“संकटात जय कसा मिळवावा” स्तोत्र ३४

तरुण सिह

 वचन: तरुण सिहांसहि वाण पडते, त्यांची उपासमार होतेपण परमेश्वराला शरण जाणाऱ्यास कोणत्याही चांगल्या गोष्टींची वाण पडत नाही. स्तोत्र ३४:१०

प्रस्तावना: स्तोत्र ३४:१० ह्या वचनाद्वारे देव दिनदुबळे, दबलेले, पिचलेले, हताश, निराश, गोरगरीब, आजार, कर्ज व  अज्ञान, या सारख्या वेगवेगळ्या बंधनात असलेल्या लोकांना विश्वास देत आहे, अभिवचन देत आहे की जे त्याला शरण जातात त्यांचे तारण होते, त्यांना आशीर्वादित जीवन लाभते व कोणत्याच चांगल्या गोष्टींची वाण पडत नाही. त्यासाठी आपण काय केले पाहिजे हे आपण स्तोत्रातून वा दाविदाच्या जीवनातून शिकतो, कारण हे स्तोत्र दाविदराजाने ईश्वरी प्रेरणेतून लिहिले आहे. 

आपल्या संकटात देवाला शोधा :  दावीद शौलाच्या भीतीने गथच्या पलिष्टी राजाकडे आश्रयाला गेला होता. परंतु हे त्याच्या अंगलट आले, राज्याच्या सेवकांनी दाविदाला ओळखले, त्यांना वाटले हा इस्राएलचा महत्वाचा माणूस आपल्या हाती लागला आहे, तेव्हा आपण याला ओलीस ठेऊ. परंतु दाविदाने हे लगेच हेरले व आपण इस्राएलचा महत्वाचा माणूस नसून एक अतिशय साधारण मनुष्य आहो असे त्या राजाला पटावे म्हणून त्याने वेड्याचे सोंग घेतले. तो कवाडे खडखडवू लागला व आपल्या दाढीवर लाळ गाळू लागला. त्याला पाहून राजा त्याच्या सेवकांवर चिडला व त्याने दाविदास हाकलून दिले. १ शमुवेल २१:१०-१५. अशा प्रकारे दाविदाने सुटका करून घेतली असे आपल्याला दिसते. परंतु दावीद राजा म्हणतो मी देवाला शोधले, तेंव्हा त्याने मला उत्तर दिले, आणि माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले. स्तोत्र ३४:४. म्हणजे दावीद शौलाच्या भीतीने पळत असताना स्वतःला वाचविण्यासाठी वेगवेळ्या प्रकारचे प्रयत्न करीत असताना आपल्याला दिसतो. परंतु या संकटात तो खऱ्या अर्थाने देवाचा शोध करीत होता हे या स्तोत्रावरून स्पष्ट होते. कारण हे स्तोत्र दाविदाने या संकटातून सुटका झाल्यावर देवाला धन्यवाद देण्यासाठी लिहिले होते. 

देवाला आरोळी मारा : दाविदाने देवाला शोधले म्हणजे काय केले ? असा प्रश्न जर आपल्या मनात आला असेल तर त्याचे उत्तर आहे त्याने देवाकडे आरोळी मारली. तो म्हणतो,”या दिनाने आरोळी केली, तेंव्हा यहोवाने ते ऐकले व त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवले.” स्तोत्र ३४:६. देवाकडे आरोळी मारणे हे कळकळीची प्रार्थना करीत त्याचा आश्रय शोधने किंवा आश्रय घेणे दाखवते. आपले जीवन जर आपल्याला सुरक्षित व आशीर्वादित ठेवावयाचे असेल तर कळकळीची प्रार्थना करून त्याच्या आश्रयाला जाणे या पेक्ष्या उत्तम मार्ग या जगात दुसरा नाही. दावीद राजा स्तोत्र ९१ मध्ये म्हणतो, ‘जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो, तो सर्व समर्थाच्या छायेत राहतो. यहोवा विषयी मी म्हणेन की तो माझा आश्रय व माझा दुर्ग आहे तोच माझा देव त्याच्यावर मी भरवसा ठेवतो. म्हणजे जो देवाकडे कळकळीची प्रार्थना करून त्याला आरोळी मारून त्याचा आश्रय घेतो देव त्याची सर्व दृश्य व अदृश्य संकटातून सुटका करितो.’  

देवाचे भय धरा: दावीद राजा या स्तोत्रामध्ये देवाच्या भयाविषयी शिकवत आहे. आपल्यासाठी देवाचे भय म्हणजे एका कानाने ऐकणे व दुसऱ्या कानाने सोडून देणे असे आहे. परंतु दाविदाचे संपूर्ण जीवन देवाच्या भयात माणसाने कसे जीवन जगावे याचे उत्तम उदाहरण आहे. पलिष्ट्यांचा राजा आखीश याच्या तावडीतून दावीद आपली सुटका करून घेताना आपले चातुर्य व धुर्तपणा पणास लावतो. परंतु सुटकेचे श्रेय देवाला देतो कारण त्याला पक्के  होते की आपल्या  धुर्तपणाने  किंवा चातुर्याने आपले रक्षण झाले नसून ते देवाने केले आहे. 

हा दावीद राजाचा अनुभव होता म्हणून तो सम्राट असताना सुद्धा आपल्या ऐश्वर्यावर गर्व करीत नाही. तो म्हणतो कोणी घोड्यांची कोणी रथांची प्रतिष्ठा मिरवतात आम्ही मात्र आमचा देव परमेशवर याच्या नावाची प्रतिष्ठा मिरवतो स्तोत्र :२०:. तो आपल्या पराक्रमाचे श्रेय देवाला देताना म्हणतो , ” तो माझ्या हातास युद्ध कला शिकवतो म्हणून माझे बाहू पितळी धनुष्य वाकवतात.” स्तोत्र १८:३४. इतकेच नव्हे तर तो स्वतःला मेंढराची उपमा देतो देवाला स्वतःचा मेंढपाळ संबोधतो. पण आत्मप्रौढी मिरवत नाही.

पवित्र शास्त्र बायबल सांगते,”ज्ञान्याने आपल्या ज्ञानाचा आभिमान बाळगू नये, बालवानाने आपल्या बलाचा श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा आभिमान बाळगू नये. बाळगायचाच असला तर मी दया करणारा, पृथ्वीवर धर्म न्याय चालवणारा परमेश्वर आहे, याची त्याला जाणीव आहे ओळख आहे याच्या विषयी बाळगावा यात मला संतोष आहे. यिर्मया :२३.

तरुण सिहांसहि वाण पडते त्यांची उपासमार होतेपण परमेश्वराला शरण जाणाऱ्यास कोणत्याही चांगल्या गोष्टींची वाण पडत नाहीस्तोत्र ३४:१० या वचनाद्वारे दावीद राजा आपल्याला हेच शिकवत आहे की आपण गर्व करू नये. आपल्या मुखावर आपण ताबा ठेवावा, कपट, व दुर्भाषण या पासून दूर राहावे व धार्मिकतेची कास धारावी.

तरुण सिंह म्हणजे प्रचंड शक्तीशौर्यधैर्य ,  विजयाचे प्रतीक आहेतरुण सिहांच्या एका गर्जनेने संपूर्ण जंगल हादरतेप्राणी जीव मुठीत घेऊन पळू लागतात  सहजच त्याच्या शक्तिशाली पंजात सापडताततरी हे सत्य आहे कि आशा शक्तिशाली तरुण सिहांस वाण पडते  त्याला भुकेने मरावे लागते.त्याच प्रमाणे जगात सामर्थ्यशाली माणसे धुळीला मिळून दोन वेळेच्या अन्नाला मोताद होतातआपणही दावीद राजा प्रमाणे देवाला शरण जाऊन त्याच्या शक्ती समर्थावर विश्वास ठेऊन जीवन जगू लागलो तर आत्मविश्वासाने म्हणू शकतो कि,’ माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण  दया हि लाभतील  देवाच्या घरात मी चिरकाळ राहील.’

प्रार्थना:हे प्रभू येशू तू दयाळू आहेस म्हणून मी तुझे आभार मानतो, तूच माझा मेंढपाळ आहेस दावीदा प्रमाणे माझा सांभाळ कर.येशूच्या नावाने मागतो.आमेन.

रेव्ह.कैलास [अलिशा ]साठे .

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole