सण हा प्रकाशाचा माझ्या ख्रिस्ताच्या जन्माचा

 सण हा प्रकाशाचा माझ्या ख्रिस्ताच्या जन्माचा 

Christmas

प्रियांनो आपल्या भारतीयांची सण साजरा करण्याची एक खास पध्दत आहे, व  मोठ्या अभिमानाने आपण ती जपतो. सण कोणत्याही धर्मियांचा असो, घरामध्ये रंगरंगोटी करून सजावट करणे, सर्वांना नवीन कपडे घेणे, काही खास स्वादिष्ट पदार्थ बनवणे, एकमेकांना भेटी देणे व खास वेळ काढून कुटुंबियांच्या समवेत एकत्रितपणे सण साजरा करणे हि आम्हां भारतीयांची सण साजरा करण्याची खास पद्धत आहे व तिला आपण आपली संस्कृती म्हणून आजही जपत आहोत व ती आपण जपलीच पाहिजे याबद्दल कोणाचेही दुमत नसावे. परंतु सणांच्या या गर्दीत आपलाही ख्रिसमस [नाताळ ] नावाचा एक सण येऊन जातो. आपणही आपल्या संस्कृती प्रमाणे म्हणा, चर्चच्या परंपरे प्रमाणे म्हणा किंवा काहीसे पाश्चिमात्यांच्या प्रभावानुसार म्हणा नाताळ अगदी आनंदाने साजरा करितो, पण या सणाचे सखल मानवांसाठी जे वेगळे व ठळक असे खास महत्व आहे ते आपण लक्षात घेत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपला हा ख्रिसमसचा सण देवाला आनंद व गौरव देणारा आहे का या विषयी विचार करणे आवश्यक आहे.

ख्रिस्तमस म्हणजे मानवाच्या उध्दाराची सुवार्ता. हि सुवार्ता रोज क्षणोक्षणी मानवापर्यंत पोहचणे अत्यंत गरजेचे आहे. कारण प्रभू येशुवरील विश्वासाने मनुष्याचा उद्धार होतो, त्याच्या पापांची क्षमा होते, तो शापमुक्त होतो, त्याला तारण म्हणजे मुक्ती प्राप्त होऊन तो अमरत्व प्राप्त करितो, व सदासर्वकाळासाठी स्वर्गात देवाबरोबर राहण्यासाठी पात्र होतो. त्याची पाप क्षमा झालेली असल्यामुळे देव त्याला ख्रिस्ताचे नीतिमत्व बहाल करून आपले पितृत्वही बहाल करितो. देवाचे वचन सांगते, “जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने  देवाची मुले होण्याचा अधिकार दिला,” योहान १:१२. त्यामुळे धकाधकीनीं भरलेल्या जीवनातं देवाचे त्यांना सहाय्य प्राप्त होते व  जीवन सुकर होते. नैतिक जीवन जगण्याचे सामर्थ्य व दैवी ज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळे वागणुकीत व व्यवहारात कमालीची सुधारणा होऊन जीवन स्वतः साठी व इतरांसाठी आशीर्वादांचे कारण बनते. त्यांच्या सहजीवनातून सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक व आर्थिक व्यवस्थांवर प्रभाव पडतो व सुधारणांना गती मिळते.

मानवाच्या उध्दाराचे हे कार्य अखंडपणे चालू आहे. देव उध्दाराच्या या कार्याला खूप महत्व देतो. जेव्हा एका मानवाचा उध्दार होतो तेव्हा हजारो देवदूत आनंद करितात लूक १५:१०. उध्दाराच्या या कार्यासाठी देवाने चर्चला म्हणजे ख्रिस्ताच्या मंडळीला पृथ्वीवर ठेवले आहे.  जो पर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरे येणे होऊन जगाचा शेवटचा न्याय होत नाही तो पर्यंत  त्याची मंडळी [चर्च ] याकार्यासाठी समर्पित आहे. ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याच्या अगदी अगदोर सुवार्ता थांबेल कारण त्यावेळी चर्च म्हणजे देवाची मंडळी स्वर्गात नेल्या जाईल. परंतु तो पर्यंत चर्चला रोज मानवाच्या उध्दारासाठी सुवार्तेचा संदेश प्रत्येक मानवापर्यंत पोहचवायाचा आहे. 

येशू ख्रिस्ताचा जन्म दिवस सण म्हणून साजरा करणे चांगले आहे. चर्चची हि परंपरा आपण जपलीच पाहिजे. परंतु जगाच्या राहाटी प्रमाणे सण साजरा करून नाही तर देवाने ख्रिस्त जन्माच्या वेळी केले तसे करून, आपण हा सण साजरा केला पाहिजे. देवानेही येशू ख्रिस्ताचा जन्मोउत्सव साजरा केला, परंतु आपल्या सारखा भौतिकतेचा बाजार मांडून नाही तर त्याचे पावित्र्य व महत्व जपून, जे धार्मिकतेचे, न्यायाचे भुकेले होते; व जे दबलेले, पिचलेले, निराशेच्या खोल अंधारात  बुडालेले होते, त्यांना उध्दाराची सुवार्ता सांगून देवाने हा सण साजरा केला. लूककृत शुभवर्तमानात दुसऱ्या अध्यायात या प्रसंगाचे वर्णन आहे. जेंव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, किंवा आपण असेही म्हणू शकतो की जेंव्हा देवाने मानवाच्या उध्दारासाठी देह धारण केला तेंव्हा स्वर्ग आनंदाने भरून गेला. आनंदाची हि सुवार्ता मानवाला कळविण्यात आली. देवाने त्याचा हा आनंद एका अशा मानवी समुदाया बरोबर वाटला की जो अतिशय खालच्या स्थराचे प्रतिनिधित्व करितो. रात्री रानात राहून आपल्या मालकांची मेंढरे राखणारे हे मेंढपाळ होते. सधन, सुखवस्तु, इतकेच नाही तर मध्यम वर्गीय किंवा सर्वसाधारण आर्थिक स्थिती असलेले लोक सुध्दा रात्रीचा समय विश्रांतीसाठी उपयोगात आणतात पण जे अतिशय कंगाल स्थितीत असतात त्यांना रोजच्या उपजीविकेसाठी रात्रीचा दिवस करावा लागतो. असे हे दबलेले, पिचलेले, व दुबळे मेंढपाळ रात्रीच्या अंधारात मेंढरांचे राखण करीत होते. रात्रीचा तो अंधार त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता, त्यांच्या कष्टमय,व कंगाल  जीवनाने विश्रांतीचा समय  त्यांच्यापासून काढून घेतला होता. अशा दुःखी, कष्टी, व भाराक्रांत कोणत्याही प्रकारची आशा नसलेल्या या मेंढपाळांना देवाने ख्रिस्त जन्माची सुवार्ता सांगितली यासाठी की त्यांना आशा प्राप्त व्हावी त्यांच्या उध्दाराच्या सुवार्तेने त्यांना आनंद प्राप्त व्हावा. देवाचे तेज त्यांच्या भोवती असलेल्या त्या अंधारात प्रकाशले व त्या गरीब बापड्यांना जीवनाचा असा मार्ग सापडला की ज्यामुळे त्यांचे जीवन लक्ष लक्ष ज्योतींनी प्रकाशावे तसे प्रकाशले. देवाची स्तुती व गौरव करीत देवाच्या या ख्रिस्त जन्म उत्सवात ते सहभागी झाले. हि घटना पुढील प्रमाणे आहे…

ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळी हे मेंढपाळ बेथलेहेमच्या रानात मेंढरांचे राखण करीत होते. तेंव्हा पहा , प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला, व प्रभूचे तेज त्यांच्या भोवताली प्रकाशले, आणि ते फार भ्याले. मग दूत त्यांना म्हणाला भिऊ नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याचे शुभवर्तमान मी तुम्हांस सांगतो, कारण आज दाविदाच्या नगरात तुम्हांसाठी तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हांस त्याची खूण हीच आहे की बालक बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत निजवलेले तुम्हांस आढळेल. 

मग एकाएकीं आकाशातल्या सैन्याचा समुदाय त्या दुताजवळ आला, आणि ते देवाची स्तुति करीत म्हणाले, परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्या माणसांसंबधी तो संतुष्ट आहे त्यांच्यामध्ये शांती. 

मग असे झाले की दूत जेंव्हा त्यांच्या पासून आकाशात गेले तेंव्हा ते मेंढपाळ एकमेकांस म्हणू लागले, चला, आपण बेथलहेमापर्यंत जाऊ, व झालेली हि जी गोष्ट प्रभुने आम्हांला कळवली ती पाहू. तेंव्हा  ते घाईघाईने आले, आणि मरीया व योशेफही व गव्हाणीत बालक हि त्यांना सापडली. मग हे पाहून त्या बालकाविषयी जी गोष्ट त्यांना सांगितली होती ती त्यांनी कळवली. आणि ज्यांनी ती ऐकली त्या सर्वांनी, मेंढपाळांनी त्यांना सांगितलेल्या गोष्टी विषयी आश्चर्य केले, परंतु मरीयेनें या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. नंतर ते मेंढपाळ आपणास सांगितले होते त्याप्रमाणेंच सर्व गोष्टी एकूण व पाहून त्यामुळे देवाचे गौरव व स्तुती करीत माघारी गेले. लूक २:८:२०. 

प्रियांनो माघारी परतलेल्या या मेंढपाळांचे आयुष्य आता पूर्ण पणे बदललेले असणार यात शंकाच नाही, कारण त्यांनी अशा दैवी अलौकिक गोष्टीचा अनुभव घेतला होता की त्यामुळे जीवनाकडे व भविष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन नक्कीच बदलला असणार. आपला उद्धारक जन्मला आहे याची खात्री झाल्यामुळे आपले व आपल्या येणाऱ्या पिढ्यांचे जीवन कसे आशीर्वादित असेल याचे भविष्यातील चित्रण त्यांच्या डोळ्यांनी रेखाटले असेल व अंतःकरणात मोठ्या आशेने साठवले असेल. त्यांनी पाहिलेले चित्र हे फक्त त्यांच्या पुरते मर्यादित नसेल तर त्याची व्याप्ती अखंड पृथ्वी वरील दिन, दुबळ्या, गरीब, दबलेल्या, पिचलेल्या, गुलाम, शोषित, दलित, वंचीत, स्रियांच्या व पुरुषांच्या उध्दाराचे ते चित्र असेल. त्या चित्रामध्ये त्यांनी अखंड मानव जातीला पाहिले असेल. त्यामध्ये निश्चित मी हि असेल व तुम्ही हि असाल. त्यांनी पाहिलेले चित्र, त्यांना मिळालेली अशा खरी होती ती व्यर्थ झाली नाही. ख्रिस्ताच्या उध्दाराच्या सुवार्तेने पृथ्वीची उलथापालथ झाली, पृथ्वीवर अस्तित्वात असलेली प्रत्येक संस्कृती, धर्म, वंश, जात, जमात, परंपरा, सर्व सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक व्यवस्था ख्रिस्ताच्या सुवार्तेने प्रभावित झाल्या आहेत. 

उध्दाराचे हे पर्व संपलेले नाही, जेंव्हा हे संपलेले असेल तेंव्हा सर्व काही नवे असेल. पाप, शाप, दुःख, कष्ट, आजार, मृत्यू , सैतान व त्याने प्रभावित केलेली प्रत्येक गोष्ट संपलेली असेल. उध्दार पावलेले सर्व अमरत्व प्राप्त करून  देवासह सनातन म्हणजे सार्वकालिक जीवनाचा आनंद उपभोगतील. परंतु तोपर्यंत चर्चला देवाच्या उध्दाराच्या या कार्याला समर्पित असणे आवश्यक आहे. या कार्यासाठीच तर चर्चचे अस्तित्व आहे. त्यामुळे चर्चने जगिक व्यवस्थांच्या प्रभावाखाली न जाता स्वर्गीय कार्यास बाध्य असणे योग्य आहे. 

ख्रिस्त जन्म मोहत्सव साजरा करताना चर्चने म्हणजे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने हे समजून घ्यावे की, भौतिकतेचा बाजार न मांडता व सणांच्या भाऊ गर्दीत सामील न होता, कश्या प्रकारे देवाच्या पाउलांवर पाऊल ठेवीत आपण ख्रिस्त जन्म दिन साजरा करावा. आपापल्या भागात कोण असे आहे की ज्याच्या पर्यंत हि सुवार्ता जाणे गरजेचे आहे. देवाने ज्या ठिकाणी ख्रिस्त जन्म झाला त्या ठिकाणच्या सर्वात शोषित लोकगटाची निवड ख्रिस्त  जन्माची सुवार्ता सांगण्यासाठी केली. अंधाराने भरलेल्या त्यांच्या जीवनात त्याचे प्रकाशमान तेज प्रगट केले. स्वर्गीय दूतांनी त्यांच्या बरोबर गीत गाऊन आपला आनंद वाटला. 

आज प्रत्येक ख्रिस्ती या देवदूतांना प्रमाणे आहे. कोणाच्यानाकोणच्या जीवनात प्रकाशाचे कारण होण्यासाठी निवडलेला आहे. तेव्हा चर्चने व प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने, कोणाबरोबर व कश्याप्रकारे हा प्रकाशाचा सण साजरा करावा यासाठी देव आपले मार्गदर्शन करो. आमीन. 

रेव्ह. कैलास [आलिशा ] साठे. 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole