राखेचा बुधवार [ लेंट ]

                                                        

चाळीस दिवसांच्या उपवासाची सुरुवात राखेच्या बुधवार पासून होते. पुनरुत्थानाच्या दिवसाच्या  साडेसहा आठवडे अगोदर हा दिवस येतो. ४६ दिवसाच्या या समयात ६ रविवार येतात. रविवार विजयी दिवस आहे त्या दिवशी प्रभू येशूने मृत्यूवर विजय मिळवला व तो पुनरुत्थित झाला म्हणून हा दिवस चर्च मध्ये भक्तीचा दिवस मानण्यात आला आहे. या दिवशी उपवास केल्या  जात नाही, म्हणून ४६ दिवसातील सहा रविवार कमी होतात व ४० दिवस उपवासाचे उरतात. 

लेंट म्हणजे प्रार्थनेचा, पश्चातापाने देवाकडे वळण्याचा, त्याग व चांगल्या कार्याचा समय अशी मान्यता आहे. तरी या बद्दल अनेक मते  मतांतरे आहेत. काहींच्या मते या समयातील उपवास, मांसाहार न करणे, दाढी वाढवणे, पायात चप्पल न घालणे, व अशा बऱ्याच कर्मकांडांचा समावेश जगातील वेगवेळ्या सांस्कृतिक प्रभावामुळे झाला आहे व तो मुख्यतोकरून कॅथोलिक पंथाकडून समाविष्टीत केला गेला आहे. कॅमब्रिज इंग्लिश डिक्शनरी लेंट ची व्याख्या पुढील प्रमाणे करते, ” ख्रिस्ती धर्मात, इस्टर च्या अगोदर ४० दिवस धार्मिक कारणासाठी काही लोक त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करण्याचे बंद करतात”. या व्याखेत काही तथ्य आहे असे आपल्याला म्हणता येईल परंतु हि व्याख्या अगदीच तोडकी आहे व अर्थ शून्य आहे . अशाच अपूर्ण चित्रीकरणातून काही समज गैरसमज निर्माण झाले आहेत. काहींचे तर अगदी स्पष्ट मत आहे की याचा बायबलशी काहीही संबंध नाही कारण बायबल मध्ये किंवा पहिल्या मंडळी मध्ये या गोष्टीचा उल्लेख झालेला नाही. कर्मकांडाच्या व्दारे शुद्धीकरण होत नाही. येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आपण शुध्द झालो आहोत. अशा प्रकारे वेगवेगळ्या मंडळ्यांमध्ये या लेंट विषयी वेगवेगळी मत प्रवाह व तो पाळण्याचे वेगवेगळे प्रघात आहेत. तरी, झावळ्यांचा रविवार,मोंदी गुरुवार, गुडफ्रायडे, व पुनरुत्थानाच्या रविवार [इस्टर संडे ] सर्वच मेनलाईन चर्च  पाळताना दिसतात. 

लेंटची ऐतिहासिक पार्श्वभूमी : लेंट या शब्दाचा थेट उल्लेख प्रेषितांची कृत्य अथवा प्रेषितांच्या पत्रांमध्ये आढळत नाही, तरी याची सुरुवात प्रेषितांच्या काळापासून झाली असल्याची मान्यता आहे. मात्र याला सार्वत्रिक अधिकृत मान्यता प्राप्त होण्यास उशीर लागला. सेंट इरेनियस [ इ.स.२०३ ]  यांनी त्यांच्या एका पत्रात पूर्वे कडील मंडळी व पश्चिमेकडील मंडळी यांच्या लेंट पाळण्याच्या पद्धतीत फरक असल्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी इस्टरच्या उत्सवाच्या तयारीचा काळ असा याचा उल्लेख केला आहे. यावरून स्पष्ट होते की पुनरुत्थानाचा सण मंडळी अगदी सुरुवातीपासून पाळत आहे. पुढे काळाच्या ओघात काही बदल होत गेले हे मात्र सत्य आहे. 

लेंटचा अध्यात्मिक आधार : सेंट इरेनियस यांच्या पत्रावरून हे स्पष्ट होते की लेंटचा काळ हा पुनरुत्थानाच्या रविवारच्या उत्सवाच्या तयारीचा काळ आहे. हि तयारी का व कशी ? असा प्रश्न जर आपण उपस्थित केला तर असे लक्षात येते की, मानवी जीवनाला फार मोठा अर्थ व आशा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने दिली आहे. संपूर्ण मानव जात “मृत्युनंतर काय “? या प्रश्नात अडकली होती. मृत्यू नंतर जीवन आहे की नाही ? मृत्यू नंतर सर्व काही जर संपत असेल तर हे जीवन किती निरर्थक आहे असे वाटणे साहजिक आहे. त्यामुळे मानव सातत्याने आध्यात्मिक मार्गाने या विषयीचा शोध घेत होता. यातूनच स्वर्ग, नरक, पुर्नजन्म, अशा कल्पना पुढे आल्या परंतु त्या मृत्यू नंतरच्या जीवनाची खात्री करून देणाऱ्या नव्हत्या. प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान हे ऐतिहासिक सत्य आहे, त्यामुळे त्याची शिकवण त्याच्या विषयीची अभिवचनें ह्या सर्वच गोष्टी जगिक तत्वज्ञानाच्या पलीकडचे सत्य प्रगट करणाऱ्या ठरल्या. त्यामुळे सुवार्तेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकास अलौकिक सामर्थ्याचा अनुभव तर आलाच पण त्या बरोबर त्यांना आपल्या उध्दाराची खात्रीही पटली. त्यामुळे प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा दिवस त्यांच्या साठी किती महत्वाचा असावा याची आपण कल्पना करू शकतो. 

प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा उत्सव उद्धाराच्या खात्रीवर आधारलेला आहे: आपण मनुष्य डोळ्याने पाहिल्या शिवाय खात्रीपूर्वक विश्वास ठेवू शकत नाही. परंतु , एखादा खात्री झाली की त्या मार्गावर चालताना पूर्णानंद तर अनुभवतोच पण त्याच बरोबर सर्वस्वाचा त्याग करत तन, मन, व धनाने त्याला अनुसरतो. हीच गोष्ट आपल्याला पवित्र शास्त्रात पहावयास मिळते. 

मरीयेला झालेली उध्दाराची खात्री : प्रभू येशू ख्रिस्ताची आई मरीया हिचा अनुभव तिच्या व स्त्री जातीच्या उध्दाराची खात्री करून देणारा होता. तिने प्रत्येक्ष देवदूताला पहिले. तो जे तिच्याशी बोलला ते फारच उत्साहवर्धक व भीतीदायक होते. उत्साहवर्धक होते कारण देवदूताने तिला सांगितले होते की जगाचा तारणहार तिच्या पोटी जन्म घेणार होता, व भीतीदायक होते कारण तिच्या लग्नाअगोदर हे तिच्या बरोबर घडणार होते. यहुदी संस्कृती मध्ये अशी मान्यता होती की वागदत्त मुलगी लग्नाआधी गरोदर असलेली आढळून आल्यास व्यभिचाराच्या पातकासाठी तिला मृत्यू दंड देण्यात यावा. तरी तीने हि जोखीम पत्करली कारण प्रत्येक्ष देवदूताने तिला हा संदेश दिला होता. देवदूताच्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देताना ती म्हणते,”पहा मी प्रभूची दासी, मला तुझ्या वचनाप्रमाणे होवो. व जेव्हा ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गरोदर राहिली तेव्हा तिचा आनंद गगनात न मावणारा होता. जगातील कोणत्याच स्त्रीने जो अनुभव घेतला नव्हता तो ती अनुभवत होती. म्हणून पूर्ण खात्रीने ती म्हणते,” माझा जीव प्रभूला थोर मानतो’ आणि ‘देव जो माझा तारणारा’ त्याज मुळे माझा आत्मा ‘उल्लासला  आहे,’ कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे; पहा, आता पासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील”. पुढे घडणाऱ्या गोष्टींबद्दल भविष्यवाणी करताना ती म्हणते,”त्याने आपल्या बाहुने पराक्रम केला आहे; त्याने गर्विष्टIची त्यांच्याच अंतःकरणाच्या कल्पनेने दाणादाण केली आहे. त्याने अधिपतीस राजासनावरून काढले आहे व दिनास उंच केले आहे. भुकेलेल्यास त्याने उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे. व धनवानास रिकामे लावून दिले आहे”. हे जे ती स्वतःच्या, स्रियांच्या, व दिन दुबळ्यांच्या उद्धारा बद्दल खात्रीने सांगत आहे व त्यासाठी कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची तिची तयारी आहे याचे कारण तिने प्रत्येक्ष घेतलेला अनुभव जो मानवी क्षमतांपलीकडचा होता. तो तिला दैवी गोष्टींवर विश्वास ठेवण्यास अतिशय स्फूर्तिदायक होता. 

प्रेषितांना झालेली उध्दाराची खात्री: जसा मरीयेचा अनुभव अलौकिक आहे तसाच प्रेषितांचा अनुभव हि अलौकिक आहे. त्यांनी वधस्तंभावर मृत्यू पावलेला प्रभू येशू पहिला होता, त्याला पुरलेले पाहिले होते, व तिसऱ्या दिवशी जिवंत झालेला प्रभू येशू सुध्दा त्यांनी पहिला होता.लूक २४: ३६-४३. त्यांच्यापैकी एक शिष्य थोमा त्या ठिकाणी उपस्थित नव्हता तेव्हा तो म्हणाला नाही मी प्रत्येक्ष प्रभूला पाहीन त्याच्या हातातील खिळे ठोकलेले व्रण पाहीन व त्यात बोट घालील व त्याच्या भाला भोकसलेल्या कुशीला पाहिल व तिच्यात माझा हात घालून पाहीन तेंव्हाच विश्वास ठेवील. प्रभू येशूने तसेच केले त्याची प्रत्येक्ष भेट घेतली त्याला हातावरील व्रण व भाला भोकसलेली त्याची कूस त्याला हवी तशी दाखवली, तेव्हा तो म्हणाला माझा  प्रभू माझा  देव. योहान २०: २४-२८. या अद्भुत अनुभवाने त्याला प्रभू येशूच्या शिकवणी बद्दल त्याने दिलेल्या अभिवचनांबद्दल पूर्ण खात्री दिली, तेव्हा सुवार्तेसाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास तो तयार झाला. त्याने भारतात सुवार्तेची मुहूर्तमेढ रोवली व येथेच रक्तसाक्षी झाला. 

मरीयेचा व प्रेषितांचा हा आत्मिक, अध्यात्मिक व अलौकिक अनुभव त्यांना देवाच्या अस्तित्वाची, त्याच्या सामर्थ्याची व विश्वासणार्यांचे पुनरुत्थान झाल्यावर त्यांच्यासाठी  असलेल्या सार्वकालिक जीवनाची खात्री देणारा होता. संत पौल सुवार्तेच्या सत्यतेचे व मृतांच्या पुनरुत्थानाचे समर्थन करताना याच गोष्टींवर भर देतो की, ख्रिस्त धर्मशास्त्राप्रमाणे सर्वांच्या पापासाठी मेला, तो पुरल्या गेला व धर्मशास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी उठविला गेला. तो प्रेषितांना, नंतर तो पाचशे पेक्ष्या अधिक बंधूंना दिसला, व सर्वात शेवटी तो त्यालाही दिसला.१करिंथ १५. 

प्रेषितांनी या गोष्टी प्रत्येक्ष अनुभवल्यामुळे ख्रिस्तावरील विश्वासाने पापक्षमा, व सार्वकालिक जीवनाची सुवार्ता ते मोठ्या धैर्याने गाजवत गेले, हे सत्य जगाला सांगत असताना त्यांना आपले प्राण गमवावे लागले तरी ते मागे हटले नाहीत. कारण त्यांना ख्रिस्तावरील विश्वासाने मिळणारे सार्वकालिक जीवन हवे होते. 

यावरून स्पष्ट होते की ख्रिस्ताच्या पुनुरुत्थानाचा दिवस प्रेषितांसाठी व पहिल्या मंडळ्यांसाठी किती महत्वाचा असेल व तो दिवस ते किती उत्साहाने साजरा करीत असतील. आत्मिक दृष्टीकोनातून विचार करिता हे नक्कीच म्हणता येईल की ते स्वतःला सुवार्तेसाठी उपवास प्रार्थनेच्या व्दारे अधिक समर्पित करीत हा पुनुरुत्थानाचा उत्सव साजरा करीत असतील. 

अध्यात्मिक सुव्यवस्था : सुवार्तेवर विश्वास ठेवून अनेक लोक प्रभू येशूकडे वळले, ते वेगवेळ्या भौगोलिक, भाषिक व सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलेले असल्यामुळे. आत्मिक गोष्टींकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोण देखील भिन्न होता. त्यामुळे मंडळ्यांमधील भक्ती, तारण, देव, विश्वास, ख्रिस्त या व अशा प्रकारच्या आध्यात्मिक गोष्टींबद्दलचे योग्य ज्ञान मंडळ्यांना प्राप्त होण्याची आणि विश्वासात, आचरणात, व भक्तीमध्ये सार्वत्रिक सुव्यवस्था असण्याची गरज निर्माण झाली. पुढे इ.स.३१२ मध्ये कॉन्स्टनटाईन या रोमी सम्राटाने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेऊन ख्रिस्ती विश्वासाला अधिकृत मान्यता दिली. व मंडळ्यांमध्ये सार्वत्रिक सुव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून इ.स. ३२५ मध्ये त्याने पहिल्या धर्म सभेचे आयोजन नायसिया येथे केले. व येथे पुनुरुत्थानाचा उत्सव कसा साजरा करावा या बद्दलचीहि अधिकृत बोलणी झाली. पुढे यात बदल होत गेले व आज आपण इस्टर जे स्वरूप पाहात आहोत ते या प्रक्रियांचा परिपाक आहे. 

चाळीस दिवस उपवास : चाळीस दिवसाचे उपवास हा पूर्णपणे पवित्र शास्त्रीय दृष्टीकोण आहे. देवाने इस्राएल राष्ट्राला नियमशास्त्र दिले त्यावेळी सीनाय पर्वतावर मोसे चाळीस दिवस व चाळीस रात्र होता त्यावेळी त्याने अन्न पाणी ग्रहण केले नाही. निर्गम ३४:२८. एलीया संदेष्टा चाळीस दिवस व चाळीस रात्री काहीही न खाता पिता देवाचा डोंगर होरेब येथवर चालत गेला व तेथे त्याला देवाचे वचन प्राप्त झाले. १ राजे १९: ८. प्रभू येशू आपली सेवा प्रत्येक्ष आरंभण्या पूर्वी चाळीस दिवस व चाळीस रात्री उपवासी राहिला. मत्तय ४:२. ह्या पवित्र शास्त्रीय आधारांना लक्ष्यात घेत, पुनरुत्थानाच्या रविवारच्या अगोदर चे चाळीस दिवस उपवासासाठी  योजिले. यात हेतू हाच की विश्वासणाऱ्याने देवाच्या अधिक जवळ जावे. स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करीत प्राप्त सार्वकालिक जीवनासाठी व सुवार्तेच्या कार्यासाठी स्वतःला अधिक समर्पित करणे व प्रभू येशूच्या प्रति आपली कृतज्ञता व त्याच्या वरील विश्वास व्यक्त करीत पुनुरुत्थानाचा आनंद लुटणे. 

राख व उपवास : पवित्र शास्त्रात अनेकदा आपल्याला पहावयास मिळते की देवाकडे आक्रोश करताना किंवा पश्चातापाने त्याच्याकडे वळताना लोक अंगावर राख उधळून घेत, अंगाला राख फासत किंवा गोणताट नेसून राखेत बसत. या वरून एक लक्ष्यात येते की राख हे पश्चातापाचे प्रतीक आहे. काही मंडळ्यात मागील वर्षाच्या झावळ्या जाळून त्याची राख करितात व राखेचा बुधवार म्हणजे चाळीस दिवसाच्या उपवासाचा प्रारंभ होतो त्या  दिवशी त्या राखेने कपाळावर क्रुसाचे चिन्ह काढतात. परंतु कृपा पावलेल्या विश्वासणाऱ्यांसाठी, ख्रिस्ताच्या शरीराचे अंग म्हणजे मंडळींचा भाग असलेल्या विश्वासणाऱ्यांसाठी [ ख्रिस्तींसाठी ] असे करणे किती योग्य आहे हा संशोधनाचा भाग आहे. त्याच प्रमाणे पुनरुत्थानाच्या रविवारच्या उत्सवाची तयारी करताना, चाळीस दिवसात स्वतःचे देवाच्या गौरवासाठी समर्पण करणे हा मूळ उद्धेश बाजूला सारत वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलेल्या उपवासाच्या संकल्पना व कर्मकांड यांचा समावेश करून आपण मंडळींसाठी आंधळे वाटाडी तर झालो नाहीना याचाही विचार करणे आवश्यक आहे. 

तरी पुनरुत्थानाच्या रविवारचे महत्व निर्विवाद आहे. मंडळीने अनावश्यक ते बाजूला सारून, कृपेने प्राप्त झालेल्या उध्दाराचा मनमुराद आनंद लुटावा, व गांभीर्याने आपले आत्मिक जीवन जगावे. राखेच्या बुधवारपासून चाळीस दिवसाच्या उपवासाची सुरुवात होते, नंतर शेवटच्या पवित्र सप्ताहाची सुरुवात झावळ्यांच्या रविवाराने होते, त्यानंतर मोंदी गुरुवार, गुडफ्रायडे व शेवटी पुनरुत्थानाचा रविवार [ इस्टर संडे ]. या प्रत्येक टप्प्यावर आपण प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या  उद्धाराच्या कार्याचे साक्षीदार होतो व स्वतःच्या उध्दाराचा आनंद साजरा करीत या जगाला सुवार्ता गाजवतो, हे आपण येथे लक्ष्यात घेऊ, बाकी प्रभू सर्व जाणतो. 

रेव्ह. कैलास [आलिशा ] साठे. 


source : 

https://dictionary.cambridge.org/dictionary/english/lent

डेनिस जे मॉक,”ख्रिस्ती मंडळीच्या इतिहासाचा आढावा” अटलांटा, जॉर्जिया एप्रिल १९८९. पान नं. ७३-८०.

https://www.christianity.com/church/church-life/what-is-ash-wednesday-why-do-christians-celebrate-it.html

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole