वचन: मग अब्राहामाने बैर–शेबा येथे एशेल झाड लाविले, आणि तेथे सनातन देव यहोवा याचे नाव घेऊन प्रार्थना केली. उत्पत्ती २१:३३.
देव खूप चांगला
आहे, त्याच्या लेकरांनीही त्याच्याशी तितकेच चांगले वागावे हि त्याची इच्छा आहे. इस्राएलाला आज्ञा देताना तो हि अपेक्षा बोलून दाखवतो. तो म्हणतो,” हे इस्राएला तू आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जिवाने व आपल्या सर्व शक्तीने यहोवा तुझा देव याच्यावर प्रीती कर,” अनुवाद ६:५. अब्राहाम खरोखर
देवावर पूर्ण अंतःकरणाने , पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती करणारा होता. त्यामुळे देव व अब्राहाम यांच्यात निर्माण झालेली विश्वासाची परिभाषा आम्हाला आशीर्वादाच्या वाटेवरून चालताना प्रकाश्यासारखी मार्गदर्शक झाली.
आत्मिक दूरदृष्टी ठेवा : आत्मिक जीवन समर्थपणे जगण्यासाठी आत्मिक दूरदृष्टी हवी. ज्या व्यक्तीला आत्मिक दूरदृष्टी असते तो जगिक मोहाला बळी पडत नाही किंवा कोणत्याच परिस्थितीत अडखळत नाही. देवाने अब्राहामाला आकाशातील ताऱ्यांप्रमाणे संतती देण्याचे अभिवचन दिले होते. हा संपूर्ण देश त्याला व त्याच्या संततीला वतन म्हणून देण्याचे अभिवचन दिले होते. अब्राहामाचा देवाने दिलेल्या अभिवचनांवर पूर्ण विश्वास होता. येथे या अभिवचनांची अल्पशी सुरुवात झाली होती. अब्राहाम मात्र या अल्पशा सुरवातिला देवाच्या अभिवचनांच्या द्वारे पूर्णपणे पाहत होता त्याच्या आत्म्यात तो तिची पूर्णता अनुभवत होता. त्याला आता स्वतःची विहीर होती. तेथे तो आपल्या घराची व आपल्या पशुधनाची तहान हक्काने भागवणार होता. तो हक्क व तो करार अधिक बळकट व्हावा व त्या वाळवंटात आपल्याला हक्काची सावली मिळावी म्हणून त्याने तेथे एशेल नावाचे झाड लावले. अभ्यासकांच्या मते हे झाड तीस फुटापर्यंत वाढते व अतिशय दाट सावली देते. हे झाड लावत असताना अब्राहामाचे अंतरंग या विचारांनी नक्कीच भरून गेले असतील की,” देव किती चांगला आहे. किती विश्वासू आहे.” व मनोमन तो देवाशी बोलत असेल,” हे देवा तूच हे केले आहे. तू या देशात मला आशीर्वादित केले आहेस, माझे नाव मोठे केले आहे, राजाने येऊन मला कृपा मागितली, माझ्याशी करार केला हे सर्व तुझे कार्य आहे. आता मला वचनदत्त पुत्र आहे, स्वतःची विहीर आहे, व आता हे झाड जे तुझ्या कृपे मुळे मी येथे लावू शकतो, हे खूप मोठे व उंच होईल, मी, माझ्या घरातील सर्व,माझे गुरेढोरे व शेरडं मेंढर या झाडाच्या सावलीला सुखावतील, इतकेच नाही तर माझा इसहाक व माझ्या येणाऱ्या पिढ्या येथे
विसावा घेतील, त्या माझी आठवण काढतील व तुला धन्यवाद देत; मनोभावे अनुसरतील तू सनातन देव आहेस जसा माझ्याबरोबर राहिलास तसाच माझ्या येणाऱ्या पिढ्यान बरोबर राहशील.
अब्राहामाच्या जीवनात हि आत्मिक दूरदृष्टी आपल्याला वेळोवेळी पहावयास मिळते. देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेऊन वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी त्याने आपले घरदार व आप्तगण सोडून तो देव दाखवील तसे मार्गक्रमण करीत गेला. कनानाच्या वैराण प्रदेशातून, नगरा नगरातून फिरत असताना त्याला अनेंक संकटाना सामोरे जावे लागले. चिंता काळज्या वाढवणारे अनेक प्रसंग त्याच्यावर आले. तरी देवाच्या पचारणाला सकारात्मक प्रतिसाद देत तो पुढेच गेला. अनेक अनुभवातून त्याला आत्मिक परिपक्कवता व दूरदृष्टी प्राप्त झाली होती. तो
राहुट्यातून राहिला परंतु आपल्या भावी पिढ्यांसाठी देवाने बांधलेली नगरे व त्यांची शासकीय राजधानी तो पहात होता. इब्री ११: ८–१०.
आपला विजय देवासह साजर करा: अब्राहामाच्या जीवनातील हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. गराराचा राजा अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल यांनी स्वतः येऊन अब्राहामाशी शपथेचा करार केला होता. त्यामुळे अब्राहाम या देशात हक्काने राहणार होता. अब्रामाच्या या आनंदाला व सुखाला आता अंत नाही. त्यामुळे त्याचे मन यहोवाच्या स्तुतीने भरून आले होते. म्हणून त्याने येथे उपकारस्तुतीच्या प्रार्थनेचे आयोजन केले.हा एक प्रार्थनेचा मोठा कार्यक्रम होता.
देवाच्या सेवकांमध्ये हि गोष्ट नेहमी दिसते
कि ते देवाला आपल्या विजयाचे श्रेय देतात. मी केले असे त्यांचे वागणे नसते. देवाने केले म्हणून शक्य झाले असेच त्यांचे वागणे असते. दावीद राजा देवाला आपला मेंढपाळ संबोधतो. आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीचे श्रेय तो देवाला देतो. तो म्हणतो,” हे माझ्या जिवा, यहोवाचा धन्यवाद कर; माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जिवा यहोवाचा धन्यवाद कर, आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व अन्यायांची क्षमा करितो; तो तुझे सर्व रोग बरे करितो; तो तुझा जीव नाशापासून खंडून घेतो. तो तुला प्रेमदयेचा व करुणेचा मुकुट घालतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो; म्हणून तुझे तरुणपण गरुडासारखे नवे होते“. स्तोत्र १०३: १–५.
प्रियांनो, आपण आपल्या आयुष्याची दोरी कणभरही वाढवू शकत नाही मग कशाला फुशारकी मिरवायची ! मानवाने फुशारकी मिरवणे व्यवहारिक नाही. उलट आपला विजय देवासह साजरकरून आपण आशीर्वादित रहावे व आपल्या येणाऱ्या पिढयांना आशीर्वादाच्या वाटेवर पुढे घेऊन जावे हे व्यवहारीक आहे. पूरीम सण ह्याचे उत्तम उदाहरण आहे. देवाने यहुद्यांना आदर महिन्याच्या तेराव्या दिवशी त्यांच्या शत्रूवर मोठा जय दिला तेव्हा त्यांनी चौदाव्या व पंधराव्या दिवशी हर्ष व उत्साह करीत एकमेकांकडे भेटी
पाठवल्या . देवाने दिलेल्या या विजयाची आठवण पिढ्यानपिढ्या
रहावी म्हणून त्यांनी हा सण दरवर्षी पाळण्याचे ठरवले. यासाठीकी पुढील पिढ्या देवसंगती चालतील व आशीर्वादित होतील. एस्तेर ९:२६–२८.
तुमचे जीवन भावी पिढीला मार्गदर्शक असू द्या: अब्राहामाने ‘एल– ओलाम सनातन देव‘ असे देवाचे नाव घेऊन उपकारस्तुतीची प्रार्थना केली. एल –ओलम सनातन देव हा त्याच्या संदेशाच्या विषय होता. उपस्थित प्रियजन व भावी पिढी याना देवाबद्दल हेच सांगत होता कि ज्या विश्व् निर्मात्याला मी
अनुसरत आहे तो सनातन देव आहे. तो जसा माझ्या बरोबर आहे तसा तुम्हाबरोबर व येणाऱ्या आपल्या पिढ्यान बरोबर असणार आहे कारण तो सनातन आहे. त्याच्यावर विश्वास ठेऊन जीवन जगा त्याने उत्तम ते आशीर्वाद तुम्हाला देऊ केले आहे.
या द्वारे अब्राहाम आपल्या घराण्याला सनातन यहोवा देवाची ओळख करून देत होता. आपल्याही जीवनात अशा अल्प गोष्टी घडल्या असतील किंवा घडतील ज्या आपल्या अभिवचनाच्या संबधित असतील. तेव्हा अब्राहमा
प्रमाणे देवाची उपकारस्तुती कराल ना? हे अथांग विश्व व्यापून उरेल इतके मोठे आशीर्वाद त्याने आपल्यासाठी त्याच्या अभिवचनाद्वारे ठेवले आहेत. आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या हाती आशीर्वादाचा हा अनमोल ठेवा आपल्या जीवनातील साक्षींद्वारे नक्की द्या.
कोरहाचा मुलगा देशावर आलेल्या महासंकटाच्या समयी देवाकडे प्रार्थना करताना म्हणतो,” हे देवा आम्ही आपल्या कानांनी ऐकले आहे; तू त्यांच्या दिवसात पुरातन दिवसात जे कार्य केले ते आमच्या वडिलांनी आम्हास सांगितले आहे; तू आपल्या हाताने राष्ट्रांना हाकून लावले, पण यांना तू रोपले; राष्ट्रातील लोकांना पिडीले पण यांना तू वाढवले. कारण त्यांनी आपल्या तरवारीने देश मिळवला नाही, आणि त्यांच्या भुजांनी त्यांना तारले नाही, तर तुझ्या उजव्या हाताने व तुझ्या भुजाने आणि तुझ्या मुखाच्या तेजाने त्यांना तारिले, कारण तू त्यांच्यावर प्रसन्न होतास“. स्तोत्र ४४:१–३.
कोरहाच्या मुलाने प्रार्थना करताना त्याच्या पूर्वजांचा संदर्भ दिला आहे, कारण पिढ्यानपिढ्या देवाविषयीच्या साक्षी त्यांनी हस्तांतरित केल्या. जर तुमचे जीवन भावी पिढीला मार्गदर्शक असेल तर येणाऱ्या तुमच्या पिढ्या प्रार्थना करताना तुमचा संदर्भ देतील.
प्रार्थना: हे प्रभू येशू तुझे माझ्याबरोबर असणे व मला चालवणे तुझ्या कृपेचा अनुभव देणारे आहे. तुझ्या अभिवचनातून मला माझ्या भविष्याकडे पाहण्यास सहाय्य कर. माझे जीवन तुझ्या उपकारस्तुतीने भरून जाऊ दे. माझ्या येणाऱ्या पिढयांना माझे जीवन मार्गदर्शक होऊ दे. येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन.
रेव्ह. कैलास [आलिशा ] साठे.