देवाचे राज्य कोठे व कसे आहे ? लूक १७;२१

देवराज्याचे रहस्य 

वचन: पहा देवाचे राज्य तुमच्या मध्ये आहे. लूक १७:२१.

चर्च

प्रस्तावना : देवाचे राज्य हि अमूर्त संकल्पना नाही, ते प्रत्यक्ष अस्तित्वात आहे. त्याची एक व्यवस्था आहे, ते कार्यरत आहे, त्याची मूल्ये आहेत. ते अतिशय सामर्थ्यशाली आहे. ख्रिस्ताद्वारे ते माणसाला प्रगट झाले आहे. तरी अनेकांना हे राज्य समजून घेताना व अंगिकारताना अवघड जाते. कारण ते आज डोळ्याने पाहता येत नाही पण भविष्यात ते पाहता येणार आहे, प्रत्यक्ष त्याच्या राजाला पाहता येणार आहे, त्या राज्याचे वैभव अनुभवता येणार आहे. परंतु हे सुख फक्त येशू ख्रिस्तावर विश्वास ठेऊन त्याचे शिष्यत्व पत्करणाऱ्यांनाच मिळणार आहे. विश्वास न ठेवणारे हे पाहतील परंतु त्यात त्यांना प्रवेश मिळणार नाही. 

देवाचे राज्य म्हणजे काय? देवाचे राज्य म्हणजे देवाची सत्ता. हि सत्ता सार्वभौम आहे, सैतानाच्या संपूर्ण सत्तेला उध्वस्त करण्याचे सामर्थ्य व अधिकार देवाच्या सत्तेला आहे. तिला अटकाव करण्याचे सामर्थ्य कोणातच नाही. तरी ती लादल्या जात नाही. प्रभू येशुवरील विश्वासानेच ते मिळवता येते. आणि विश्वास ठेवणे न ठेवणे हा पूर्णपणे मनुष्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. प्रभू येशूने म्हटले आहे,”मी तुम्हांस खचित खचित सांगतो की जो कोणी देवाचे राज्य बालकासारखे होऊन घेणार नाही तो त्यात जाणार नाही.” मार्क १०:१५. 

देवाच्या राज्याचे स्थान: देवाचे राज्य भौगोलिक पातळीवर विभागता येत नाही. देव सर्वसत्ताधीश, सार्वभौम व सनातन आहे. सर्व विश्व त्याचेच आहे. त्याचे अधिकार अमर्यादित आहेत. त्यामुळे त्याची सत्ता सर्वत्र आहे, परंतु त्याच्या राज्याचे भागीदार मात्र नवीन जन्म पावलेले ख्रिस्तीच आहेत. कारण आज ते त्याच्या सामर्थ्याच्या स्वरूपात, मूल्यांच्या स्वरूपात, व अधिकारांच्या स्वरूपात त्याच्या लेकरांच्या ठायींच आहे. 

आपली पापे पदरी घेऊन जो प्रभू येशूला शरण जातो त्याला देवाचे मुल होण्याचा अधिकार प्राप्त होतो. हाच  आत्मिकरित्या नव्याने जन्मण्याचा मार्ग आहे. देवाचे वचन सांगते,”जितक्यांनी त्याला अंगिकारले तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची लेकरे होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्तापासून, किंवा देहाच्या इच्छेपासून किंवा माणसाच्या इच्छे पासून झाला नाही तर देवापासून झाला आहे. योहान १:१२-१३.म्हणून प्रभू येशू देवाच्या लेकरांना उद्देशून म्हणतो, “देवाचे राज्य नजरेस पडेल अशा प्रकारे येत नाही, पहा ते येथे आहे ! किंवा तेथे आहे ! असे बोलणार नाहीत, कारण पहा देवाचे राज्य तुम्हांमध्ये आहे. लूक १७:२१

देवाच्या राज्याचे गौरव / वैशिष्ट्ये : देवाच्या राज्यात देव इच्छेला प्राधान्य आहे. स्वर्गात जसे त्याच्या इच्छेप्रमाणे सर्वकाही चालते तसेच त्याच्या लेकरांच्या जीवनात त्याच्या इच्छेने सर्वकाही चालते. मत्तय ६:९-१०.

देवाच्या राज्यात भेदभाव नाही, पश्चातापाने पापाअंगीकार करून प्रभू येशूवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण देवाच्या राज्याचा भागी आहे. जकातदार व कसबिणी विश्वासाच्या द्वारे देवाच्या राज्यात जात आहेत. मत्तय २१:३१. सर्वानी ख्रिस्ताला परिधान केले आहे, यात भेदभाव नाहीच, हेल्लेणी, यहुदी, सुंता, बेसुंता, अन्य देशीय  [वंश व जातपात], स्कुथी, दास व स्वतंत्र असे काहीच नाही, तर ख्रिस्त सर्वकाही व सर्वांमध्ये आहे.कल ३:१०-११. 

या राज्यात देवाच्या लेकरांना मोठे थोरपण आहे. प्रभू येशू ख्रिस्त हे मोठेपण गौरविताना म्हणतो की,”मी तुम्हांस खचित खचित सांगतो की, स्रियांपासून जे जन्मले त्यांच्यामध्ये बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा असा कोणी झाला नाही, तरी स्वर्गाच्या राज्यात [ देवाच्या राज्यात ] जो अगदी लहान आहे तो त्याच्यापेक्षां [योहानापेक्षा] मोठा आहे.” 

भावी काळात ख्रिस्ताचे दुसरे येणे होईल तेव्हा तो जगाचा न्याय करील व देवाचे लेकरे देवराज्याचे प्रत्येक्ष वतन मिळतील, देवाच्या राज्यात ते सूर्या सारखे तेजाने तळपतील, व युगानुयुगे देवाच्या संगती सर्वकाळचे जीवन उपभोगातील. मत्तय २५:३४,  १३:४३, १९:१६, २३:३० मार्क १०:३०. 

प्रार्थना: हे प्रभू येशू तुझ्या पवित्र आत्म्या साठी मी तुझे आभार मानतो, देव राज्यासाठी तुला धन्यवाद देतो.जगाला शांतीचा म्हणजे तुझा मार्ग दाखवण्यास मला साहाय्य कर.येशूच्या नावान मागतो, आमेन.

रेव्ह. कैलास [आलिशा] साठे. 

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole