तुमचा मोठा आशीर्वाद
वचन: मी तुला अत्यंत फलसंपन्न करीन; तुझपासून मी राष्ट्रे निर्माण करीन, तुझं पासून राजे उत्पन्न होतील. उत्पत्ती १७:६
देवाने अब्राहामाला दिलेल्या आशीर्वादानं मध्ये हा खूप महत्वाचा आशीर्वाद आहे. कारण आपण सर्व ख्रिस्ती या आशीर्वादाचे भागी आहोत. देवाने अब्राहामाला अभिवचन दिले कि त्याच्यापासून राजे उत्पन्न होतील. याचा अर्थ तो आपला आत्मिक पिता असल्यामुळे आपण जे ख्रिस्ती आहोत त्या आपणा पासून राजे उत्पन्न होतील. आता हि किती मोठी गोष्ट आहे हे समजण्यासाठी राजे म्हणजे काय हे आपल्याला समजले पाहिजे.१) राजा म्हणजे उत्तम व्यवस्थापक, जो देशातील साधन संपत्तीचा व्यवस्थित विनियोग करू शकतो. २) राजा म्हणजे कधीही न संपणारा आशीर्वाद, वडिलांप्रमाणे तो जनतेवर व आपल्या शत्रूवरही प्रेम करतो. ३) राजा म्हणजे सल्लामसलत घेणारा, सर्वांचे ऐकणारा विरोध करणार्यांचा
किंवा विरोधी मत मांडणार्यांचा सन्मान करणारा ४) सर्वांचे ऐकल्यावर सद्यस्थितीला ओळखून योग्य निर्णय योग्य वेळेत घेणारा. तो निर्णय सर्वांच्या हिताचा व दूरगामी परिणाम घडवून आणणारा असेल क्षणिक हीत हे राजाचे लक्ष नसते. ५) राजा ऐक्य व आनंदाचा भुकेला असतो. म्हणजे सर्वात ऐक्य असावे व सर्व जण आनंदित असावेत हे त्याचे ध्येय असते.६) त्याचे स्वप्न व निर्णय यात तफावत नसते त्यासाठी तो जागृतपणे, प्रत्येक गोष्टीचे तंतोतंत पालन करून सातत्यपूर्णतेने कार्यरत असतो. ७) राजाला दैवी देणग्या असतात, तो आत्मविश्वासाने भरपूर व आनंदी व नवनिर्मितीची क्षमता असणारा असतो. ८) राजा हा देवाच्या अधीन असतो तो त्याच्या मार्गदर्शनानुसार चालतो. म्हणून त्याला पृथ्वीवर देवाचे प्रतिरूप मानले जाते. आता विचार करा तुमच्या माझ्या पोटी कोणी जन्म घेतला आहे किंवा घेणार आहेत . राजेच ना ! त्यांची काळजी घ्या, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांना देवाच्या अभिवचनानुसार मार्गदर्शन करा. ते मस्तक आहेत अनुवाद २८:१३.
प्रार्थना हे प्रभू येशू तू आम्हाला मस्तक बनवले आहे म्हणून मी तुझे आभार मानतो. आम्हाला व आमच्या येणाऱ्या पिढयांना हे कळू दे कि ते पुढारी आहेत, देवराज्याची मूल्य समाजात रुजवणारे
व सर्वांसाठी ते आशीर्वाद आहेत, त्यांना तू अभिषेक कर. येशूच्या नावाने मागतो आमेन.
रेव्ह कैलास [अलिशा ] साठे .
प्रभू मध्ये सर्व भेद संपतात
वचन: या पुढे तुझे अब्राम हे नाव घेणार नाहीत, तुझे नाव अब्राहाम असे घेतील, कारण मी तुला राष्ट्रसमूहाचे जनक केले आहे. उत्पत्ती १७:५.
देव अब्राम च्या जीवनात विशेष असे कार्य करायला जात असताना त्याने त्याचे नाव बदलले. व त्या नावाबरोबर आशीर्वाद उच्चारला. या पाठीमागे काय रहस्य आहे माहित नाही. पण आई वडील किंवा आध्यात्मिक माता पिता अशा प्रकारे नाव बदलून आशीर्वाद उच्चारताना व आशीर्वाद देताना आपण पाहतो व त्याचे चांगले अनुभवही आहेत. असो, अब्राम या नावाचा अर्थ मोठा बाप असा होतो. पण देव म्हणतो कि आता तुला अब्राहाम असे म्हणतील याचा अर्थ पुष्कळ राष्ट्रांचा बाप. देवाच्या योजनेला सकारात्मक प्रतिसाद देणे किती धन्यता प्रदान करू शकते याचा येथे विचार करावा. अब्राम पंच्चाहत्तर वर्षाचा होता पण त्याला अपत्य नव्हते पण त्याच्या नावाचा अर्थ होता मोठा पिता त्याचा जीवन प्रवास सुद्धा अतिशय खडतर होता उत्पत्ती ११:३१–३२. परंतु जेंव्हा त्याला देवाचे पाचारण झाले व तो त्या पाचारणाला सकारात्मक प्रतिसाद देत चालू लागला तेव्हा त्याने प्रत्येक पावलावर देवाचे संरक्षण, मार्गदर्शन व आशीर्वाद प्राप्त केले. आता त्याच्या विषयीच्या योजनेचा कळस दिसत आहे. देव त्याला पुष्कळ राष्ट्रांचा बाप करत आहे. राष्ट्र म्हणजे असा लोकसमूह कि ज्याची संस्कृती, भाषा, वंश, एक आहे. उदाहरण घायचे तर, ‘देवाने मिसर देशात इस्राएल राष्ट्राची निर्मिती केली होती, तेथे त्यांना त्यांची भूमी नव्हती.
त्याचप्रमाणे आपल्या देशात फाळणीच्या वेळी आपल्या देशात द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला होता कि भारतात हिंदू व मुसलमान अशी दोन राष्ट्रे आहेत. या वरून लक्षात घ्या कि राष्ट्र म्हणजे धर्म, संस्कृती, व भाषेने वेगळा लोक समुदाय. देव अब्राहामाला पुष्कळ राष्ट्रांचा पिता करणार होता याचा अर्थ भिन्न लोक समुदाय अब्राहामाच्या द्वारे जोडल्या जाणार होती त्यांच्यातील भेद नष्ट होऊन ते स्वर्गीय देवासाठी एक वंश होणार होती. त्याच्या द्वारे मिळणाऱ्या पितृत्वाने आशीर्वादित होणार होती. धन्य आहेत ते सर्व जे देवाच्या पाचारणाला योग्य प्रतिसाद देतात. रोम ४:१३–१५.
प्रार्थना: हे प्रभू येशू तुझ्या वरील विश्वासाने मला अब्राहामाचे आशीर्वाद प्राप्त झाले म्हणून मी तुझे आभार मानतो. माझ्या पाचारणाला योग्य प्रतिसाद देण्यास मला सहाय्य कर येशूच्या नावाने मागतो , आमेन .
रेव्ह . कैलास [अलिशा ] साठे .