हृदय रुपी युद्धभूमीवर ज्ञानाचे महत्व. नीती ४:२३.

वचन : ज्या  कशाचे तू रक्षण करतोस त्या सर्वांपेक्षा अधिक कसोशीने तू आपल्या हृदयाचे रक्षण कर कारण त्यातून जीवनाचे झरे निघत असतात. नीतिसूत्रे ४:२३. 

हृदय एक युद्धभूमी
प्रस्तावना:भाषाशात्रानुसार नीतिसूत्रे हा एक काव्य प्रकार आहे. हिब्रू काव्य प्रकारात यमक जुळवण्या पेक्षा शब्दालंकार व प्रगतिशील विचार प्रगट करण्यावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे,”ज्या कशाचे तू रक्षण करतोस त्या सर्वांपेक्षा अधिक कसोशीने तू आपल्या हृदयाचे रक्षण कर कारण त्यातून जीवनाचे झरे निघत असतात. ह्या वचनाला समजून घेण्यासाठी आपल्याला नीतिसूत्रे ४ या संपूर्ण काव्याचा मतितार्थ समजून घ्यावा लागेल. आणि तसे केल्यास आपल्या लक्षात येते कि या काव्याचा मुख्य उद्देश ज्ञानाचे महत्व विदित करणे हा आहे.परंतु, पवित्र शास्त्राच्या अर्थविवरणाच्या नियमानुसार आपल्याला  ज्ञाना बद्दल समजून घेताना फक्त एक वचन किंवा एक अध्याय समजून घेऊन चालणार नाही तर संपूर्ण पवित्र शास्त्र याबद्दल काय सांगत आहे हे आपल्याला समजून घ्यावे लागेल.  नीतीसूत्रे ४ ची सुरवात करताना शलमोन राजा म्हणतो की, त्याचा बाप दावीद याच्याकडून त्याला शिक्षण मिळाले म्हणजे ज्ञान प्राप्त झाले.नीती ४: ३-४, व त्या शिक्षणामुळे त्याचे जीवन सर्वांग सुंदर झाले याची त्याला खात्री असल्यामुळे  तो या नीतिसूत्रांच्या द्वारे आपल्याला हे ज्ञान किती मौल्यवान आहे, त्याला कसे मिळवावे, व कसे जतन करावे या बद्दल सांगत आहे.चला तर मग आपण या बद्दल  जाणून घेऊया.

ज्ञान म्हणजे काय ?: ज्ञान  हि इतकी अमूल्य गोष्ट आहे की तिची तुलना कशाशीच केली जाऊ शकत नाही . तर मग आपल्याला प्रश्न पडू शकतो की हे कोणत्या प्रकारचे ज्ञान आहे ? कारण ज्ञान म्हटले की आपल्या डोक्यात अनेक विचार येतात,”जसे ज्ञान म्हणजे माहिती, ज्ञान म्हणजे हुशारी, ज्ञान म्हणजे चलाखी, ज्ञान म्हणजे निर्णयक्षमता. एखादा व्यक्ती व्यापारात हुशार असेल तर आपण म्हणतो त्याला व्यापाराचे खूप ज्ञान आहे. राजकारणी व्यक्तीला आपण खूप ज्ञानी समजतो. परंतु  वास्तविक पहाता या गोष्टींचा ज्ञानाशी काहीही संबंध नाही. पवित्र शास्त्र सांगते तेच खरे ज्ञान आहे. 

पवित्र शास्त्रानुसार ज्ञानाची व्याख्या पुढील प्रमाणे आहे,” पहा प्रभूचे भय हेच ज्ञान आहे, आणि वाईटापासून दूर जाणे हीच बुध्दी आहे. ईयोब २८:२८. यावरून स्पष्ट होते की ज्ञानी व्यक्तित्व म्हणजे पवित्र व्यक्तित्व.”मला दयेची आवड आहे, यज्ञाची नाही, होमार्पणापेक्षा देवाचे ज्ञान मला अधिक आवडते.”होशेय ६:६. यावरून स्पष्ट होते की, दया, क्षमा, शांती, प्रीती, आनंद, सहनशीलता, इंद्रियदमन, ममता, चांगुलपणा, लीनता, विश्वासूपणा या गुणांनी जे व्यक्तित्व पूर्ण आहे ते ज्ञानी व्यक्तित्व आहे. किंवा जे यासाठी झटत आहेत म्हणजे ज्यांना क्षमा मिळत नाही तरी ते दुसऱ्याला आनंदाने क्षमा करतात, ज्यांना वेळोवेळी द्वेषाचा अनुभव येतो तरी ते आनंदाने प्रीती करतात, ज्यांचा नेहमी विश्वासघात होतो पण ते इतरांशी विश्वासू राहतात, ज्यांच्या कडून अपमानाचा अनुभव येतो त्यांचा ते मानसन्मान करितात, ते ज्ञानाच्या  वाटेवर आहेत, प्रभू त्यांना कृपा पुरवील. हे सर्व का कारण हीच आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे. ज्ञान हे अतिशय मौल्यवान आहे. 

ज्ञानाचे फायदे : मनुष्याला ज्ञानचे मोल कळत नाहीत्याचा ओढा भौतिक सुखाकडे म्हणजे भोग विलासाकडे अधिक असतो. देवाचे पवित्र वचन सांगते,” मनुष्य ज्ञानाचे मोल जाणत नाही. सोने, रूपे, माणिक मोती, हिरे किंवा उच्च प्रतीची दागिने अशी कोणतीच अमूल्य गोष्ट देऊन ते घेता येत नाही.” ईयोब २८:१३-१९.देवाचे वचन सांगते,”वरून येणारे जे ज्ञान ते आधी निर्मल, नंतर शांतिकारक, विनयी, सहज समजूत होण्याजोगे, दयेने व चांगल्या फळांनी भरलेले, अपक्षपाती व निष्कपट असे आहे,”याकोब ३: १७. असे जर जीवन आपण जगलो तर त्याचे किती फायदे आम्हाला होतात हे आपण पाहू म्हणजे त्याचे मोल आपल्याला कळेल. 

अ ] ज्ञानामुळे दीर्घायुष्य प्राप्त होते : दीर्घ आयुष्य कोणाला नको आहे ? सर्वांनाच ते हवे आहे, नाहीतर दवाखान्यांची इतकी मोठी मोठी बिल कोण कशाला भरणार. हे जीवन खरोखर न परवडणारे आहे. पण दुसराही एक मार्ग आहे तो म्हणजे वरून येणारे शुध्द ज्ञान आत्मसाथ करणे. देवाचे वचन मोशेला प्राप्त झाले ते हे की,” सर्व नियम व आज्ञा पाळायला तू व तुझ्या येणाऱ्या पिढ्यांनी देवाचे भय धरावे, म्हणजे तुझे आयुष्याचे दिवस वाढतील,” अनुवाद ६:२. पहा पवित्र शास्त्राच्या व्याख्ये नुसार आपण पाहिले की,”प्रभूचे भय हेच ज्ञान आहे, आणि वाईटापासून दूर जाणे हीच बुध्दी आहे. यावरून स्पष्ट होते की देव मोशेला दीर्घ आयुष्य मिळवण्यासाठी ज्ञानाच्या मार्गावरून चालण्यास सांगत आहे. “ज्ञानाच्या उजव्या हातात दिर्घआयुष्य आहे, धन व सन्मान त्याच्या डाव्या हातात आहेत. त्याचे मार्ग आनंदाचे आहेत आणि त्याच्या सर्व वाटा शांती आहेत. जे त्याला धरून घेतात त्यांना ते जीवनाचे झाड आहे , आणि जोकोणी त्याला राखून ठेवतो तो सुखी आहे,” नीती ३: १६-१८.

ब ] ज्ञानामुळे देवाचे संरक्षण प्राप्त होते: सैतानाने माणसाला वेगवेळ्या भयांनी त्रस्त केले आहे. हे जग भयाने भरलेले आहे. इथले भय कधीच संपत नाही. अशा भययुक्त जगात निर्भय जगायचे असेल तर देवाला भिऊन वागले पाहिजे म्हणजे ज्ञानच्या मार्गात चालले पाहिजे. “जे यहोवाला भितात, जे  त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात. त्यांचा जीव मरणापासून  सोडवायला व त्यांना दुष्काळांत वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर असते. स्तोत्र ३३:१८. तो त्यांची ढाल आहे स्तोत्र ११५:११. नीती १४:२६. १९:२३. जसा पैसा रक्षण  आहे तसे ज्ञान रक्षण आहे. परंतु ज्ञानाचे उत्कृष्टपण असे आहे, की ज्ञान ज्याला आहे त्याच्या जीवाचे ते रक्षण करते, उपदेशक ७:१२.

भौतिकतेचि आवड धरणारे मात्र देवाच्या या आशीर्वादांना मुकतात.”माझे लोक ज्ञान नसल्यामुळे नष्ट होतात; तू ज्ञान नाकारले, म्हणून मीही तू माझ्याकडे याजक नसावा असा तुला नाकारीन; तू आपल्या देवाचे नियमशास्त्र विसरला आहेस, म्हणून मी हि तुझ्या लेकरास विसरेन,” होशय ४:६.  

क ] ज्ञानामुळे देवाचा पुरवठा प्राप्त होतो: दावीद राजा अतिशय ज्ञानी व्यक्ती होता तो  देवाला भिऊन जीवन जगत असे. तो म्हणतो,” हे देवा मी तुझविरुद्ध पाप करुनये म्हणून मी तुझे वचन माझ्या हृदयात जपून ठेवले आहे स्तोत्र ११९:११. त्यामुळे त्याने देवाच्या पुरवठ्याचा प्रत्येक वेळी अनुभव घेतला होता. म्हणूनच मोठ्या आत्मविश्वासाने तो म्हणतो,”परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काही उणे पडणार नाही”. “माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया हि लाभतील व परमेशवराच्या घरात मी चिरकाळ राहीन,” स्तोत्र २३: १-६. देवाचे अभिवचन आम्हाला  आवहान करते की,”अहो तुम्ही त्याचे पवित्र जन  हो, यहोवाला भ्या कारण जे त्याचे भय धरतात त्यांना उणे पडत नाही. तरुण सिहांना देखील उणे पडते आणि ते भुकेले होतात, परंतु जे यहोवाला शोधतात त्यांना कोणतीही चांगली गोष्ट उणी पडणार नाही,” स्तोत्र ३४:९-१०. येथे भ्या म्हणजे दैवी ज्ञानाने युक्त होऊन जीवन जगा.

ड ] ज्ञानामुळे आपण देवाचे प्रतिनिधी बनतो: ख्रिस्ती जीवनाचा आरंभ स्वतःच्या पापमय जीवनाला ओळखून पश्चात्तापी अंतःकरणाने प्रभूंयेशूला उध्दारासाठी शरण गेल्याने होतो. म्हणजे जेंव्हा एक व्यक्ती त्याच्या पापाची क्षमा मागतो व प्रभू येशूच्या पवित्रतेच्या मार्गावर चालण्यासाठी स्वतःचे समर्पण करितो, तेव्हा देव त्याच्या या कृतीला न्यायीपणाची कृती समजून त्याचा स्वीकार करतो, त्याच्या अपराधांची क्षमा करतो व त्याने पवित्र जीवन जगावे व सुवार्तेची सेवा करावी म्हणून त्याला पवित्र आत्मा देतो. तेव्हा त्याला देवाचे मूल होण्याचा व त्याला आबा; बापा म्हणून हाक मारण्याचा अधिकार प्राप्त होतो. देवाचे वचन सांगते,”तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकवर्ग, पवित्र राष्ट्र, मोलाने मिळवलेले लोक आहा, यासाठी की ज्याने तुम्हांस अंधारातून आपल्या अद्युत प्रकाशात बोलावले आहे त्याचे गुण तुम्ही प्रसिध्द करावे.१ पेत्र २:९. ख्रिस्ती जीवन देवाच्या इच्छेला संपूर्ण समर्पित असल्यामुळे ते दैवी ज्ञानाचा उद्घोष करणारे जीवन आहे, पवित्र जीवनाचे स्पष्ट प्रगटीकरण ख्रिस्ती जीवनाद्वारे अपेक्षित आहे. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो,” तुझे भय धरणार्यांना तू झेंडा दिला आहे; त्यांनी तो सत्याकरिता उभारून दाखवावा,” स्तोत्र ६०:४. झेंडा जसा राष्ट्राचे, धर्माचे किंवा वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधित्व करितो तसे देवाचे भय धरणारा व्यक्ती म्हणजे ख्रिती व्यक्ती देवाचे पृथ्वीवरती प्रतिनिधित्व करितो त्याच्या हाती देवाचा झेंडा आहे.

इ ज्ञानामुळे धार्मिकांमध्ये वतन प्राप्त होते: ख्रिस्ती जीवनाचा प्रारंभ देवाच्या भयाने सुरु होतो म्हणजे ज्ञानाने सुरु होतो. जेव्हा एक व्यक्ती प्रभूंयेशूला जीवन समर्पित करतो तेव्हा तो देवाचा अधिकार मान्य करून त्याचे प्रभुत्व स्वीकारतो हि त्याची कृती त्याच्या जीवनातून देवाचे भय व ज्ञान प्रगट करणारी असते व तेव्हाचं त्यांना पवित्र जनांमधे वतन मिळते. प्रेषित २६:१८.आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व बाप धन्यवादित असो त्याने मोठ्या दयेने येशू ख्रिस्ताच्या मेलेल्यांमधून पुनः उठण्याच्या द्वारे आपणास जिवंत अशा प्राप्त होण्यासाठी पुनः जन्म दिला आहे. याकरिता की  अविनाशी आणि निर्मल व न कोमेजणारे वतन तुम्हासाठी स्वर्गात राखून ठेवलेले आहे. १ पेत्र १:३-४. स्तोत्र कर्ता म्हणतो,” हे देवा तू माझे नवस ऐकले आहेस तुझ्या नावाचे भय धरणाऱ्यांचे वतन तू मला नेमून दिले आहे,” स्तोत्र ६१:५.

ई ] ज्ञानामुळे कुटुंब वस्सल व समृध्द जीवन प्राप्त होते : जो यहोवाचे भय धरितो जो त्याच्याच मार्गानी चालतो तो प्रत्येक जण सुखी आहे. तू आपल्या हाताच्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील आणि तुझे बरे होईल. तुझी बायको तुझ्या घरात सफळ द्राक्षवेलीसारखी होईल. तुझी मुले जैतुनाच्या रोप्यांसारखी तुझ्या मेजा भोवती होतील. पहा जो पुरुष यहोवाला भितो तो असाच आशीर्वादित होईल. स्तोत्र १२८:१-४. जे देवाचे भय धरतात त्यांचे हित होईल. उपदेशक ८:१२. ज्ञानी वैभवाचे वतनदार होतील नीती १:५. 

उ ] ज्ञानामुळे प्रशंसा होते : जेव्हा मनुष्य न्यायपूर्ण, प्रीतीपूर्ण व शांतीपूर्ण जीवनाला प्राधान्य देतो तेव्हा त्याची प्रशंसा होते. देवाचे वचन सांगते ज्ञानाला उंचाव म्हणजे ते तुला थोर करील; तू त्याला आलिंगिले म्हणजे ते तुला गौरवील . ते तुझ्या डोक्याला शोभेचे वेष्टण देईल, सुंदर मुकुट ते तुला सोपवून देईल. नीती ४: ८-९. स्रियांच्या साठी विशेष अभिवचन आहे; “जी स्त्री ज्ञान मार्ग अनुसरते म्हणजे देवाच्या भयात जीवन जगते तिची प्रशंसा होईल,” नीती :३१:३०. 

ऊ ] ज्ञानामुळे कार्यसिद्धी होते : मानस कार्यसिद्धी साठी साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या युक्त्या वापरतात व यालाच हुशारी किंवा ज्ञान म्हणतात परंतु, आपण जाणतो की देवाच्या भयात कार्य करणे यालाच ज्ञान म्हणतात. आपण साम, दाम, दंड, भेद या भानगडीत पडू नये. देवाचे वचन सांगते कार्यसाधण्यासाठी ज्ञान उपयोगी पडते. उपदेशक १०:१०. तर मग आपण जाणून घेऊ की हि ज्ञानाची कृती काय आहे? आपण जाणून घेतले पाहिजे की प्रत्येक कार्य देवाच्या व्दारे योग्य वेळी पूर्ण केल्या जाते. उपदेशक ३:१-१५. म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला सल्ला देते की,”तू आपली सर्व कार्य यहोवाच्या स्वाधीन कर, म्हणजे तुझे बेत सिध्दीस जातील.नीती १६:३. 

ज्ञान कसे प्राप्त करावे: पवित्रशास्त्रानुसार ज्ञानाचा खरा श्रोत देव आहे. देवाचे वचन सांगते की ज्ञान जीवनतांच्या भूमीत सापडत नाही. ते जलाशयांच्या व समुद्राच्या ठायी नाही.  ज्ञान हे सर्व जीवनतांच्या दृष्टी पासून गुप्त आहे, आणि आकाशातील पक्षांपासून ते लपवून ठेवलेले आहे. नाश व मरण म्हणतात आम्ही आपल्या कानांनी त्याची अवई ऐकली आहे. ज्ञानाचा मार्ग व बुद्धीची जागा फक्त देवाला माहिती आहे. कारण सर्वकाही त्याने निर्माण केले. तो मनुष्याला म्हणतो, पहा प्रभूचे भय हेच ज्ञान आहे, आणि वाईटापासून दूर जाणे हीच बुध्दी आहे. ईयोब २८:१२-२८. तर मग हे ज्ञान कसे प्राप्त होते ते आपण पाहू.  

अ ]  येशू ख्रिस्तावर विश्वास  : “यहोवाचे भय ज्ञानाचा प्रारंभ आहे, जे त्या प्रमाणे वागतात त्यांना बुध्दी आहे. त्यांची प्रशंसा सर्वकाळ राहते,” स्तोत्र १११:१०. यहोवा ज्ञान देतो; ज्ञान  व बुध्दी त्याच्या मुखातून येतात. नीती २:६. पण नव्या कराराच्या प्रारंभा नंतर किंवा आपण म्हणू शकतो की येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आल्यानंतर देवाने अशी व्यवस्था निर्माण केली आहे की जो येशूवर विश्वास ठेवतो त्यालाच ज्ञान प्राप्त होते. कारण ख्रिस्ती जीवनाचा प्रारंभ प्रभू येशूचे प्रभुत्व स्वीकारल्या शिवाय होत नाही, जो पर्यंत आपण आपले जीवन त्याला समर्पित करीत नाहीत तो पर्यंत आपण त्याच्यावर विश्वास ठेवला आहे हे सिध्द होत नाही. म्हणजेच ख्रिस्ती जीवनाची सुरवातच देवाच्या भयाने म्हणजे त्याचे स्वामित्व स्वीकारत त्याच्या अधीन जीवन जगण्याच्या संकल्पाने होते. 

दुसरी गोष्ट अशी की, मानवाने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा हि देवाची आज्ञा आहे. त्याने आपला न्याय कळवला आहे,”जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला सर्वकाळचे जीवन आहे व जो त्याच्यावर विश्वास ठेवत नाही तो जीवन पाहणार नाही तर देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो,”योहान ३:३६. कारण प्रकाश त्यांच्याकडे  आला पण त्यांनी अंधाराची आवड धरली कारण त्यांची कर्मे दुष्ट होती. योहान ३:१९. आता देवाच्या आज्ञांचे पालन करणे हा जर ज्ञानी जीवनाचा मुख्य मापदंड असेल तर याचा अर्थ ख्रिस्ती जीवन हाच ज्ञानाचा मार्ग आहे. कारण आजच्या काळात व भविष्यात सर्व काळासाठी देवाची सर्वात मोठी व महत्वाची हीच आज्ञा आहे की मनुष्याने आपल्या उध्दारासाठी प्रभू येशूवर विश्वास ठेवावा म्हणून जे कोणी या देव आज्ञेचे पालन करीत नाहीत ते देवाला भीत नाहीत, त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत म्हणून ते अंधारात आहेत ज्ञानापासून वंचीत आहेत.

याच्यापुढे जाऊन पाहिले तर आपल्या असे लक्ष्यात येईल की पुढे येणारा ज्ञानाचा प्रत्येक श्रोत ख्रिस्ता पासून आहे. ख्रिस्तावर विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी ज्ञानाची सर्व दारे बंद आहेत.

ब ] पवित्र आत्मा : पवित्र आत्मा ज्ञानाचा व सामर्थ्याचा श्रोत आहे पण तो त्यांनाच मिळतो जे येशुख्रिस्तावर विश्वास ठेवतात. येशू ख्रिस्त म्हणतो,” जर कोणी तान्हेला असला तर त्याने माझ्याकडे येऊन प्यावे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या आतून शास्त्र लेखाने सांगितल्या प्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील . हे जिवंत पाणी पवित्र आत्म्याला सूचित करते . योहान ७:३८-३९. येशू ख्रिस्त पुढे आणखीन सांगतो  की,”ज्याला बाप माझ्या नावाने पाठविलं तो पाराक्लेत, म्हणजे पवित्र आत्मा, तुम्हास सर्व काही शिकवील, आणि ज्या गोष्टी मी तुम्हास सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. योहान १४:२६. याचा अर्थ पवित्र आत्मा ज्ञानाचा श्रोत आहे, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यास हे स्वर्गीय ज्ञानाचे भांडार खुले होते. 

क ]  देवाचे वचन :  प्रत्येक शास्त्रलेख देवाने प्रेरलेला आहे, तो शिक्षण, निषेध, सुधारणूक, न्यायीपणाचे शिकवणे यांकरिता उपयोगी आहे , यासाठी की देवाचा माणूस पूर्ण व प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. २ तिमोथी ३:१६-१७. दावीद राजा म्हणतो, ” तुझ्या वचनांचे उलगडणे प्रकाश देते; ते भोळ्यांस बुध्दी देते,” स्तोत्र ११९: १३०. 

ड ] मेंढपाळ : मंडळीत पाळक हा आपल्या साठी देवाने ठेवलेला ज्ञानाचा श्रोत आहे . देवाचे अभिवचन यिर्मया द्वारे भविष्य वाणीच्या स्वरूपात आपल्याकडे आले ते हे की,”माझ्या मनासारखे मेंढपाळ मी तुम्हास देईन, ते तुम्हास ज्ञान व बोध चारतील,” यिर्मया ३:१५. संत पौल मंडळीचा पाळक तीमथ्य याला मार्गदर्शन करताना निक्षून सांगतो की, “वचन गाजीव, सुकाळी अकाली त्यात तत्पर ऐस, सर्व सहनशीलतेने व शिक्षणाने दोश पदरी घाल, निषेध कर व बोध कर,” २ तीमथ्य ४:१-२. 

इ ] धार्मिक जण : ख्रिस्त आम्हासाठी दिला, यासाठी की, आम्ही त्याच्यामध्ये देवाचे न्यायीपण असे व्हावे, २ करिंथ ५; २१. आपण ख्रिस्तामध्ये आहो म्हणून तो देवापासून आम्हांस ज्ञान, म्हणजे न्यायीपण व पवित्रीकरण व खंडणीअसा करण्यात आला १ करिंथ १:३०  येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे मिळणारे देवाचे न्यायीपण सर्व विश्वासणाऱ्यांसाठी आहे कारण त्यात काहीच भेद नाही, रोम ३:२२. देवाकडून आम्हाला धार्मिकता प्राप्त आहे म्हणून ज्ञानाचा श्रोत आपल्या ठायी आहे. धार्मिकांच्या मुखावाटे ज्ञान निघते नीती १०:३१. नम्र जणांच्या ठायी ज्ञान असते. नीती ११:२ 

ई ] धार्मिक आई वडील : देव इस्राएलाच्या संतानाला निक्षून सांगतो की, हे इस्राएला श्रवण कर, यहोवा आमचा देव एकच यहोवा आहे, तू आपल्या अनुवाद ४: १० सर्वच आईवडील आपल्या लेकरांना चांगले शिकवू इच्छितात व चांगले शिकवण्याचा प्रयत्न करितात. 

उ ] पवित्र जीवन : दानिएल, शद्रख , मेशख, आबेदनगो हे यहुदी तरुण ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतींत राजा त्यांस जे काही विचारी त्यात ते त्याच्या अवघ्या राज्यात असलेल्या सर्व जोतिष्यांपेक्षा व मांत्रिकांपेक्षा दसपट हुशार आहेत असे त्यास दिसून येई.दानी १:२०  हे का घडले कारण त्यांनी देवासाठी पवित्र जीवन जगण्याचा मार्ग निवडीला होता. राजाचे मिष्टान्न व द्राक्षरस देवासाठी आपण पवित्र असावे म्हणून त्यांनी नाकारला. दानी १:८. 

ऊ ] ऐकणे : बोध एकूण शहाणे व्हा, त्याचा अव्हेर करू नका. जो माझ्या दाराशी नित्य जागत राहून, माझ्या दाराच्या खांबांजवळ उभा राहून माझे ऐकतो तो धन्य. कारण ज्याला मी प्राप्त आहे त्याला जीवन प्राप्त होते, आणि त्याला परमेश्वराची दया प्राप्त होते; परंतु जो मला अंतरतो तो आपल्या जीवाची हानी करून घेतो. जे माझा द्वेष करितात त्या सर्वांना मरण प्रिय आहे. नीती ८: ३३-३६. 

ए ] प्रार्थना : या प्रजे समोर वर्तण्यास मला आता चातुर्य व ज्ञान दे तुझ्या एवढ्या मोठ्या प्रजेचे शासन कोणाला करता येईल ?  २इतिहास १:१० हे यहोवा तुझा मार्ग मला शिकीव, मी तुझ्या सत्यांत चालेन; तू माझ्या हृदयाला तुझ्या नावाचे भय धरायला लाव. स्तोत्र ८६: ११. 

ज्ञानाला कसे व का जतन करावे ?: ज्ञान अतिशय महत्वाचे आहे ते आपल्या जीवनासाठी खूपच उपयुक्त आहे, व ते आपल्याला कसे मिळवता येते हे आपण पाहिले. आता हे ज्ञान जपून कसे ठवावे हे आपण पहाणार आहोत. ज्ञान इतके मौल्यवान आहे कि त्याची तुलना कोणत्याच मौल्यवान गोष्टीशी होवू शकत नाही म्हणून मौल्यवान गोष्टीचे जसे रक्षण करावे लागते तसे ज्ञानाचेही रक्षण करावे लागते. तर त्यासाठी काय आवश्यक आहे ते आपण पाहू. 

योग्य हृदय : पवित्र शास्त्रात मानवाचे विश्वास योग्य व्यक्तित्व किंवा त्याच्या अंतरंगाची स्थिती दाखवण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला आहे त्यात प्रामुख्याने, हृदय, मन, अंतःकरण, अंतर्याम, चित्त या शब्दाचा वापर केला आहे. तेव्हा येथे आपण “योग्य हृदय” असे सांगत असताना बाकीच्या समानार्थी शब्दांचाही विचार करावा म्हणजे, योग्य मन, योग्य अंतःकरण, योग्य अंतर्याम, योग्य चित्त अशा अर्थाने हा विषय आपण समजावून घ्यावा.अनुवाद ५:२९ आपल्याला योग्य हृदया बद्दल सांगते,”त्यांचे व त्यांच्या संतानाचे हित सर्वकाळ व्हावे म्हणून त्यांनी सर्वदा माझे भय धरावे व माझ्या सर्व आज्ञा पाळाव्या असे हृदय त्यांच्या ठायी असेल तर किती बरे! या वचनाचा बारकाईने विचार केल्यास आपल्या लक्ष्यात येते की हे वचन ज्ञान आणि हृदय यांचा सबंध सांगत आहे. कारण ज्ञानाची व्याख्या अशी आहे की, “पहा प्रभूचे भय हेच ज्ञान आहे, आणि वाईटापासून दूर जाणे हीच बुध्दी आहे. ईयोब २८:२८.याचा अर्थ सर्वकाळच्या कल्याणासाठी आपण ज्ञान मार्गाने चालणे आवश्यक आहे पण तसे चालण्यास एका योग्य हृदयाची गरज आहे. 

हृदय एक युध्द भूमी: आपल्या आत्मिक जीवनाची युद्धभूमी आपले हृदय आहे. हे हृदय पापाच्या प्रभावामुळे, दुष्ट आत्म्यांमुळे, सैतानामुळे नेहमीच धोक्यात असते. सैतान आपले मन नियंत्रित करून आपल्या देहाचा ताबा घेतो त्यामुळे, हे हृदय दुष्ट असू शकते, सर्वप्रकारच्या विकारांनी युक्त असू शकते, अशुध्द असू शकते, कठीण, कठोर,किंवा जड असू शकते, खिन्न व अस्वस्थ असू शकते. सैतानाला असेच हृदय हवं असल्यामुळे तो सर्व शक्तीनिशी मानवाचे हृदय, मन, अंतःकरण, अंतर्याम, चित्त यांना त्याच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो. ह्या गोष्टी तो विश्वासणाऱ्यांच्या बाबतीतही करतो व अविश्वासणाऱ्यांच्या बाबतीतही करतो.

सैतान अविश्वासणाऱ्यांना तारणा पासून वंचित ठेवण्यासाठी तत्पर असतो  : जेव्हा कोणी राज्याची गोष्ट ऐकतो पण ती त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येतो व त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो.मत्तय १३:१९. आणि जे वाटेवरचे ते ऐकणारे आहेत, पण त्यानंतर  सैतान येतो व त्यांनी विश्वास धरून तारण पावू नये त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो,  लूक ८:१२. 

सैतान अविश्वासणाऱ्यांचे मने सैतान आंधळे करितो: संत पौल करिंथकरांच्या मंडळीला शुभवर्तमानाच्या खरेपणाबद्दल व सरळपणाबद्दल मार्गदर्शन करताना लिहितो की,”आमचे शुभवर्तमान झाकलेले आहे तर ते नाश पावणाऱ्यांच्या ठायी मात्र झाकलेले आहे. त्यांच्यामध्ये  या जगाच्या देवाने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने आंधळी केली आहेत, यासाठी की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवाच्या शुभवर्तमानाचा उजेड त्यांच्यावर प्रकाशू नये, २करिंथ ४:४. 

सैतान विश्वासणाऱ्यांना वाकड्या मार्गात घेऊन जातो व त्यांचे मन अशुध्द करून बिघडून टाकतो:  आपण पवित्र जीवन जगावे अशी देवाची इच्छा आहे. देवाच्या या इच्छेला संत पौल सुध्दा करिंथकरांच्या मंडळीमध्ये  पूर्ण होताना पाहू इच्छित होता परंतु तो म्हणतो, ” जसे सापाने आपल्या धूर्तपणाने हव्वेला ठकवले, त्याप्रमाणे कशाने तरी तुमची मने ख्रिस्ताकडील सरळपण व शुद्धपण यांपासून दूर होऊन बिघडवली जातील, असे मला भय आहे,”२ करिंथ ११:३. आदम व हव्वा सरळमार्गी व पवित्र जीवन जगत होते. सैतानाने येऊन त्यांचे हृदय बिगडवले, त्यामुळे त्यांना वाटले की देव त्यांना फसवत आहे. त्यामुळे देवाने दिलेल्या अतिशय सुंदर जीवनाला ते मुकले व कष्ट दुःख व मरण असे जीवन त्यांना प्राप्त झाले. ऊत्पती ३. 

सैतान विश्वासणाऱ्यांना [सेवकाला ]अहंकारात पाडू पहातो : संत पौल तीमथ्याला मार्गदर्शन करताना म्हणतो,” पाळक गर्वाने फुगून सैतानाच्या दंडात पडू नये म्हणून नवशिका नसावा. आणि त्याची निंदा होवू नये व तो सैतानाच्या फासात पडू नये म्हणून बाहेरच्या लोकांकडून त्याच्याविषयी चांगली साक्ष असावी.१ तीमथी ३:६-७. अहंकार सैतानापासून आहे. सिलास व पौल यांना लोक देवासमान लेखू लागले व तेथील याजक त्यांना यज्ञार्पण करू लागला हि त्यांना मोहात पाडून अहंकाराकडे घेऊन जाणारी गोष्ट होती. परंतु देवाचे हे सेवक सैतानाच्या या पाशाला बळी पडले नाहीत. 

सैतान विश्वासणाऱ्यांना भुलवितो किंवा पापास प्रवृत्त करतो: सैतान विश्वासणाऱ्यांना भुलवून पापात पाडू शकतो, देव कोणालाही मोह घालीत नाही किंवा वाईट गोष्टींचा उपयोग करून कोणाची परीक्षा पहात नाही. १ थेस्सल ३:५. चोरी करणे, व्यभिचार करणे, भ्रष्टचार या सारखे मोह देव कोणालाहि घालत नाही. व्यक्ती प्रलोभनाकडे आकर्षित होतो व पापात पडतो व पाप वाढत जाऊन मृत्यूला कारण होते.याकोब १:१३-१५, 

सैतान विश्वासणाऱ्याने क्षमा करू नये म्हणून त्याला चेतवतो : सैतान फार चतुर आहे त्याला माहित आहे की मंडळी जर प्रीतीत राहिली तर ख्रिस्ताची साक्ष जगाला पटेल.  म्हणून तो भावाबहिणींना एकमेकांच्या विरोधात चेतवतो; यासाठीकी त्यांनी एकमेकांना क्षमा करू नये. त्याचा परिणाम मंडळीत प्रार्थना व आत्मिक जीवनात होतो. २करिंथ २:९-११.

सैतान विश्वासणाऱ्या पती पत्नीला लैगिंक पापात पाडतो: आत्मिक जीवनात विवाहबाह्य लैगिंक संबंधांना थारा नाही. प्रत्येक स्त्री व पुरुष विवाहाच्या चौकटीतच राहून लैगिंक इच्छांची पूर्ती करू शकतात अन्यथा नाही. म्हणून पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगते की, प्रत्येकाला स्वतःचा नवरा व बायको हवी. नवऱ्याचा स्वतःच्या शरीरावर हक्क नाही तर बायकोला आहे. व बायकोलाही स्वतःच्या  शरीरावर हक्क नाही तर तिच्या नवऱ्याला आहे. याचा अर्थ ते एकमेकांना विश्वासू राहून एकमेकांच्या लैगिंक इच्छा पूर्ण करण्यास बांधील असतात.पवित्र शास्त्र सांगते या हक्कापासून त्यांनी एकमेकांना वंचीत करू नये, परंतु उपवास व प्रार्थना यासाठी संमतीने काही काळ वेगळे असावे. व पुन्हा एकत्र असावे. १करिंथ ७:१-७. परंतु सैतान पती पत्नींच्या मनात एकमेकांच्या प्रति द्वेष, अविश्वास निर्माण करून त्याना एकमेकांवर जळफळाटाने रागे भरण्यास व लैगिंक अनीतीच्या पापात, व असंयमामुळे परीक्षेत पडतो. 

सैतान मंडळीत गोंधळ व कलह माजवतो : मंडळीत गोंधळ व कलह मोजावा म्हणून सैतान खोटे विश्वासणारे मंडळीत गुपचूप घुसवतो. ते जगातील गोष्टी मंडळीत आणतात, व वेगवेगळ्या कारणावरून मंडळीत फूट पाडणे, धुसफूस सुरु करणे, अशा गोष्टी करत राहतात मत्तय १३:३६-४२. 

अशा प्रकारे सैतान आपल्या हृदयात कार्य करून आपल्याला पापात पाडू शकतो, देवापासून दूर नेऊन आपला नाश करणे हा त्याचा हेतू असतो. म्हणून देवाचे वचन सांगते, “ज्या  कशाचे तू रक्षण  करतोस त्या सर्वांपेक्षा अधिक कसोशीने तू आपल्या हृदयाचे रक्षण कर कारण त्यातून जीवनाचे झरे निघत असतात.” नीती ४:२३. 

आता पाहू की कशाप्रकारे आपण आपल्या हृदयाचे म्हणजे आपले, मन, अंतर्याम, अंतःकरण, किंवा चित्ताचे रक्षण करावयास हवे जेणेकरून आपले जीवन आशीर्वादित असेल व इतरांनाही आपल्या जीवनाकडून आशीर्वाद मिळतील. 

१ ] कुटिलतेपासून आपले हृदय दूर ठेवा: आपल्या हृदयाचे रक्षण करण्यासाठी आपण इतरांची निंदा व द्वेष या पासून स्वतःला आवरले पाहिजे. नीती ४:२४ पण यासाठी आपले हृदय देवाच्या वचनाने म्हणजे ज्ञानाने भरलेले असले पाहिजे. “मी तुझ्याविरुध्द पाप करू नये म्हणून मी आपल्या हृदयात तुझे वचन जतन करून ठेवले आहे”.असे स्तोत्र ११९:११ सांगते. तुम्ही आपले हृदय देवाच्या वचनांनी भरलेले असेल तर किती चांगले होईल, कारण हृदयात देवाचे वचन असेल तर बाहेर आशीर्वादाचे शब्द येतील कारण अंतःकरणात जे भरलेले आहे तेच बाहेर येईल.चांगला माणूस आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगले काढतो, आणि वाईट माणूस वाईटातून वाईट काढतो; कारण अंतःकरणात जे भरलेले आहे त्यातून त्याचे तोंड बोलते. लूक ७:४५. 

अ ] वाईट लोकांपासून दूर रहा : कुटील वृत्ती वाईट लोकांच्या संगतीमुळे येते किंवा वाढते. पवित्र शास्त्र सांगते की, “कुसंगतीने नीती बिघडते”. १ करिंथ १५:३३. म्हणून स्तोत्र १ सांगते की, ” धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही. पापी जनांच्या बैठकीत बसत नाही, तर देवाच्या नियमशास्त्रात आनंद मानतो, तो यशस्वी होईल त्याची सर्व कार्य सिध्दीस जातील. 

२ ]आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा: आपल्या हृदयाचे रक्षण जर आपल्याला करावयाचे आहे तर आपण आपल्या महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.नीती ४:२५. त्यासाठी आपले चित्त आपल्या स्वाधीन असले पाहिजे. ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही तो  गावकूस नसलेल्या पडक्या गावासारखा आहे. नीती २५:२८ आपल्याला विचलित करणाऱ्या खूप गोष्टी आहेत, वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभने सैतान आपल्या पुढे ठेवतो हे आपण लक्ष्यात घेतले पाहिजे. संगीत, चित्रपट,टीव्ही, पुस्तके, पैसा, गर्व व सर्व प्रकारची माध्यमे,या द्वारे सैतान नेहमीच आपल्याला उत्तेजना देत असतो हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने लक्ष्यात घ्यावे. यामुळे आपल्या ध्येयापासून विचलित होतो. जे आपल्याला करावयाचे आहे ते राहून जाते व आपण दुसरेच करीत बसतो. 

अ ] तुमच्या प्राधान्य गोष्टीना आद्यक्रम द्या: आपल्या जीवनात कोणत्या गोष्टी प्राधान्य आहेत ते आपण लक्ष्यात घेतले पाहिजे. एका ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात प्राधान्यक्रम कसा असावा याचा विचार केल्यास आपल्या लक्ष्यात येते की, सर्वप्रथम देव, कुटुंब, व अर्थार्जनासाठीचे माध्यम अशा प्रकारे आपला प्राधान्यक्रम असावा. परंतु आपण पहातो की बऱ्याचदा आपण नको त्या गोष्टींना प्राधान्य देतो व त्यामुळे आपल्या हृदयावरती देव केंद्रस्थानी रहात नाही व आपण इतर गोष्टींच्या मागे लागतो, आणि मग त्यात सर्वच वाया जाते. 

ब ] धोक्याच्या स्थितीत लक्ष सांभाळा: ज्ञानी मनुष्य देवावर पूर्ण विश्वास ठेवतो. मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावितो मला सहाय्य कोठून येते ? यहोवा जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माणकर्ता याज पासून माझे सहाय्य येते. स्तोत्र १२१:१. अशाप्रकारे आम्ही देवावर भिस्त टाकणारे असले पाहिजे. दावीद राजा प्रमाणे आम्ही निडर व खंबीर असले पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत आपले लक्ष विचलित होता कामानये. आपला प्रभू येशू क्रुसावरील मरणाला सामोरा गेला पण देव इच्छेला समर्पित राहण्याचे त्याचे जे लक्ष होते ते त्याने पूर्ण केले. गेथशेमाने बागेत देवाकडे तो प्रार्थना करितो की शक्य असल्यास हा प्याला माझ्या पासून दूर कर तरी माझ्या इच्छेने नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.मत्तय २६:३९.  

३ ] आपले मार्ग व्यवस्थित करा: आपल्याला आपले हृदय योग्य राखण्यासाठी आपले मार्ग व्यवस्थीत ठेवणे आवश्यक आहे.  नीती ४: २६ सांगते,”तू आपल्या पायाची वाट सपाट कर आणि तुझे सर्व मार्ग नीट व्यवस्थित असोत”. एक ज्ञानी व्यक्ती वाईट आणि चांगले यातील फरक जाणतो व आपले मार्ग व्यवस्थित करतो. देहाचे मनोविकार व वासना आमच्या जीवनात डोंगरांप्रमाणे व दऱ्याखोऱ्यांप्रमाणे आहेत. या मुळे जीवनाचा प्रवास दुःखद व कष्टसाध्य होतो. म्हणून संत पौल गलतीकरांच्या मंडळीला मार्गदर्शन करताना सांगतो की, जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहाला, त्याच्या मनोविकार आणि वासना यांसुद्धा वधस्तंभी दिले आहे”. गलती ५:२४. 

अ ] देवाला अनुसरा: जगात अनेक गोष्टी अनुसरण्यासाठी आहेत, जसे नामवंत व्यक्ती, वेगवेगळ्या चळवळी किंवा विचारधारा, तत्वज्ञान, धर्म, पंथ, अगदी जगण्याची भ्रांत असणाऱ्या व्यक्ती सुध्दा यापैकी कश्याला का होत नाही पण अनुसरत असतात. परंतु यांना अनुसरणाऱ्या कोणालाच जीवनाची किंवा ज्ञानाची वाट सापडत नाही उलट अनेकदा यामुळे आपल्या जीवनात अडचणींच्या डोंगरदऱ्या उभ्या राहतात. यासर्वांना डावलून देवाला अनुसरणे म्हणजे आपला मार्ग व्यवस्थित करणे होय. परंतु त्यासाठी कठोर मनोनिग्रह करायला हवा, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो जो कोणी मला अनुसरू इच्छितो त्याने स्वतःला नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावे. मत्तय १६:२४. 

ब ]रोज स्वतःला सुवार्ता सांगा : सुवार्ता हाच आपल्या विश्वासाचा पाया आहे. सुवार्ता आम्हाला सांगते की आपले तारण होण्यासाठी देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला आपल्यासाठी दिले. योहान ३:१६. आपला उध्दार येशू ख्रिस्ताच्या स्वयज्ञार्पणातून झाला आहे. सुवार्ता अतिशय अनमोल आहे. सैतान सुवार्तेचा शत्रू आहे तो सुवार्तेला सहजासहजी कोणापर्यंत पोहचवू देत नाही. सुवार्तेसाठी आजपर्यंत हजारो लाखों रक्तसाक्षी झाले आहेत. तिचे मोल जर आपल्याला कळाले तर नक्कीच आपण आपला मार्ग व्यवस्थित करू व देवाला अनुसरू. असे केल्याने सैतानाला आपल्या जीवनात वाव मिळणार नाही. आपल्या हृदयाचे रक्षण होईल व देवाच्या द्वारे मिळणारे ज्ञान आपल्या जीवनात रोज वृद्धिंगत होईल. 

क ]येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा: ख्रिस्तावरील विश्वास आपल्या हृदयाचे संरक्षण करील. आपल्याला विचलित होण्यापासून वाचवेल व त्यामुळे आपण आपला मार्ग अडचणीत येणार नाही. अब्राहाम विश्वासाने देवाला अनुसरला त्याने अभिवचनावर विश्वास ठेवला व त्याला माहित नसलेल्या देशात तो उपरीम्हणून राहिला. त्याने राहुट्यांमधून वस्ती केली. हे विश्वासाचे जीवन तो का जगला ? देवाचे वचन सांगते की, “कारण तो देवाने योजिलेल्या व भक्कम पायावर बांधलेल्या नगराची तो वाट पहात होता.” इब्री ११:१०. आपणही त्याने देऊ केलेल्या सर्वांग सुंदर अशा आत्मिक पूर्णतेची व सार्वकालिक जीवनाची आशा धारावी.  विश्वास म्हणजे आशा धरलेल्या गोष्टींविषयीची भरवसा, आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयीची खात्री आहे. इब्री ११:१.

४ ]तडजोड करू नका : नीती ४:२७ सांगते की,”उजवीडावीकडे वळू नका आपला पाय वाईटापासून दूर राखा.” जीवनात जर आशीर्वादित जीवन हवे असेल तर देवासंगतीचे जीवन जगणे आवश्यक आहे. त्यामुळे तडजोडीचे जीवन आपण टाळले पाहिजे. वाईटाला आपल्या जीवनात थोडीसुद्धा जागा देऊ नये कारण. दुष्ट योजणाऱ्या हृदयाचा देवाला वीट येतो. नीती ६:१८. उत्पत्ती ६:५ सांगते मानवाच्या मनात येणाऱ्या सर्व कल्पना एकसारख्या वाईट असतात असे जेव्हा देवाने पाहिले तेव्हा त्याने त्याचे आयुष्यमान कमी करून टाकले. 

आपले जीवन अनमोल आहे कारण आपल्याला ख्रिस्तामध्ये मोठी आशा आहे. देव ख्रिस्तामध्ये आम्हास आपल्या विजयात नेतो आणि आम्हाकडून आपल्या विषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रगट करतो. २ करिंथ २:१४. आपल हृदय मात्र फक्त त्याच्या साठी असणे आवश्यक आहे. 

प्रार्थना: हे प्रभू येशू तू ज्ञानाचा खरा श्रोत आहेस, माझं हृदय फक्त तुझ्यासाठी आहे माझ्यावर दया कर व तुझ्या पासून असलेल्या खऱ्या ज्ञानाने मला भर. येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole