सदा सज्ज असा, उत्पत्ती २२:१.

वचन: या गोष्टीनंतर असे झाले कि, देवाने अब्राहामाला पारखले, आणि त्याला म्हटले
हे अब्राहामा, आणि तो म्हणाला, मी येथे आहे. उत्पत्ती २२:.

 

सदासज्जअसाउत्पत्ती २२:१

देव आपल्याला आशीर्वादित पाहू इच्छितो, तो नेहमीच आपल्याला आशीर्वाद देण्यास तयार असतो. गरज असते ती आपण आशीर्वादांमध्ये चालण्याची. अब्राहामाप्रमाणे देव केंद्रित जीवन जगणाची.देवावर प्रीती करत विश्वासूपणे 
त्याच्या बरोबर चालू तर आशीर्वाद वाढतच जातात.

वरील वचनाचा संदर्भ घेतल्यास असे 
लक्षात येते की, देवाने अब्राहामाला त्याच्या अभिवचनाप्रमाणे खऱ्याअर्थाने आता आशीर्वादित करण्यास सुरवात केली होती. त्याला वचनदत्त पुत्र दिला होता. अबीमलेख राजा बरोबर करार झाल्यामुळे तो आता देशात हक्काने राहणार होता. तो आता एका विहिरीचा मालक होता. त्याने हक्काचा 
झाऊ नावाचा 
वृक्ष तेथे लावला होता. राजाकडून हक्काचे काही मिळणे म्हणजे उपरीपणाकडून वतनदारीकडे त्याची वाटचाल सुरु झाल्याचे हे संकेत होते . अभिवचनांच्या पूर्तीची हि अल्पशी सुरवात अब्राहामाला खूप सुखावून गेली होती. आता तो 
त्या अभिवचनांच्या परिपूर्ती कडे आशेने पहात होता. ती संपूर्ण भूमी त्याची झाली आहे त्याच्या संतानांनी भरून गेली आहे. देव त्यांच्या बरोबर असल्यामुळे समृध्दी 
तेथे नांदत आहे. अशा प्रकारे तो भविष्यातील खूप मोठे मधुर आशीर्वादांचे स्वप्न रंगवत असता, देवाने त्याला कसोटीस लाविले. त्याची परीक्षा अतिशय भयंकर होती तरी देव केंद्रित असलेले त्याचे जीवन जराशीही विचलित झाले नाही. चला तर मग जाणून घेऊया अब्राहामाच्या देव केंद्रित जीवनाचे रहस्य.

 तो देवाविषयी कधीही अडखळला नाही : देवा संगती चालतांना नकारात्मक विचारांना आपल्या जीवनात जागा असता काम नये. अब्राहामाप्रमाणे नेहमी देवाच्या सेवेत तत्पर असे आपले जीवन असावे . तो नेहमीच देव वाणी कडे लक्ष लावून असे.

देवाने अब्राहामाला पारखण्याची वेळ पहा, आता अब्राहाम सुखावला होता, स्थिरावला होता इतक्यात त्याला फार मोठ्या संकटात टाकणारा प्रसंग त्याच्यावर देवाने आणला होता. जणू त्याला देवाने फार मोठ्या कोड्यात टाकले होते.त्याला सांगितले कि तुझा एकुलता एक मुलगा इसहाक ज्याच्यावर तू प्रीती करतोस त्याला मोरिया देशात घेऊन जा तिथल्या डोंगरात मी दाखवील त्या डोंगरावर त्याचे होमार्पण म्हणून अर्पण कर, उत्पत्ती २२:

 येथे प्रश्न 
उभा राहतो कि एखाद्या विश्वासणाऱ्याने देवासाठी किती त्याग करावा? शंभर वर्षानंतर झालेला सुकुमार एकुलता एक मुलगा अग्नीत होमार्पणासाठी अर्पण करावा का? या परिस्थितीला अब्राहामाने कसा प्रतिसाद द्यायला हवा असा प्रश्न जर उपस्थित केला, तर आपण काय उत्तर द्याल ? मी तर निरुत्तर आहे, येथे फक्त अब्राहामच बोलू शकतो असे मला वाटते. कारण अब्राहामाचा देवा बरोबर चा अनुभव, त्याच्या वरील त्याचा विश्वास या गोष्टी आत्मिक दृष्ट्या खूप मोठ्या उंचीच्या आहेत. आमची बुध्दी या गोष्टी समजू शकत नाही. मी तर म्हणेल येथे भाष्य करण्याचा अधिकारच आम्हाला नाही. येथे फक्त नतमस्तक होऊन पवित्र देव त्याच्या विश्वासू सेवकातील त्याचे गौरव पहावे. आणि इतकेच म्हणावे कि, ” मान, महिमा , गौरव सर्व काही त्या परमेश्वराला, आणि अब्राहामाच्या विश्वासाला नम्र पणे सलाम करावा. कारण तो आपला एकुलता एक पुत्र देवासाठी होमार्पण करण्यास राजी झाला.

 खरे पाहता चांगले दिवस आले म्हणजे माणूस देवाला विसरतो
धार्मिक जीवनाविषयी त्याचा आद्यक्रम राहत नाही. कधी कधी माणसात गर्व येतो देवाला भिऊन वागत नाही. किंवा आपण असेही म्हणू शकतो की माणसे आत्मिक जीवन जगत असताना खूप तडजोडी करतात. उदारणार्थ, चर्चला जाण्याबद्दल, दान दशमांश देण्याबद्दल, चर्चच्या कार्यात सहभाग देण्याबद्दल, पवित्र जीवन जगण्याबद्दल. त्यांना आत्मिक जीवनाच्या भाग असणाऱ्या या गोष्टी निरर्थक ओझे वाटतात. त्यांच्या या वागण्याचे समर्थन करण्यासाठी त्यांच्याकडे अनेक कारणे असतात. त्यांना वाटत असते की ते खूप हुशार , ज्ञानी व्यावहारिक आहेत , परंतु वास्तविक पाहता ते कोड्यात पडलेले आशीर्वादांसाठी अडखळण बनलेले असतात.

देवाने त्याच्या साठी जे केले होते तो ते कधीच विसरला नाही: जेव्हा; देवाने अब्राहामाला अशी आज्ञा केली की, त्याचा एकुलता एक पुत्र इसहाक याला मोरिया देशातील तो दाखवील त्या डोंगरावर नेऊन त्याचे होमार्पण म्हणून अर्पण कर. उत्पत्ती २२: अब्राहामासाठी हि अतिशय धक्कादायक गोष्ट होती. पोटच्या लेकरांचा होम करून त्यांना भुतांना अर्पण करणे ह्या गोष्टी परराष्ट्रीयांत होत असत. स्तोत्र १०६:३७, अनुवाद ३२:१७, राजे २१:.परंतु,यहोवा देवाने त्याला अशीआज्ञा करावी हि गोष्ट त्याला कोढ्यात टाकणारी होती. त्याने रात्रभर विचार केला असेल कि ज्या देवाला मी अनुसरत आहे तो परराष्ट्रीयांच्या देवांसारखा नाही तो अद्वितीय आहे, तो सनातन आहे, तोच देव आहे. तो न्यायी विश्वास योग्य आहे. त्याने मला माझ्या आप्तांमधून आणि त्याने माझी खूप काळजी घेतली, माझे रक्षण केले, मी चुकलो असताही माझ्यावर कृपा केली,त्याने फारो अबीमलेखा सारख्या राजांना शासन करून माझ्या पत्नीचे रक्षण केले. एका नीतिमानासाठी त्याने सोअर नगराचे रक्षण केले. त्याने आज पर्यंत माझ्या प्रत्येक न्याय्य निर्णयांची दखल घेऊन मला आशीर्वाद दिले. मी तर इश्माएल बरोबर समाधानी होतो परंतु त्याने मला वयाच्या शंभराव्या वर्षी साराच्या पोटी हा पुत्र दिला सांगितले कि हाच तुझा वचनदत्त पुत्र आहे हाच तुझा वंश चालविल. त्याने मला अभिवचन दिले आहे कि तो माझी संतती आकाशातील ताऱ्यांप्रमाणे समुद्राच्या वाळू प्रमाणे अगणित करिन. माझ्याशी इतका विश्वासू प्रितीने वागणारा हा सनातन पवित्र परमेश्वर मला असे कृत्य करण्यास कसे सांगू शकतो ! रात्रभर या विचारांचे काहूर उठले तरी पहाट होत असता त्याच्या लक्षात आले कि येथे माझी परीक्षा होत आहे. म्हणून तो आवेशाने भल्या पहाटे उठला आपल्या एकूलत्याएक पुत्राला दोन तरुण चाकरांना घेऊन मोरिया देशात पोहचला. मग देवाने जो डोंगर त्याला दाखवला तेथे जाताना बरोबरच्या चाकरांना मागे ठेऊन तो त्याच्या लेकराला घेऊन डोंगर चढू लागला. तेव्हा सुकुमार इसहाकाच्या मनात हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे कि आम्ही होमार्पण करण्यासाठी जात आहोत पण त्यासाठी लागणारे कोकरू कोठे आहे ? म्हणून तो आपल्या पित्याला विचारतो कि बाबा आपल्याकडे होमार्पणासाठीची सर्व सामुग्री आहे पण कोकरू कोठे आहे? हे ऐकून अब्राहामाच्या आत वेदनांचा आगडोंब उठून त्याचे काळीज नक्कीच फाटले असेल.तो आपल्या लाड्क्याला काय सांगणार होता? अब्राहाम देवाच्या उपकारांना कधीच विसरला नाही, तर देवाने जे जे त्याच्या साठी केले त्यातून त्याने देवाची ओळख करून घेतली. त्यामुळे देवाशी त्याचे नाते अधिक घट्ट होत गेले. म्हणून परीक्षा होत असता तो विश्वासाने पावले टाकीत पुढे गेला.

आपणही आपल्या जीवनात घडलेल्या साक्षी कधीही विसरू नयेत. त्या भविष्यात आशीर्वादित वाटचालीसाठी प्रकाशा प्रमाणे असतात. त्यामुळे आत्मिक जीवन जगताना आपण कधीही अडखळत नाही.

 तो देवा प्रती आशावादी होताइसहाकाच्या प्रश्नाचे उत्तर अब्राहाम देऊ शकत नव्हता. पण तो देवाप्रती आशावादी होता.त्याचा विश्वास होता कि तो ज्या देवाला अनुसरत आहे, तो पवित्र आहे,प्रितीने पूर्ण आहे,अतिशय कृपाळू आहे, तो विश्वास योग्य वचनाचा पक्का आहे.तो हाअनर्थ माझ्या हातून होऊ देणार नाही तर यातून काही तरी मार्ग काढील. आणि खरोखरच जर मला माझ्या लाडक्या लेकराला होमार्पण म्हणून अर्पण करावे लागले, तरी हरकत नाही माझा परमेश्वर चांगला पवित्र 
देव आहे.तो माझ्या एकुलत्याएक मुलाला राखेतूनही मला परत देण्यास समर्थ आहे.त्याने मला अभिवचन दिले आहे कि तो याच माझ्या मुलापासून माझा वंश वृद्धिंगत करिन. इब्री ११:१७१९.म्हणून आपल्या लाडक्या लेकाच्या 
प्रश्नाला उत्तर देताना तो मोठया विश्वासाने म्हणतो, माझ्या मुला,देव आपल्यासाठी होमार्पणाचे कोकरू मिळूवून देईल. आणि खरोखर अब्राहामाच्या विश्वासाप्रमाणे त्याने धरलेल्या आशेप्रमाणे घडून आले, तो सर्व विश्वासणार्यांचा पिता ठरला त्याच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित झाली.

 देव चांगला आहे ,देवाचे वचन सांगते की,”परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा; जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य.” स्तोत्र २४:. “परमेश्वर म्हणतो, तुम्हा विषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत अनिष्टचे नाहीत .ते तुम्हास 
तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत.” यिर्मया २९:११. म्हणून देवासाठी जर थोडेफार कष्ट, थोडाफार त्याग करावा लागला तर तो आपल्या हिताचाच असतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे. देव आपल्या क्षमतेपेक्षा जास्त आपली परीक्षा होऊ देत नाही, तोच आपल्याला परीक्षेत निभावण्याचा उपाय देतो , यासाठी कि आपण सहन करण्यास समर्थ व्हावे. करिंथ १०:१३. ” माझ्या बंधुनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो ; आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्यासाठिकी, तुम्ही कशातही उणे होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. याकोब : .म्हणून देव कार्यासंदर्भात आपले अंतःकरण कठीण असू नये.

आपणही अब्राहामा प्रमाणे आपल्या देवाला समजून घेतले पाहिजे की तो पवित्र कल्याणकारी आहे. म्हणजे विश्वासाचे जीवन जगत असताना जीवनातील प्रत्येक परिस्थितीत त्याच्या कृपेची आशा ठेवू. कोणत्याच जगिक मार्गाचा अवलंब करता. आपल्या जीवनाच्या द्वारे देवाचे गौरव करू.देव केंद्रित जीवनाचं आपल्याला 
आशिर्वादात टिकवून ठेवते. . देवाला सर्व परिस्थितीत अनुसरणे हीच आशीर्वादाची वाट आहे.

 प्रार्थना: हे प्रभू येशू मला कधीही परीक्षेत पडू देऊ नकोस. मी तुला सर्व परिस्थितीत अनुसरावे म्हणून माझे सहाय्य हो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन.

 रेव्ह. कैलास (अलिशा ) साठे.

Enable GingerCannot connect to Ginger Check your internet connection
or reload the browser
Disable in this text fieldEditEdit in GingerEdit in Ginger×

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole