“यशाचा राजमार्ग” स्तोत्र १:३.

यशस्वी जीवनाचे रहस्य 

वचन:जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे  आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, आशा झाडा सारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.  स्तोत्र १:३.

प्रस्तावना: नितळ स्वच्छ पाण्याचा प्रवाह, सुंदर पानाफ़ुलांनी व रसाळ फळांनी डवरलेले झाड. आणि संथ स्वच्छ वाहणारा थंडगार वारा.हे दृश्य फक्त डोळ्यां समोर आणा तुमचे मन प्रसन्न होईल.इतके ऐश्वर्य व सात्विकता दुसरीकडे शोधूनही सापडणार नाही. जी धार्मिकांच्या ठायी असते.येशूवर विश्वास ठेवणारा असाच आहे.त्याचे हे ऐश्वर्य तो मुक्तपणे उधळत इतरांना सुखी आणि आनंदी करण्याचा प्रयत्न करीत असतो.विश्वासणारा जे काही हाती घेतो ते सिध्दीस जाते.आपण हे ठाम पणे म्हणू शकतो कि येशुवरील विश्वास हा यशाचा मार्ग आहे. परंतु, हा विश्वास कसा असावा हे आपण पाहू.

दुर्जनांपासून दूर रहा : खरा विश्वासणारा दुर्जनांपासून दूर राहतो. आपल्याला माहित आहे कानांनी लोकांच्या  दुष्टपणामुळे  देवाने तो देश इस्राएल राष्ट्राला दिला. इस्राएल राष्ट्र जेव्हा हा देश यहोशवाच्या नेतृत्वाखाली जिंकून घेत होते, तेव्हा यहोशवाने त्यांना दिलेल्या इशारावजा सूचनेकडे लक्ष द्या. तो इस्राएल राष्ट्राला इशारा देताना म्हणतो, तुम्ही जर या दुष्ट लोकांच्या संगती सहभागिता ठेवाल,त्यांच्याशी जोडल्या जाल तर तुमचा नाश होई पर्यंत हे लोक तुमच्यासाठी पाश व सापळा, व तुमच्या कुशीवर छडी, व तुमच्या डोळ्यात काटे अशी होतील. यहोशवा २३:११-२३.  दुष्ट लोक कधीही कोणासाठीही आशीर्वादाचे कारण होऊ शकत नाहीत. नीतिसूत्रे २२:२९ सांगते,”जो आपल्या धंद्यात निपुण आहे अशा मनुष्याला तू पाहिले काय? तो राजांसमोर  राहील, तो हलकट माणसांसमोर उभा राहणार नाही. प्रेषित योहान यावर अधिक सखोल प्रकाश टाकताना सांगतो ,” प्रियांनो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत या विषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे भविष्यवादी जगात निघाले आहेत.” १ योहान ४:१. 

देवाच्या वचनाला प्रिय माना: दावीद राजा म्हणतो,  “अहा, मी तुझ्या नियमशास्त्रावर किती प्रीती करतो ! सारा दिवस ते माझे ध्यान आहे. स्तोत्र ११९:९७, “मी तुझ्याआज्ञा सोन्यापेक्षा, उत्कृष्ट सोन्यापेक्षाही, प्रिय मानतो.” स्तोत्र ११९: १२७. हेच दावीद राजाच्या यशस्वी जीवनाचे रहस्य आहे. तो म्हणतो,” नियमशास्त्रावर प्रीतीकरणाऱ्यांना मोठी शांती आहे, आणि त्यांना काहीच अडखळण नाही. स्तोत्र ११९: १६५.  

देवाच्या वचनाला अंगिकारा: देवाचे वचन नुसते माहित असून चालणार नाही,  भिंतीची शोभा वाढावी म्हणून भिंतीवर टांगून चालणारनाही. काही लोक घरात वचन किंवा क्रोस यासाठी लावतात की त्यांना वाटते त्यामुळे अंधाराच्या शक्तीचा प्रादुर्भाव होणार नाही. परंतु देवाचे वचन सांगते,जे मार्गात सरळ आहेत, जे यहोवाच्या नियमशास्त्रात चालतात ते सुखी आहेत” स्तोत्र ११९:१. दावीद राजा म्हणतो ,” हे देवा तुझे वचन माझ्या पावला साठी दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश आहे. स्तोत्र ११९:१०५.पवित्र शास्त्राचे वाचन, चिंतन, मनन, करून प्रभू येशूची इच्छा जाणून घेऊन त्याप्रमाणे जीवन जगण्याचा तो प्रयत्न करतो.त्यामुळे परमेश्वराचे आशीर्वाद त्याच्या साठी यशाचे मार्ग प्रशस्थ करतात व जीवनाचा प्रवास सुखद होतो.

प्रार्थना: हे प्रभू येशू मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तुझे वचन माझे अन्न पाणी होऊ दे मी तुझ्या वचनात रमू इच्छितो, व तुझ्या इच्छेनुसार चालू इच्छितो. माझे सहाय्य हो.येशूच्या नावाने मागतो.आमेन.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole