वचन: परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर प्रकाशवो आणि तुझ्यावर कृपा करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर उंचाववो आणि तुला शांती देवो.
गणना ६:२२–२६.
देव मोशेला सांगत आहे की याजक म्हणून अहरोन व त्याच्या मुलांनी इस्राएलाला कश्या प्रकारे आशीर्वाद द्यावा. येथे देवाने आशीर्वादा साठी
नेमके कोणते शब्द वापरले पाहिजेत ते सांगितले आहे. या वरून आशीर्वादाचे महत्व समजून घेतले पाहिजे.
आशीर्वाद म्हणजे काय?: आपण पाहतो कि देवाने निसर्गाला आशीर्वाद दिला व म्हटले,”तुम्ही सफळ
व्हा, व बहुतपट व्हा, व समुद्रातील जले भरा, आणि पृथ्वीवर पक्षी बहुतपट होवोत. उत्पत्ती १:२२. त्याच प्रमाणे त्याने मनुष्याला निर्माण केल्यावर आशीर्वाद दिला व म्हटले तुम्ही सफळ व्हा, व बहुतपट व्हा व पृथ्वी भरा व ती हस्तगत करा, आणि समुद्रातील माशांवर व आकाशातील पक्षांवर व पृथ्वीवर हालचाल करणाऱ्या प्रत्येक जीवावर धनीपण करा. उत्पत्ती १:२८. व शेवटी सृष्टी निर्मितीचे काम पूर्ण झाल्यावर त्याने सातव्या दिवसाला आशीर्वाद दिला आणि तो पवित्र केला कारण देवाने जे अस्तित्वात आणले होते आणि केले होते त्या आपल्या सर्व कामापासून त्या दिवशी त्याने विसावा घेतला होता. उत्पत्ती २: ३. या तिन्ही आशीर्वादांवरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि देवाने आशीर्वाद तिला म्हणजे नेमके काय केले ? पहिल्या आशीर्वादमध्ये निसर्गातील जीवांना काही क्षमता प्रदान केल्या जसे प्रजननाची क्षमता, सर्व जले व पृथ्वी
भरून टाकण्याचा अधिकार दिला.त्याचा अर्थ देवाने
उच्चारलेल्या शब्दांद्वारे या क्षमता व
अधिकार त्यांना प्राप्त झाले होते. दुसऱ्या आशिर्वादात मानवाला देवाने प्रजननाची क्षमता, पृथ्वी व्यापून टाकण्याचा अधिकार दिलाच पण त्या बरोबर सर्व प्राणिमात्रांवर अधिकार दिला. व तिसऱ्या आशिर्वादात त्याने सातव्या दिवसाला आशीर्वाद दिला व त्याला पवित्र करून विशेष महत्व प्राप्त करून दिले. या वरून असे लक्षात येते कि आशीर्वाद म्हणजे
शब्दांच्या द्वारे विशेष देणग्या बहाल करणे, महत्व वाढवणे, व उणेपण भरून काढण्यासाठी काही विशेष सामर्थ्य स्थापित करणे. आशीर्वाद पूर्णपणे शुभ असतात व सदिच्छेचे
प्रगटीकरण करतात. व जे जे बोलले गेले आहे ते अधिकाराने बोलले असल्यामुळे ते पूर्ण होणारच असा विश्वास त्यातून व्यक्त होत असतो. कारण देव बोलला व ते सर्व पूर्ण झाले असल्याचे आपण पाहतो.
आशीर्वाद कोण देऊ शकतो: पवित्र शास्रात आशीर्वादाची अनेक उदाहरणे आहेत त्या वरून आपण समजून घेऊ शकतो कि कोण आशीर्वाद देऊ शकतो.जसे देव उत्पत्ती १:२८.मार्क १०:१६, याजक गणना ६:२२–२६. आई वडील उत्पत्ती २७:२३, अनुवाद ५:१६.देवदूत उत्पत्ती ३२:२८. वृध्द सर्वांना अगदी राज्याला देखील आशीर्वाद देऊ शकतात उत्पत्ती उत्पत्ती ४७:७, ४८:९, संदेष्ट उत्पत्ती२२:६,अनुवाद ३३:१, राजा १ राजे ८:५५, धार्मिक किंवा सरळमार्गी
नीती ११:११, सर्व ख्रिस्ती रोम १२:१४.
आशीर्वादाचा खरा श्रोत: प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही आशा जोतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते. याकोब १:१७. याचा अर्थ सर्व आशीर्वादाचा श्रोत देव आहे. कारण तोच सर्वांचा निर्माणकर्ता, व पालनहार आहे. परंतु त्याचे निवडलेले, ज्यांना त्याने धार्मिक ठरवले ते जेंव्हा आशीर्वाद देतात तेव्हा देव त्यांच्या शब्दांना खरे करतो.
तरी देवाने त्याच्या लोकांना आशीर्वाद देण्यासाठी याजकांची नियुक्ती केली असल्याचे बायबल स्पष्टपणे सांगते १ इतिहास २३:१३. १९७९ साली यरुशलेम येथील उत्खननात ख्रिस्त पूर्व ७०० वर्षा पूर्वीच्या; दोन रुप्याच्या पाट्या सापडल्या. त्या वर गणना ६:२४–२६ वचन कोरलेले सापडले याजक आशीर्वाद देण्यासाठी या वचनाचा उपयोग करीत, म्हणून या वचनांना इस्राएलात खूप महत्व असे.
खरा आशीर्वाद कोणता आहे : आज प्रथमदर्शनी; आम्ही आशीर्वादांना भौतिक स्वरूपात पाहतो. परंतु ख्रिस्ती व्यक्तीने याचे रहस्य समजून घेणे गरजेचे आह. खरा आशीर्वाद सोन्या रुप्यात नसून देवाच्या संगती जीवन जगण्यात आहे. देवामधील जीवन म्हणजे खरा आशीर्वाद व त्याचे आपल्या संगती आसने हेच खरे संरक्षण. दावीद प्रमाणे आम्ही सुद्धा त्या उत्तम मेंढपाळांच्या कृपा छायेत निश्चिंत जीवनाचा आस्वाद घ्यावा. येशू ख्रिस्त उत्तम मेंढपाळ आहे. योहान १०:११–१६.
प्रार्थना: प्रभू येशू तू माझा उत्तम मेंढपाळ आहे तुझी कृपादृष्टी मजवर ठेव तू माझ्या संगती आसने यातच मला खरे आशीर्वाद व संरक्षण आहे.माझ्या पित्या तूच माझ्या वैभवाचा श्रोत आहेस. माझ्या चुकांची पापांची क्षमा करून मला तुझ्या पितृत्वाने तृप्त कर.येशूच्या नावाने मागतो, आमेन.
रेव्ह कैलास [आलिशा ] साठे