भुते,भूत बाधा, व उपाय.

वचन: मग त्यानें  त्या बारा जनांस एकत्र बोलावून त्यांना सर्व भुतांवर, आणि रोग बरे करायला, सामर्थ्य व अधिकार दिला. लूक ९:१ 

भूत बाधा

प्रास्ताविक: आज अनेक लोक भुतांवर किंवा अदृश्य जगावर विश्वास ठेवत नाहीत. परंतु बायबल भुतांच्या अस्तित्वाबद्दल आपल्याला खात्री देते, व त्यांच्या बद्दल अनेक गोष्टी आपण बायबल द्वारे समजूं शकतो. जर आपण या गोष्टी योग्य प्रकारे समजून घेतल्या तर आपल्याला अनेक प्रश्नांची गुंतांगुंत सोडवता येईल. चला तर मग समजून घेऊया की, बायबल भूतांबद्दल काय सांगते? 

भुते आत्मिक युद्ध करितात: ख्रिस्ती व्यक्तीला हे माहित असायला हवे की त्याचे जीवन हे आत्मिक युध्दभूमी वरील जीवन आहे. सैतान हा आपला शत्रू आहे. परंतु तो एकटाच आपल्याबरोबर आत्मिक युद्ध लढत नाही तर जे त्याच्या पेक्ष्या दुय्य्म दर्जाचे  पतित देवदूत आहेत ज्यांना देवाने त्याच्याबरोबर स्वर्गातून खाली टाकले ते त्याच्या आधीन राहून आपल्याशी आत्मिक युद्ध लढतात. त्यांना आपण दुष्ट आत्मे किंवा भुते म्हणतो. इफिस ६:११-१२ सैतानाला देवाप्रमाणे सामर्थ्य व अधिकार नाही त्यामुळे त्याला सर्ववेळी सर्व ठिकाणी कार्य करता येत नाही, तरी त्याच्या बरोबर आत्मिक युद्धात सहभागी असलेले पतित देवदूत म्हणजे भुते किंवा दुष्ट आत्मे सर्वत्र पसरलेली आहेत व ती आपल्याशी लढत राहतात.  सैतानाने त्यांना त्यांचे कार्य क्षेत्र नेमून दिलेले असते. दानीएल १०:१३. 

भुते शक्तिमान आहेत: आपण पाहिले की भुते किंवा दुष्ट आत्मे हे मेलेले माणसे नसून पतित देवदूत आहेत त्यामुळे ते शक्तिमान आहेत.आपण पाहतो की दानीएलाच्या उपास प्रार्थनेचे उत्तर घेऊन आलेल्या देवदूताला पारसाच्या राजाच्या अधिपतीने एकवीस दिवस अडवले, शेवटी मीखाएल या मुख्य देवदूताला त्याच्या मदतीला यावे लागले. दानीएल १०:१३. तारण न पावलेला, प्रभू येशूला आपले जीवन न दिलेला असा कोणीही व्यक्ती येशूच्या नावाचा उपयोग करून भुतांना घालवू शकत नाही. प्रेषित १९: १३-१६, भुते माणसे, पशू , प्राणी यांना पछाडू शकतात लूक ८:२६-३८

भुते बुद्धिमान आहेत: गरसेकरांच्या प्रदेशातील इसमास लागलेल्या भुतांनी येशू ख्रिस्ताला ओळखून विनंती केली हे आपण पाहतो, यावरून आपल्या लक्षात येते की ते बुद्धिमान असतात.लूक ;८:२६-३२. भुते माणसांना भुलवून आपले शिक्षण देतात व त्यांच्या करवी त्यांच्या शिक्षणाचा प्रसार करितात १ तिम ४:१-२

भुतांना नांवे असतात: भूतांना नावे असतात, त्यांच्या नावावरून त्यांचे व्यक्तित्व व सामर्थ्य कळते.  रात्रीचे भय, दिवसा उडणारा बाण हि सैतानी अस्र सुद्धा एकप्रकारच्या भुतांची संबोधने आहेत, तसेच काळोखात फिरणारी मरी व भर दुपारी नाश करणारी पटकी असे या दुष्ट आत्म्यांची नावे आपण पाहतो. या रोगांवरून या भुतांच्या नावाचा बोध होतो.स्तोत्र ९१:५-६. क्षयरोग, ताप, दाह, भेरडे ह्या आजारांच्या नावावरून भुतांच्या नावांचा बोध होतो. अनुवाद २८:२२, ३२:२४, अर्थात आपण आजारांवरून हे सहज ओळखू शकतो की कोणत्या भुताने किंवा दुष्ट आत्म्याने संबंधित व्यक्तीला पछाडले आहे.मार्क १:२३, ७:२५  काही भुतांना प्राण्यांची नांवे आहेत, लेवीय १७:७ मध्ये बोकड दैवत असा यांचा उल्लेख आहे. यांना रानबोकडे व वन्य पशु म्हटले आहे, हे मानवी जीवनातील कष्टला व दुःखाला कारण ठरतात यशया १३:२१-२२, ३४:१३-१५. राहब [मगर]हे समुद्रांतील श्वापद आहे. ईयोब ९:१३, २६:१२, स्तोत्र ८९:९-१०, यशया ३०:७, ५१:९,१०. जळवा हे नाव रक्तपिपासू भुतांना दाखवते नीती ३०:१५. सैन्य,डेरा,मृत्युलोक, हे सैतान, व भुतांच्या [दुष्ट आत्म्यांच्या] ठिकाणाला अथवा समूहाला दर्शवते.मार्क ५:९,१५, लूक ८:३० ईयोब १८:१४,होशेय १३:१४. मृत्यूच्या दोऱ्या, अभक्तीचे पूर हे सुद्धा सैतानाची/ भुतांची नांवें आहेत स्तोत्र १८:४. 

सैतान सुद्धा एक दुष्ट आत्मा म्हणजे भूतच आहे फक्त फरक इतकाच आहे की तो अतिशय शक्तिशाली आहे, त्यांचा मुख्य अधिपती आहे. त्याला साप म्हटले आहे , तो या सगळ्यात धूर्त आहे. उत्पत्ती ३:१, १ इति २१:१, २ करिंथ ११:३,१४ प्रक १२:९, २०:२. त्याला बालजबूल असेही नाव आहे मार्क ३:२२. परराष्ट्रीयांची दैवते १ करिंथ १०:२० प्रक ९:२०. 

भूतें व मूर्ती : पवित्र शास्त्रानुसार मूर्तीपूजा निषिद्ध आहे, कारण हि भुते / दुष्ट आत्मे / पतित देवदूत यांची पूजा आहे. पूर्वी अनेक संस्कृतींमध्ये मूर्तीना, अग्नीला, नद्यांना नरबळी देत असत, निर्माणकर्त्या पवित्र देवाच्या दृष्टीने हे ओंगळ कर्में होत. अशा कर्मांनी देव क्रोधीत होतो व अशी ओंगळ कर्मे करणार्यांना शिक्षा करितो. बायबल सांगते, मंत्र, तंत्र,जादूटोणा, चेटकी करणारे व मूर्तिपूजक यांना स्वर्गात प्रवेश नाही. प्रक २१:८, रोम १:१८-३०. स्तोत्रकर्ता म्हणतो, त्यांच्या टोळीस अग्नीने पछाडले, आगीच्या लोळाने त्या दुर्जनांस जाळून टाकले, त्यांनी होरेबात वासराची मूर्ती केली, ओतीव मूर्तीची पूजा केली, त्यांनी परमेश्वर जो त्याचे ऐश्वर्य त्याच्या ऐवजी गवत खाणाऱ्या बैलाची प्रतिमा स्वीकारली, स्तोत्र १०६: १८-२०, याच स्तोत्रात तो पुढे म्हणतो,”ते बाल-पौरावर आसक्त झाले, त्यांनी निर्जीव मूर्तीना वाहिलेले बळी खाल्ले. वचन २८, त्यांनी त्यांच्या मूर्तींची पूजा केली त्या त्यांस पाशरूप झाल्या, त्यांनी आपले पुत्र व आपल्या कन्या यांचे बळी भूतांला दिले, त्यांनी निरपराध्यांचा रक्तपात केला, म्हणजे आपले पुत्र व कन्या यांचे रक्त पाडिले; त्यांनी कनानाच्या मूर्तीस त्यांचे बळी दिले; असे करून त्यांनी रक्ताने भूमी विटाळली. म्हणून देवाच्या लोकांनी मूर्तिपूजेपासून दूर राहावे. 

भुताने पछाडलेल्या व्यक्तीत काही लक्षणे: भुताने पछाडलेल्या व्यक्तीमध्ये ते भूत राहत असते, पवित्र शास्रात भूतग्रस्त व्यक्तींची वर्णने आहेत त्यावरून असे दिसते कि; या व्यक्तींच्या शरीरामध्ये हि भुते राहतात. मत्तय ८:३१.भूत लागलेल्या व्यक्तीमध्ये अमानवीय शक्ती असल्याचे दिसून येते.त्यांच्या व्यक्तित्वात बदल होतो व मानसिक संतुलन बिघडते व असे लोक देवाच्या गोष्टीना विरोध करितात. मार्क ५:३-१५. आपण पाहिले की आजारांच्या प्रकारांवरून आपण त्या भुताला किंवा दुष्ट आत्म्याला ओळखू शकतो की त्याचे नाव काय आहे. या वरून स्पष्ट होते की हे भूतग्रस्त शारीरिक व मानसिक आजारांनी पीडित असतात. मत्तय १५:२१-२८, १७:१४-१८, मार्क ९:१४-२७, लूक ९ :३७-४२. ११:१४, मार्क ९:१८, मत्तय ४;२४, ९:३२.

भूत बाधा दूर करणे : भूत बाधा दूर करण्यासाठी अनेक प्रकारचे मार्ग लोक अवलंबताना दिसतात परंतु सर्व प्रकारच्या भूतांना घालवणारे एकच नाव आहे ते म्हणजे “येशू “नाव येशूच्या नावाने सर्व रोग बरे होतात व सर्व दुष्ट आत्मे म्हणजे सर्व भुतें निघतात. अट एकच आहे येशूच्या नावाने भुते काढणारा व्यक्ती त्याचा शिष्य असावा लागतो, त्याच्यावर विश्वास ठेवणारा लागतो, नाहीतर गोष्टी अंगलट येतात हे लक्षात घ्यावे. प्रेषित १९ १३-१६ मध्ये असे वर्णन आहे की काही बाहेरच्या लोकांनी येशूच्या नावाने भुते काढण्याचा प्रयत्न केले पण ते त्यांच्या अंगलट आले. परंतु येशूचे शिष्य मात्र सर्व प्रकारचे भुते काढू शकतात तसा अधिकार व सामर्थ्य त्यांना आहे. मार्क १६:१७-१८,लूक ९:१ प्रेषित ५:१६. विश्वासणाऱ्यांच्या अंतःकरणात पवित्र आत्मा राहतो म्हणून भुतांचे त्यांच्यावर काही चालत नाही. १ करींथ ६:१९, २ करिंथ ६:१४-१८, १ योहान ४:४ सांगते,”मुलांनो, तुम्ही देवापासून आहां आणि त्यांजवर तुम्ही जय मिळवला आहे; कारण जगात जो आहे त्यापेक्षा तुम्हात जो आहे तो मोठा आहे. तरी काही वेळेस विश्वासणाऱ्याने उपास प्रार्थनेत राहिल्याने अधिक प्रभावी कार्य होते. मत्तय १७:२१, मार्क ९:२९.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole