माझी-साक्ष:-सैतानावर-देवाने-विजय-दिला-!

 माझी साक्ष-सैतानावर देवाने विजय दिला !

माझ्या जीवनातील देवाची कृपा जी मी अनुभवत आहे.

प्रस्तावना: प्रियांनो देव आपल्या जीवनात अनेक साक्षी निर्माण करितो. बायबल सांगते आपण सर्व एका साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपण प्रत्येक ओझे व सहज अडकवणारे पाप टाकून आपल्यापुढे ठेवलेल्या धावेवरून धीराने धावावे. इब्री १२:१. हा साक्षीरूपी मेघ आपल्याला निराश होऊ देत नाही, तर प्रभुमध्ये आशेने चालण्याचे सामर्थ्य देतो. सैतानावर विजय मिळवण्यासाठी शक्ती देतो. माझ्या जीवनात अनेक साक्षी आहेत. त्या मला अंधारातून जात असताना प्रकाशासारख्या आहेत. तरी मी सध्या जी साक्ष जगत आहे तिला आपल्याबरोबर सामाजिक करितो, यासाठीकी आपण सर्व या द्वारे आशीर्वादित व्हावेत  व सैतानावर विजयी असे आपले जीवन असावे. 

पार्श्वभूमी : गेल्या काही महिन्यां पासून मी जोरदार आत्मिक युद्धातून जात होतो.देव मला जसे जसे यश देत होता तसा तसा सैतान चौताळत होता व वेगवेगळ्या प्रकारे माझ्यावर,माझ्या कुटुंबावर,व मिनिस्ट्रीवर  हल्ले करीत होता. माझे शारीरिक व मानसिक स्वास्थ बिघडवून मी हाती घेतलेल्या कामात अडखळणे आणत होता. 

उपास प्रार्थंना बंद पाडल्या: आम्ही सर्व चर्च प्रत्येक शनिवारी उपास प्रार्थना करीत होतो. परंतु आम्हीं आमच्या चर्चच्या बिल्डिंगचा उद्घाटनाच्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे दोन तीन आठवडे प्रार्थना करू शकलो नाही. मला हे स्वाभाविक वाटले की चला आता शक्य नाही तर उदघाटन झाल्यावर आपण पुन्हा शनिवारच्या प्रार्थना सुरु करू. परंतु मला एक विचित्र थकवा जाणवू लागला. मंडळीही या बाबतीत थोडी थंड झाली, व जवळजवळ आमच्या प्रार्थना बंद पडल्या. यामुळे सैतानाला खूपच जोर चढला असे मी म्हणू शकतो कारण एका शनिवारी मी अगदी थकून गेलो होतो, तरी प्रार्थनेला बसण्यासाठी चर्चमध्ये जाण्याचा विचार करीत होतो. परंतु जाऊ शकलो नाही व मला झोप लागली, तेव्हा त्याने येऊन माझ्या पोटात जोरात फाइट मारली व म्हटले खूप प्रार्थना करतो काय! त्यामुळे मी वेदनेने कण्हत उठलो, परंतु मला काहीच सुचले नाही व थोड्यावेळाने पुन्हा झोपी गेलो. यावरून लक्षात येते की आमच्या प्रार्थना व हाती घेतलेले प्रोजेक्ट अडवण्यासाठी सैतान किती पेटला होता. 

कुटुंबात आजार आणला : मी, माझी पत्नी व मुलगी सारखे आजारी पडू लागलो. कोविड मध्ये माझी शुगर वाढली असल्यामुळे खूपच त्रास जाणवू लागला. मला वाटत असे की हे कोविडचे परिणाम आहेत. कारण मला व माझ्या पत्नीला औषधें खाऊनही बरे वाटत नव्हते. त्यामुळे महिन्याच्या शेवटीच्या रात्रीची प्रार्थना सुध्दा बंद पडली. अशक्तपणा व अंगदुखीने इतका कळस केला की; कोणतेच काम करतायेईना. एका रविवारी मी नाष्टा न करता भक्ती सुरूकेली, कारण मला भक्ती वेळेत सुरु करावयाची होती. परंतु संदेशाच्या शेवटी मला इतका थकवा आला की मला मी खाली पडतो की काय असे वाटू लागले. शेवटी सूचना सांगताना काहीच सुचत नसल्याचे माझ्या लक्षात आले, त्या दिवशी कशीतरी भक्ती पूर्ण केली. 

मंडळीवर हल्ला: कोविड नंतर चर्च मध्ये एक संजीवन पहावयाला मिळू लागले.अनेक उत्साह वर्धक गोष्टी घडत होत्या. मंडळीत आत्मिक वाढ व नवीन लोकांची भर पडत होती. नवीन चर्च बिल्डिंगचे उद्घाटन झाले. प्राणी व पक्षांसाठीचा दयार्थ सेवेचा प्रोजेक्ट सुरु झाला. आता  तरुण, मुले, व महिला यांच्यासाठी योजना करीत होतो. डे केअर व प्रीस्कुलची योजनाही हाती होती. पण सैतानाने नकळत चर्च मध्ये नकारात्मकतेचा आत्मा घुसवला. गुप्तपणे मतभेद पेरले, काहीजण भविष्य सांगणे व चिन्ह चमत्काराच्या सेवाला खूप महत्व देऊन स्वतःचे उदात्तीकरण करणाऱ्यांच्या प्रयोगाला वश झाले. त्याचा परिमाण नवशिक्यांवर झाला…यापेक्षा अधिक काय सांगू खूपच वेदनादायक ह्या गोष्टी झाल्या. एका पाळका साठी मंडळी सर्व काही असते. त्या मंडळीत त्याचे भाऊ- बहिणी असतात आई-वडील असतात व लेकरेबाळेही असतात. त्याचे हे कुटुंब जेंव्हा धोक्यात येते तेंव्हा त्याचे त्यालाच माहित असते. त्याने घेतलेल्या कष्टावर पाणी ओतल्या गेले आहे, हे जेव्हा तो पाहतो तेव्हा त्याचे दुःख शब्दांत मांडण्या सारखे नसते. तसेच माझे झाले होते. सैतानाने चहुबाजूने हल्ला चढवला होता. इतरांची साथ तर सोडा पण  स्वतःचे शरीरही साथ देत नव्हते. 

प्रभू येशू माझा आश्रय, व माझा दुर्ग : वर वर्णन केलेल्या गोष्टी ह्या माझ्यावरील हल्ल्याच्या पंचवीस टक्के गोष्टी आहेत, पंचाहत्तर टक्के सांगत नाही कारण त्या सांगने प्रशस्त होणारनाही. असो, आता पर्यंत च्या आत्मिक प्रवासावरून मला हे कळले होते की या सर्वांमागे माणूस नाही सैतान आहे.आपण माणसे पाहू शकतो पण माणसांना चालवणारा सैतान असतो. त्या माणसांना हे अनेकदा कळत नाही. 

या हल्ल्यांवर विजय मिळवण्यासाठी पवित्र आत्मा मला उपवास प्रार्थना साठी मार्गदर्शन करीत होता. परंतु त्यासाठीचे धैर्य नव्हते. कारण माझा अशक्तपणा, अंगदुखी व थकवा मला इतका भारी झाला होता की उपवास व प्रार्थना ह्या बद्दल विचार करणे शक्य नव्हते. परंतु देवच माझा आश्रय, माझा दुर्ग तोच हि लढाई मला जिकून देईल याबद्दल खात्री होती. 

दैवी मार्गदर्शन : या सगळ्या परिस्थितीतून जात असताना मी देवाच्या सहाय्याची वाट पहात होतो. कोणीतरी मला  प्रार्थने द्वारे आधार व्हावे, मार्गदर्शन करावे किंवा काहीतरी दैवी सामर्थ्याने घडून यावे व मला विजय मिळावा असे सारखे वाटत होते. एक दिवस मी रस्त्यानी जात असताना मला एका आत्मिक बहिणीला भेटण्याची प्रेरणा झाली. अशी प्रेरणा मला या आधीही झाली होती; पण मी त्या बहिणीला भेटू शकलो नाही. त्या दिवशी मात्र ती मला भेटली. माझी इच्छा होती की आम्ही एकत्र प्रार्थना करावी, परंतु तिने कस चाललय असे विचारले आणि मी मनमोकळ्यापणाने सर्व परिस्थिती तिला सांगितली. तिने मला सात दिवस उपास प्रार्थनेत राहण्याचे सांगितले. मलाही तिचे म्हणणे पटले पण सात दिवस सलग उपवास करणे मला अवघड वाटत होते कारण शारीरिक बाबतीत मी खूपच थकलेलो होतो. नंतर आम्ही प्रार्थना केली; व मी तेथून निघालो; ते मी उपवास करू शकेल की नाही हा प्रश्न मनात घेऊन. 

देवाची कृपा व विजय : मी रस्त्यानी असतांनाच हा निर्णय घेतला की उद्यापासून उपास सुरु करू. कारण मला आतून खात्री झाली की देवबाप कृपा पुरवील. आणि देवाची कृपा इतकी झाली की मी उपवासाला सुरवात केली आणि अगदी पहिल्याच दिवशी ठणठणीत बरा झालो. संध्याकाळी माझ्या पत्नीला भेटलो आणि पाहतोतर काय तिला हि बरे वाटू लागल्याचे माझ्या लक्षात आले. जस जसे उपवासाचे दिवस पुढे जाऊ लागले तस तसे आत्मिक अनुभव वाढू लागले. एरवी मी पहाटे प्रार्थना करण्यासाठी उठलो तर मन लागत नव्हते, दिवसभर थकवा अनुभवायचो; आता मात्र पहाटे तीन वाजता उठलो तरी थकवा जाणवत नाही, खुपवेळ प्रार्थनेत मन लागते.दिवसा झोपायची गरज भासत नाही. दिवसभर काम करूनही थकवा येत नाही. पुन्हा शनिवारच्या प्रार्थना सुरु झाल्या आहेत. मंडळीत नवीन कुटुंबांची भर पडली आहे. माझे आत्मिक अनुभव येथे सांगणार नाही पण ते अतिशय विलक्षण आहेत.पहाटच्या प्रार्थनेत आत्म्याने भरणे, प्रार्थने साठी दैवी सहभागिता लाभणे. दुष्ट शक्ती ज्या अडखळणं होत्या त्या प्रत्येक्ष प्रगट होणे. व त्यांच्यावर निर्णायक विजय मिळवणे, वेळोवेळी आत्मिक सामर्थ्य प्रगट होणे, अशा  अद्भुत गोष्टी घडत आहेत.देवाने मार्गातील अडखळणे दूर केले आहेत. ब्लॉग लिहिण्याच्या सेवेलाही गती मिळाली आहे. लवकरच आम्ही युट्युब चॅनल सुरु करत आहोत. माझ्या घराच्या बांधकामातील अडखळणे दूर झाले आहेत आता ते अगदी शेवटच्या टप्प्यात आहे.  मंडळीत आरोग्य वाहू लागले आहे. मंडळीतील काहींना उपास प्रार्थनेच्या प्रेरणा झाल्या आहेत व काहींनी उपवास प्रार्थनेला सुरुवात केली आहे. थोडक्यात काय तर उपवास प्रार्थनेच्या द्वारे देवबाप आम्हांला सैतानावर निर्णायक विजय दिला आहे. आज हि साक्ष तुमच्या बरोबर शेअर करीत असताना माझ्या उपवासाचा  [ ५२ ] वा दिवस आहे. 

प्रियांनो, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती हा आत्मिक युद्धभूमीवर आहे, ज्या वेळी आपण प्रभू येशूचा आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकार करितो त्याच वेळी आपला नवा जन्म होतो, व तेथेच आत्मिक युद्धालाहि सुरुवात होते, अर्थात आपला शत्रू सैतान हा पराभूत शत्रू आहे. देवाने त्याला आपल्या पायाखाली दिले आहे. तरी आत्मिक युद्धात उपवास प्रार्थनेची आम्हांला गरज असते. आत्म्याने भरणे, सामर्थ्याने सेवा करणे ह्यासाठी आपण उपवास प्रार्थना करावी असे मी याठिकाणी आपणाला सांगू इच्छितो. 

रेव्ह कैलास [अलिशा ] साठे. 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole