वैवाहिक सुख
वचन: परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून त्याची स्त्री बनवली आणि तिला आदामा कडे नेले. उत्पत्ती २:२२.
परमेश्वर देवाने आदामासाठी अनुरूप सहकारी म्हणजे पत्नी निर्माण करण्याचा संकल्प केला असे आपण वचन १८ मध्ये पहातो. पण देवाने तिला लगेच निर्माण केले नाही. त्याने अगोदर पशु पक्षी घडवले व त्यांना आदामाकडे नेले तेव्हा आदामाने त्यांना नावे दिली. या पशु पक्षांना नावे देत असताना आदाम त्यांच्यात त्याच्या सदृश्य जोडीदार शोधत होता, पण त्याला तो मिळाला नाही. आदामाने पत्नीचे महत्व लक्षात घ्यावे म्हणून कदाचित देवाने त्याला या परिस्थितीतून नेले असावे. पुढील वचन; “मग” या शब्दाने सुरु होते याचा अर्थ असा आहे कि आदामाला त्याच्या उणेपणाची जाणीव झाल्यानंतर देवाने स्त्री निर्मितेच कार्य हाती घेतले.
स्त्री ची निर्मितीही देवाने विशेष प्रकारे केली. त्याने आदामाला गाढ
झोपी लावले, आज ऑपरेशन करताना जशी भूल देतात तसाच हा प्रकार आहे असे वाटते पण देवाने त्याच्या सामर्थ्याने हे अगदी सहज केले असावे. आदाम गाढ झोपी गेल्यावर त्याची फासळी काढून त्याची स्त्री बनवली. देवाने देहातून देह निर्माण केला तो यासाठीच कि पती पत्नीने एक देह होऊन त्याचे गौरव करावे व उभयतांनी एकमेकांवर प्रीती करावी. देवाने जेंव्हा तिला आदामाकडे नेले तेव्हा त्याची प्रतिक्रिया देवाच्या या परिपूर्ण इच्छेचे प्रतिबिंब आहे. तेंव्हा आदाम म्हणाला आता हे मात्र माझ्या हाडातले हाड व मासातले मास आहे. येथे, ‘मात्र‘ या शब्दावरून आदामाची आनंददायी प्रतिक्रिया लक्षात घ्या. त्याचा जोडीदार त्याला हवा तसा मिळाला आहे हेच तो सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचे आपण पाहतो.
देवाच्या या कृतीतून काही गोष्टी आपण लक्षात घेऊ, येथे देव पवित्र विवाह संस्थेची स्थापना करीत आहे. आपल्या विवाह संस्थेचे प्रतिबिंब आपण देवाच्या या कृतीत पाहिले तर तिचे पावित्र्य आपल्या लक्षात येईल.
जसा बाप आपल्या मुलीला विवाहा मध्ये देतो तसे देव हव्वेला देत आहे. आज जेव्हा बाप आपल्या मुलीला विवाहामध्ये देत असतो तेव्हा तो स्वर्गीय देवाचे अनुकरण करीत असतो व देव विवाहामध्ये उपस्थित राहून वधु व वर या त्याच्या दोन्ही लेकरांना त्याच्या महान दैवी आशीर्वादाने त्यांच्या जीवनातील भावी योजना पूर्ण व्हावी म्हणून आशीर्वादित करीत असतो. म्हणून विवाह योजनेत दोन कुटुंब किंवा नातेवाईक एवढेच सहभागी नसतात तर प्रत्यक्ष स्वर्ग हि या पवित्र कार्यात सहभागी असतो. हे जर आम्हाला समजले तर ख्रिस्ती विवाह संस्था, कुटुंब संस्था व समाज व्यवस्था आशीर्वादित झाल्या शिवाय राहणार नाही.
प्रार्थना: हे प्रभू येशू स्त्री पुरुषा बद्दल किंवा पती पत्नी बद्दल तू किती संवेदनशील आहेस हे मला समजले म्हणून मी तुझे आभार मानतो. ख्रिस्ती जीवन जगताना मला तू घालून दिलेल्या
उच्च आदर्शानुरुप जीवन जगता येउदे.येशूच्या नावाने मागतो.आमेन.