वचन:- कारण पुन्हा भ्यावे असा दासपणाचा आत्मा तुम्हास मिळाला नाही, तर ज्याच्याकडून आपण अब्बा बापा, अशी हाक मारतो तो दत्तक पनाचा आत्मा तुम्हास मिळाला आहे. रोम ८:१५.
दैहिक जीवन: दैहिक जीवन हे पापाचे गुलाम असते. शास्त्री परूशी आपल्या वांशिक हक्कावरून बढाई मारत असता येशू ख्रिस्ताने त्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले की, ” मी तुम्हांस खचित, खचित सांगतो, जो पाप करतो तो पापाचा दास आहे”.योहान ८:३४. यावरून हे स्पष्ट होते की कोणीही श्रेष्ट वंशीय आपल्या वंशामुळे किंवा कर्मकांडामुळे पापाच्या दास्यातुन मुक्त होत नाही. कारण शास्त्री, परूशी स्वतःला वांशिक दृष्टीकोनातून, ज्ञानामुळे, व त्यांच्याकडे नियमशास्त्र असल्यामुळे स्वतःला जगात सर्वश्रेष्ट समजत. परंतु येशू ख्रिस्ताने त्यांना स्पष्ट शब्दात सुनावले की तुम्ही पाप करीता त्यामुळे तुम्ही सुध्दा पापाचे दास आहात. आपल्याला सर्व मानवांमध्ये पापाचा प्रभाव दिसून येतो. पवित्र शास्त्र सांगते “सर्वांनी पाप केले आहे व ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत”. रोम ३:२३.
दैहिक जीवनाद्वारे देवाचे गौरव होत नाही, कारण देहाच्या प्रेरणा एकसारख्या वाईट असतात. उत्पत्ती ६:५ सांगते की,”पृथ्वीवर मनुष्याची दुष्टIई फार मोठी आहे आणि सदोदित त्याच्या हृदयाच्या विचारातील प्रत्येक कल्पना केवळ वाईट आहे”. ह्या वाईट कल्पना देहाच्या कर्मांना जन्म देतात. गलती ५:१९-२१ सांगते की,”देहाची कर्मे तर उघड आहेत, ती हि आहेत: व्यभिचार, जारकर्म, अशुध्दपण, कामातुरपण, मूर्तिपूजा, चेटकें, वैर, भांडणे, मत्सर, राग, तंटे फुटाफुटी, तट, हेवा, खून, दारूबाजी, विलास व या सारख्या गोष्टी याविषयीं जसे मी पूर्वी सांगितले होते, तसे तुम्हांस आणखी अगोदर सांगून ठेवतो की जे अशी कर्मे करतात ते देवाच्या राज्याचे वतन पावणार नाहीत”. ह्या सर्व देहाच्या कर्मा विषयी विचार करा आपल्या लक्ष्यात येईल की, हे सर्व कर्मे मानवी जीवनाला शापित करणारी आहेत व यातून केवळ दुःख, अशांती व भीती मानवी जीवनाला ग्रासित जाते.
आत्मिक जीवन : दैहिक जीवन हे मानवामध्ये असलेल्या पापाचा परिणाम आहे तर आत्मिक जीवन हे ख्रिस्ताद्वारे प्राप्त झालेल्या उध्दाराचा परिणाम आहे. आपल्याला माहित आहे की जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला पवित्र आत्म्याद्वारे नवा जन्म प्राप्त होतो. देवाचे वचन सांगते,”जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा, ते नवे झाले आहे.२ करिंथ ५:१७. आत्म्याच्या द्वारे प्राप्त झालेल्या ह्या नवीन जन्माचे रहश्य प्रत्येक विश्वासणाऱ्याला कळाले पाहिजे. देवाचे वचन सांगते जे देहापासून जन्मले ते देह आहे, आणि जे आत्म्यापासून जन्मले ते आत्मा आहे, या बद्दल नवल मानू नये. वारा त्याला जिकडे पाहिजे तिकडे वाहतो, त्याचा आवाज आपल्याला ऐकू येतो, परंतु तो कोठून येतो व कोठे जातो हे आपल्याला कळत नाही, जो कोणी आत्म्या पासून जन्मलेला तो तसाच आहे.योहान ३:६-८. आपण ज्ञानाच्या गोष्टी ऐकतो, आपण चिन्ह चमत्कार होताना पाहतो, आपण अनपेक्षित सहाय्य अथवा यासारख्या अनेक गोष्टी अनुभवतो व आपल्याला वाटते हे कसे घडते? हे सर्व आत्म्याचे कार्य असते तो दिसत नाही पण त्याचे कार्य आपण पाहतो.
कोंबडा आरवण्यापूर्वी ज्या पेत्राने भीतीपोटी ख्रिस्ताला तीन वेळा नाकारले तोच पेत्र आत्म्याने भरल्यावर असंख्य यहुद्यांच्या समोर धैर्याने ख्रिस्ताची साक्ष देतो व त्यातील तीन हजार लोक ज्यांच्या अंतःकरणाला पवित्र आत्मा टोचणी लावतो ते ख्रिस्ताचे अनुयायी होतात. प्रेषित २:१४, ४१. आत्म्याचे हे कार्य आपल्या ठायी आहे.
आत्मिक जीवन कसे जगावे: संपूर्ण पवित्र शास्त्र पवित्र आत्म्याच्या कार्यानी भरलेले आहे, व तोच पवित्र आत्मा आपल्या ठायी असताना आपण किती निर्भय व सामर्थ्यशाली जीवन जगावे, याचे उत्तर देताना आपल्याला ओशाळल्यासारखे होईल कारण आपण सामर्थ्याचे नाही तर भीतीने युक्त असे दुबळेपणाचे जीवन जगतो. याचे कारण आपण ख्रिस्तामध्ये प्राप्त जीवनाला गांभीर्याने घेत नाही. देवाचे वचन सांगते, जे बोध एकूण त्याची सेवा करितात त्यांची भरभराट होते व ते आपले जीवन आनंदाने जगतात, पण जे ऐकत नाहीत ते संकटात सापडतात व ज्ञानावाचून मरतात. ईयोब ३६:१०-१२. माझे लोक ज्ञान नसल्यामुले नष्ट होतात होशेय ४:६.
देहाच्या इच्छांना ठार मारा: आता आपल्याला प्रश्न पडू शकतो की, पवित्र आत्मा आपल्यामध्ये असताना आपण अज्ञानी किंवा सामर्थ्यहीन कसे असू शकतो ? तर, हा आत्मिक युध्दाचा भाग आहे हे आपण येथे समजून घ्यावे. पवित्र शास्त्र सांगते की, देह आत्म्या विरुद्व इच्छा करितो व आत्मा देहा विरुद्ध इच्छा करितो. परंतु जर आपण आत्म्याच्या इच्छेने चालू तर देहाच्या इच्छा पूर्ण करणारच नाही, गलती ५:१६-१७. आपण पाहिले की, मानवाच्या हृदयाच्या विचारातील प्रत्येक कल्पना केवळ वाईट असते”. ह्या वाईट कल्पना देहाच्या कर्मांना जन्म देतात. व यातूनच व्यभिचार, जारकर्म, अशुध्दपण, कामातुरपण, मूर्तिपूजा, चेटकें, वैर, भांडणे, मत्सर, राग, तंटे फुटाफुटी, तट, हेवा, खून, दारूबाजी, व विलासी जीवनाची भूक तीव्र होत जाते. ह्या देहाच्या इच्छाच आपल्या दुःखाला, क्लेशांना, व भयाला कारणीभूत असतात. म्हणून ह्या इच्छांना आत्म्याच्या सामर्थ्याने ठार मारा असे पवित्र शास्त्र आपल्याला सांगते. रोम ८:१३.
पवित्र आत्म्याच्या इच्छेने चाला: प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यास देवाचा आत्मा प्राप्त होतो, त्यामुळे ते देहाचे गुलाम (पापाचे ) रहात नाहीत. आता ते आत्मा आहेत, त्यामुळे त्यांना आत्म्याच्या इच्छा, प्रेरणा व मार्गदर्शन प्राप्त होते. आत्म्याच्या इच्छा देहाच्या विरुध्द असतात, देहाला भौतिक विलासी जीवनाची तीव्र भूक असते तर पवित्र आत्म्याला पवित्र जीवनाची तीव्र भूक असते. पवित्र आत्म्याची हि इच्छा पूर्ण करण्यासाठी पवित्र शास्त्र आपल्याला उत्तेजना देते की, “तुम्ही नवीन जन्मलेल्या बालकासारखे वचनरूपी निऱ्या दुधाची इच्छा धरा, यासाठीकी तुम्ही त्याच्या द्वारे तारणा पर्यंत वाढावे”. १ पेत्र २:२. येथे देवाचे वचन रिक्त होऊन स्वीकारावे असे मार्गदर्शन आहे. “तो न्यायी आहे हे जर आपल्याला माहित असेल तर जो कोणी न्यायीपण करितो तो त्याच्यापासून जन्मलेला आहे हे तुम्ही जाणता”. १ योहान २:२९. येथे न्याय जीवन जगण्याचे आव्हान आहे. ” प्रियांनो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे, आणि जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि देवाला ओळखतो” १ योहान ४:७. येथे प्रीती करण्याचे आव्हान आहे म्हणजे सर्वांचे सहन करीत, सर्वांना सांभाळून घेत, सर्वांच्या उन्नती साठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. संत पौल फिलिप्पेकरांच्या मंडळीला मार्गदर्शन करताना अगदी निक्षून सांगतो की,” शेवटी, भावांनो जे काही खरे, जे काही सन्मान्य, जे काही न्यायी, जे काही शुध्द, जे काही प्रिय, जे काही सत्कीर्तिमान आहे, जर काही सद्गुण व जर काही स्तुतिपात्र असेल तर त्यांचे मनन करा. आणि जे तुम्ही शिकला व जे तुम्ही स्वीकारले व ऐकले व माझ्या ठायी पाहिले तें आचारा; म्हणजे शांतीचा देव तुम्हांबरोबर राहील”. फिलिप्पे ४: ८-९.
पवित्र आत्मा |
पवित्र आत्म्याची मदत घ्या : देवाचे वचन सांगते,”बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याद्वारे कार्य सिद्धी होईल असे सैन्याचा यहोवा म्हणतो. जखऱ्या ४:६. भयमुक्त, आनंदी, व शांतीने भरलेले पवित्र जीवन जगण्यासाठी आपल्याला फक्त ज्ञान असून चालत नाही तर त्या बरोबर सामर्थ्याचीही गरज असते. प्रत्येक विश्वासणार्यांसाठी आनंदाची गोष्ट हि आहे की, पवित्र आत्मा आपला सहाय्यक आहे. पवित्र आत्मा आपल्या सामर्थ्याचा श्रोत आहे. प्रेषित १;८. पवित्र जीवन आचारण्यासाठी ज्या गुणांची व क्षमतांची गरज असते ते गुण व क्षमता पवित्र आत्मा आपल्याला देतो, गलती ५:२२-२३.
प्रार्थना: स्वर्गीयपित्या माझ्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मापाठवून मला आपले मुल बनवले म्हणून मी तुझे आभार मानतो. पवित्र आत्म्याच्या सहाय्याने मी पवित्र जीवन जगेल.तुझ्या कृपेने माझे जीवन यशस्वी कर, प्रभू येशू च्या नावाने मागतो. आमेन.
रेव्ह. कैलास (अलिशा ) साठे.