देव आपले युध्द लढतो.

वचन या गोष्टी झाल्यानंतर यहोवाचे वचन दृष्टांतात अब्रामाकडे आले ते म्हणाले अब्रामा भिऊ नकोमी तुझी ढाल , तुझे अत्यंत मोठे प्रतिफळ आहे . उत्पत्ती १५.

अब्राहामाने चार आक्रमक राजांच्या एकत्रिक सैन्याचा पराभव करून त्याचा पुतण्या लोट याला मुक्त केले. नंतर सर्वकाही शांत झाल्यावर त्याच्या लक्ष्यात आले की त्याने खूप मोठी जोखीम घेतली आहे. तो विचार करू लागला की, हे राजे दुखावल्या गेले आहेत, बदला घेण्यासाठी ते माझ्यावर चढाई करून येतील. असे जर झाले तर आपले काही खरे नाही आपण आपले सर्वस्व धोक्यात टाकले आहे. या विचारांनी त्याच्या डोक्यात थैमान मांडले होते, भीतीपोटी तो अगदी निराश झाला होता. तेंव्हा देवाने त्याला धीर देण्यासाठी निराशेतून बाहेर काढण्यासाठी वरील अभिवचन दिले, तो म्हणाला, “अब्राहामा भिऊ नको; मी तुझी ढाल; तुझे अत्यंत मोठे प्रतिफळ आहे

येथे एक गोष्ट लक्ष्यात घेतली पाहिजे की, देव जेव्हा आपल्याला निवडतो तेव्हा तो आपल्या मागे सर्व शक्तीनिशी उभा राहतो. अब्राहामाने चार राज्यांच्या एकत्रित सैन्याला पाणी पाजले [ पराभूत केले ] कारण देव त्याचे युध्द लढला. परंतु देवाला, किंवा त्याच्या सहाय्याला आपण प्रत्येक्ष पाहत नसतो म्हणून म्हणा किंवा मानवाच्या मर्यादा म्हणा. प्रत्येक दुसऱ्या आव्हानाच्या वेळी आपण देवाच्या सहाय्याला जमेस धरीत नाही. अब्राहामाच्या बाबतीतही असेच काही म्हणावे लागेल, नाहीतर देवाबरोबरचा त्याचा अनुभव इतका घट्ट असताना देखील तो चिंता काळजी करीत बसला नसता. देवाने त्याला अभिवचन दिले होते की, “जो तुझे अभिष्ट चिंतील त्याचे मी अभिष्ट करील  जो तुझे अनिष्ट चिंतील त्याचे मी अनिष्ट करिन,” याचा अर्थ देवाने त्याला स्पष्टपणे सांगितले होते की तुला कोणालाही घाबरण्याचे कारण नाही; तरीही तो घाबरून चिंता काळजी करीत बसला. शेवटी देवाला त्याला पुन्हा सांगावे लागले की, तू घाबरू नको मी तुझी ढाल म्हणजे तुझे संरक्षण आहे, तुझे मोठे प्रतिफळ आहे. 

आपल्याही जीवनात देवाचे छोटे मोठे अनुभव रोज असतात. त्याअनुभवा द्वारे देव आपल्याला खात्री देत असतो की तो आपल्या बरोबर आहे, आपली ढाल आपले प्रतिफळ तो आहे, तरी आपण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून जीवनातील प्रत्येक आव्हानास सामोरे जाताना कमी पडतो चिंता काळज्यांनी भरलेले ओझे वाहात राहतो. 

आज या मननाच्या द्वारे देव आपल्याला पुन्हा खात्री देत आहे की, तो आपल्या बरोबर आहे, परिस्थिती कोणतीही असू द्यात भिण्याचे, चिंता काळजी करत बसण्याचे कारण नाही. देव आपले युद्ध लढतो त्यामुळे विजय आपलाच आहे. 

स्तोत्रकर्ता म्हणतो,” मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावितो; मला सहाय्य कोठून येईल ? आकाशाचा पृथ्वीचा निर्माणकर्ता जो परमेश्वर त्याज पासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही; तुझ्या रक्षकास झोप लागत नाही. पहा, इस्राएलाच्या रक्षकास  झोप लागत नाही तो डुलकीहि घेत नाही.परमेश्वर तुझा रक्षक आहे; परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्य रात्री चंद्र तुला बाधा करणार नाही. परमेश्वर सर्व आरिष्ट पासून तुझे रक्षण करील. परमेश्वर तुझे येणे जाणे आतां पासून सर्वकाळ सुरक्षित करील. स्तोत्र १२१. प्रभू येशू म्हणतो, “आपल्या डोक्यावरचे केस देखील त्याने मोजून ठेवले आहेत. लूक १२:. मग कशाला चिंता काळजीचे ओझे वाहावयाचे. देव आपले युध्द लढत आहे. ख्रिस्ती जीवन विश्वासाचे जीवन आहे. 

प्रार्थना: हे प्रभू येशू तू सदैव माझ्या बरोबर आहेस म्हणून मी तुझे आभार मानतो. जसा तू अब्रामाची ढाल बनून त्याचेसंरक्षण केले त्याला जय दिला  त्याचे सांत्वन केले तसे मलाही सांभाळ माझे युद्ध लढ मला निर्भय पणे तुझी सेवा करता यावी म्हणून माझे सहाय्य हो. येशूच्या नावाने मागतो,आमेन.

 

Enable GingerCannot connect to Ginger Check your internet connection
or reload the browser
Disable in this text fieldEditEdit in GingerEdit in Ginger×

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole