मोह पाशा प्रमाणे आहे.
वचन: पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी सांगितले आहे कि ते खाऊ नका; त्याला स्पर्शही करू नका; कराल तर मराल. उत्पत्ती ३:२
बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी सांगितले आहे कि ते खाऊ नका; त्याला स्पर्शही करू नका; कराल तर मराल. उत्पत्ती ३:२, या वचनाची तुलना उत्पत्ती २:१६–१७ या वचनाशी करून पहा आपल्या लक्षात येईल कि देवाने केलेल्या इशारा वजा आज्ञे बद्दल हव्वा साशंक होती. सापाने विचारण्याच्या आगोदरच; तिच्या मनात बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाबद्दल आकर्षण होते, त्या आकर्षणाला आता फक्त अधिक चेतवण्याची गरज होती. सैतानाच्या हे लक्षात आले असावे म्हणून त्याने सापा करवी हव्वेच्या मनात ते फळ खाण्या बद्दल धिटाई निर्माण केली.
त्याने धूर्त पणे प्रश्न विचारताना देवाच्या प्रीती बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. त्याने स्त्रीला विचारले कि तुम्ही बागेतील कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले हे खरे काय ? उत्पत्ती ३:१. स्त्रीला वाटले कि सर्प व आपण समदुःखी आहोत व ह्याला आपल्याबद्दल खरी सहानुभूती आहे यावर स्त्रीने तिच्या मनात असलेल्या शंके बद्दल सर्पाकडून समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यासाठी तिने देवाच्या आज्ञेचा तिच्या मनाने अर्थ लावून म्हटले कि सर्व झाडाचे फळे आम्ही खाऊ शकतो पण बागेतील मध्ये भागी असलेल्या झाडाला स्पर्श देखील करू शकत नाही. तिच्या या उत्तरातून सर्पाने ओळखले कि ती देवाच्या आज्ञे बद्दल साशंक आहे, देवाबद्दल तिच्या मनात थोडीशी नाराजी आहे व बऱ्यावाईटाच्या फळा बद्दल तिला आकर्षण आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेत त्याने देवा बद्दल धांदात खोटे बोलून स्त्रीला मोहात पाडले व फसवले.
मोह हे सैतानाचे अत्यंत शक्तिशाली अश्र आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. सैतानाने येशू ख्रिस्ताला सुध्दा मोहात पाडून फसवण्याचा प्रयत्न केला होता. मत्तय ४:१–१३. म्हणून सदैव आशीर्वादीत जीवनासाठी देवाच्या वचनावर पूर्णपणे विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आपले विचार व आचार देवा पुढे सरळ असावेत. देवाने आपल्याला असेच निर्माण केले आहे, पण आपण मोहात पडून चुकीच्या कल्पना करतो व शेवटी पापात पडतो. उपदेशक ७:२९. म्हणून देवावर मनापासून भाव ठेवा आपल्या बुध्दीवर अवलंबून राहू नका. नीती ३:५.
प्रार्थना: प्रभू येशू तू मला पापापासून सोडवले, शाप मुक्त केले म्हणून मी तुझे आभार मानतो, मला पूर्णपणे तुला अनुसरण्यास सहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो आमेन.