तुझ्या उत्कर्षाचा मार्ग
वचन: नगरात तू आशीर्वादित होशील आणि शेतात तू आशीर्वादित होशील. अनुवाद २८:३.
प्रास्ताविक: देवाचे आज्ञा पालन म्हणजे शिस्तबद्ध, उपकारक, शांतीप्रिय जीवनशैली अनुसरणे आहे. जर आपण देवाचे आज्ञापालन करू तर आपल्याला आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, व आर्थिक आशीर्वाद प्राप्त होतात हे वरील वचन स्पष्ट करते. नगरात तू आशीर्वादित होशील आणि शेतात तू आशीर्वादित होशील या दोन्ही गोष्टी आपण क्रमाने पाहू या.
नगरात तू आशीर्वादित होशील: नगर हे सामाजिक सहजीवन दाखवते. येथे मनुष्य एकत्र वस्ती करून राहतात व त्यातूनच त्यांच्या अनेक गोष्टींची देवाण घेवाण होत असते. नवनवीन अविष्कारांची येथे स्पर्धा असते. मनुष्याचें एकत्र राहणे एकमेकांवर प्रभाव टाकीत असते. आपल्या कला गुणांच्या द्वारे मनुष्य वैयक्तिक पातळीवर आपले कर्तृत्व सिद्ध करीत असतात. नगरात मानवी सहजीवनाचे रक्षण व्हावे, तेथे न्याय व्यवस्था असावी, परस्परात सुसंवाद असावा, नीतिनियमांचे पालन व्हावे म्हणून येथे राजकीय शासन व्यवस्था गरजेची होते. अशावेळी समाजातील ज्ञानाने व आर्थिक क्षमतेने , शक्तिशाली झालेले लोक या राजकीय व्यवस्थांमध्ये मुख्य पदावर विराजमान होऊन समाजाला नेतृत्व देतात. देवाचे वचन सांगते कि जर आपण आज्ञापालन करू तर आपण नगरात आशीर्वादित होऊ याचा नेमका अर्थ या ठिकाणी हाच आहे कि देव आपल्याला समाजाला नेतृत्व देण्याचे सामर्थ्य देईल हे आपल्या लक्षात घेतले पाहिजे.
शेतात तू आशीर्वादित होशील: पूर्वी शेती हाच अर्थ व अन्न मिळवण्याचा मुख्य मार्ग होता असे म्हटले तर वावगे होणार नाही. किंबहुना आपण असेही म्हणू शकतो की उत्कृष्ट शेती व भरपूर धन धान्यांचे उत्पन्न यामुळे मानवाला स्थिर जीवन शैली प्राप्त होत असे. ज्ञानार्जनाच्या संधी व क्षमता त्यांना प्राप्त होत. त्याचप्रमाणे आर्थिक सामर्थ्य प्राप्त होऊन सामाजिक प्रतिष्ठा वाढीस लागे. त्यामुळे साहजिकच असे लोक इतरांवर सत्ता गाजवीत.
देवाचे अभिवचन सांगते कि या दोन्ही भागात आपण आशीर्वादित होऊ याचा अर्थ जी भूमी आदामाच्या पापामुळे कष्ट करूनही हवे तसे धन धान्य देत नाही ती भूमी आज्ञापालनामुळे तिचे सत्व प्रगट करील व उत्तम व भरपूर धनधान्य देईल. वर स्पष्टीकरण केल्या प्रमाणे आपल्याला आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, व आर्थिक आशीर्वाद प्राप्त होतील.
आज्ञापालन आशीर्वाद जीवनाचा मार्ग आहे: आजच्या संदर्भात जर आपल्याला हे वचन समजून घ्यायचे तर असे समजून घ्यावे कि जर आपण आज्ञापालन करू तर देव आपले अर्थार्जनाचे साधन आशीर्वादित करिन, आपल्याला स्थैर्य देईल, व विद्वान बनवुन सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देईल. ज्यामुळे आपण समाजाला नेतृत्व देऊ शकू. आपण शेपूट म्हणजे कोणाच्यातरी मागे चालणारे नाही तर मस्तक बनु म्हणजे जग आपल्या मागे चालेल. अनुवाद २८:१३.
प्रार्थना: हे देवा तूच माझ्या सामाजिक प्रतिष्ठेचा व आर्थिक भरभराटीचा श्रोत आहेस. आज्ञापालन करण्यासाठी मला साहाय्य कर माझ्या हाताच्या कामाला बरकत दे माझी आर्थिक भरभराट कर मला सामाजिक प्रतिष्ठा लाभुदे, मला मस्तक बनव . येशूच्या नावाने मागतो. आमेन.
रेव्ह कैलास [आलिशा ] साठे.