उपवास व प्रार्थना कशी करावी?

उपवास व प्रार्थनेसाठी महत्वाचे मुद्दे !

प्रास्ताविक : आपण सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे की उपवास व प्रार्थने द्वारे आपण देवाच्या जवळ जाऊ शकतो , किंवा उपास व प्रार्थना आपल्याला देवाच्या जवळ घेऊन जाते. उपवास व प्रार्थना देवाशी आपला संबंध अधिक दृढ करते. देवाकडून सामर्थ्य प्राप्त करून घेण्याचा हा एक मार्ग आहे. उपवास म्हणजे फक्त अन्न त्याग नव्हे, परंतु देवाकडुन तृप्तता आणि व्यक्तित्वात बदलण्याचा अनुभव आहे. पहिल्या मंडळी मध्ये उपवास हा विश्वासणाऱ्यांसाठी एक नियमित सराव असायचा. यामुळे ते पवित्र आत्म्या मध्ये अधिक संवेदनशील असावयाचे, त्यांची जीवने प्रगतिशील होती आणि पाप व शापाच्या बंधनांचे साखळदंड तुटल्या जात.

उपवास प्रार्थना कशी करावी: आज आपल्याला सुध्दा पहिल्या मंडळी प्रमाणे सामर्थ्य असणे गरजेचे आहे. परंतु उपवास प्रार्थनेचे शिस्तबध्द जीवन नसल्यामुळे आपण आशीर्वादाच्या वाटेवर योग्यपणे चालू शकत नाही. आज यशया संदेष्ट्या प्रमाणे मोठ्याने ओरडून संदेश देण्याची गरज आहे. यशया ५८:१ सांगते : “कंठरव कर, कसर करू नकोस; आपला स्वर कर्ण्याप्रमाणे मोठा कर; माझ्या लोकांना त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यास त्याची पातके विदित कर. आज देवाच्या सेवकांनी मंडळीला तिचे अपराध पातके दाखवली पाहिजेत. यशयाच्या काळी लोक देवाबरोबर चालू इच्छित असत. परंतु देवाच्या इच्छेनुसार ते चालत नसल्यामुळे त्यांच्या हाती निराशा येत असे किंवा आपण म्हणू शकतो की देवाकडून त्यांना इच्छित फल प्राप्ती होत नसे. देव याविषयी यशयाला मार्गदर्शन करताना सांगतो की, माझे लोक माझ्याकडे दररोज येतात, ते माझे मार्ग ते जाणू इच्छितात; नीतीचे आचरण करणार्‍या व आपल्या देवाचे नियमशास्त्र न सोडणार्‍या राष्ट्राप्रमाणे ते माझ्याजवळ रास्त निर्णय मागतात; माझी समीपता ते इच्छितात, यशया ५८: २. ते उपवास प्रार्थना करतात, आपल्या जीवास पीडा देतात, परंतु उपवास प्रार्थनेच्या दिवशीही पवित्र जीवनाला प्रधान्य देत नाहीत, रोजच्या प्रमाणे ते कामात व्यस्त असतात, आपल्या मजुरांकडून काबाडकष्ट करून घेता, कटकटी करिता दुष्टपणानें ठोसाठोशी करतात. त्यामुळे उपवास प्रार्थनेत मी तुमचा शब्द ऐकत नाही. मला तुमचा उपवास व प्रार्थना संतोष देणाऱ्या नाहीत. तुमच्या उपवास प्रार्थनेत बाह्यत्कारी दिखावा आहे. मत्तय ६ ;१ ६ -१ ८ सांगते, “जेव्हा तुम्ही उपास करता तेव्हा तुम्ही ढोंग्यांसारखे चेहरा उदास करू नका. कारण आपण उपास करीत आहोत हे लोकांना दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हांला खरे सांगतो. त्यांना त्यांचे प्रतिफळ मिळाले आहे. तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा आपल्या डोक्याला तेल लावा आणि आपले तोंड धुवा. यासाठी की, तुम्ही उपास करता हे लोकांना दिसू नये तर तुमच्या गुप्त पित्याला दिसावे. मग तुमचा गुप्त पिता तुम्हांला प्रतिफळ देईल. योएल २ :१ २ -१ ३ सांगते, “परमेश्वराचा संदेश पुढीलप्रमाणे आहे: “मनापासून माझ्याकडे परत या. तुम्ही दुष्कृत्ये केलीत. रडा, शोक करा आणि उपवास करा. तुमचे कपडे फाडू नका, तर ह्रदये फाडा” परमेश्वराकडे, तुमच्या परमेश्वराकडे परत या. तो कृपाळू व दयाळू आहे. तो शीघ्रकोपी नाही. तो खूप प्रेमळ आहे. त्याने योजलेली कडक शिक्षा कदाचित् तो बदलेलही”.

उपास आणि प्रार्थना म्हणजे पश्चातापाने देवाला शरण जाणे आहे. आपण जे अन्यायी अत्याचारी जीवन जगत आहोत त्याबद्दल देवाकडे जाऊन क्षमा मागणे आहे, व त्याच बरोबर न्यायीपणाच्या कृती करणे गरजेचे आहे. क्षमा मागणे व आचरणात दुरुस्ती करणे आशा दोन्ही गोष्टी उपास व प्रार्थनेच्या वेळी व्हाव्यात अशी देवाची अपेक्षा आहे. देव म्हणतो, ” दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, जुवाच्या दोर्‍या सोडाव्यात, जाचलेल्यांना मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय?तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावे; तू लाचारांना व निराश्रितांना आपल्या घरी न्यावे; उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे; तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये हाच तो उपास नव्हे काय? यशया ५ ८ :६ -७

पुढे देव म्हणतो, “असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातेप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी नीतिमत्ता तुझ्यापुढे चालेल व परमेश्वराचा गौरव तुझा पाठीराखा होईल. तेव्हा तू हाक मारशील ती परमेश्वर ऐकेल; तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल, हा मी आहे. जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील; जर तू आपल्या जिवाला इष्ट ते भुकेल्यांना देशील, दुःखग्रस्त जिवांना तृप्त करशील; तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल, परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल, तो अवर्षणसमयी तुझ्या जिवास तृप्त करील, तुझ्या हाडांना मजबूत करील; तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्यांप्रमाणे होशील; पाणी कधी न आटणार्‍या झर्‍याप्रमाणे होशील, बहुत काळ मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुन्हा बांधतील; पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाये तू पुन्हा उभारशील; मोडतोडीचा जीर्णोद्धार करणारा, वस्ती होण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणारा, असे तुझे नाव पडेल. तू शब्बाथाची पायमल्ली करणार नाहीस, माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस, शब्बाथ आनंददिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान्य दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील; व त्या दिवशी आपले कामकाज करणार नाहीस, आपला धंदा चालवणार नाहीस, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाहीस; तर तू परमेश्वराच्या ठायी हर्ष पावशील; तू देशाच्या उच्च स्थलांचे जयोत्साहाने आक्रमण करशील, असे मी करीन; आणि तुझा पिता याकोब ह्याच्या वतनाचा तुला उपभोग घेऊ देईन; परमेश्वराच्या तोंडचे हे शब्द आहेत.” यशया ५ ८ : ८ -१ ४

याचा अर्थ आपण उपवास प्रार्थनेमध्ये देवाकडे जाताना पश्चतापी अंतःकरणाने जावे व आपल्या जीवन शैलीत सुधारणा करावी हे अपेक्षित आहे. परंतु पवित्र जीवन जगणे हे मनुष्याला देवाच्या कृपाप्रसादाशिवाय अश्यक्य आहे. आपण पहातो की कित्येक, भलेभले आचार्य, शास्त्री, पंडित, ज्ञानी, योगी, महायोगी पतित झाले आहेत. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, ” “माणसांना हे अशक्य आहे, ‘देवाला’ तर ‘सर्व शक्य आहे’.” मत्तय १९ :२६.प्रभू येशू वरील विश्वासाने पवित्र आत्म्याच्या योगे हे शक्य आहे. प्रेषित १ :८, सांगते, “पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”

म्हणून आपल्या जीवनात देवाच्या परिवर्तन करणाऱ्या सामर्थ्याचा अनुभव घेण्यासाठी उपवास व प्रार्थनेंत पवित्र आत्म्याच्या अभिषेकासाठी अवश्य प्रार्थना करावी.

उपवास व प्रार्थनेसाठी काही मुद्दे

अ) ताज्या व शक्तिशाली अभिषेकासाठी प्रार्थना करा: आपल्या खांद्यावरचा भार व मानेवरचे जू आपल्या मधील सामर्थ्याने मोडले पाहिजे. यशया १० :२७. परंतु हे लक्षात घ्या आपले युध्द सैतानाच्या बरोबर आहे. रक्तमांसाच्या माणसांबरोबर नाही, सत्तांबरोबर, काळोखातील जगाच्या अधिकाऱ्यांबरोबर, व आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे, इफिस ६ :१० -१८. म्हणून देवाच्या आत्म्याच्या शक्तिशाली अभिषेकाशिवाय हे युध्द लढता येत नाही, जू मोडता येत नाही. संत पौल म्हणतो, “ह्या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते, त्या [प्रभू येशू ख्रिस्ताच्या] पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की, त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हांला असे दान द्यावे की, तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे;” इफिस ३: १४ -१६.

देवाचे शक्तिशाली प्रगटीकरण व्हावे म्हणून प्रार्थना: प्रियांनो, आपण आपल्या देवाला ओळखणारे असलो पाहिजेत. देव म्हणतो,“शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे, राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल.” स्तोत्र ४६ :१०. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, “मी उत्तम मेंढपाळ आहे; जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात; आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो”.योहान १०:१४ -१५ . संत पौल प्रार्थनेत खंड पडू न देता हेच वरदान मागतो की, ‘आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता, ह्याने मंडळीला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा; म्हणजे मंडळींचे आत्मिक नेत्र उघडतील व पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, ‘पवित्र जनांमध्ये’ त्याने दिलेल्या ‘वतनाच्या’ वैभवाची समृद्धी केवढी, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणांविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय हे आपण त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. इफिस १ :१६ -१९ आपण आपल्या देवाबद्दल अज्ञानी असू नये. दावीद राजा देखील हीच प्रार्थना देवाकडे करीत असे, तो म्हणतो, ” तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. स्तोत्र ११९ :१८ म्हणून देवाविषयीचे शक्तिशाली प्रगटीकरण आम्हांला व्हावे अशी प्रार्थना आपण केली पाहिजे.

धार्मिकतेची भूक वाढावी म्हणून प्रार्थना करा: आपल्या जीवनात धार्मिकतेची भूक असली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, “जे नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील,” मत्तय ५ :६. अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैसा नसलेले तुम्ही या; सौदा करा, खा; या, पैशावाचून व मोलावाचून द्राक्षा-रसाचा व दुधाचा सौदा करा! जे अन्न नव्हे त्यासाठी दाम का देता? ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा; तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन करून संतुष्ट होवो. यशया ५५ :१ -२ धार्मिकतेच्या भुकेच उत्तम उदाहरण म्हणजे दावीद राजा तो म्हणतो, “हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठी लुलपते तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे.माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तान्हेला झाला आहे; मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन?” स्तोत्र ४२ :१ -२. पुढे तो स्तोत्र ६ १ :१ -२ मध्ये म्हणतो, “हे देवा, तू माझा देव आहेस; मी आस्थेने तुझा शोध करीन; शुष्क, रुक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे.अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्रस्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे.”

देवाबरोबर आपले नाते दृढ असावे व रोज त्याच्या बरोबर चालावे म्हणून त्याच्याकडे कृपा मागा: प्रभू येशू म्हणतो, “तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्यावाचून त्याला आपल्याआपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हांलाही देता येणार नाही.”योहान १५ : ४ . संत पौल म्हणतो, “आत्म्याला विझवू नका;” १ थेस ५ :१९. दावीद राजा देवाबरोबरच्या आपल्या नात्याला फार महत्व देतो.परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन; ते हे की, आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी; म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन,” स्तोत्र २७ :४. देवा! तुझी प्रेमदया किती मौल्यवान आहे.मानवजात तुझ्या पंखांच्या सावलित आश्रय घेते. ते तुझ्या घरातल्या समृद्धीमुळे तृप्त होतील. तू आपल्या बहुमोल नदीतून त्यांना मनसोक्त पिण्यास देशील. कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे. तुझ्या प्रकाशात आम्ही प्रकाश पाहू. स्तोत्र ३ ६ : ७ -९ जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील; तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे; तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत.स्तोत्र १६ :११.


देवाने शक्तिशाली मार्गाने तुमच्या व तुमच्या सभोवतालच्या लोकात कार्य करावे म्हणून प्रार्थना करा: जखऱ्या ४ :६ सांगते,बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. येशू ख्रिस्ताने म्हटले तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत; ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा,”मत्तय ९ : ३७-३८. ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षित केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही; त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. योहान ६ :४४.


देवाने आपले दृष्टीकोन बदलावेत व आपले विचार आणि इच्छा त्याच्या इच्छेनुरूप असाव्यात अशी प्रार्थना करा: आपले ज्ञान हे फारच तोडके आहे अध्यात्मिक जीवन जगण्यासाठी देवाचे मार्गदर्शन आपल्याला कळाले पाहिजे. देवाचे वचन सांगते, “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या”,रोम १२ :२. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत; माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत. यशया ५५ :८ -९. संत पौल म्हणतो, ‘आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देहस्वभावाप्रमाणे युद्ध करत नसतो. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्वकाही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो; २ करिंथ १० :३ -५. “बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदर णीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‍गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा”. फिलिपी ४ :८ .


जीवनात प्रगती साठी प्रार्थना करा. मंडळीतील व कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसाठी प्रार्थना करा : प्रत्येक गोष्टी साठी प्रार्थना करा. एज्रा संदेष्ट्याने आपला प्रवास देवाच्या हाती कसा दिला ते पहा. तो म्हणतो, तिथे अहवा नदी किनारी मी सर्वांनी उपवास करावा अशी घोषणा केली. देवापुढे नम्र व्हावे आणि आमची मुलंबाळे, साधनसंपत्ती यांच्यासह आमचा पुढचा प्रवास सुखरुप व्हावा हा आमचा उपवासामागचा होतू होता. प्रवासातल्या सुरक्षिततेसाठी राजाक़डे सैनिक आणि घोडेस्वार मागायचा मला संकोच वाटला. वाटचालीत शत्रूचा धोका होता. संरक्षण मागयचा संकोच वाटण्याचे कारण म्हणजे आम्ही राजा अर्तहशश्तला म्हणालो होतो, “जो देवावर विश्वास ठेवतो त्याची देव पाठराखण करतो. पण देवाकडे पाठ फिरवली तर देवाचा कोप होतो.” म्हणून आम्ही आमच्या प्रवासासाठी उपवास आणि देवाची प्रार्थना केली. परमेश्वरानेही आमचा धावा ऐकला, एज्रा ८ :२ १ -२ ३. अशाच प्रकारे आपण आपल्या सर्व मागण्या देवाला कळवू शकतो. सैतानाने आपल्या जीवनाला घातलेल्या मर्यादा येशूच्या नावाने तोडा. सापाच्या आत्म्याला येशूच्या नावाने घालवा.

देवाने आपल्याला आपल्या सरहद्दी वाढवण्याचे अभिवचन दिले आहे, तो म्हणतो, “हे सीयोने, जागी हो; आपल्या बलाने युक्त हो; हे यरुशलेमे, पवित्र नगरी, आपली सुंदर वस्त्रे परिधान कर; कारण ह्यापुढे बेसुंती किंवा अशुद्ध असा कोणी तुझ्या ठायी प्रवेश करणार नाही. अंगाची धूळ झाड; हे यरुशलेमे, उठून बस; सीयोनेच्या बंदिवान कन्ये, आपल्या गळ्याची बंधने सोडून टाक”, यशया ५ ४ :१ -२ .”मी तर परराष्ट्रांना तुझ्यापुढून घालवून देईन व तुझी सरहद्द वाढवीन; वर्षातून तीनदा तू आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर हजर होण्यास जाशील तेव्हा कोणी तुझ्या भूमीचा लोभ धरणार नाही”. निर्गम ३४ :२४. म्हणून वाढीसाठी प्रार्थना करावी. “तू आपले डोळे वर करून चोहोकडे पाहा; ते सर्व एकत्र होत आहेत, तुझ्याकडे येत आहेत; तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणत आहेत.हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल, कारण समुद्राकडून विपुल धन तुझ्याकडे लोटेल, राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे येईल. उंटांच्या झुंडी, मिद्यान व एफ्रा येथील तरुण उंट तुला व्यापून टाकतील. लोक सोने व ऊद घेऊन शबा येथून येतील, परमेश्वराचा आनंदाने गुणानुवाद करतील. केदारचे सर्व कळप तुझ्याजवळ एकत्र होत आहेत; नबायोथचे एडके तुझ्या कामी येतील; ते मला पसंत पडून माझ्या वेदीवर चढतील, आणि मी आपल्या सुंदर मंदिराची शोभा वाढवीन. जे मेघाप्रमाणे धावत आहेत, कबुतरे आपल्या घरकुंड्यांकडे उडून जातात तसे जे उडत आहेत ते कोण? खरेच, द्वीपे माझी वाट पाहत आहेत; तुझा देव परमेश्वर ह्याच्या नामासाठी, इस्राएलाच्या पवित्र प्रभूसाठी तार्शीशची गलबते तुझ्या पुत्रांना त्यांच्या सोन्यारुप्यांसहित दुरून घेऊन प्रथम येत आहेत, कारण परमेश्वराने तुला वैभवयुक्त केले आहे”,यशया ६० :४ -९.

अध्यात्मिक गोष्टींना महत्व देता यावे म्हणून देवाकडे संवेदनशीलता व कृपा मागा: आत्मिक जीवन जगताना आम्ही संवेदनशील असले पाहिजे, आपले आत्मिक नेत्र देवाच्या कृपेने उघडे असावेत. ‘मनुष्य भाकरीने जगतो असे नाही तर देवाच्या वचनाने जगेल.” मत्तय ४ :४. देवाची इच्छा आहे की आपण नम्र असावे, आपल्याला देवाचे प्रेम व सामर्थ्य कळावे. अनुवाद 8:3 सांगते, “परमेश्वराने तुम्हाला लीन केले, तुमची उपासमार होऊ दिली आणि मग, तुम्ही अन् तुमचे पूर्वज यांना माहीत नसलेला मान्ना तुम्हाला खाऊ घातला. माणूस फक्त भाकरीवर जगत नाही तर परमेश्वराच्या मुखातील वचनाने जगतो हे तुम्हाला कळावे म्हणून त्याने हे सर्व केले”. देवाची इच्छा आहे की आपण आपल्या लोंकांसाठी मध्यस्थी करावी. दानिएल ९ : ३ -४ सांगते, “मग मी देव माझा प्रभू ,याची प्रार्थना केली व कृपेची याचना केली. मी उपवास केला व शोकप्रदर्शक कपडे घातले. मी डोक्यात धूळ टाकून घेतली. मी परमेशवराची, माझ्या देवाची, प्रार्थना केली मी त्याच्याजवळ माझ्या पापांचा पाढा वाचला मी म्हणालो परमेशवरा तू महान आणि भीतिदायक देव आहेस. तुझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांवर दया व प्रेम करून तू तुझा करार पाळतोस तुझ्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांबरोबरही तू कराराचे पालन करतोस”. देवाच्या कार्यात उपास प्रार्थनेने सहभागी असावे. अंत्युखिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते. ते पुढीलप्रमाणे बर्णबा, निग्र शिमोन, लूक्य कुरेनेकर, मनाएन (जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला), आणि शौल.ही सर्व माणसे देवाची सेवा करीत असत व उपास करीत असत. पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौलाला माझ्याकडे द्या. एक खास काम त्यांच्याकडून मला करवून घ्यायचे आहे. हे काम करण्यासाठी मी त्यांना निवडले. आहे” म्हणून मंडळीने उपास व प्रार्थना केल्या, त्यांनी बर्णबा व शौल यांच्या डोक्यांवर हात ठेवून प्रार्थना केली, मग त्यांना पाठवून दिले. प्रेषित १ ३:१-३

शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य मिळावे म्हणून प्रार्थना करा: देवाचे वचन सांगते आनंदी हृदय उत्तम औषधी आहे, व खिन्न हृदय हाडे शुष्क करते नीती २२ :१ ७. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला दबावाने भरलेल्या जीवनातून मुक्त करतो, तो म्हणतो, “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे ‘तुमच्या जिवांना विसावा मिळेल.’कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे,” मत्तय ११ :२८ -३० देवाची ख्रिस्त येशू मध्ये हीच इच्छा आहे. यिर्मया ३ ० :१ ७ सांगते ‘मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बर्‍या करीन, असे परमेश्वर म्हणतो; यिर्मया ३ ० :१ ७. तसेच स्तोत्र १ ४ ४ :३ सांगते “भग्नहृदयी जनांना तो बरे करतो; तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो”.स्तोत्र १०३:१-६सांगते आपल्याला देवाने दिलेल्या परिपूर्ण आरोग्यासाठी त्याचा धन्यवाद करा. “हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर; हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस; तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो; तो तुझे सर्व रोग बरे करतो; तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धरतो; तो तुला दया व करुणा ह्यांचा मुकुट घालतो; तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो; म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. जाचलेल्या सर्वांसाठी परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्ये करतो”.

सैतानी किल्ले उध्वस्त व्हावे म्हणून प्रार्थना: मुलांनो, कोणी तुम्हांला बहकवू नये; जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणाराही नीतिमान आहे. पाप करणारा सैतानाचा आहे; कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला. १ योहान ३ : ७ -८. आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्वकाही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो; २ करिंथ १ ०: ४ -५ . शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकार्‍यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.ह्या कारणास्तव तुम्हांला वाईट दिवसांत प्रतिकार करता यावा व सर्वकाही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री घ्या. तर मग आपली कंबर सत्याने कसा; नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा; शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा, आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हांला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन, ही घ्या. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा, इफिस ६ :१०-१८. त्या दिवशी लोकांची उन्मत्त दृष्टी नीच होईल, माणसांचा गर्व उतरेल; व परमेश्वरच काय तो उच्च स्थानी विराजेल. गर्विष्ठ, उन्मत्त व चढेल अशा सर्वांसाठी सेनाधीश परमेश्वराने दिवस नेमला आहे; त्या दिवशी ते नीच होतील, यशया २ :१ १ -१ २. देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल, याकोब ४ :७. सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो.त्याच्याविरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा; कारण तुम्हांला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दु:खे भोगावी लागत आहेत. आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने येशू ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दु:ख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला पूर्ण, दृढ व सबळ करील. १ पेत्र ५ :८ -१ ०. त्याला त्यांनी कोकर्‍याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले; आणि त्यांच्यावर मरायची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जिवावर प्रीती केली नाही. म्हणून ‘स्वर्गांनो’ व त्यांत राहणार्‍यांनो, ‘उल्लास करा!’ पृथ्वी व समुद्र ह्यांत राहणार्‍यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुमच्याकडे आला आहे,” प्रगटी १२ :११-१२. सैतानाला दटवा जसे येशू ख्रिस्ताने त्याला दटावले. मत्तय १ ६ :२ ३ व ४ :१ ० -१ १ .

व्यसनांपासून मुक्तता मिळावी म्हणून प्रार्थना: फसू नका, “कुसंगतीने नीती बिघडते.”१ करिंथ १५ :३३. “सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे,” तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही; “सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे,” तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही, १ करिंथ ६ :१२. जे फार वेळपर्यंत द्राक्षारस पीत राहतात, जे मिश्रमद्याचा पूर्ण आस्वाद घेण्यास जातात त्यांच्या. द्राक्षारस कसा तांबडा दिसतो, प्याल्यात कसा चमकतो, घशातून खाली कसा सहज उतरतो हे पाहत बसू नकोस. शेवटी तो सर्पासारखा दंश करतो, फुरशाप्रमाणे झोंबतो, नीती २३ : ३० -३२. द्राक्षारस चेष्टा करणारा आहे, मद्य गलबला करणारे आहे, त्यांच्यामुळे झिंगणारा शहाणा नव्हे, नीती २०:१. “जेव्हा जेव्हा तुम्ही, म्हणजे तू व तुझे मुलगे दर्शनमंडपात जाणार असाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षारस अथवा मद्य पिऊ नये; प्याल तर मराल; हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय; ह्या प्रकारे तुम्ही पवित्र व सामान्य, अशुद्ध व शुद्ध ह्यांमधील भेद जाणावा; लेवीय १०:९. मधाचे अतिसेवन करणे बरे नाही; तसेच मनुष्याने आपल्या गौरवाच्या पाठीस लागण्यात काही अर्थ नाही. ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही, तो गावकुसू नसलेल्या पडक्या गावासारखा आहे. नीती २५ :२ ७ :२ ८

जीवन निर्भय असावे म्हणून प्रार्थना : परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे; मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे मी कोणाचे भय धरू? स्तोत्र २७ :१. बायबल आम्हाला भयमुक्त / निर्भय जीवन जगण्यास सांगते. परंतु आमचे धाडस देवाच्या सहाय्यावर व त्याच्या वरील विश्वासावर अवलंबून आहे. मी तुला आज्ञा केली आहे ना? खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.”यहोशवा १ :९. दावीद राजा आपली हिम्मत स्तोत्र २३ मध्ये व्यक्त करतो. संत पौल आम्हांला चिंतकाळजी मुक्त जीवन जगण्याचे आवाहन करतो. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.फिलपी ४ :६-७.

विश्वासात वाढ व्हावी म्हणून प्रार्थना: विश्वासावाचून त्याला ‘संतोषवणे’ अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणार्‍याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणार्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे. इब्री ११:६. १ योहान ५ : १ ३ -१ ५ मी हे तुम्हाला लिहिले आहे ह्याचे कारण हे आहे की, जे तुम्ही देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवता, त्या तुम्हाला समजावे की, तुम्हाला सार्वकालिक जीवन आहे. आणि आपल्याला त्याच्यासमोर धैर्य आहे, कारण आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकतो. आपण काही मागितले असता तो आपले ऐकतो हे जर आपण जाणतो, तर आपण हे जाणतो की, आपण त्याच्याकडून ज्या मागण्या मागितल्या त्या आपल्याला मिळाल्या आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole