देवाचे संरक्षण स्तोत्र ९१:३

वचन: तो पारध्याच्या पाशा पासून घातक मरी पासून तुझा बचाव करीन. स्तोत्र ९१:३.

स्तोत्र :९१

प्रस्तावना : मानवाला खरे संरक्षण देवाकडूनच आहे. परंतु मानव देवावर अवलंबून न राहता आपल्या आर्थिक बळावर, राजकीय बळावर, बाहुबळावर, व बुद्धिमत्तेवर अधिक अवलंबून राहतो. पण ज्यांना देवाची ओळख आहे, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते परमेश्वरालाच आपल्या संरक्षणाचा श्रोत मानतात.

देवामधील संरक्षण : संपूर्ण पवित्र शास्त्र आपल्याला देवाकडून प्राप्त असलेल्या संरक्षणा बद्दल शिकवते. दावीद राजा म्हणतो, ‘देवाचे संरक्षण मला प्राप्त असल्यामुळे माझा अनुभव मला सांगतो की माझा वर्तमानकाळ व भविष्यकाळ देवाच्या हाती सुरक्षित आहे, त्यामुळे परिस्थिती कितीही गंभीर असो माझ्या आयुष्याचे दिवस आनंदात जातील परमेश्वराची प्रेम दया मी रोज अनुभवेल.’ स्तोत्र २३. 

देवाचे संरक्षण कोणाला प्राप्त होते: देवाचे संरक्षण त्याच्या लेकरांसाठी आहे. देव ज्यांना निवडतो व  जे त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याच्याठायी आश्रय घेतात त्यांना देवाचे संरक्षण मिळते. देवाने अब्राहामाला निवडले तेव्हा तो कायम अब्राहामा बरोबर राहिला. त्याने त्याच्या पत्नीचे, त्याच्या आप्तांचे, त्याच्या जीवाचे व त्याच्या संपत्तीचे, रक्षण केले. इस्राएल राष्ट्राचे त्यांच्या शत्रुंपासून वेळोवेळी रक्षण केले. जेंव्हा एस्तेर, मर्दखय, व यहुदी उपवास धरून प्रार्थना करतात तेंव्हा त्यांना देवाचे संरक्षण प्राप्त झाले. शद्रक, मेशख, व अबेद्नगो, यांनी त्याच्या पवित्र नावावर पूर्ण मनाने पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीति केली म्हणून त्याने त्यांचे अग्नीच्या भट्टीतून संरक्षण केले. 

देवाचे संरक्षण कशाप्रकारे काम करते: देव त्याच्या लकरांविषयी अतिशय आवेशी आहे. सैन्याचा यहोवा म्हणतो, ‘जो तुम्हांस स्पर्श करील तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करील. जखऱ्या २:८.देवाचे वचन सांगते, इस्राएलच्या रक्षकाला झोपही लागत नाही व तो डुलकी हि घेत नाही, स्तोत्र १२१:४. याचा अर्थ परमेश्वर आपल्या लेकरांच्या रक्षणासाठी अतिशय तत्पर व आवेशी असतो.  

देव पारध्याच्या पाशा पासून व घातक मरी पासून तुझा बचाव करीन, हे वचन देवावरील विश्वास दृढ करणारे आहे. दावीद राजाचे जीवन स्वतः पेक्षा देवावर विश्वास ठेवण्यास आपल्याला शिकवते. याठिकाणी पारधी हा शब्द जातीवाचक अर्थाने या ठिकाणी वापरलेला नाही, तर शिकारी या अर्थाने वापरला आहे. शिकारी शिकार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गुप्त पाश पेरतो. पशु पक्षांना हे कळत नाही व ते सहज येऊन त्यात अडकतात व मोठ्या संकटात सापडतात. शिकाऱ्याला मात्र आनंद होतो आपला पाश अधिक बळकट करीत तो शिकार करितो. त्याच प्रमाणे आपला शत्रू सैतान व त्याच्या हातातील लोक आपल्यासाठी गुप्त पाश पेरत असतात हे विसरू नये पण आपला देव नित्य आपल्यावर नजर ठेऊन असतो. तो म्हणतो,’कोणी स्त्री आपल्या पोटच्या मुलावर दया न करता आपल्या तान्ह्या बाळाला विसरेल काय ? होय, कदाचित विसरेल पण मी तुला विसरणार नाही. पहा, मी आपल्या तळहातावर तुला कोरले आहे; तुझे कोट नित्य माझ्या समोर आहेत. यशया ४९:१५-१६. 

प्रार्थना : हे प्रभू येशू तूच माझा तारणहार आहेस म्हणून मी तुला धन्यवाद देतो. या जगात जीवन खूप कष्टमय आहे. तुझे संरक्षण सर्वाना लाभुदे. येशूच्या नावाने मागतो. आमेन.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole