भिऊ नका स्थिर राहा
वचन:
मग मोशेने आपला हात समुद्रावर लांब केला, तेंव्हा यहोवाने पूर्वेच्या वाऱ्याकडून समुद्र मागे हटवला आणि
समुद्राची कोरडी जमीन केली आणि जले दुभंगली. निर्गम १४:२१ स्तोत्र ७८:१३
हेतू हा कि मिसरी लोकांना यहोवाची ओळख व्हावी व फारो व त्याच्या सैन्याने त्याचा सन्मान करणे शिकावे. या साठी देवाने मोशेला ज्या सूचना दिल्या होत्या त्या प्रमाणे त्याने इस्राएल लोकांना लाल समुद्राच्या कडेला आणले व पी–हहीरोथाजवळ बाल –सफोना समोर तळ देण्यास सांगितले. इकडे देवाने फारोचे मन त्यांच्या विषयी पुन्हा कठीण केले त्यामुळे त्याने निवडक सहाशे रथ व मिसरातील सारे रथ व त्या सर्वांचे
सरदार बरोबर घेतले आणि इस्राएलाच्या पाठीस लागला. इस्राएल लोक पी–हहीरोथाजवळ बाल –सफोना समोर तळ देत असताना फारोच्या सैन्याने त्यांना गाठले. जेव्हा फारोचे सैन्य जवळ आले तेव्हा इस्राएल लोक खूप घाबरले. मृत्यू त्यांच्या
समोर उभा होता व ते देवाकडे आरोळी करीत होते त्याच बरोबर ते मोशेला दोष देऊ लागले. मोशेला माहित होते कि देवानेच हे करायला सांगितले आहे त्यामुळे तो सर्व काही व्यवस्थित करिन. म्हणून तो इस्राएल लोकांना सांगण्याचा प्रयत्न करीत होता कि देव आपले संरक्षण करिन. हि लढाई देवाची आहे तुम्ही उगे राहा. पण इस्राएल लोक घाबरून गेलेले असल्यामुळे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी मोशेलाही काही सुचेना तोही देवाकडे आरोळी मारू लागला. परिस्थिती गंभीर होत चालली होती. फारो त्याच्या सैन्यासह अगदी जवळ येऊन ठेपला होता. त्याचा क्रोध गगनाला भिडला होता. अगदी टोकाची स्थिती निर्माण झालेली असताना. देवाने परिस्थितीचा ताबा घेतला. तो मोशेला म्हणाला, मला का हाक मारतोस इस्राएलाच्या संतानांना सांग पुढे चाला. तू आपली काठी उचल आणि समुद्रावर आपला हात लांब
करून त्याला दुभांग. मग इस्राएलाची संताने कोरड्या भूमीवरून भूमी वरून जातील. मी फारोचे मन कठीण करिन त्याला नेमके काय घडत आहे हे कळणार नाही व तो हि समुद्रात इस्राएलाच्या मागे येतील. मग मी फेरो, त्याचे सैन्य, त्याचे रथ व घोडे यांच्याकडून सन्मान पावेन व मिसरी लोकांना कळेल कि मी यहोवा देव आहे.
आणि मग असे झाले कि देवाचा दूत जो मेघ स्तंभाने इस्राएलाच्या पुढे चालला होता तो त्याच्या मागे म्हणजे फारोचे सैन्य व इस्राएल लोक यांच्या मध्ये उभा राहिला. त्याने मिसरी लोकांनाच्या बाजूला गडद अंधार निर्माण केला व इस्राएलाच्या बाजूला प्रकाश दिला. त्यामुळे फारोचे सैन्य पुढे येऊ शकले नाही . रात्रभर हीच परिस्थिती राहिली. इकडे मोशेला सांगितल्या प्रमाणे त्याने हातात काठी घेऊन समुद्रावर हात उगारला आणि देवाने पूर्वे कडून जोरदार वारा
वाहविला व समुद्रात कोरडी भूमी निर्माण केली व इस्राएल लोक कोरड्या भूमीतून पुढे चालू लागले तेव्हा दोन्ही बाजूला समुद्राचे पाणी भिंती प्रमाणे उभे राहिले. इस्रायलचा समुद्रातील प्रवास संपताच फारोचे सैन्य समुद्रात त्यांचा पाठलाग करू लागले. ते सर्व त्यांच्या रथांसह व घोड्यांसह समुद्रात मध्यभागी आले तेव्हा पहाटची वेळ होती. यहोवा देवाने
त्यांच्याकडे अग्नीतून व ढगातून पाहिले तेव्हा त्यांची त्रेधा उडाली देवाने त्यांच्या रथांची चाके काढली तेंव्हा त्यांना रथ चालवणे कठीण जाऊ लागले. त्यांची दमछाक झाली, त्यांच्या लक्षात आले कि यहोवा इस्राएलाच्या बाजूने त्यांच्याशी लढत आहे. आता ते घाबरले व इस्राएलापासून माघारी पळून जाण्याचा विचार करू लागले. तेव्हा देवाने मोशेला आज्ञा केली कि तुझा हात पुन्हा समुद्रावर पुढे कर एकही मिसरी जो समुद्रात आला आहे माघारी जाता कामा नये आणि झालेही तसेच मोशेने हातात काठी घेऊन समुद्रावर पुन्हा
हात लांब केला तेव्हा सर्व पाणी एकत्र झाले व सर्व मिसरी सैन्य जे समुद्रात इस्राएल लोकांच्या मागे गेले होते ते सर्व बुडून मेले.
या युध्दात मोसे फक्त देवाने सांगितल्या प्रमाणे करतो म्हणजे इस्राएल लोकांना ठरल्या प्रमाणे समुद्राच्या काठावर घेऊन जाणे. समुद्रावर हात उगारणे व इस्राएल लोकांना देव सांगेन तसे मार्गदर्शन करणे. सर्व गोष्टी मोसे करताना दिसत होता पण अप्रत्यक्षपणे सर्व गोष्टी देव स्वतः करत होता. देव स्वतः हि लढाई लढत होता. म्हणूनच समुद्र दुभंगून इस्राएल लोक कोरड्या भूमीवरून पार गेले व मिसरी लोक समुद्रात बुडून मेले.
आपणही जेव्हा येशूच्या नावाच्या नावाने आज्ञा करत असतो तेव्हा परिस्थिती समोर आपणच उभे असतो पण अप्रत्यक्ष रित्या देवाने त्या परिस्थितीचा ताबा अगोदरच घेतलेला असतो, आपल्याला फक्त येशूचे नाव घेऊन उभे राहावयाचे असते . देव आपले युध्द लढत असतो. त्यामुळे फक्त मोशेप्रमाणे प्रभूकडे लक्ष लावून शांत पण तो सांगतो तेवढेत करायचे बाकी विजय आपला होणार हे नक्कीच असते.
इस्राएल लोकांना संरक्षण मिळावे म्हणून देवाने समुद्राची कोरडी भूमी केली,हि घटना देवाचे सर्वसमर्थ पण दाखवते. दोन्ही बाजूला पाणी भिंती प्रमाणे उभे राहते व कोरड्या भूमीतून इस्राएल लोक समुद्र पार करतात. हि गोष्ट माणसाच्या दृष्टीने अविश्वसनीय आहे.पण देव सर्व काही करू शकतो हे सत्य आहे. पुढे आफाट समुद्र व मागे चिडलेल्या क्रूर फारोचे सैन्य आणि मध्ये सापडलेले गोरगरीब दीनदुबळे चारशे वर्षे गुलामीत दबलेले, पिचलेले, घाबरलेले लोक हि घटना डोळ्या समोर आणा. या परिस्थितीत देवाचे त्यांच्या साठी उभे व राहणे व हा अद्भुत पराक्रम करणे हे सर्वकाही समजून घ्या व विचार करा कि जो देव इस्राएलाची आशा प्रकारे सुटका करतो तो तुमच्या आमच्या जीवनातील प्रसंगातून किती सहज सुटका करू शकतो.म्हणून परिस्थितीकडे किंवा बलाढ्य शत्रू कडे पाहून घाबरून जाऊ नका,देवावर विश्वास ठेऊन स्थिर राहा.
प्रार्थना: हे सर्वसमर्थ देवा तू माझा बळकट दुर्ग आहेस, माझे संरक्षण करून, माझ्यासाठी विजय सोपा करतोस म्हणून मी तुला धन्यवाद देतो.तुझी कृपादृष्टी माझ्यावर नित्य ठेव, माझे सहाय्य होत राहा. येशूच्या नावाने मानतो,आमेन.
रेव्ह कैलास [आलिशा ] सा