुंबाचा आधार. या विचारधारांचा परिणाम मुलींच्या संगोपनावर होतो, त्यांच्या खाण्यापिण्यापासून तर त्यांच्या शैक्षणिक व करिअर पर्यंत सर्वच बाबतीत त्यांना दुय्यम स्थान दिल जात. चूल आणि मूल हेच स्त्रीच प्रथम कर्तव्य आहे अशी सर्वसमावेशक मान्यता आजही आपल्याला पहावयाला व अनुभवायला मिळते. त्यामुळे स्रिचा उत्कर्ष व्हावा म्हणून आपल्या देशात बऱ्याच मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबवले जातात. अनेक सेवाभावी संस्था, सामाजिक कारकर्ते, राजकीय पक्ष, व सरकार मिळून स्रियांच्या उत्थानासाठी कार्यरत असल्याचे आपल्याला पहावयास मिळते. तरी अद्याप आपल्याला व जगातील इतर राष्ट्रांना स्त्री मुक्तीच्या या लढ्यात पूर्ण पणे यश मिळाले नाही. जो काही बदल आहे तो फक्त बदलाचा भास आहे. ख्रिस्ती दृष्टीकोनातून विचार केल्यास खरोखर फक्त भास आहे. याची काही कारणे आपण पाहू या.
या चळवळीला मूळ प्रश्न समजला नाही: आपल्याला माहित आहे की जो पर्यंत आजार व आजाराचे कारण कळत नाही तो पर्यंत त्या आजारावर योग्य दिशेने उपचार करता येत नाहीत व तो आजार बारा होण्यापेक्षा वाढत जातो. तसेच काहीशे या चळवळीचे झाले आहे. या चळवळीच्या धुरंधरांना असे वाटते की स्रियांच्या शोषणाचे मूळ पुरूषसत्ताक समाज व्यवस्थे मध्ये आहे. त्यामुळे ते या व्यवस्थेला टार्गेट करतात, व मग पुरुषी अहंकार, पुरुषवर्चस्ववाद यावर सडकून टीका करतात. त्यांना वाटते की धर्म, संस्कृती, परंपरा, विवाह संस्था, कुटुंबसंस्था, राजकारण, अर्थकारण या सर्व समाजव्यवस्थेतेतील घटक संस्थाची निर्मिती पुरुष्यांच्या वर्चस्वासाठी केली आहे व त्यात स्रियांना जाणीवपूर्वक दुय्यम स्थान दिले आहे.
आज स्रियांना शिक्षणात, व्यवसायात, नोकऱ्यांत, राजकारणात, धार्मिक गोष्टीत, साधनसंपत्तीच्या मालकी हक्कात पुरुषांच्या बरोबरीने स्थान देण्यात आले आहे. स्त्री बाहेर जाऊन अर्थार्जन करीत असताना पुरुषाने चूल सांभाळावी इतपत आम्ही मान्य करण्याप्रत पोहोचलो आहो. तरी शोषणाचा जो मूळप्रश्न आहे तो सुटला आहे का ? या मूळ प्रश्नाचे विश्लेषण केल्यास उत्तर नकारात्मकच येते. कारण शोषणाचा मुख्य श्रोत पुरुषसत्ताक समाजव्यवस्था नाही तर बायबल नुसार “मूळ पाप” आहे. कुठलीही समाज व्यवस्था या “मूळ पापाच्या” प्रभावापासून मुक्त नाही. निदान ख्रिस्ती मंडळीने तरी हि गोष्ट अशा प्रकारे समजून घेतली पाहिजे.
मूळ पाप: आपल्याला माहित आहे की, देवाने पुरुष्याची निर्मिती मातीतून केली व स्त्री ची उत्पत्ती पुरुष्याच्या देहातून केली. या स्त्री पुरुष्याना असे निर्माण करण्याचे कारण हे होते की त्यांनी एक देह असावे व एका ध्येयासाठी कार्य करावे. येथे मुख्य देव आहे व स्त्री व पुरुष देवाच्या कार्यासाठी आहेत. येथे वर्चस्व वादाला मुळीच स्थान नाही. स्त्री व पुरुष यांना देवाच्या वतीने किंवा आपण म्हणू इच्छेने; त्याने निर्मिलेल्या पृथ्वीवरील सृष्टीची काळजी घ्यायची आहे. देवाने जे त्यांना सांगितले होते तेवढेच त्यांनी करावे हे अपेक्षित व व्यवहारिक आहे. कारण निर्माणकर्त्याच्या इच्छेला व योजनेला त्याच्या निर्मितीने समर्पित असावे हेच योग्य आहे. कारण निर्मितीची पूर्ण क्षमता व योजना निर्माणकर्त्याच्या स्वाधीन आहे. निर्मिती त्या क्षमता धारण करून त्या योजनेस पुढे नेऊ शकत नाही हे सत्य आहे. तरी देवाचा शत्रू सैतान याने तसे करण्यासाठी या प्रथम निर्मित स्त्रीला व पुरुषाला प्रोत्साहित केले. व श्रेष्टत्वाच्या मोहाने चेतून या स्त्री व पुरुषाने आज्ञाभंगाचे पाप केले या पापालाच “मूळ पाप” म्हणतात.
मूळपापाचे परिणाम: या पापामुळे देव व मनुष्य यांच्यात संबंध बिघडले. मनुष्याला कष्टसाध्य जीवन व शेवटी मरण प्राप्त झाले. मनुष्य देहाच्या वासनांच्या आधीन झाला. एकमेकांवर जळणे, एकमेकांचे हिरावून घेणे व एकमेकांवर वर्चस्व चालवणे ह्या प्रेरणा मुख्यत्वेकरून मानवामध्ये प्रबळ झाल्या कारण मूळपापाला ह्याच प्रेरणांनी जन्म दिला होता. त्यामुळे देवाने मानवाला ह्या प्रेरणांच्या [वासनांच्या ] स्वाधीन केले. मनुष्य जे काही निर्माण करीतो ते दोषयुक्तच असते त्याचे नकारात्मक परिणामअसतातच. मुख्यत्वकरून जळणे, हिरावून घेणे व वर्चस्व चालवणे याचा परिणाम मानवाने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टींवर होतो.
विवाह संस्था, कुटुंबसंस्था ह्या अतिशय उदात्त हेतूने निर्मिल्या आहेत, बायबल नुसार या संस्था देवाने स्थापित केल्या आहेत परंतु आपण पाहतो की विवाहाच्या शपथा पती पत्नी दोन दिवसात विसरतात किंवा काहींच्या लेखी त्यांना महत्वही नसते. पहिल्या दिवसापासूनच पती पत्नी, सासू सून, यात बरेच नावे टाकता येतील हे सर्व एकमेकांवर वर्चस्व गाजवण्यासाठी तयार असतात. त्यामुळे शेवटी बळी तो कानपिळी ह्या म्हणी नुसार परिणाम येतात. यात मुख्य गोष्ट हि आहे की समाजातील अशक्त वर्ग अधिक भरडला जातो.
अगदी व्यवहारिक दृष्टीकोनातून विचार करता असे म्हणता येईल की आपल्याला जर निकोप समाज व्यवस्था व राष्ट्र निर्माण करावयाचे असेल तर जेथे बिघडले तेथूनच ते दुरुस्त केले पाहिजे. म्हणजे मूळपापाचे परिणाम; मूळपाप नष्ट झाल्यानेच नाहीसे होतील हे येथे आपण लक्ष्यात घेतले पाहिजे.
प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने मूळ पापाचे परिणाम नष्ट होतात: प्रभू येशू या जगात आला तो आपल्याला या मूळ पापाच्या दोषापासून सोडविण्यासाठी. त्याने देवाच्या योजनेला व इच्छेला अनुसरण्यासाठी वधस्तंभावरील मृत्यू स्वीकारला. त्याचे ते मरेपर्यंत देव इच्छेला समर्पित जीवन मानवाला न्यायी व सैतानाला दोषपात्र ठरवून गेले. त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मानवाला देव न्यायी असे स्वीकारतो व त्याच्या ठायी असलेला आज्ञाभंगाच्या मूळ पापाला पुसून टाकून त्याला क्षमा करतो. कारण प्रभू येशूवर विश्वास ठेऊन तो विश्वासणारा हे घोषित करीत असतो की ज्या मार्गावर प्रभू येशू चालला त्याच मार्गावर तो हि चालेले व शेवटपर्यंत देवची इच्छा व त्याच्या योजनेला समर्पित राहीन.
विश्वासणाऱ्याच्या या निर्णयाचे देव स्वागत करितो व देहाच्या वासनांवर विजय मिळविण्यासाठी त्याला पवित्र आत्मा देतो. यालाच ख्रितामध्ये नवीन जन्म म्हणतात. पवित्र वचन सांगते येशुख्रिस्तावर विश्वास ठेवणारा नवी सृष्टी आहे. हा नवा मनुष्य कोणत्याच जगिक व्यवस्थेला म्हणजे मातृसत्ताक, पितृसत्ताक, पुरुषप्रधान किंवा स्त्रीप्रधान संस्कृतीला अनुसरत नाही.
तो अनुसरतो ते देवाच्या इच्छेला व योजनेला, देव इच्छेत भेदभाव नाही, पती पत्नीने एकदेह असावे असे अशी देवाची इच्छा आहे. पतीने आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घ्यावी तशी आपल्या पत्नीची काळजी घेतली पाहिजे तिच्यावर प्रेम करून तिला संतुष्ट ठेवावे व आपल्या पतीचा मान पत्नीने राखावा हि देव इच्छा आहे. आपल्या पत्नीशिवाय इतर स्रिया आपल्या बहिणींप्रमाणे समजाव्यात हि देवाची इच्छा आहे. आपल्या आई वडिलांचा मान राखावा हि देवाची इच्छा आहे. स्रियांना कर्तृत्वाच्या बाबतीत देव कुठेच कमी लेखत नाही. पवित्र शास्त्रात अशी अनेक उदाहरणे आहे की देवाने जसे पुरुषाला निवडले व अभिषिक्त केले तसे त्याने स्त्रीयांनाही निवडले व अभिषिक्त केले. देवाचे वचन सांगते, ख्रिस्त येशू मध्ये कोणीही श्रेष्ट व कोणीही कनिष्ट नाही. सर्वांचा एक बाप्तिस्मा, सर्वांना एक आत्मा व सर्वांचा एक प्रभू.
म्हणून शोषणाची व्यवस्था नको असेल तर मानवाने प्रभू येशूवर विश्वास ठेऊन देवाकडे वळणे हाच एक मार्ग आहे. अन्यथा व्यवस्था कितीही चांगली वाटत असली तरी ती सदोष असणारच. कारण मानव जे काही निर्माण करितो त्यात जळणे, हिरावून घेणे व सत्ता चालवणे या मूळपापाच्या वासना कार्य करतात त्यामुळे संघर्ष कोणत्याना कोणत्या स्वरूपात उभा राहतो व पुन्हा तेच दुष्टचक्र सुरु राहते. आता पुरुष मुक्तीच्या चळवळी सुरु होऊ पाहात आहेत.
प्रार्थना: हे प्रभू येशू तू आम्हावर कृपा कर व आम्हाला साक्षीरूपी जीवन जगण्यास सहाय्य कर. तुझ्या मध्ये कोणताच भेद नाही शोषणाला कोठेच स्थान नाही. तूच मानवाला शोषणाच्या या दुष्ट चक्रापासून सोडवणारा आहेस हे कळू दे . येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक, आमेन.
रेव्ह. कैलास [आलिशा ] साठे.