विपुल जीवनाचे रहस्य
वचन: मला ‘प्रभुजी, प्रभुजी‘ असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छे प्रमाणे वागतो त्याचा होईल. मत्तय ७:२१
येशू ख्रिस्त या जगात मानव जातीला नरकाच्या यातनांपासून वाचवण्यास आला होता. त्याने मानवाच्या उद्धाराचे कार्य पूर्ण केले. परंतु जोपर्यंत मनुष्य त्याच्यावर योग्य प्रकारे विश्वास ठेवत नाही तो पर्यंत त्याला विश्वासाचे फळ म्हणजे पाप क्षमा व सर्वकाळचे स्वर्गीय जीवन प्राप्त होणार नाही.
देवाने पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नाही, तर त्याच्या द्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याजवर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही; परंतु , जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्यायनिवाडा झालाच आहे, कारण त्याने देवाच्या एकूलत्याएका पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही, त्याचा निवाडा हाच की, जगात प्रकाश आला आहे, तरी ज्या मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरिली, त्यांची कर्मे दुष्ट होती, जो कोणी वाईट कर्मे करितो तो प्रकाशाचा द्वेष करितो, आणि आपली कर्मे सदोष ठरू नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही, परंतु जो सत्य आचारतो तो प्रकाशाकडे येतो; यासाठी की आपली कर्मे देवाच्या ठायी केलेली आहेत अशी ती उघड व्हावी. योहान ३:१७-२१.
अनेक लोक ख्रिस्ती आहेत, चर्चला जातात पण विश्वासाची फळे त्यांच्या जीवनात दिसत नाहीत. नवीन जन्म, आत्म्याचे चालवणे, देवाचे सामर्थ्य या अलौकिक आत्मिक आशिर्वादां पासून ते दूर राहतात.कारण येशू त्यांचा देव आहे हे ते मानतात पण त्यांच्या डोक्यात व मनात जग आहे.जगाचे तत्वदज्ञान त्यांना देव वचनापेक्षा अधिक व्यवहारिक वाटते. त्यामुळे त्यांना येशू चर्चमध्ये बायबलमध्ये किंवा आपल्या संस्कृती नुसार विचार केल्यास देव्हाऱ्यामध्ये बरा वाटतो [बायबल मध्ये/ चर्च मध्ये ] पण प्रत्येक्ष जीवनात संगती नको असतो.त्यांना त्याचे वचन व्यवहारिक जीवनात लागू करणे कठीण जाते. चर्चने तयार केलेले नियम त्यांना फार प्रिय असतात; पण देवाने दिलेले नियम जसेच्या तसे स्वीकारत नाहीत. संदेश सांगणे, प्रार्थना करणे, पुढारीपण करणे खूप प्रतिष्ठेचे वाटते पण पवित्र जीवन जगताना हजारदा तडजोडी असतात.
देवाने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. कल १:१३. त्यामुळे हे अगत्याचे आहे की आपण पुन्हा त्या अंधाराची आवड धरू नये. देव आपल्याला प्रकाशात चालवू इच्छतो. पण जर आपण त्याचे आज्ञापालन करून प्रकाशात चालत नाही तर आपले हे वागणे देव इच्छेच्या विरोधात आहे. देवाचे वचन सांगते,”अहो व्यभिचाऱ्यांनो, जगाची मैत्री देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हांस ठाऊक नाही काय ? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे. याकोब ४:४.
विश्वासाशिवाय आपण देवाला संतोषवू शकत नाही. विश्वासाने आपले तारण होते. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मला ‘प्रभुजी, प्रभुजी‘ असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छे प्रमाणे वागतो त्याचा होईल. मत्तय ७:२१ देवाचे वचन सांगते, “देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठीकी जो कोणी त्याजवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे.” योहान ३: १६. प्रियांनो, प्रभू येशूवर विश्वास ठेऊन देव इच्छेला अनुसरा म्हणजे, सार्वकालिक जीवनाचे भागी व्हाल.
प्रार्थना: हे प्रभू येशू तुझी कृपा रोज आम्हासाठी नवी होते म्हणून मी तुझे आभार मानतो.तुला योग्य प्रकारे अनुसरण्यास माझे सहाय्य हो; येशूच्या नावाने मागतो.आमेन.