आशीर्वादाचे रहस्य
वचन: हनोख देवाच्या समागमे रहात असे, देवाने त्याला नेले आणि तो दिसेनासा झाला. उत्पत्ती ५:२४.
हनोख तीनशे वर्ष देवाच्या समागमे चालला; तो संन्याशी नव्हता, तर संसार प्रपंच चालवणारा होता. तीनशे वर्ष देवाबरोबर चालत असताना त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. उत्पत्ती ५:२२ याचा अर्थ आपणही देवा बरोबर चालू शकतो. पण आधी देवाबरोबर चालणे म्हणजे काय ते समजून घेऊ.हनोख बद्दल सांगितले आहे कि तो विश्वासाच्याद्वारे देवाला संतोषवीत असे.इब्री ११:५. मग आता विश्वास म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो तर ते समजून घेऊ. पहा, देवाला आपण त्याच्या इच्छे शिवाय पाहू शकत नाही ज्यांना त्याने वेगवेगळ्या प्रकारे दर्शन दिले ते अगदी थोडके आहेत. म्हणून देवाला मी पाहीन व मग विश्वास ठेवीन असे होत नाही, विश्वास न ठेवल्याने देवाचे काही बिघडत नाही पण आपले मात्र सर्वच बिघडते,म्हणून विश्वास ठेवा. इब्री ११:६ सांगते कि देवा जवळ जाणाऱ्यांनी असा विश्वास ठेवला पाहिजे कि, तो आहे, आणि जे त्याचा शोध झटून करतात त्यांना तो प्रतिफळ देतो.तरी आसा प्रश्न उभा राहतो कि त्याचा शोध नेमका कसा करायचा.तर येथे एक गोष्ट समजून घ्या कि देवाला आपण सहज पाहू शकत नाही पण तो आपल्याला नित्य पहातो, तो सर्व ठिकाणी सर्व वेळी उपस्थित असणारा म्हणजे,”सर्व व्यापी देव आहे. स्तोत्र १३९:७–१२. देव आब्राहामाला म्हणाला मी सर्व समर्थ देव आहे तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्विक पणे रहा, उत्पत्ती १७:१. हे जर आपल्याला समजले तर आपल्या लक्षात येईल कि आपण सर्व गोष्टी त्याच्या समोर करत आहोत व त्याच्या विषयीचे भय आपल्याला अनीती पासून दूर ठेवील व आपण पवित्र शास्रा नुसार जीवन जगू तर हे विश्वासाचे जीवन आहे; जे देवाला संतोष देणारे होईल. अब्राहामाने देवाचे ऐकले व देव मला पहात आहे असा विश्वास ठेऊन तो देवाला भिऊन वागला.आज जर आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहोत व त्याच्या शिकवणीनुसार जीवन जगत आहोत तर आपण देवाच्या बरोबर चालत आहोत.योहान ३:१६–२१.
प्रार्थना: हे प्रभू येशू तू माझे तारण केलेस म्हणून मी तुझे आभार मानतो, आता तुझ्या समागमे चालण्यास मला सहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो आमेन.