वचन: तेव्हा देवाने अब्राहामाला म्हटले, मुलामुळे व तुझ्या दासीमुळे हे तुझ्या दृष्टीने वाईट असू नये. सारा जे काही तुला सांगते ते तिचे सर्व म्हणणे तू ऐक, कारण इसहाकांतच तुझे संतान म्हटले जाईल. उत्पत्ती २१:१२
घाई नको, प्रार्थना करा. |
प्रियानो
, आपण देवाने निवडलेले लोक आहोत. तरी आपल्या जीवनात त्रासाचे दिवस कमी नसतात, हि एक कोड्यात टाकणारी गोष्ट आहे. आज आपण आपला आत्मिक पिता अब्राहाम याच्या जीवनातून या विषयीचे रहस्य समजून घेऊ. अति घाई संकटात नेई : अब्राहाम वयाच्या पंच्याहत्तर वर्ष्यांपासून देवाला अनुसरत होता
उत्पत्ती १२:४. देवाने त्याला अभिवचन दिले होते की,” कनान देश
मी तुझ्या संतानास देईन“.उत्पत्ती १२:७. देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवून गेले ८–९ वर्ष तो कनान देशात उपरीपणाचे जीवन जगत होता. या काळात देवाने अब्राहामाला वेळोवेळी दर्शन दिले, त्याचे रक्षण केले, त्याला धीर दिला, व त्याला धन संपत्ती देऊन; तो त्याच्या संगती असल्याची खात्री दिली.
तरी तो समाधानी नसल्याचे चित्र आपल्याला पहावयाला मिळते. देव त्याला दर्शन देऊन म्हणतो की,”अब्राहामा भिऊ नको, मी तुझी ढाल व अत्यंत मोठे प्रतिफळ आहे. तेव्हा अब्राहाम देवाला म्हणाला तू मला काय देणार मी तर संतांना शिवाय जातो. व माझे जे काही आहे ते दुसऱ्याचे होईल, यावर देवाने पुन्हा त्याला खात्री दिली की,”तुझ्या पोटी जो येईल तोच तुझा वारस होईल“. उत्पत्ती १५:१–४. याचा अर्थ अतिशय स्पष्ट होता की देव अब्राहामाला व
साराला पुत्र देऊन आशीर्वादित करणार होता. परंतु अब्राहाम व साराला यांना इतकी घाई झाली होती की त्यांनी वर्षभर सुध्दा वाट बघितली नाही. साराने आग्रहपूर्वक आपली दासी हागार ही पत्नी म्हणून दिली व इश्माएल च्या जन्माने दोघांच्याही जीवनात दुःख आणले.
देवाचे वचन सांगते की ,”प्रत्येक गोष्टीचा एक समय आहे“. उपदेशेक ३:१. परंतु अब्राहाम व सारा यांनी केलेली घाई
“अति घाई संकटात नेई असे झाले.”
परिस्थितीला जगिक दृष्टीकोणातून सामोरे जाणे
: अब्राहाम व सारा यांच्याकडून चूक झाली कारण त्यांनी विश्वास व बुध्दी यांची सांगड घातली नाही.देवाच्या संगती चालत असताना वेळोवेळी त्याचे सहाय्य, मार्गदर्शन, व सामर्थ्य ते अनुभवत होते तरी त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेऊन वागायला त्यांना जमत नव्हते. देवाने अब्राहामाला सांगितले होते की, “तो त्याच्या बरोबर असेल जो त्याचे अभिष्ट चिंतीत त्याचे तो अभिष्ट करीन व जो कोणी त्याचे अनिष्ट चिंतीत त्याचे तो अनिष्ट करीन“. उत्पत्ती १२ ३. म्हणजे
देव त्याला खात्री देत होता की तू भिऊ नको, परंतु अब्राहाम बुद्धीच्या पातळीवर या अभिवचनाला समजू शकला नाही त्यामुळे त्याने मिसरात साराची ओळख बहिण अशी करून दिली कारण त्याला वाटले की जर तो साराची ओळख त्याची बायको अशी करून देतो तर तेथील लोक त्याला मारून टाकतील व तिला घेऊन जातील म्हणून आपला जीव वाचवण्यासाठी तो खोटे बोलला. आणि खरोखर त्याच्या तशा सांगण्यामुळे मिसराचा राजा फारो याने साराला त्याची बायको करून घेण्यासाठी नेले. यावर देवाने त्याच्या अभिवचनाप्रमाणे साराचे रक्षण केले व फारोला चांगलाच धडा शिकवून साराला सुखरूप अब्राहामा कडे पाठवण्यास भाग पडले उत्पत्ती १२:१४:२०. तरीही अब्राहामाच्या विश्वासात व बुद्धीत मेळ बसला नाही त्याने पुन्हा गरारात तीच चूक केली. तेथे गेल्यावर पुन्हा भीतीपोटी साराची आपली बहीण आहे अशी ओळख करून दिली व त्यामुळे गराराचा राजा अबीमलेख याने साराला बायको करून घेण्यासाठी नेले. व देवाला पुन्हा साराचे रक्षण करावे लागले. उत्पत्ती २०:१–१८. याचा अर्थ अब्राहामाने भोवतालची परिस्थिती पाहिली व भ्याला त्याने विश्वासाने विचार केला असता तर तो समजू शकला असता की, ‘जो देव फारोला धडा शिकवू शकतो, चार राज्यांच्या एकत्रित सैन्यावर जय देऊ शकतो तो देव अबीमलेखावरही जय देईन. परंतु या विश्वासाने तो परिस्थीकडे पाहू शकला नाही. कारण त्याची बुध्दी त्याला हेच सांगत होती की तू उपरी आहेस स्थानिक लोकांबरोबर शत्रुत्व घेऊ नकोस. हीच गोष्ट हागारेशी लग्न करण्यास कारणीभूत आहे. अब्राहाम व साराला नेहमी हेच वाटे की आता आपले वय होत चालले आहे. आपल्याला लवकर मुल व्हायला हवे नाहीतर आपण बेवारस मरू व आपली सर्व सम्पत्ती दुसऱ्याची होईल. म्हणून साराने त्यांच्या संस्कृतीनुसार नुसार विचार केला. त्यांच्या संस्कृतीत अशी मान्यता होती की दासीच्या द्वारे होणाऱ्या मुलांवर धनीणीचा अधिकार असतो. म्हणजे दासीला झालेली मुले ही धनीणीचे होतात. त्यामुळे साराने असा विचार केला की वयामुळे आपण तर आपल्या पतीला मुल देवू शकत नाही पण हागारेपासून जर अब्राहामाला मुल झाले तर ते आपलेच होईल. हा विचार तिने अब्राहामाला बोलून दाखवला व दोघांनीही देवाच्या अभिवचनाकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करीत त्यांच्या बुद्धीला जे पटले ते केले.परिणामतः साराच्या वाट्याला
द्वेष आला व अब्राहामाच्या वाट्याला पुत्र विवोगाचे दुःख आले.
कृपाळू देवाचे मार्गदर्शन स्वीकारा: अब्राहाम व सारा यांनी चूक केल्या मुले त्यांच्या कौटूंबिक जीवनात कलह निर्माण झाला. हागार दासी असताही साराचा द्वेष करू लागली व सारा तिचा छळ करूलागली. इश्माएल हा देहापासून झालेला मुलगा अब्राहाम, सारा, व इसहाक यांचा अनादर करणारा झाला. उत्पत्ती उत्पत्ती २१:८–९, गलती ४:२९–३०. त्यामुळे साराने हागार व इश्माएल यांना घराबाहेर काढण्याचा अब्राहामाकडे आग्रह धरला. ती म्हणाली,”या दासीला व हिच्या मुलाला बाहेर घालिव, कारण या दासीचा मुलगा माझ्या मुलगा इसहाक ह्याच्या बरोबर वारीस व्हायचा नाही. उत्पत्ती २१:१०. यामुळे अब्राहाम खूप नाराज झाला तो निराशे मध्ये असता कृपाळू देवाचे मार्गदर्शन त्याला प्राप्त झाले. देव त्याला म्हणाला,” मुलामुळे व तुझ्या दासीमुळे हे तुझ्या दृष्टीने वाईट असू नये; सारा जे काही तुला सांगते ते तिचे सर्व म्हणणे तू ऐक, कारण इसहाकातच तुझे संतान म्हटले जाईल. मी दासीच्या मुलाचेही मोठे राष्ट्र करीन कारण तो तुझे संतान आहे “. उत्पत्ती २१:१२–१३.
काहीही असो आपल्या मुलाला व पत्नीला जंगलात वाऱ्यावर सोडून देणे सोपे नव्हते. परंतु देवाच्या मार्गदर्शनावर व अभिवचनावर अब्राहामाने विश्वास ठेवला व त्याप्रमाणे केले. त्यामुळे सारा व त्याच्यातला कलह संपला व देवाने दिलेल्या अभियवचनानुसार हागार व इश्माएल यांचे संरक्षण केले व इश्माएलाचे मोठे राष्ट्र केले.
देवाच्या वचनाचा
प्रभाव
बुध्दीवर
पडू द्या
: अब्राहाम व सारा यांनी जगाच्या सांस्कृतिक धारणेला अनुसरून बुद्धी चालवली म्हणून त्यांना वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले. शेवटी देवाने परिस्थिती सांभाळून घेतली. परंतु अशी परिस्थितीच येऊ नये असे जर आपण वागलो तर किती उत्तम होईल.
देवाने आपल्याला बुद्धी यासाठीच दिली आहे की आपण योग्य विचार करून योग्य निर्णय घ्यावा. परंतु योग्य विचार करण्यासाठी आपण यौग्य मार्ग निवडला पाहिजे. तो योग्य मार्ग आहे देवाचे मार्गदर्शन जे पवित्र शास्त्रात आपल्यासाठी उपलब्ध आहे. २ तिमोथी ३: १६–१७ सांगते की,” संपूर्ण शास्त्रलेख देवाने प्रेरलेला आहे, आणि तो शिक्षण, निषेध, सुधारणूक, न्यायीपणाचे शिकवणे, या करिता उपयोगी आहे. यासाठी कि देवाचा माणूस पूर्ण व प्रत्येक चांगल्या कामास सज्ज व्हावा“.
आपला पिता यहोवा याने आपल्याला त्याचे वचन मार्ग दाखवण्यासाठी दिले आहे. दावीद राजा म्हणतो, “हे देवा तुझे वचन माझ्या पायास दीप व माझ्या मार्गावर प्रकाश असे आहे.” “मला माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा अधिक बुध्दी आहे; कारण तुझ्या साक्षी माझे ध्यान आहेत“. “वृद्धांपेक्षा मी अधिक समजतो, कारण मी तुझे निर्बंध पाळले आहेत“. स्तोत्र ११९: ९९, १००, १०५.
दावीद राजाप्रमाणे आपल्या बुद्धीवर देवाच्या वचनाचा प्रभाव पडूद्या म्हणजे आशीर्वादाच्या वाटेवरून चालताना त्रासाचे दिवस येणार नाहीत. त्याने जसा प्रत्येक लढाईत विजय मिळवला तसा तुम्हीही मिळवाल. परमेशवराच्या आशिर्वादात परिपूर्ण सुख आहे.
प्रार्थना: हे प्रभू येशू तूझ्या प्रत्येक शास्त्र लेखासाठी
मी तुझे आभार मानतो. माझ्या बुद्धीवर तुझ्या वचनाचा प्रभाव पडू दे व
मला माझे जीवन तुझ्या मार्गदर्शनाला समजून जगाता येऊ दे. येशूच्या नावे मागतो म्हणून ऐक, आमेन.
रेव्ह. कैलास [आलिशा ] साठे.