वचन : अहो, तुम्ही यहोवाला नवे गीत गा; हे सर्व पृथ्वी, यहोवाला गा. यहोवाला गा, त्याचे नाव धन्यवादित म्हणा; दिवसेंदिवस त्याचे तारण गाजवा. राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्युत कृत्ये जाहीर करा. स्तोत्र ९६:१–३.
नाही. आनंदाचे क्षण जीवनात वेळोवेळी येतात पण त्याचा अनुभव घेऊ शकत नाही. पृथ्वीवर मानवाची हीच जीवनशैली आपल्याला पहावयाला मिळते.
व्यर्थतांची व्यर्थता, असे उपदेशक म्हणतो, व्यर्थतांची व्यर्थता, सर्वकाही व्यर्थताच आहे. सूर्याच्या खाली मनुष्य जे सर्व श्रम करतो त्यांचा त्याला काय लाभ ? सर्व गोष्टी कष्टाने भरलेल्या आहेत, मनुष्याच्याने त्या सांगवत नाहीत, डोळा पाहून तृप्त होत नाही; कान ऐकून भरत नाहीत. उपदेशक :१:२–३,८. उपदेशकाचे
हे शब्द आजही किती
खरे वाटतात. मानवाच्या आद्य माता पित्यानी केलेल्या आज्ञाभंगाचे मूळ पाप मानवाच्या या अवस्थेला कारणीभूत आहे. मानव खरी शांती, व जीवनाचा खरा आनंद हरवून बसला आहे. त्याला व्यर्थतेच्या कष्टात सैतानाने जुंपिले आहे. खरा आनंद, खरी शांती, जीवनाचा खरा अर्थ
शोधण्याचा तो भरपूर प्रयत्न करितो परंतु ते त्याच्यापासून दूर राहते.
मानवाला या व्यर्थतेच्या जोखडातून सोडवून, त्याला खरा देव , खरी शांती, खरा आनंद, जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगण्यासाठी व पापात पडलेल्या शापित जीवनापासून त्याचे तारण करण्यासाठी प्रभुयेशू या जगात आला. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो म्हणजे आपले तारण व्हावे म्हणून त्याला आपल्या जीवनाचे समर्पण करितो त्याच्या जीवनातून मूळ पाप नष्ट होते. शापित जीवन
जाते व देवासंगतीचे आशीर्वादित जीवन त्याला प्राप्त होते. गरज आहे व्यर्थतेचा कार्यभार टाकून देऊन प्रभू येशूच्या संगती जीवनाचा खरा आनंद लुटण्याची. मग
नवीन वर्ष काय पण संपूर्ण आयुष्य तुमच्या पुढे आशीर्वाद घेऊन उभे राहील. व्यर्थतेचा कार्यभाग टाकणे
म्हणजे भौतिक अभिलाषांनी भरलेली जीवनशैली
त्यागून आत्मिक जीवनशैली अंगीकारणे होय. ही आत्मिक जीवनशैलीच आम्हाला आशीर्वादित जीवन मिळवून देते. चला तर मग या आशीर्वादाच्या वाटेवरून चालत नवीन वर्षात प्रवेश करीत असता या आत्मिक जीवनशैली बद्दल जाणून घेऊ, तिचा अंगिकार करू
व आशीर्वादित जीवनाचा भरपूर आनंद लुटू.
प्रभू येशू मध्ये आनंद करा : प्रियांनो, खरा आनंद व खरी शांती प्रभुमध्येच आहे. वर्ष येतील व जातील पण
प्रभू मधील जीवन फलद्रूपच होत जाईल. संत पौल फिलिप्पेकरांच्या मंडळीस मार्गदर्शन करताना लिहितो की, प्रभू मध्ये आनंद करा, मी पुन्हा सांगतो, आनंद करा. फिले ४:४. प्रभुमध्ये आनंद करा म्हणजे नेमके काय करावे हा प्रश्न येथे उपस्थित होणे स्वाभाविक आहे तर आपण जाणून घेऊ की प्रभू मध्ये आनंद कसा करावा.
अ ] आत्म्यात आनंद: हे एक रहश्य आहे. खाणे व पिणे हे देवाचे राज्य नाही, तर न्यायीपण व शांती आणि पवित्र आत्म्यामध्ये आनंद हे देवाचे राज्य आहे. रोम १४:१७. पवित्र आत्मा आपल्यात राहतो १ करिंथ ६: १९. पवित्र आत्म्याला
खिन्न करू नका इफिस ४: ३०. तर त्याच्या प्रेरणेने आपले जीवन जगा. गल ५:१६. आत्म्याच्या प्रेरणा म्हणजे, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगलेपणा, विश्वासूपणा, लीनता, इंद्रियदमन, या आहेत अर्थात आम्ही या सर्व गोष्टी आनंदाने करू शकलो पाहिजे,पवित्र आत्म्याच्या प्रेरणा देहापासून भिन्न आहेत. त्यामुळे देहाचा आनंद व आत्म्याचा आनंद वेगळा आहे
वचन पुढे सांगते,”जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहाला, त्याचे मनोविकार व वासना या सुध्दा वधस्तंभी दिले आहे. जर आपण आत्म्याने जगतो तर आपण आत्म्याने चालावे, आपण एकमेकांना चिथावून व एकमेकांचा हेवा करून पोकळ अभिमानाची इच्छा करणारे असे नसावे.गल ५: २२–२६. देहाच्या इच्छा पुरवल्या की देह आनंदित होतो.व आत्म्याच्या इच्छा पुरवल्या की आत्मा आनंदित होतो. देहाच्या इच्छा दुष्ट प्रवृत्तीला जन्म देतात. देवाचे वचन सांगते की,” दुष्टचा जयोत्सव अल्पकालिक असतो, आणि अधर्म्याचा हर्ष क्षणिक असतो. जरी त्याचा उत्कर्ष आकाश्यापर्यंत पोहचला आणि त्याचे मस्तक आभाळाशी लागले. तरी तो आपल्या विष्ठे प्रमाणे सर्वकाळ नष्ट होईल. ज्यांनी त्याला पहिले आहे ते म्हणतील कि तो कोठे आहे ? ईयोब २०: ५–७. म्हणून आत्म्याच्या इच्छा पूर्ण करा म्हणजे धार्मिकतेची फळे उपजतील. यहोवाचे खंडून घेतलेले गायन करीत सियोनात परत येतील; आणि त्यांच्या माथ्यावर अक्षय हर्ष होईल; ते आनंद व हर्ष पावतील आणि शोक व उसासे पळून जातील. यशया ३५:१०.
ब ] सह्भागीतेत आनंद : प्रभू मध्ये आनंद तेंव्हाच पूर्ण होऊ शकतो जेंव्हा आपण सह्भागीतेच्या जीवनाला प्राधान्य देतो.पहिल्या मंडळींचे जीवन पहा, ते सहभागितेचे जीवन जगत
होते, ते देवासाठी व भावाबहिणींसाठी तत्पर असत. ते एकमेकांची काळजी घेणारे होते. प्रेषितांच्या मार्गदर्शनात त्यांचे जीवन होते. ते मंदिरात तत्परतेने व एकचित्ताने एकत्र जमत असत व घरोघरी भाकर मोडित असत, आणि मोठ्या आनंदाने व मोकळ्यामनाने आपले अन्न एकत्र खात असत. ते देवाची स्तुती करीत असत व सर्व लोकांची कृपा त्यांच्यावर होती; आणि तारण पावत असलेल्याना दररोज त्यांच्यात मिळवीत असे. प्रेषित २: ४२:४७.
पवित्र आत्मा आम्हाला सह्भागीतेसाठी उत्तेजना देतो. दावीद राजा म्हणतो ते यहोवाच्या मंदिराकडे जाऊ असे जेव्हा म्हणाले तेव्हा माझ्या मनाला आनंद झाला स्तोत्र १२२:१. महिमा व प्रताप त्याच्या पुढे आहेत;
सामर्थ्य व आनंद त्याच्या राहण्याच्या ठिकाणात आहेत. १ इति १६:२७. याचा अर्थ शांतीचा व आनंदाचा खरा स्रोत प्रभू येशू आहे. जो त्याच्या ठायी आश्रय घेतो तो खऱ्या आनंदाचा उपभोग घेतो. प्रभू येशू
म्हणतो,”मी तुम्हास खचित सांगतो की; ज्या काही गोष्टी तुम्ही पृथ्वीवर बांधून टाकाल त्या आकाशामध्ये बांधल्या जातील, आणि ज्या काही गोष्टी तुम्ही पृथ्वीवर मोकळ्या कराल त्या आकाशामध्ये मोकळ्या केल्या जातील. आणखी मी तुम्हांस सांगतो खचित सांगतो की पृथ्वीवर जर तुम्हातले दोघे, ते मागतील त्या कोणत्याही गोष्टी विषयी, एक मताचे होतील, तर माझ्या आकाशातील बापाकडून ती त्यांच्यासाठी केली जाईल.कारण जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. मत्तय १८:१८–२०.
क ] शिकण्यात आनंद : पवित्र आत्मा आपल्याला शिक्षण घेण्याची भूक देतो. जो देवाचे वचन शिकण्यात आनंद मानतो तो आशीर्वादित आहे. स्तोत्र १:२. आद्य ख्रिस्ती देवाच्या वचनातून शिकण्याला विशेष महत्व देत. त्यामुळे ते जगावर प्रभाव टाकू शकले. प्रभूचे सामर्थ्य त्यांच्याठायी प्रगट होत गेले. प्रेषित पेत्र मंडळीला मार्गदर्शन करिताना म्हणतो. सर्व
दुष्टयी व सर्व कपट व ढोंग व हेवा व सर्व निंदा ही सोडून. तुम्ही नवीन जन्मलेल्या बालकासारखे वचनरूपी निऱ्या दुधाची इच्छा धरा, यासाठीकी तुम्ही त्याच्याद्वारे तारणापर्यंत वाढावे. २ पेत्र २:१–२. ज्या मनुष्याला ज्ञान सापडलें, जो मनुष्य विवेक पावला, तो सुखी आहे. कारण त्याची प्राप्ती रुप्याच्या प्राप्तीपेक्षा आणि त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे. ते मानकापेक्षा मौलवान आहे, आणि तुझे सर्व इष्ट पदार्थ त्याशी समतोल नाहीत. दीर्घायुष्य त्याच्या उजव्या हातात आहे, धन व सन्मान त्याच्या डाव्या हातात आहेत. त्याचे मार्ग आनंदाचे मार्ग आहेत, आणि त्याच्या सर्व वाटा शांती आहेत. जे त्याला धरून घेतात त्यांना ते जीवनाचे झाड आहे, आणि जो कोणी त्याला राखून ठेवतो तो सुखी आहे. नीती ३: १३–१८.
प्रभू येशूची सेवा करा: प्रभू येशूने आपल्याला त्याचे साक्षी होण्यासाठी निवडले आहे. तारणाच्या सुवार्तेची घोषणा करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. जर आपण आपल्या तन, मन, व धनाने या सेवेत आहोत तर आपल्याला काळजी करण्याचे कारण नाही. प्रभू म्हणतो,” माझ्या घरात अन्न असावे म्हणून तुम्ही अवघा दशमांश कोठारांत आणा; आणि तुम्ही असे केले म्हणजे मी तुम्हासाठी आकाशाच्या खिडक्या उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हांवर ओतील की नाही; या विषयी आता माझी प्रचीती पहा. मलाखी ३:१०. देव ज्यांना निवडतो त्यांची तो सर्वांगाने काळजी हि घेतो. यहोवा आपल्या सेवकाच्या कल्याणात संतोष पावतो
स्तोत्र ३५:२७. देवाने अब्राहामाला निवडीलें तेव्हा त्याला त्याच्या कल्याणाची हमी दिली. उत्पत्ती १२: १–३. प्रभू येशूने आपल्याला तो सदैव संगती राहील अशी
हमी दिली आहे. आपणही पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याचे आपल्या बरोबर असणे अनुभवत आहोत. असे असताही आम्ही उद्याची काळजी चिंता करीत बसने योग्य नाही. संत पौल सांगतो, कशाचीही काळजी चिंता करू नका, तर सर्व गोष्टींविषयी उपकारस्तुतीसहित प्रार्थना व विनंती करून आपली मागणी देवाला कळवा
आणि देवाची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमची हृदये व तुमचे विचार ख्रिस्त येशूत राखील. फिले ४:६–७.
प्रियांनो, उपजिविके साठी काम करावे लागते, आपल्या अनेक गरजा असतात पण प्रभू येशू म्हणतो, काय खावे किंवा आपण काय प्यावे किंवा आपण काय पांघरावे असे म्हणत काळजीत असू नका, कारण राष्ट्रांचे लोक ह्या सर्व गोष्टी मिळवायला झटतात, आणखी या सर्वांची तुम्हाला गरज आहे हे तुमच्या आकाशातील बापाला ठाऊक आहे. तर तुम्ही पहिल्यांने त्याचे राज्य व त्याचे न्यायीपण मिळवायला झटा, म्हणजे त्यांवर ह्या सर्व गोष्टीहि तुम्हाला मिळतील. मत्तय ६: ३१–३३.
प्रभू येशूचे गौरव करा: आपण या जगात देवाचे गौरव करण्यासाठी आहोत. या पृथ्वीचे मीठ व प्रकाश असे आपण आहोत . आपली सत्कृत्य पाहून जगातील लोकांनी देवाचे गौरव करावे
हि प्रभू येशूची इच्छा आहे. मत्तय ५:१३–१६. तर कश्या कश्याने देवाचे गौरव होते ते आपण पाहू. आपल्या जीवनातून पवित्र आत्म्याच्या
सामर्थ्याचे प्रगटीकरण व्हावे हे अपेक्षित आहे कारण त्यामुळे देवाचे गौरव होते. देवाचे राज्य बोलण्यात नाही पण सामर्थ्यात आहे १करिंथ ४:२०. मंडळींचा छळ करणारा शौल देवाकडे वळून संत पौल झाला त्यामुळे त्याकाळी पौलाविषयी मंडळ्यातून देवाचे गौरव होत गेले. तसेआपल्या रूपांतरित होण्याच्या व्दारेही
देवाचे गौरव होते. गल १:१८–२४. सुवार्तेच्या कार्यासाठी उदारपणे व संतोषाने दिल्याने देवाचे गौरव होते. २ करिंथ ९: ६–१३. देवाचे गौरव झाल्याने सैतानाच्या कृत्यांना आळा बसतो. सुवार्तेच्या कार्यात अडखळणे आणणारे वठणीवर येतात.प्रेषित ४:२१. जगातील लोक पश्चताप करून देवाकडे वळल्याने व त्यांचे तारण झाल्याने देवाचे गौरव होते. प्रेषित ११:१८. आपण फळ दिल्याने देवाचे गौरव होते योहान १५:८.
सारांश : प्रियांनो, जग नव्या वर्षाला सामोरे जाताना उत्साह दाखवते पण येणारे वर्ष काय घेऊन येईन या विषयी शाशंक असते. सर्वप्रकारचा दिखाऊपणा करूनही त्यांच्या दुविधा मनःस्थितीला ते लपवू शकत नाही. आपण मात्र देवांनी दिलेल्या नवीन वर्ष्याचे स्वागत यहोवाला नवे गीत गाऊन करावे, त्याचे उपकार स्मरण करून त्याला धन्यवाद द्यावा. आणि विशेष करून त्याच्याकडे कृपा मागावी की, आपण त्याच्या सेवेत तत्पर राहू, आणि आपल्या जीवनाच्या द्वारे त्याचे गौरव करू शकू.
प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, सहभागितेत आवेशी असा, व प्रभूच्या शिक्षणात वाढत जा. प्रभूचा कल्याणकारी हात आपल्या बरोबर सदैव आहे.
प्रार्थना : हे प्रभू येशू तू सदैव माझ्या बरोबर आहेस म्हणून मी तुझे आभार मानतो. या नवीन वर्षा साठी मी तुला धन्यवाद देतो. या वर्षात मी सदैव तुझ्यामध्ये आनंदी रहावे, तुझी सेवा करावी व तुला गौरव द्यावे असा अनुग्रह तू माझ्यावर कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू
ऐक, आमेन.
रेव्ह. कैलास [आलिशा ] साठे.