वचन : ती मुलाला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापापासून तारील. मत्तय १:२१.
येशू दर्शनासाठी ज्ञानी लोकांचा प्रवास |
आज
संपूर्ण जगभर नाताळचा सण साजरा केल्या जात आहे.हा असा एकमेव सण आहे कि ज्याने पृथ्वी व्यापून टाकली आहे. कारण येशू ख्रिस्ताच्या जन्माचे महत्व मानवा साठी अनन्य साधारण आहे. मानवाला पापापासून तारण्यासाठी त्याने या जगात जन्म घेतला. जगभरातील बहुसंख्य लोकांना हा अनुभव आल्यामुळे ते नाताळचा हा सण साजरा करितात, काही असे आहेत की जे फक्त परंपरा म्हणून या सणामध्ये सहभाग घेतात, व काही असेही आहेत कि ज्यांना ह्या सणाचे महत्व काय आहे हे माहीतच नाही. याची अनेक कारणे असतील परंतु महत्वाचे कारण म्हणजे एकतर त्यांच्या पर्यंत येशू ख्रिस्ताच्या जन्माचे शुभवर्तमान पोहचले नसेल किंवा पोहचले तरी त्यांना ते समजले नसेल. कारण मानवाचा व देवाचा शत्रू सैतान याने जगभरात असंख्य खोटे तत्वज्ञान निर्माण करून, मानवात भेदभावाच्या व द्वेशाच्या आडभिंती
निर्माण करून उद्धाराच्या या शुभवर्तमानास अडखळण निर्माण केले आहे. होय, हे अगदी खरे आहे कारण जगातील सर्व लोकांना पापाच्या शिक्षेपासून वाचण्याची गरज आहे. आजही जगात बहुसंख्य लोक पापामध्ये जन्म घेतात, पापामध्ये जीवन जगतात व पापामध्ये मरतात. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून ते पवित्र जीवनात जन्म घेऊ शकतात, पापमुक्त जीवन जगू शकतात व पापामध्ये मरून नरकात न जाता स्वर्गात सनातन जीवन म्हणजे युगांयुगाचे कधीही न संपणारे आनंदमय जीवन जगण्यासाठी देवाकडे जाऊ शकतात हे त्यांना कळतच नाही.
आजचा हा संदेश त्या लोकांसाठी आहे कि ज्यांना येशू ख्रिस्त पापापासून तारीतो म्हणजे नेमके काय आहे ते समजत नाही. त्या साठी आपण पुढील गोष्टी समजून घेऊ या.
पाप म्हणजे काय आहे ?: पापाबद्दल अनेक समज गैरसमज आहेत, धर्मानुरूप, संस्कृतीनुरूप काही धारणा आहेत. पवित्र शास्त्रात अनेक ठिकाणी पापावर भाष्य करण्यात आले आहे. १ योहान ३:४ सांगते, ” जो कोणी पाप करितो तो स्वैराचार करितो; पाप हे स्वैरवर्तन आहे“. सर्वच अन्याय पाप आहे १ योहान ५:१७. देवा विरुद्ध विद्रोह पाप आहे . अनुवाद ९:७, यहोशवा १:१८.
प्रियानो, पवित्र शास्त्रात अशा अनेक व्याख्या आपल्याला पहावयास मिळतात. म्हणून ‘पापा विषयीची नेमकी व व्यापक व्याख्या समग्र पवित्र शास्त्राचा विचार करून करावी लागेल हे आपण लक्षात घ्यावे. तसे केल्यास पुढील व्याख्या निर्माण होईल ती अशी की,” पाप म्हणजे प्राप्त दर्जा, क्षमता व उत्कृष्ट जीवन शैलीला
मुकणे“.
प्राप्त दर्जा : देवाने मनुष्याला आपला प्रतिनिधी “प्रतिरूप ” असे निर्माण केले. त्याला पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीवर अधिकार दिला. उत्पत्ती १;२७–२८. प्रथम मानवाला देवाबरोबर सहभागिता होती उत्पत्ती : २: १८–१९, ३: ८. मनुष्याला देवाने देवदूतांपेक्षा किंचित कमी म्हणजे देवदूतानं इतकेच
श्रेष्टत्व दिले व गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केले. त्याला हाताच्या कृत्यांवर प्रभुत्व दिले व सर्वकाही त्याच्या पायाखाली ठेवले .स्तोत्र ८: ५–६.
क्षमता : प्रथम मानवाच्या ठायी कुठलाच विकार नव्हता. उत्पत्ती २:२५. ते देवाला पाहू व त्याच्याशी बोलू शकत होते. उत्पत्ती २ व
३. देवाचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या ठायी ज्ञानाच्या व सामर्थ्याच्या पूर्ण क्षमता होत्या. मृत्यूचे सामर्थ्य त्यांच्यावर नव्हते त्यामुळे ते अमर होते. परिपूर्ण मानवाच्या क्षमता समजून घ्यायच्या
असतील तर
प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्षमता समजून घ्यायला हव्यात कारण तो आपल्यामध्ये परिपूर्ण मानव म्हणून वावरला. लूक २: ५२. प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली सामर्थ्याची कामे हि परिपूर्ण मानवांकडूनही
[ विश्वासणाऱ्यांकडून] अपेक्षित आहेत. मार्क ९: २३, मत्तय १७:२०, योहान १४;१२.
उत्कृष्ट [पवित्र]जीवनशैली : प्रथम मानवांचे जीवन देवा संगती होते.उत्पत्ती : ३: ८. स्त्री पुरुष असा भेदभाव तेथे नव्हता उत्पत्ती २:२४. देवाच्या मार्गदर्शनात पृथ्वीवर ते सर्व व्यवस्था पाहणारे होते. उत्पत्ती : २: १८–१९. प्रभू येशू ख्रिस्ताची जीवनशैली परिपूर्ण मानवाचे प्रतिनिधित्व करते. त्याचे देवावरील प्रेम, पवित्र जीवन, माणसांवरील प्रेम, क्षमाशील जीवन, हे सर्व परिपूर्ण मानवासाठी आवश्यक आहे.
प्रथम मानव आदाम व हव्वा
यांनी देव इच्छेला प्राधान्य दिले नाही त्यांनी देव आज्ञेचा भंग केला त्यामुळे ते
देवाने त्यांना दिलेला दर्जा, क्षमता व उत्कृष्ट जीवनशैली गमावून बसले. हे त्यांचे वागणे देव इच्छेला व संकल्पना विरोध करणारे असल्यामुळे पाप ठरले.
पापाचे परिणाम : आदाम व हव्वा यांनी प्राप्त दर्जा, क्षमता व उत्कृष्ट जीवन गमावले. त्यांनी केलेले हे पाप संपूर्ण मानवतेसाठी पाश असे झाले. मानवाची देवाबरोबरची सहभागिता कायमची तुटली. त्याच्यात मरण आले व कष्टसाध्य जीवन त्यांना प्राप्त झाले. उत्पत्ती ३:१६–१९. या पापाचा परिणाम मानव जातीत वाढतच गेला. मानवांचे मन विकारांनी भरून गेले उत्पत्ती ६:३.
दुसरीकडे, मानवाने
गमावलेल्या गोष्टी म्हणजे त्याचा पूर्वीचा दर्जा, क्षमता व उत्तम जीवनशैली पुन्हा मिळवण्याची त्याची इच्छा होती. त्यामुळे तो स्वतःचा व देवाचा शोध घेत राहिला परंतु देवा पासून दूर गेलेल्या व सैतानाच्या आधिपत्या खाली असलेल्या मानवाला, सैतानाने अधिकच अंधारात लोटले. मानव निर्माणकर्त्या देवाला ओळखू शकला नाही व त्याच्या कडे वळला नाही. उलटपक्षी त्याने स्वतःचे देव बनवले मानव, प्राणी, पक्षी, जलचर , व ग्रह ताऱ्यांच्या मूर्ती बनवून त्यांना त्याने देव म्हटले. कधी त्यांची भक्ती केली तर कधी त्यांना वश करण्याचा प्रयत्न केला. यातूनच वेगवेगळे धर्म, पंथ, तत्वज्ञान, तंत्र , मंत्र, जादू टोणा, व वेगवेळ्या विद्या निर्माण झाल्या. गर्वाने व लोभाने भरलेल्या मानवाने
स्वतःला देव घोषित करून तो इतरांचे शोषण करीत गेला. यातूनच धर्मसत्ता प्रबळ होत गली तिने राजसत्तेला अंकित करून आपले वर्चस्व स्थापित केले. या सर्वांच्या मागे सैतान असल्यामुळे त्याने परस्पर वैर, स्वार्थ, गर्व, व स्पर्धा या गोष्टीना इतकी चेतना दिली कि मानवाला जीवन व मरण यातील फरक कळेना असे झाले.
देवाचे वचन सांगते, “सर्वानी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवला उणे पडले आहेत“. रोम ३:२३. विकारांनी भरलेले मानवाचे मन त्याला अधिक अधिक भ्रष्ट करीत गेले. मानव मानवाचा वैरी झाला, त्याच्या ठायी असलेल्या देहाच्या वासना अनेक अनिष्ट गोष्टीना जन्म देत गेल्या. साम्राज्यवाद, वंशवाद, धर्मवाद , जातीवाद , भाषावाद, गुलामगिरी, अस्पृश्यता, गरिबी, शोषण, भ्रष्टचार,स्त्री पुरुष भेद
अशाप्रकारच्या अनेक अनिष्ट गोष्टी समाजात वाढत गेल्या. मानव सैतानाचा गुलाम झाला. जगभर अशांतता व शोषण वाढतच गेले
सैतानाने मानवाचे जीवन पूर्णपणे उध्वस्त केले. जगात कोणीच सुखी नाही अशी अवस्था निर्माण झाली.
परिणामतः खून, व्यभिचार, चोरी, अनीती, दुष्टपणा, लोभ, हेवा, हत्या, कलह, कपट, कुबुद्धी, चहाड, निंदक, देवद्वेष्ट्ये, उध्दट, गर्विष्ट, कुकर्मकल्पक, माता पितरांची अवज्ञा करणारे, बुद्धिहीन, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दयी, भेदभाव करणारे, भेकड, जारकर्मी, चेटूक करणारे, मूर्तिपूजक, लबाड, अशा प्रकारची नीच जीवनशैली मानवाला प्राप्त झाली. अशी जीवनशैली अनुसरणारे नरकाच्या शिक्षेस पात्र आहेत.
मानवाच्या या पतित अवस्थेतून त्याला उद्धारण्यासाठी प्रभू येशू या जगात आला: मानवाच्या प्रथम माता पित्याने केलेल्या आज्ञाभंगाच्या पापाला मूळ पाप असे म्हटले आहे. हे मूळ पापच सर्व वाईटचे कारण आहे. या पाप दोषापासून मानवाला मुक्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. देवाचे वचन सांगते, “प्रभू या साठी प्रगट झाला कि त्याने सैतानाची कामे नष्ट करावीत“. १ योहान ३: ८. जसे आपले आद्य माता पिता परिपूर्ण मानव होते तसा तो परिपूर्ण मानव झाला. आता त्याला देव इच्छेला मरेपर्यंत समर्पित राहून मानवाला आज्ञाभंगाच्या पापापासून मुक्त करावयाचे होते. मानवाला पुन्हा त्याचा देवाने दिलेला दर्जा, क्षमता, व उत्तम जीवनशैली प्राप्त करून द्यायची होती. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माला अनन्य साधारण महत्व आहे.
येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यास पुन्हा देवाकडून उच्च दर्जा प्राप्त होतो : जितक्यांनी त्याला अंगिकारले तितक्यांनी, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्याना त्याने देवाची लेकरे होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्तापासून किंवा देहाच्या इच्छेपासून किंवा माणसाच्या इच्छेपासून झाला नाही तर देवा पासून झाला. योहान १:१२–१३. ख्रिस्तावरील विश्वासाने मानव पुन्हा देवाची
सहभागी प्राप्त करितो. १ योहान १:३, १ करिंथ १:९. ख्रितावर विश्वास ठेवणाऱ्यास देव नीतिमान ठरवतो व त्याचे गौरव करितो. रोम ८:३०. १ करिंथ ६:९–११.
येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यास पुन्हा देवाकडून क्षमता / सामर्थ्य
प्राप्त होते : मनुष्य जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो, तेव्हा देव त्या मनुष्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे नवा जन्म देतो.योह न ३: ५–६. त्यामुळे पवित्र आत्म्याचे सामर्थ्य त्यांच्यात कार्य करू लागते. प्रेषित १:८, २ तिम १:७.
येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यास पुन्हा देवाकडून उच्च [पवित्र]जीवनशैली
प्राप्त होते : प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण जगातील विद्वानांना प्रभावित करणारी आहे. भारतात राजाराम मोहन रॉय, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले असे एक नाही अनेक संत महात्मे, समाज सुधारक व राजकीय पुढारी येशू ख्रिस्ताच्या शिकवणीने व जीवनशैलीने प्रभावित झाले. येशू ख्रिस्ताची शिकवण आणि जीवनशैली यात काहीच फरक नव्हता. तीच अपेक्षा त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांकडून आहे. देवाचे वचन सांगते तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा; तुम्ही जगाचा प्रकाश आहा; तुमचा उजेड लोकांपुढे पडो यासाठीकी त्यांनी तुमची चांगली कामे पहावीत आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. मत्तय ५:१३–१६. १ पेत्र २:९ सांगते,”तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे अहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधारातून कडून आपल्या अदयुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिध्द करावे.
देवाने मानवाकडून फक्त उच्च जीवन शैलीची अपेक्षा केली नाही तर आपला पवित्र आत्मा देऊन त्यासाठी त्याला
समर्थ हि केले. देवाचा हा संकल्प होता की त्याने मनुष्याला न्यायी जीवन जगण्यासाठी समर्थ करावे. यहे ३६:२५–२७ मध्ये देव म्हणतो,”मी तुम्हावर शुध्द पाणी शिंपडील, म्हणजे तुम्ही शुध्द व्हाल; तुमच्या सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती यापासून मी तुमची
शुध्दी करीन. मी तुम्हास नवे हृदय
देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चाललं, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करीन.” येशू ख्रिस्ताने त्याचा आत्मा त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यास दिला, देवाचे वचन सांगते,” आत्माच्या प्रभावाने विश्वासणाऱ्याला होणारी फलप्राप्ती पुढील प्रमाणे आहे, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन, म्हणून आत्म्याच्या प्रेरणेने चालणे गरजेचे आहे.
आपण शुध्द जीवन जगावे म्हणून त्याने आमच्यातून सर्व भेद नष्ट केले. जितक्यांचा ख्रिस्ता मध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. अश्यांमध्ये यहूदी व
हेल्लेनी, दास व स्वतंत्र , पुरुष व स्त्री हा भेद नाही; ख्रिस्त येशू मध्ये सर्व एक आहेत. गलती ३:२८.
सारांश: ज्या पापामुळे मानव दोषपात्र झाला होता; त्या पापातून त्याला मुक्त करून पुन्हा देवाशी जोडण्यासाठी व त्याचे सुरवातीचे वैभव म्हणजे त्याचा दर्जा, क्षमता / सामर्थ्य व उच्च जीवनशैली त्याला मिळवून देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. म्हणून ख्रिस्त जन्माची सुवार्ता सर्व मानवांसाठी आहे पण विशेष करून त्यांच्यासाठी आहे जे दीन आहेत, जे न्यायप्रिय
आहेत, जे सौम्य आहेत, जे शांती इच्छितात जे धार्मिकतेचे भुकेले आहेत अशांसाठी आहे.जे पाप व शापित जीवनापासून मुक्त होऊ इच्छितात त्यांच्या साठी आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठीकी जो कोणी
त्याजवर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. योहान ३:१६. म्हणून प्रभू येशूवर विश्वास ठेवा व उद्धरलेल्या जीवनाचा आनंद लुटा.
रेव्ह. कैलास [आलिशा ] साठे.