ख्रिस्ती जीवनाची महानता !
वचन: त्याने आपल्या संतोषाची जी हि योजना पूर्वी स्वतःमध्ये योजली होती तिच्या प्रमाणे त्याने आपल्या इच्छेचे गुज आम्हांस लकळवले; ती योजना हि की, आपण काळांच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना सर्व काही, म्हणजे जे आकाशांमध्ये व जे पृथ्वीवर आहे ते सर्व, त्याच्यांत म्हणजे ख्रिस्तात एकत्र करावे. इफिस १:८-१०
प्रस्तावना: प्रियांनो, आपण ख्रिस्ती जीवनाची उंची, खोली व रुंदी म्हणजे याची लौकिकता समजून घ्यावी आपल्यासाठी खूपच महत्वाचे आहे. एक महान धर्म, जगात सर्वात जास्त अनुयायी असलेला किंवा जगातील सर्वांत सामर्थ्यशाली राष्ट्रांचा धर्म, अशा अर्थाने आपण याकडे पाहू लागलो तर आपल्याला याचे गौरव कळणार नाही. किंवा जिवंत देव, पापांची क्षमा करणारा, शाप मुक्त करणारा, यश समृद्धी, दिर्घआयुष्य, निरोगी जीवन, शांती व आनंद देणारा यासारख्या अनेक गोष्टी; आपल्याला ख्रिस्ती जीवनाची महानता पटवून देऊ शकणार नाहीत.
तर मग आपल्या समोर प्रश्न उभा राहतो की काय केल्याने आपल्याला ख्रिस्ती जीवनाची लौकिकता, गौरव व महानपण कळेल? या प्रश्नाचे उत्तर आहे आपण प्रत्येकानें “मी स्वतः”ख्रिस्तामध्ये कोण आहे हे ओळखून घेतल्याने आपल्याला ख्रिस्ती जीवनाची लौकिकता, गौरव, व महानता कळेल. वरील वचन याच गोष्टीवर प्रकाश टाकत आहे. चला तर मग आपण वरील वाचनातील रहस्य समजून घेऊ.
देवाची संतोषाची योजना: आपण सर्वच वेगवेळ्या प्रकारच्या योजना करीत असतो. आपण केलेली योजना पूर्णतेस गेल्याने आपल्याला संतोष होतो. तशी देवाने एक योजना केली आहे जी त्याला संतोष देणारी आहे. हि अतिशय महान योजना आहे; कारण या योजनेचे परिणाम सर्वकाळावर म्हणजे सनातन जीवनावर होणार आहेत, यात देव स्वतः, सर्व आत्मिक जीव, [ आत्मिक सृष्टी ] व भौतिक सृष्टी म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड प्रभावित होणार आहे.
हि योजना त्याने स्वतःमध्ये योजली होती.आपणही अतिशय महत्वाची योजना जेंव्हा योजतो तेंव्हा तिचे गांभीर्य लक्षात घेऊन; तिला शक्य तितकें गुप्त ठेवतो. आपण अशा प्रकारची योजना कोणालाही सांगत नाही ज्याला सांगणे आवश्यक आहे त्यालाच, तिच्या बद्दल सांगतो. वचन सांगते त्याने आपल्या इच्छेचे गुज आम्हांस कळवले. यावरून आपण समजून घ्यावे की प्रभूच्या नजरेत आपण कोण आहोत किंवा मी म्हणेन, आपण प्रत्येकानें हे समजून घ्यावे की मी प्रभूच्या नजरेत कोण आहे व त्याला माझ्याकडून काय अपेक्षा आहेत.
मी प्रभूच्या नजरेत कोण आहे: प्रियजनहो, आपल्याला कदाचित प्रश्न पडला असेल की ‘मी प्रभूच्या नजरेत कोण आहे’? व जर आपण त्याचे उत्तर शोधू लागलात तर आपले उत्तर कदाचित असे असेल की, मला माहित नाही ! परंतु मी आशा करतो असे अगदी थोडेच असतील. आपल्या पैकी बहुतेक वेगवेळ्या प्रकारे उत्तर देतील; काही म्हणतील देव माझ्याकडे त्याच्या मुलाप्रमाणे पाहतो,योहान १:१२ काही म्हणतील तो माझ्यावर प्रीती करितो यिर्मया ३१:३ काही म्हणतील मी त्याच्या नजरेत पापी नाही कारण त्याच्या रक्ताने त्याने मला धुतले आहे १ योहान १:९ अशा अनेक गोष्टी आपण सांगू शकता. एकदा माझ्या एका आत्मिक बहिणीने मला सांगितले की प्रभू सर्वांना त्याच्या हातातील ताटातून देतो तिला मात्र त्याच्या हृदयातून देतो; हा तिचा दावा होता कारण तिने तसा दृष्टांत किंवा स्वप्न पाहिले होते.
येथे मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो; की खूप कमी लोक असे आहेत की ते हा दावा करतात,’देव माझ्याकडे मी पवित्र असल्यासारखे पाहतो’. कारण देवाच्या नजरेतून स्वतःला पवित्र म्हणून घेणे हे खूप जाबदारीचे बोलणे आहे. कारण या विश्वात देवच फक्त पवित्र आहे! म्हणून एक माणूस जेंव्हा स्वतःला पवित्र म्हणतो तेंव्हा त्याच्या विचारा, आचरा बाबद, उठण्या बसण्या बाबद, सर्वच इतिहास भूगोला बाबद प्रश्नचिंन्ह निर्माण होते , व अतिशय जबाबदारीने वागण्याचे आव्हान त्याच्या पुढे उभे राहते. कारण पवित्र म्हणजे, ‘त्याचे प्रतिरूप, त्याच्या सारखे परिपूर्ण, आत्म्याच्या फळांनी भरलेला.’
त्यामुळे अनेकांच्या डोक्यात हे उत्तर असते पण मनांत अनेक शंकारुपी प्रश्न उपस्थित झाल्याने त्यांना भीती वाटते व उत्तर पोटातल्या पोटात दाबून ठेवतात, वर येऊच देत नाहीत. एखाद्याच्या गळ्यातून पार तोंडात हे उत्तर येते पण ते तो पुन्हा गिळून घेतो व इतरांन प्रमाणेच गुळगुळीत; गोलगोल उत्तर देतो. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की जो पर्यंत तुम्ही स्वतःकडे मी देवाच्या नजरेत पवित्र आहे असे पाहू शकणार नाही तो पर्यंत तुम्ही प्रकाशित, सामर्थ्यांने युक्त व अधिकाराने युक्त असे प्रभावी जीवन जागून या जगाला त्याची साक्ष पटवू शकणार नाही.
इब्री १०:९-१८ सांगते,” मग त्याने [येशूने ] म्हटले, हे देवा, पाहा , मी तुझी इच्छा पूर्ण करायला आलो आहे. दुसरे स्थापावे म्हणून तो पहिले काढून टाकतो, त्या इच्छेने येशू ख्रिस्ताच्या देहाच्या एकदाच झालेल्या अर्पणाच्या द्वारे, आपण पवित्र केलेले आहो, आणि प्रत्येक याजक तर प्रतिदिवशी सेवा करीत, आणि पापे दूर करायला जे यज्ञ कधीही समर्थ नाहीत, तेच तेच वारंवार अर्पण करीत उभा असतो, परंतु हा पापांसाठी एकच यज्ञ अर्पून सर्व काळ देवाच्या उजवीकडे बसला आहे, आणि तेंव्हा पासून पुढे तो आपले वैरी आपलें पादासन होईपर्यंत वाट पहात आहे , कारण जे पवित्र केले जात आहेत त्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळ पूर्ण केले आहे. पवित्र आत्माही आपल्याला साक्ष देतो, प्रभू म्हणतो, त्या दिवसानंतर जो करार मी त्यांच्याशी करीन तो हाच; मी आपले नियम त्यांच्या हृदयांना मध्ये ठेवीन, आणि त्यांच्या मनावर मी ते लिहीन. मग असे म्हटल्या नंतर तो म्हणतो, आणि मी त्यांची पापे आणि त्यांचे अधर्म आणखी आठवणारच नाही. आतां जेथे त्यांची क्षमा झाली तेथे पापांसाठी आणखी अर्पण नको.
संत पौल हा देवाचा सेवक होता त्याला हे रहश्य कळाले होते, म्हणून तो रोमकरांच्या मंडळीला लिहितो,”सध्या मी पवित्रांची सेवा करीत असता यरुशलेमेस जातो; कारण यरुशलेमेतील पवित्र लोकांतल्या गरिबांसाठी काहीं वर्गणी गोळा करावी, असे मासेदोनिया, व अखया यांतील लोकांना बरे वाटले,” रोम १५:२५-२६. येथे संत पौल ‘पवित्रांची सेवा’ व पवित्र लोकांतल्या गरिबांसाठी’ असे शब्द का वापरत आहे याचा विचार करा, म्हणजे तुम्ही कोण आहांत व देव तुमच्याकडे कसे बघतो याचे उत्तर तुम्हाला कळेल. बायबल आपल्या प्रत्येकाबद्दल सांगते,”तुम्ही निवडलेला वंश, राजकीय याजकवर्ग, पवित्र राष्ट्र, मोलाने मिळविलेले लोक आहा, यासाठीकी ज्याने तुम्हांस अंधारातून आपल्या अद्युत प्रकाशात बोलावले आहे, त्याचे सद्गुण तुम्ही प्रसिध्द करावे. १ पेत्र २:९-१०. ज्याला कान आहेत तो एको लूक ८:८, मार्क ४:२३.
देवाची महान गुप्त योजना: देवाने त्याची गुप्त योजना आपल्याला का सांगितली ? आपले कान ती योजना का ऐकू शकले ? त्याचे महत्व काय आहे ? व आपले कर्तव्य काय आहे ? यावर आपण चिंतन करणे गरजेचे आहे. येथे आपण फार खोलवर विचार करणार नाही परंतु काही गोष्टी समजून घेऊ ज्या आपल्याला विचार करायला सहाय्यभूत ठरतील. देवानी हि योजना आपल्याला कळवली याचे कारण आपण त्याचा निवडलेला वंश आहोत त्याची पवित्र प्रजा आहोत. १पेत्र १:९. त्याच्या या संतोषकारक योजनेत आपण खूप महत्वाचे आहोत कारण हि आपल्या तारणाची योजना आहे. देवाचे वचन सांगते,”क्षणात, निमिषांत, शेवटल्या करण्याच्या वेळेस; कारण कर्णा वाजेल आणि मेलेले ते अविनाशी असे उठवल्या जातील, आणि आपण पालटले जाऊ. कारण नाशवंताने अविनाशीपण नेसावे, आणि हे मरणारे यांने अविनाशीपण नेसावे हे आवश्यक आहे. आणि हे नाशवंत अविनाशीपण नसेल, आणि हे मरणारे आमरणपण नसेल तेंव्हा हे लिहिलेले वचन घडून येईल की, मरण विजयात गिळून टाकले गेले आहे. [यशया २५:८] अरे मरणा तुझा जय कोठे ? अरे मरणा तुझी नांगी कोठे? [होशय १३:१४] मरणाची नांगी पाप आणि पापाचे सामर्थ्य नियमशास्त्र आहे, [रोम ३:२०, ४:१५, ७:८,११] परंतु देव जो आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडून आपल्याला जय देतो’ त्याची उपकारस्तुती असो.” १ करिंथ १५:५२-५७
मग मी नवे आकाश आणि नवी पृथ्वी पाहिली, कारण पहिले आकाश व पहिली पृथ्वी हीं सरून गेली होती, आणि समुद्र आणखी राहिला नाही, तेव्हा मी पवित्र नगर नवे यरुशलेम, देवापासून आकाशातून उतरत असलेले पाहिले, ते आपल्या नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीसारखे सजवलेले होते. नंतर मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली; ती म्हणाली, पाहा, देवाचा मंडप माणसांजवळ आहे, तो त्यांच्या जवळ वस्ती करील, आणि ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्या संगती राहील. आणि तो त्यांच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसून टाकील, आणि यापुढे आणखी मरण होणार नाही, आणि शोक, व रडणे, व कष्ट हि या पुढे आणखी होणारच नाहीत,कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत. प्रक २१;१-५
काळाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना देव सर्व गोष्टी प्रभू येशूच्या ख्रिस्ताच्या ठायी एकत्रीत करीत आहे. सर्वकाही त्याच्यापासून, आणि त्याच्याकडून, आणि त्याच्यासाठी सर्वकाही आहे त्याला सदासर्वकाळ गौरव असो, आमेन. रोम ११:३६. तो देवाच्या रूपात असून देवासमान असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. पण त्याने आपणाला रिते केले म्हणजे तो दासाचे रूप घेऊन माणसांच्या प्रतिमेचा झाला. आणि माणसाच्या आकाराचे प्रकट होऊन त्याने मरण, वधस्तंभावरचे देखील मरण, सोसावे येथपर्यंत आज्ञांकित होऊन आपणाला नम्र केले . त्यामुळे देवाने त्याला फारच उंच केले, आणि प्रत्येक नावा पेक्षा श्रेष्ट ते नाव त्याला दिले. यासाठीकी आकाशात व पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काही आहे त्यातील प्रत्येक गुढघा येशूच्या नावाने टेकवा, आणि देव बाप त्याच्या गौरवासाठी, प्रत्येक जिभेने, येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. फिली २:५-११. हे प्रभू येशूचे गौरव आहे व ते सनातन असणार आहे, त्या सनातनत्वाचे आपण भागी असणार आहो. प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपण उद्धरलेल्यांच्या गौरवाचे वर्णन वाचतो, पृथ्वीवरील सर्व उध्दारिलेले त्याच्या स्तुती स्तवनाच्या सेवेत आनंदाचे सनातन जीवन अनुभवणार आहेत. प्रक ७: ९-१७.
म्हणून माझ्या प्रिय भावांनो व [बहिणींनो ] तुम्ही स्थिर व अढळ व प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा, कारण तुम्ही जाणता की प्रभू मध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत. १ करिंथ १५:५८. देव आपणास आशीर्वाद देवो.
रेव्ह कैलास [आलिशा ] साठे